_________________________________________________
" अय आशिक बोड्याच्या, बंद कर ते रेडीयु.. ईळुमाळ गानी ऐकीत बस्तय. " आबा रागात खवळतच आत आले आणि खांद्याला असलेल्या दोन्हीं पिशव्या खाली ठेवल्या.
प्रताप त्यासरशी लगेच उत्तरला, " आबा अभ्यास केला , रानात बी जाऊन आलुय, लाकडं बी तोडल्यात, इहिरीतून पाणी शेंदलय म्हणून वाईस ऐकत बसलु गानी."
" आला लय काम करणार... त्या सुवर्णीला घिऊनश्यान रानमाळ उंडरत बसला असशील. " आबा चिडत म्हणाले. हे ऐकुन प्रतापच्या भुवया एकत्र झाल्या. त्याने रेडिओ बंद केला.
" काहीं कसं बोलता ओ आबा... स्वतः च्या मुलावर विश्वास न्हाय लका तुमचा. " प्रताप गमजाने कपाळातून आलेला घामाचा ओघळ पुसत बोलला.
" काहीं काय.. आख्खं गाव हीच सांगतंय... पोरगं पोरीला घिऊन फिरत अस्तय फटफटीवर. तुला यासाठी घिउन दिली का फटफटी..? जीवाला लाज जरा.. बापाची मान खाली घातली ताॅ आज " आबा भिंतीला टेकून कपाळाला हात लाऊन बसले.
" आबा, कॉलेज तालुक्याला हाय ... आनं तुम्हाला माहीत हाय की आबा... गावात फक्त दोन टाईमच ईश्टी थांबती. काॅलिजातून येतानी सुवर्णीला इश्टी नव्हती घावली. म्हणुन तिला घेऊन आलतो एक दोनदा. लोकांचं काय ऐकिता... " प्रतापने आबाच्या कपाळावरचा हात काढत त्यांना तांब्याभर पाणी दिले.
"तुजं तिच्याबरं लफडं हाय असा बोभाटा झालाय गावात..." आबांनी पाणी पिऊन झाल्यावर चिंता व्यक्त केली.
" आबा, एक येळ मला नावं ठीवा.. पण त्या भल्या पोरीवर तरी विश्वास ठिवा. तुम्हीच सांगा ती तसली पॉर हाय का? "
प्रतापचे बोलणे ऐकून आबा खरंच भानावर आले.
कारण सुवर्णा ही खुप साध्या स्वभावाची गुणी मुलगी. संस्कारी तर असणारच, कारण ती सुभानराव आणि सुशाला ची मुलगी होती. ती १६ वर्षाची पोर तालुक्याच्या कॉलेजला १२ वी शिकत होती . प्रताप आणि ती एकाच वर्गात. प्रताप सुध्दा हुशार असल्याने नेहमी पहिला यायचा वर्गात. खुप कौतुक करणारे हेच गाव आज त्याच्याबाबतीत असं बोलत आहेत, हे आबाला सहन नव्हते झाले.
ВЫ ЧИТАЕТЕ
' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेस
Любовные романы#सस्नेह_नमस्कार, 🙏 सर्व रसिक #वाचकांसाठी सादर करत आहे एक #नवीन कथा, 🎭 ' #चाबऱ्या '🎭 #कथा काही दशकां आधी सुरु होते. #स्वभावाशी निगडित असणाऱ्या शब्दाला #समाजाने दिलेले नाव म्हणुन मिरवणाऱ्या #चलबिचल मनाची ही कहाणी. 🍂 कधी...