सगळ्यांची खोपा घालण्याची गडबड सुरू झाली... प्रत्येक जण आपापली खोप उभारून बाजार करण्यासाठी जवळच्या गावाकडं जाऊ लागला. प्रत्येक टोळी मध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या जास्तच होती. त्यामुळे जवळच कुठला दारूचा गुत्ता आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा टोळीतील काही तरुण पोरांनी जायचं ठरवलं.
त्या तरूणांमध्ये खदिर आघाडीवर होता... मिळून दहा ते पंधरा जणांच्या तरुणांचं ते टोळकं आणि त्या टोळक्याचा खदिर हा प्रमुख होता. खदिर म्हणेल तीच पूर्वदिशा. खदिर सुद्धा बायकापोरांना गावाकडं ठेवूनच कारखान्यावर आला होता स्वभावाने तसा तो खूप प्रेमळ पण त्याच्या आयुष्यात त्याला नडलेली एकच गोष्ट ती म्हणजे त्याची दारूची सवय. दारू पिण्याचे भयंकर व्यसन त्याला लागलं होतं.
अख्या कारखाना भागात वन वन करत आमच्या इथं येऊन पोहोचले. संभा शेठ कारखान्यावर सीझनमध्ये दारूचा गुत्ता चालवायचा. मी त्याच्याकडेच कामाला होतो. अरे हो मी सगळ्यांची ओळख करून देता देता माझी स्वतःची ओळख करून द्यायला विसरलोच की..... माझं नाव बट्ट्या आता तुम्ही म्हणाल की हे नाव कसलं... आई-बापाविना वाढलेल्या पोर मी हे नाव मला कोणी दिलं ते सुद्धा मला आठवत नाही. गल्लीतल्या चार पोरांच्या संगतीने शाळेत गेलो आणि लिहायला वाचायला शिकलो. शाळेतलं जास्त काही कळत नव्हतं पण माणसाच्या चेहऱ्यावरचं दुःख कागदावर उतरवायला मला खूप आवडायचं. त्यातूनच लिहायची आवड तयार झाली. संभा शेठकड कामाला लागतानाच शेठ कडून गुत्त्यावर असतानासुद्धा फावल्या वेळेत लिहायची वाचायची परवानगी घेतली. शेठ सुद्धा भला माणूस त्यांन सुधा परवानगी दिली चांगला पन्नास रुपयाचा ट्रायमॅक्स पेन आणून दिला लिहायला मोठाली वही दिली.
अन पहिल्या दिवसापासूनच चालू केलं लिहायला.....
आमचा दारूचा गुत्ता कारखान्याच्या राठेगावकडील बाजूस पंक्चर वाल्याच्या दुकानाला लागूनच होता. कारखान्याकडून येणाऱ्या त्या दहा ते पंधरा जणांना बघून हे पक्के बेवडे आहेत आणि हे आपल्याच शोधात येत आहेत हे मी ताडलं.
ते सगळे आमच्या दुकानाच्या जवळ येताच त्यातील उंचीने बुटका अन विचित्र अशा दिसणाऱ्या तरुणांन पुढे येऊन विचारलं....
सेठ नमस्ते यहा माल कहां मिलेगा?
माल तो बहुत जगह मिलता है लेकिन सवाल यह है कि आपको कौन सा माल चाहिए....
वह बोले तो दारू चाहिए थी सेठ....
अरे फिर सही जगह पर आए हो अंदर आओ अंदर आओ.....
मेरा मेरा नाम खदीर है जी... हम सब बीड़ से आए हैं...
त्या टोळक्यातल्या सगळ्यात पुढे असलेल्या त्या बुटक्यान आपली ओळख संभा शेठला करून दिली.
एका वेळेस इतक्या जणांना दारू प्यायला आलेल बघून मी आता मात्र जाम खूष झालतो.
संभा शेठन सगळ्यांची नाव विचारून ओळख करून घेतली.... दिवस असो किंवा रात्र 24 तास आपला दारूचा गुत्ता चालू राहील हे सांगून त्यांना दारू प्यायला येण्याचं आमंत्रण देऊन टाकलं. दारूच्या बाटलीच्या दरावर सुद्धा चांगली तासभर चर्चा रंगली पण दरात मात्र संभा शेठण माघार न घेता 80 रुपयाला मिळल यावर तो ठाम राहिला. संभा शेठ मुळचा हुशार माणूस. जमाव बघताच तो बुटका यांचा प्रमुख असला पाहिजे आणि त्याला बाटलीत उतरवला की बाकीचे सगळे आपोआप आपल्याकडेच दारु घ्यायला येतील हे त्यांन ओळखलं. अन त्या बुटक्याला रोज स्पेशल चकना देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या टोळीतील सगळ्यांनी माझ्याकडेच दारू प्यायला आलं पाहिजे हे कबूल करून घेतलं.
एकाच वेळी 10 कॉटर घेऊन ते सगळे निघून गेले. सुरवातीच्या दिवसात इतकं मोठं कस्टमर सापडलं म्हणून मी आन शेठ जाम खुश झालो. पण त्यातला एक जण मागेच थांबला. तो का थांबला असेल याचा विचार करण्याची जबाबदारी माझी होती... पण मला मात्र खदीरचा स्वभाव जाम आवडला होता. खदिर नावाचं रसायन फारच अजब होतं, दिसायला कितीजरी विचित्र असला तरी त्याच मन मात्र निखळ होतं, त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा अहंकार कुठल्याही प्रकारची वाईट भावना मला तात्काळ तरी दिसली नाही.
दुकानाच्या तसेच कारखान्याच्या आसपास एका दिवसात जवळजवळ सातशे ते आठशे खोपा उभारल्या गेल्या होत्या. अनेक जणांचे संसार तिथं नावारूपाला आले होते. सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण दरवळत होतं. दिवसा संभा शेठ आणि रात्री मी असा आमचा दुकानाचा व्यवहार सांभाळण्याचा नियम ठरला होता. संभाशेठ सकाळी दहाला कारखान्यावर येई. आणि मी अंघोळीला घरी जात असे.... मग मला परत यायला सायंकाळचे पाच वाजत. सकाळी दहा ते रात्री बारा पर्यंत संभाशेठ दुकानावर असे.
संभाशेठ मेरा नाम खलील है....!
त्या गॅंग मधील मागे थांबलेल्या इसमाने आपल नाव सांगितलं...
आपको देखकर तो नहीं लग रहा कि आप गन्ना तोड़ने आए हो... कहीं ऐसा तो नहीं कि आप उस टोली के मुकादम हो...?
जी नहीं सेठ.... मैं भी गन्ना तोड़नेच आया हूं. मगर मजबूरी से नहीं शौक से।
मेरा काम इन सबसे अलग होता है। आप मेरी गिनती इन सब में मत कीजिएगा। मैं ज्यादातर तो पीता नहीं मगर हां कभी-कभार मेरे पास पैसे ना हो तो उधार दीजिएगा जरूर आपके पैसे डूबेंगे नहीं।
हां वह तो चंद दिनों में पता चल ही जाएगा कि किस का व्यवहार सबसे अच्छा है। लेकिन एक बात तो तय है भाई साहब, शुरुआत के 15 दिनों में हम किसी को भी उधार नहीं देते 10.. 15 दिन गुजरने दो तब तक हम अंदाजा लगाते हैं कि कौन कैसा है। और उसके बाद ही उधारी का सिलसिला चालू होता है।
भला ठीक है सेठ चलता हूं इस बार के लिए खाली एक क्वार्टर दीजिएगा यह लो ₹80 रुपए ।
संभा शेठ बरोबर बोलता बोलता रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बायांच्याकडे खलील ज्याप्रमाणे बघत होता.. त्याच्या वरूनच मी ओळखलं की हा पक्का बाईलवेडा असणार आहे. अन संभा शेठ ज्याप्रमाणं त्याच्याबरोबर हिंदीत बोलत होता त्यामुळे मला शेठच कौतुक सुद्धा वाटलं.
दिवस असेच सरत होते.
एका सकाळी संभा शेठ पाचलाच दुकानावर हजर झाले... व्यायाम करून झाल्यावर सरळ ईकडं आले होते. मग काय तासभर आमची मैफिल रंगली. दुकानावर का रात्री उशिरा येणाऱ्या कस्टमर आणि प्रत्येक कस्टमरची दर्द भरी कहानी थोडक्यात संभा शेठला सांगू लागलो. साधारण सहा वाजण्याच्या सुमारास मी दुकानावरून खदिर ची टोळी जिकडं आहे त्या बाजूला चालत निघालो.... कारखान्याचं मेन गेट लागायच्या अगोदर डाव्या बाजूला वळसा घेऊन सरळ पुढ चालत गेलं की अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर खदीर ची टोळी उतरली होती. सकाळच्या वातावरणातील गारवा अंगावर शहारे आणत होता सगळं कसं प्रसन्न वाटत होतं. मी माझ्याच धुंदीत चालत चालत कधीचा खदिर च्या टोळीजवळ येऊन पोहोचलो हे मला सुद्धा कळालं नाही.
टोळीवर सगळीकडे शांतता होती बहुतेक सगळेजण फडात गेले असतील... तीन नंबरच्या लाईन मधील शेवटच्या खोपी जवळ मला जरा हालचाल जाणवली जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाआड उभा राहून मी समोर बघू लागलो.
सकाळच्या कोवळ्या उन्हात पूर्ण पणे न्हालेली, उंच सोनेरी कांती आणि शेलाटी बांधा घेऊन एखाद्या दिमाखदार हंसासारखी मंद, पण आत्मविश्वासाने चालत ती खोपी मधून बाहेर आली. केस मोकळे सोडलेले. आपल्या मादक शरीराला व्यवस्थित पणे साडीमध्ये गुंडाळून त्याच्या सौंदर्याचा तजेला वातावरणात पसरवत ते वातावरण धुंद करत ती खोपिकडून रस्त्याकडे निघाली होती. तिच्या अंगप्रत्यंगांचे उठावही चांगलेच कमनीय होते. चालतांना तिच्या अंगावरच्या मदनकुंभांची अतिशय हलकी दोलने तिच्या शरीराच्या भयंकर मादकतेची खात्री देत होते. तिचा चेहरा उभा होता. ओठ ठसठशीत होते तर डोळे मोठाले आणि पाणीदार होते. ती हसली की नक्कीच तिच्या एका गालावर खळी पडत असणार असे जाणवत होते.
तिचा चालताना निघणाऱ्या कमरेचा हेल मला वेडावत होता. तिची चाल अप्रतिम होती कि मला ती अप्रतिम वाटत होती ह्याचा निर्णय आजही माझे मन करू शकत नाही.
पण एक मात्र खरं आहे कि मी त्यावेळी भान हरपून तिला बघत होतो, इतकी सुंदर स्त्री मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नव्हती. अन त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारखान्यावर ऊस तोडायला येणारी ही सुंदर बाई कोण असेल ? याची उत्सुकता माझ्या मनात खूप मोठ्या प्रमाणात दाटून आली.
माझं वय तसं जास्तही नव्हतं आणि कमीही नव्हतं मी जेमतेम एकोणीस वर्षांचा असेन. आणि त्यामुळेच माझ्या शरीरात कंपन निर्माण झाली ती त्या समोरच्या बाईला बघूनच. माझा जीव अगदी कासावीस झाला. लवकरात लवकर जाऊन संभा शेठच्या कानावर ही बातमी घातली पाहिजे, म्हणून ती गेली त्याच्या दुसऱ्या बाजूने मी रस्त्याकडे गेलो आणि सरळ दुकानाची वाट धरली.