* इमानदारीचं फळ *
सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.
भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती.
"काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"
त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली.
"तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."
शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं.
"थँक्स बेटा.काय नाव तुझं?"
"सोनाली"
तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.
संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला.
अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं.
"काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं.
"हे पाकिट तुमचं आहे?"
शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला.
"हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?"
"त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.
त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.
ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली.
"कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.
संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं.
दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली.
"शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"
धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला.
"हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला.
" बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"
शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना.
" आईस्क्रीम चालेल?"
"हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली.
"चला तर मग.बसा गाडीत"
त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.
शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.
ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले.
" तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"
" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला.
" तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."
शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला.
"मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!"
शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली.सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं.
"आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं.
"काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.
ही गोष्ट आहे मला भावलेली...
तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा व शेअर करा...
आणि पेज लाईक करायला विसरु नका व रोज अश्या मन वेधून घेणाऱ्या कथा वाचा....