भूकबळी

1.2K 4 2
                                    

" आह..." हात हवेत पसरवत अंगाला अळोखेपिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा अंदाज घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबरबँड एव्हाना घरंगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले चार पाच केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यांत गच्च पकडून रबराच्या साहाय्याने तिने घट्ट अंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा जरासा बाजूला केला. लॉकडाऊन असल्यामुळे निदान आतातरी सगळे घरात बसले असतील ही तिची पोकळ अपेक्षा बाहेरून भसकन नाकात शिरलेल्या सिगारेटच्या वासाने फोल ठरवली.

' सदानकदा नुसते फुकट पडलेले असतात..' स्वतःशीच नाक मुरडत तिने पडदा खेचून पुन्हा होता तसाच बंद केला.

स्वतःशीच निश्वास सोडत ती मागेच भिंतीला टेकून बसली. आपल्या निराश नजर तिचे एकवेळ घरातल्या अंधारावरून फिरवली. बऱ्याच वर्षांपासून राहत असलेल्या त्या चाळीच्या छोट्याश्या खोलीत पाहण्यासारखं असं काहीच नव्हतं. साधारण दहा वर्षांपूर्वी माप ओलांडून ती ह्याच एवढुश्या घरात आली होती. तीच अर्ध आयुष्य तर गावातल्या कुडाच्या झोपडीत अगदी गरिबीत गेलेलं. सकाळी असलं तर दुपारच्या भ्रांत व्हावी अशी परिस्थिती. कधी कोणी काही दिल तरीही आधी ते तिच्या भावांच्या पुढ्यात पडायचं आणि मग उरलंच तर तिच्या... कित्येक रात्री तर घोटभर पाणी घशाखाली रिचवून आणि ओढणी पोटाला बांधून सरल्या. पोटात उठणाऱ्या कळांसरशी तिच्या मेंदूत मात्र प्रश्न भिरभिरू लागत. असं काय झालं असेल तिच्या हातून कि तिला इतक्या दारिद्र्यात जन्म मिळाला. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असूनही वंशाच्या दिव्याच्या नावाखाली तिच्यापाठी चार भाऊ जन्मले पण अजूनही गरिबीचा अंधकार काही संपला नव्हता... विचारांत ती तशीच हसली... वर्षानुवर्षे वापरवुन खिळखिळ्या झालेल्या लाकडी खाटेवर तितकाच जुना फाटलेला बिछाना अंथरला होता. आधी आधी ती त्याला ठिगळ जोडायची पण एका जागी जोडावं तर खेचून अजून दोन तीन बाजूनी उसवायचं शेवटी तिने त्याचा नाद सोडून दिला.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Oct 19, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

भूकबळीWhere stories live. Discover now