"ऐक ना रे...थोड समजून घे ना...." अवंतीने विनवले. रडून रडून तिचे डोळे आणि गोरापान चेहरा लाल झाला होता. आसुंचे ओघळ गळ्यावरून ओघळून टॉपच्या कडा भिजलेल्या होत्या. पिंजरलेल्या तिच्या सोनेरी केसांना सावरायचही भान नव्हतं तिला. केविलवाण्या चेहऱ्याने ती बावरून राहुलकडे आर्जव करत होती.
"काय ऐकायचं...?? आणि किती वेळा तेच तेच सांगायचं तुला ??" राहुलच्या स्वरात तीव्र नाराजी होती. चिडलेल्या राहुलचा गोरापान चेहरादेखील संतापाने लालबुंद झाला होता. कपाळावरच्या सूक्ष्म आठयांआडून एक शिर ताडताड उडत होती.
"राहुल आय एम सॉरी..... रिअली.... बट यू अल्सो नो ना....." अवंती अजिजीने बोलायचा प्रयत्न करत होती. पण राहुल काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता.
"आय डोन्ट नो एनीथिंग.... यू डीसाईड हू डू यू रिअली वॉन्ट...?" राहुल रागाने किंचाळला. वैतागत पाय आपटत त्याने रागाने दार ढकलल आणि बाहेर निघून गेला. त्याच्या ह्या भयानक अवताराला घाबरलेली ती धाडकन सोफ्यावर कोसळली.
दोन वर्षांपूर्वी राहुल आणि अवंतीच अरेंज मॅरेज झालेलं. अवंती म्हणजे एक साधी सरळ आणि आपल्या कामाशी काम ठेवणारी मुलगी. पण प्रचंड बडबडी म्हणून मित्रपरिवारही बराच विस्तीर्ण. त्याउलट राहुल एकदम मितभाषी, सतत आपल्या कामात बुडालेला आणि साधारण माणूसघाणाच. फक्त मुलाचा भरभक्कम पगार आणि कुंडल्या जुळल्या म्हणून घरच्यांनी घाईने लग्न लावून दिलेलं. तिच्या मनाचा, तिच्या आवडीचा कोणी तसाही कधी विचार केला नव्हता त्यामुळे लग्नासाठी अर्थात तिला कोणी मत विचारायची तसदी घेतली नाही. कुंडलीतील सगळे गुण जुळले परंतु आजतागायत मन काही जुळल नव्हतं.
अवंतीची लग्नाबद्दल काही छोटीशी गोड स्वप्न होती. अवंती, नवरा आणि छोटंसं घरकुल.....त्या घरात दुडूदुडू चालणार छोटंसं बाळं......थोडस गोड, थोडंसं आंबट, थोडंसं तिखट..... असच काहीस..... पण तिच्या स्वप्नातल्या संसारात राहुल कुठेच बसत नव्हता. ती खूप प्रयत्न करायची त्याच्या जवळ येण्याचा, त्याला समजावून घ्यायचा पण तो सतत तिच्यातील कमीपणा अधोरेखित करायचा. तिची हौसमौज पुर्ण करन तर दूरची गोष्ट पण बायको म्हणून तोंडदेखली किम्मत पण नाही मिळायची तीला.