मुंबईहून दोडावण्याला जाताना वाटेत सड्यावरून पुढे जाऊन ओबडधोबड पायरस्त्यानं जावं लागतं.एका बाजूला अरुंद पायवाट आणि दुसर्या बाजूला खोल दरी.डाव्या बाजूला पायवाटेला लागून उभे सपाट कडे. पुढे गेल्यावर सपाट कडे उतरत थोडी मोकळी सखल जमीन , अन् तिथे थोडी मोठी झाडं- आंबा, पिंपळ, चिंच वगैरे. तिथेच थोडा झाडझाडोरा.झुडपं वगैरे.थोडं दाट गवत.या जागेवर वडाच्या झाडाला पारंबीवर कोणीतरी पत्र्याची पाटी लटकावली होती.त्यावर ऑइलपेंटनं वेडंवाकडं नाव लिहिलं होतं""वाटिका"
अन् मग मुबईहून येणार्या जाणार्या गाड्यांचा हा वाटिका थांबा किंवा हॉल्ट जणू ठरूनच गेला होता.
तिथेच वाटिकेच्या पुढ्यात रस्त्यावर किसननं एक पत्रा ठोकलेलं लांबट टेबल मांडलं होतं.त्यावर होता स्टोव्ह अन चहाचं भगुणं अॅल्युमिनिअमचं ,अन चार कपबशा
पाशिंजर गाडीतून उतरून गरमगरम कटिंग चहा पिऊनच परतवण्याहून पुढे निघत....तर असं हे रस्तापुराण.
रस्त्याच्या उजव्या बाजूला होती दरी. कोणे एके काळी रस्त्यावरून घरंगळत आलेले मोठमोठे दगडधोंडे गति थाबल्यावर दरीत विसावले होते. गोल,चौकोनी,टोकेरी अन काही सपाट .दरीतच थोडा सपाट भाग होता.गवतानं आच्छादलेला. तिथून गुराखी गुरं चरायला नेत.त्यामुळे अरुंद पायवाट तयार झाली होती.वरून ,रस्त्यावरून डोकावलं कि गाईम्हशी अगदी शेळ्यामेंढ्यांएवढ्या लहान दिसत.दरीच्या उतारावर पायवाटेच्या नेमकं वर दोन अजस्त्र दरडी दोन एडक्यांसारख्या डोक्याला डोकं भिडवून तटून जागीच अडकल्या होत्या त्यामुळं तिथं सपाट अशी जागा ,सीट म्हणा हवं तर ,तयार झाली होती.परतवण्यात पाऊस भरपूर नि हवा दमट. पहावं तिथे लगेच शेवाळ उगवायचं झाडांवर, दरडींवर, अगदी उडत्या पाखराच्या पिसावरही शेवाळ उगवेल अशी हवा.
तर असं हे दरीपुराण अन् हवापुराण.
मध्यरात्रीचा सुमार.किसनचहाचा ठेला आवरून सावरून टेबलाखाली हातपाय पोटाशी घेऊन अनावर झोपेनं झोपला होता. गाड्यांच्या आवाजानं मधेच दचकून जागा होत होता. आज दिवसभर पाशिंजराना चहा पाजताना त्याला जेवायलाही फुरसत झाली नव्हती.
मुंबईहून परतवण्याच्या दिशेनं एक पांढरी मारुती व्हॅन सुसाट आली. वाटिका थांब्याशी गाडी आतल्या झाडीत वळली.गाडीच्या हेडलाईट्सनी किसनचे डोळे किलकिले झाले. "आता चा मांगू नका दादांनू.लई शिनलोय". त्यानं डोळे परत मिटले.गाडी वाटिकेच्या झाडीत गेली आतून दोन माणसं उतरली. तांबूस,टोकेरी दाढीचा,सुरमा घातलेल्या भेदक डोळ्यांचा उंचापुरा देखणा रिझवान आणि म्हातारासा, मळकट कपड्यातला अस्लममामू.दोघांनी गाडीच्या डिकीतून एक गोणपाटाचं जड पोतं बाहेर काढलं.अस्लम रस्त्यााकडेला उभा राहून दोन्ही बाजूंना न्याहाळून पाहू लागला. मग त्यानं रिझवानला खूण केली. व तो परत वाटिकेत गेला. दोघांनी मिळून ते जड पोतं फरफटत ओढत रस्त्यापर्यंत आणलं , मग रस्ता ओलांडून रस्त्याच्या उजव्या बजूला येऊन दोघांनी ते पोतं खोल दरीत ढकलून दिलं .ते घरंगळत ,रक्ताचे फराटे उठवत घसरत घसरत त्या दोन दरडींवर जाऊन विसावलं. त्या पोत्यात रिझवानची तरूण सुंदर पत्नी शाहीन अन तिचा प्रोड्यूसर यार लकडावाला , दोघांच्या शरीराचे तुकडे एकमेकाला घट्ट बिलगून खच्चून भरले होते." मामू, पोता बीचमें अटक गया. मालूम होता है, किस्मत अपने साथ नही है .
"रिझूबेटा तू फिकर मत कर सब ठीक हो जाएगा. तेरा इरादा नेक था ना?"
"सोला आने मामू"
"तब चल बैठ जा गाडीमें"
दोघं गाडीत बसले .अन् गाडी दोडावण्याच्या दिशेनं निघून गेली. किसन पडल्या पडल्या पहात होता. पोतं रस्ता ओलांडून नेलेलं अन दरीत फेकलेलं त्यानं अर्धमिटल्या डोळ्यानी अर्धवट झोपेत त्यानं पाहिलं. पण झोपेपुढे त्याचा इलाज चालेना.
+++++++++++++++++++++++++++++++
तरूण,उमदा रिझवान एका पासपोर्ट एजंटकडे नोकरीला होता. त्याची तरूण सुंदर बिवी शाहीन आणि लहानगा दानिहाल,दोघांवर त्याचं जीवापाड प्रेम होतं. शाहीनला सिनेमात काम करण्याचं प्रचंड वेड होतं.अन् रिझवाननं तिच्या प्रेमाखातर तिला याची परवानगी दिली होती.लकडावाला देमार चित्रपटांचा प्रोड्यूसर होता अन शाहीनला छोटेमोठे रोल मिळवून देत असे.
पण हल्ली तिचं आणि लकडावालाचं वागणं संशयास्पद व्हायला लागलं होतं.स्पॉटबॉय नासिरनं त्याला एकदा गाठून सांगितलं होतं" मियांसाब, वो लकडावाला अच्छा आदमी नही है.अपनी जनानीको समझाना जरा. अच्छाखासा बनाबनाया घर बिगाड देगा आपका."
असाच एक दिवस रिझवान जेवायला जरा लवकर घरी आला. पहातो तर चिमणा दानिहाल दाराबाहेर रडत उभा. त्यानं कळवळून दानिहालला उचलून घेतलं जवळच्याच हॉटेलात नेऊन त्याला खाऊपिऊ घातलं अन गोड बोलून हळूहळू त्याच्यकडून माहिती काढून घेतली. दानिहालच्या सांगण्यानुसार सूटवाले अंकल(लकडावाला) रोज घरी येतात. मग अम्मी त्याला दार लवकर उघडत नाही. भूक लागली कि त्याला रडू येतं . अब्बूना सांगायचं नाही म्हणून अम्मी बजावते. म्हणते, कि नाहीतर ती दानिहालला सोडून जाईल. मग त्याला फार भीती वाटते." हुंदके देत दानिहालनं सगळं सांगितलं.रिझवानला कळवळूव आलं. त्या रात्री त्यानं शाहीनला जाब विचारला. पण ती कबूल झाली नाही.तिचं म्हणणं होतं कि दानिहाल खोटं बोलतोय.त्याचे कान शेजारच्या मुमानीदादीनं भरलेत. रिझवान यावर काहीच बोलला नाही. दानिहालला कुरवाळत राहिला. तिला एवढं मात्र म्हणाला"सुन शाहीन, अगर तू उससे निकाह करना चाहती है तो बेशक मुझसे बोल.मै तुझे आजाद तर दूॅंगा, लेकिन कुछ दानिहाल के बीरेमें भी सोच."
