#नाती_जपतांना - कथा ३४

5 0 0
                                    

माया मावशी, अगं आमची काही आठवण आहे की नाही!! महिना झाला तुझा काही फोन नाही का घरी चक्कर मारली नाहीस.. येत्या रविवारी आहेस ना, मी येते दुपारी...‌

हो आहे की, ये तू..‌ स्वतःहून फोन करून माझी विचारपूस केलीस, आनंद वाटला गं... भेटूया.. (फोन ठेवला खरा पण मनात विचार कसे नि किती सुरू झाले याला काही गणती नाही...)

माया, गेले दोन वर्षे एकटीच राहते, अहोंच्या जाण्याने घरांत नि नात्यांत तशी थोडी पोकळीच निर्माण झाली होती.. सुरवातीला एक वर्ष सगळेच नातेवाईक आपलेपणाने वागायचे, चौकशी करायचे पण नंतर जो तो आपापल्या संसारात व्यग्र झाला.. नि मायाला एकटेपणा जाणवायला लागला.. सतत कोणीतरी आपल्याकडे यावे, आपल्याशी बोलावे, स्वतःहून आपल्याला त्यांच्या घरी बोलवावे असे तिच्याही नकळत नैसर्गिकरीत्या तिच्या या अपेक्षा वाढत होत्या. दररोज स्वतःहूनच सगळ्यांना फोन करायचे, भेटण्याचे मनसुबे व्हायचे पण प्रत्यक्षात याच्या अगदी उलट होत होते..

एकदा असेच युट्युब वर काहीतरी बघताना, सुंदर विचार मनात रूजला.. "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".... तिनं विचार केला, जोपर्यंत आपण आपले मन कशात रमवत नाही, तोपर्यंत आपल्याला मनस्तापच होणार.. आपण मोकळे आहोत पण समोरचा नाही ना... आपला आनंदी मार्ग आपणच शोधावा.. इच्छा तेथे मार्ग हेच सत्य....

माया आता दररोज सकाळी जवळच्या सरकारी शाळेत ३०-३० मिनिटांचे असे चार तुकड्यांचे संस्कारवर्ग घेते...(तेही अगदी निःशुल्क..) गीतेचा अध्याय नि बाकी काही स्तोत्रे, लहान सहान बोध-गोष्टी इत्यादी... उद्याची तयारी करण्यात तिचीही दुपार छान जाते. शाळेमुळे परिसरात नव्या ओळखी झाल्या आहेत.. कसा वेळ जातो कळत नाही... लहान मुलं अगदी मनापासुन आपल्या या आजी-शिक्षिकेची वाट पाहत असतात.. गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुथडे मन भरून काय काय गिफ्ट नि आठवणी घेऊन ती घरी परतली..

एव्हाना जवळच्या सर्वांना मायाचे आपल्या वाचून काही अडत नाही हे कळलं होतं.. खरं तर तिचे आधी सारखं आपल्या आयुष्यात नसण्याचे जाणवतही होते.. मनुष्य स्वभावच तो, एखादी गोष्ट नसल्यावरच त्याची किंमत कळते. अती तेथे माती मग ते नात्यांचे ही होतेच..‌ खरंय ना.... समाप्त!!


©® सौरभ पटवर्धन

नाती_जपतांनाNơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ