आजही अतुल तण-तण करत आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बरळत अपार्टमेंटच्या पायऱ्या चढत होता.
जेव्हा-जेव्हा तो नाईट शिफ्ट संपवून सकाळी आठेक वाजेच्या सुमारास घरी यायचा तेव्हा बऱ्याच वेळा हे घडायचे.
आजही कार पार्क केल्याबरोब्बर वरून कुठून तरी चुगळलेल्या वर्तमानपत्राचा एक बोळा अचूकपणे कारच्या बोनेटवर येऊन पडला.अतुल एका इस्टेट एजंटच्या माध्यमातून तीन महिन्यांपूर्वीच या अपार्टमेंट मध्ये राहायला आला होता.
त्याची कोणाशीच फारशी ओळख नव्हती.
मुळात ओळख असायला या अपार्टमेंट मध्ये फारसे कोणी राहतच नव्हते.
एका मजल्यावर फक्त दोन फ्लॅट्स असलेल्या या सात मजली अपार्टमेंटची जमीन वादग्रस्त असल्यामुळे त्यातले बरेचसे फ्लॅट्स रिकामेच होते.
सर्व फ्लॅट्स विक्री झालेलेच नव्हते.
अपार्टमेंटच्या पार्किंग मध्येही बांधकामाचे बरेचसे साहित्य, गज, सिमेंटची पोती, विटा आणि रेतीचा खच पडून होते.
वॉल कंपाऊंडचेचे काम अर्धवट झाले होते.
बिल्डिंग मध्ये असणारे वॉचमन जोडपे अजून कुठेतरी कामाला जात असल्याने अतुलला त्यांचे क्वचितच दर्शन व्हायचे.
वॉचमनची दोन मुले नंतर उशिरा शाळेत जात असावीत म्हणून ती कधीतरी घरी असायची.
कधीतरी बाहेर अभ्यास करत बसलेली दिसायची.
अतुल कोहिनूर-A मध्ये राहत होता.
कोहिनूर-B ची पण अवस्था काही वेगळी नव्हती.
अतुलला टूबीएचकेचा फ्लॅट अत्यंत कमी दरात भाड्याने मिळाला म्हणून तो अगदी आनंदात इथे राहायला आला होता.
शिवाय त्याला हवी असणारी मनशांती सुद्धा इथे होती.फक्त एकच गोष्ट त्याला खटकत होती ती म्हणजे वरून भिरभिरत येणारा तो कागदाचा बोळा.
कारण ही गोष्ट एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा त्याने अनुभवली होती.
त्यामुळे राग आणि कुतूहल अशा संमिश्र भावना त्याच्या मनात होत्या.
बरं, पायऱ्या चढून वर यावे आणि अंदाजाने घर शोधून बोळा फेकणाऱ्याला ओरडावे तर चक्क ते फ्लॅट्स कडी कुलूपात बंद दिसायचे.
त्यामुळे हा उद्योग कोणी चालवला आहे हे समजायला मार्ग नव्हता.
त्या कागदाच्या तुकड्यात कचरा, केस, खरकटे किंवा तत्सम त्याज्य पदार्थच असणार म्हणून अतुलचा संताप होत होता.
YOU ARE READING
ट्रॅप ✔️
Mystery / Thrillerअतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि...