अगाथा ख्रिस्तीच्या 'वन टू बकल माय शू' वर आधारित.
प्रकरण पहिले
कधी-कधी माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की ज्यावेळेस तुमची सामाजिक प्रतिष्ठा,तुमचं ऐश्वर्य,तुमची विद्वत्ता,तुमची धडाडी ह्या सगळ्याचा काही उपयोग नसतो.माणूस पार असहाय्य,हतबल झालेला असतो.प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी हा क्षण येतोच.
तसाच माझ्याही आयुष्यात अखेर हा क्षण येऊन ठेपला होता.माझ्या तर्कचातुर्याचा,सूक्ष्म अवलोकनाचा काहीही उपयोग झाला नव्हता.माझ्या नीतीधैर्याचा काटा पार शून्यावर आला होता.
मी..गौतम अभ्यंकर,एक बऱ्यापैकी नाव कमावलेला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह,आत्ता मात्र एका अतिशय आरामदायक खुर्चीवर गलीतगात्र अवस्थेत बसलो होतो.माझे डोळे अर्धवट उघडे होते.तोंडाचा आ वासलेला होता.मी नेहमी वरुणला,माझ्या सहाय्यकाला सांगतो,'आपल्याला आपल्या वेदनेला,मग ती शारिरीक असो वा मानसिक,आपली ताकद बनवता येण्याची किमया साधली पाहिजे.'
पण आत्ताच्या माझ्या वेदनेपुढे माझंच तत्त्वज्ञान लुप्त झालं होतं.आत्तापर्यंत माझी अशी ठाम धारणा बनली होती की या जगात सर्वात वेदनादायी काही असेल तर ती म्हणजे....दंतदुखी.
हो..मी डेन्टिस्टच्या समोर बसलो होतो.
डॉक्टर सन्मित्र घोष माझ्या किडलेल्या दाढेची दुरावस्था बघत होते.कितीही काळजी घेतली तरी माझ्या दाढेने मला दगा दिलाच होता.डॉक्टरांनी दाढ बधीर करण्यासाठी हातात इंजेक्शन घेतलेलं बघताच मी गपकन डोळे मिटून घेतले.डॉक्टर माझी ही अवस्था बघून गालातल्यागालात हसत होते.खरंतर मी त्यांच्या केबीनमध्ये पाऊल ठेवताक्षणी त्यांनी मला ओळखलं होतं.ते अक्षरशः भारावून गेले होते.त्यांनाही म्हणे डिटेक्टिव्ह व्हायची खूप इच्छा होती.पण शेवटी असा रुक्ष व्यवसाय निवडावा लागला होता.
सणसणीत उंची,अतिशय हसरा चेहरा,कानाला एकदम गोड वाटणारं बंगाली ढंगाचं पण अस्खलित मराठी बोलणं.