#नाती_जपतांना - कथा ३३

5 0 0
                                    

अवि, ए अवि....‌ आजींनी हाक मारली खरी पण अविनाश कधीचाच कौलेज नि क्लासला पळत गेला होता...‌ काय गं, रागावला आहे का माझ्या वर? अविची आई म्हणाली, मला नका घेऊ तुम्हा दोघांत... काय रुसवे फुगवे असतील तर तुमचे तुम्हीच जाणो...

इथे आजींना काही दिवसभर चैन पडेना.. काल‌ उगाच शुल्लक कारणावरून छान शाब्दिक मार दिला होता या आपल्या शेजारच्या छोट्या दोस्ताला (नातवाला)... दुपार सरली तशी त्यांनी बागेतला झाडाचा नारळ खोवला नि गुळ खसखस घालून मस्तपैकी सारण बनविले... सुवासिक तांदूळ पिठीची उकड काढून मस्तपैकी कोकणी पद्धतीचे, मोठ्ठ्या आकाराचे, २१ कळ्यांचे, सुबक मोदक बनवून वाफवायला ठेवले..

नेहमीसारखाच ५.३०-६ ला बंगल्याचे दार वाजले, नि स्वयंपाकघरातील छोट्या खिडकीतून आजींनी अवि आल्याचे पाहिले. येताना त्याने आज आजींच्या आवडीचे लाहे-बत्तासे आणलेले,ते आजींना हाक मारतच बाहेरच्या झोपाळ्यावर ठेवले.. थोड्या वेळाने घरच्या बाप्पाला मंगळवारचा नैवेद्य दाखवून, वाफाळणारे, कळीदार, पातळ पाळीचे उकडीचे मोदक (त्यावर घरच्या साजुक तुपाची धार), घेऊन आजी आपल्या वयाहून चौपट लहान वयाच्या दोस्ताला भेटायला आल्या... घे रे अवि, गरमागरम मोदक. खास तुझ्यासाठी केले आहेत बरं...

ते बघून अवि एकदम खूश, त्याचे डोळे आनंदाने जणू लुकलुकत होते.. अविच्या आवडीचे मोदक त्याला मनापासून खाताना पाहून आजींचे मनही एकदम तृप्त नि मोदकाचा यथेच्छ ताव मारत छोटे साहेब सुद्धा आनंदी... 

आजींना एक नमस्कार करून दोघांची सेटलमेंट कधी झाली ते कळलेच नाही... खरेच मनाचे अनमोल नातं मिळायला सुध्दा नशीबच हवे, नि ते नातं जपायला दोन्ही बाजूने प्रामाणिक प्रयत्न सुध्दा आवश्यकच... समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाDonde viven las historias. Descúbrelo ahora