चॉकलेट गर्ल

1.5K 5 4
                                    

  
   ३-४ महिन्यांच्या सुट्टीनंतर कॉलेजच्या त्या सदाहरित कॅम्पसमध्ये शिरताच एक विलक्षण प्रसन्नता जाणवू लागली. नुकत्याच पडलेल्या पावसाच्या माऱ्यामुळे क्रीडांगणातून छान मृद्गंध दरवळत होता. त्या मन प्रफुल्लित करणाऱ्या सुवासाने डोळ्यांवरची अर्धवट झोप कुठल्याकुठे पळवून लावली. सकाळच्या इतक्या रोमहर्षक वातावरणातून माझा पाय निघणं कठीण होतं, पण नवीन वर्षाचा श्रीगणेशाच बंकने करायला नको म्हणून मी वर्गात जाऊन बसलो.
    बोर्डाच्या परीक्षेनंतर मिळालेली  भलीमोठी सुट्टी संपवून पुन्हा एकदा कॉलेजमध्ये येऊन भलतंच भारी वाटत होतं. आता 'डिग्री कॉलेजचा विद्यार्थी' म्हणून कॉलेजचं नवीन वर्ष सुरू करणं, ही भावनाच खूप वेगळी होती. नवीन वर्षाविषयीची उत्सुकता...,कुणाकुणाच्या ओळखी होणार?...,नवीन काय काय घडणार?...जुने मित्र आपल्यासोबत असतील की नाही?....हे सगळे प्रश्न‌ होतेच.
वर्गात जातच जुने मित्र भेटले आणि एकदाचा माझा जीव भांड्यात पडला. हे वर्ष धम्माल असणार यात तीळमात्र शंका उरली नाही!....
   
    दोन-तीन आठवड्यांतच सगळं रूटीन अंगवळणी पडलं. महत्तवाचं म्हणजे काही महिन्यांसाठी मोडलेली लवकर उठायची सवय पुन्हा लागली. उरलासुरला शीण घालवण्यासाठी कॅम्पसमधली गार हवा पुरेशी होती. लेक्चर्ससुध्दा एवढ्यातच रटाळ वाटू लागली. बाकी कॅम्पसमधली धमाल आणि अधूनमधून कधीतरी कॉलेजबाहेर हॅंगआऊट्स एवढीच काय ती मजा उरली!
तोच एक दिवस सहज कार्तिक ग्रुपवरचा एक मेसेज दाखवत मला म्हणाला, "फेस्टिवल टीममध्ये व्हॉलंटीअर्स म्हणून नाव देऊया?"
मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
कारण पहिलं वर्ष म्हणजे अभ्यासाचा ताण फार नसणार ,हे गृहीत धरूनच मी बरंच काही ठरवलं होतं. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं. अगदी 'पर्सनालिटी' बनवायची‌, सगळ्यांवर छाप पाडायची वगैरे...
   त्याच दिवशी फेस्टिव्हल टीमचा भाग होण्यासाठी इच्छुक असलेल्यांकरता कॅम्पसमध्ये एक मिटींग भरवली होती. फेस्टिव्हल्स टीमचा हेड असलेला फायनल यीअरचा प्रथमेश काळे हा जमलेल्या सर्व फ्रेशर्सना व फेस्टिव्हलबद्दल माहिती सांगत होता. १०-१५ मिनिटं झाली असतील नसतील,त्याचं पाल्हाळीक भाषण ऐकवेनासं झाल्यावर मी वैतागून कार्तिकला "चल,जाऊया" म्हणण्याकरता तोंड उघडणार एवढ्यात पाठीमागून...
    "एक्सक्युज् मी ?"
एक नाजुक ,मधाळ स्वर अगदी हळुवारपणे कानांत शिरला. मी मागे वळून पाहिलं. आणि पाहतंच राहिलो!
आयुष्यात पहिल्यांदाच  काहीतरी विलक्षण रहस्यमय असं वाटत होतं. ती भावना नेमकी काय होती , सांगणं कठीण आहे. जणू मी माझ्या ताब्यात नव्हतोच. समोर उभ्या असलेल्या त्या विलक्षण आकर्षक सौंदर्यवतीवर माझी नजर खिळली होती. गोरीपान,तेजस्वी चर्या, मोकळे सोडलेले काळेभोर केस , त्याहूनही मोहक असा आणि काळजाचा ठाव घेणारा तिच्या उजव्या गालावरचा तीळ!
तिची प्रश्नार्थक नजर मला कळत होती , पण त्या टपोऱ्या,नक्षीदार डोळ्यांत मी पुरता अडकून पडलो होतो!
  "अ...व्हॉलंटीअर्ससाठीची मिटींग..???"
   "हं...?",त्या प्रशनाबरोबर मी कसाबसा भानावर आलो.
   "अ...हो...इथेच आहे",माझ्या आधीच कार्तिकने उत्तर दिलं.
  "ओके....थॅंक यू", मघाचाच तो लाघवी आवाज आणि चेहऱ्यावर विलक्षण लोभस हसू! मी सुन्न होतो. कुणीतरी यावं आणि हळूवारपणे मनात गुदगुल्या करून जावं असं काहीसं वाटत होतं. अवघ्या काही क्षणांच्या या भेटीतच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आकंठ!!

चॉकलेट गर्ल ( Chocolate Girl)Where stories live. Discover now