रात्रीच्या त्या निरव शांततेत संपूर्ण बीच वरती दूर दूर पर्यंत कोणीही नव्हतं. दूरवर पसरलेला फेसाळणारा समुद्र त्यावर मधूनच पडणारा दिपगृहाचा प्रकाश. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे ओल्या मातीचा वास वातावरणात भरून राहिलेला. आता मात्र निरभ्र आकाश स्पष्ट दिसत होते, रात्रीच्या वेळी समुद्रलगतची वाळूही निळसर प्रकाशाने चमकत होती, मधूनच एखादा समुद्र पक्षी रात्रीच्या त्या निरव शांततेला भंग करत जायचा.
त्या गूढरम्य वातावरणात, ते दोघ समुद्रात पाय सोडून एका शिळेवर बसलेले. पायाला मधूनच समुद्राच्या लाटा गुदगुल्या करून जायच्या. तो कसलाश्या विचारात बुडालेला, आणी ती वाळूवर रेघोट्या मारत होती. आपण इथन परत जायचं का मला या सुनसान जागी भीती वाटते. रोहन!! तिच्या हाकेने रोहन त्याच्या विचारातून बाहेर आला. हा बोलना हासिनी काय म्हणतेस.
काही नाही, आपण जाऊया मला इथे थोडी भीती वाटते कोणीच नाहीये . मला वाटलं मुलींना असं रोमँटिक आवडत, रोहन तिच्याकडे बघत डोळा मारत म्हणाला. तशी ती लाजली, आणी खाली बघत म्हणाली मला नव्हतं वाटलं तू एवढा रोमँटिक असशील. या आधी कधी आणलं नाहीस ना असं, नुसतं त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून कोणाशीतरी बोलत असतो. झालं सुरु,म्हणजे नवरा रोमँटिक वागला तरी प्रॉब्लेम, नाही वागला तरी प्रॉब्लेम. आता बिचाऱ्या नवऱ्याने काय कराव. रोहन भोळा चेहरा करून म्हणाला. काही नाही फक्त वेळ द्यावा,हासिनी रोहनकडे बघत म्हणाली. अलगद तिचा हात रोहन ने आपल्या हातात घेतला, त्या ऊबदार स्पर्शाने हासिनी शहारली. इतके दिवस या स्पर्शाची तिने वाट पहिली होती. तिचा हात हातात ठेवत रोहन पुढे बोलला,फक्त वेळच का मी तर आणखी बरच काही द्यायचा विचार करतोय.
आणखी काय? तिने रोहनकडे बघत प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं. तिचा भोळेपणा बघून रोहन गालातल्या गालात हसत होता. सांगू की करून दाखवू, रोहन मिश्किलपणे म्हणाला. तशी हासिनी लाजून चूर झाली. कायतरीच काय, हे पब्लिक प्लेस आहे. अग हे गुलाब म्हणतोय मी, तुला द्यायचं, तुझ्यासाठी घेतलेलं तुला काय वाटलं वेडे.
हासिनी: मला वाटलं ते बेड मध्ये करायच असत ते. तिच्या या निरागसतेवर रोहन खळखळून हसत म्हणाला अच्छा ते का, बरीच चावट आहेस.
हासिनी - मग जायचं का आपण बराच उशीर झालाय.
रोहन: का काय झालं बस्स की, एवढे दिवसांनी आलोय निवांत वेळ काढून.
हासिनी: पण ही जागा एवढी सुनसान का आहे, जवळपास काही लोकवस्ती नाही.आपण इथे येताना पण कोणीच नव्हतं. संपूर्ण बीच रिकामा आहे.
रोहन: मग चांगलंच आहे ना, आता रोमँटिक होण्यासाठी तुला नवरा सोडून कशाला कोण हवं . (असं म्हणत रोहनने आपल डोकं हासिनीच्या मांडीवर ठेवल आणी विसावला.)
हासिनी: कायतरी बोलू नको, मी मस्करीत नाही खरंच विचारतेय.
रोहन: हा आता तू विचारतेस म्हणून सांगतो. या जागेवर आधी एक मर्डर झाला होता काही महिन्यापूर्वी. एक डोक्यावर परिणाम झालेला लिंगपिसाट खूनी, ज्याने अनेक मुलींवर जबरदस्ती करून केवळ त्यांची हाडे मागे ठेवायचा.
हासिनी : काय
रोहन: हो, असं ऐकण्यात आहे की तो त्यांना जिवंत खायचा. फक्त हाड राहायची मागे. याच बीच वरती त्याने एका महिलेवर हा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. पण ती महिला पोलिसात होती, तिने गोळी झाडून त्याचा एन्काऊंटर केला.
हासिनी: मग त्याचा इथे काय संबंध?
रोहन: तो अजून इथेच आहे असं म्हणतात. त्याची विकृत सवय मेल्यावरही सुटली नाही. इथे काही लोकांना तो दिसलाय फिरताना. 7 फूट उंच, डोक्यावरून हूड घेतलेला, पूर्ण काळ्या कपड्यात, हातात त्याची नेहमीची कुकरी, करावतिसारखे दात आणि त्याचे लाल निखारे डोळे. म्हणून इथे रात्रीच काय दिवसाही कोणी येत नाही.
हासिनी: आणि तू मला आणलंस रात्रीच
रोहन: हा तू म्हटलं होतस ना तुला असं सायलेंट रोमँटिक places आवडतात. मग एन्जॉय.
हासिनी: तू बरा आहेस ना
(हासिनी रागाने उठून तिथून निघू लागते) मला नाही थांबायचं इथे.
रोहन: अरे तिकडे नको जाऊस तिकडेच असतो तो.
( हासिनी घाबरून परत पाठी वळून येऊ लागते, तिची अवस्था बघून रोहनला हसू आवरत नाही, तस तिला जोरात धाप लागते )
रोहन: रिलॅक्स मस्करी केली तुझी, काय झालं. बस इथे.
हासिनी: अरे माझा अस्थमा चाळवतो अस काही झालं की.
रोहन: सॉरी, बरं माझ्या लक्षात नाही आलं तुला हा त्रास आहे ते. तू हे पाणी पी. बरं वाटतंय का आता?
हासिनी: हा, आपण जाऊ ना इथून.
रोहन: तू थोडी रिलॅक्स हो, डिप ब्रेथ कर. आपण निघूच लगेच.( तेवढ्यात रोहनचा फोन वाजतो आणि 2 मिनटात आलो असं सांगून रोहन फोन घ्यायला साईड ला जातो. हासिनी इन्हेलर ने श्वास घेते, तसा तिचा श्वास नॉर्मल ला येतो )
हासिनी रोहन विषयी विचार करू लागते, खरंतर तिच्यासारख्या अनाथ आणी अस्थमा असलेल्या मुलीला रोहनसारखा देखणा आणी उच्च पदावर नोकरी असणारा जोडीदार म्हणून मिळाला तेव्हाच तिला आकाश ठेंगणे झाले होते. लग्नानंतर काहीसा तुटक आणि आपल्याच कामात गर्क राहणारा रोहन आज पहिल्यांदा तिला बाहेर घेऊन आला होता. स्वतःच्या नशिबावरच्या सगळ्या शंका तिच्या आज मिटल्या होत्या, आपल्या हक्काचं माणूस मिळाल्याच तिला समाधान होतं. आजपर्यंत झालेल्या सगळ्या त्रासाचं जणू चीज झालं होतं. अशा विचारांमध्ये असतानाच हासिनीला दूरवरून शीळ ऐकू आली. निरखून पाहून पण कोणी दिसेना,मात्र तो आवाज हळू हळू जवळ येत अचानक बंद झाला. दुरवर एक आकृती हलताना दिसली, ती बीच च्या त्या टोकापासून झपाझप पावलं टाकत याच दिशेने येत होती. आत्ता या वेळेला इथे कोण असेल, हासिनी त्या आकृतीकडे निरखून पाहू लागली, तिला राहून राहून ती आकृती आधी कुठेतरी पहिल्यासारखी वाटू लागली . ती अनोळखी आकृती जवळ आली तशी स्पष्ट दिसू लागली,7 फूट उंच, डोक्यावरून हूड घेतलेला, पूर्ण शरीर काळ्या कपड्यात झाकलेलं , हातात भली मोठी कुकरी, करवतिसारखे दात आणि त्याचे भेदक लाल डोळे हासिनी वरती रोखलेले, जणू काही त्याला चेहराच नव्हता आणि डोळ्यांच्या जागेवर लालभडक निखारे ठेवलेले . आता मात्र हासिनी चांगलीच घाबरली होती, तिला दर्दरून घाम फुटला, ती रोहनला हाक मारू लागली. ती अनोळखी व्यक्ती हासिनीच्या रोखाने येऊ लागली, तशी हासिनी उठून जिवाच्या आकांताने पळू लागली, पळताना ती कोणालातरी जोरात धडकली, तो रोहन होता.
रोहन: एवढ्या लगेच आठवण आली का माझी, अग इथेच होतो मी.
धाप लागल्यामुळे हासिनी च्या तोंडातून भीतीने शब्द फुटत नव्हता कसतरी ती एवढंच बोलली.
हासिनी: तो.. अनोळखी.. आलाय.
रोहन: काय, मला काही समजतं नाहीये तू काय बोलतेस.
(हासिनीने मागे बोट दाखवलं, तो अनोळखी माणूस अजूनही तिच्या दिशेने येत होता. त्याची ती भयानक भेदक नजर हासीनिवर रोखलेली.)
रोहन: कुठेय कोण? इथे फक्त आपण दोघेच आहोत.
हासिनी: तो काय तिथे समोर आहे. तो 7 फूट उंच, पूर्ण काळ्या कपड्यात गुंडाळालेल शरीर, हातात कुकरी आहे त्याच्या आणी ते करवतीसारखे दात.
रोहन: तुला भास होतायत, तिथे कोणीही नाहीये. चल रूम वर जाऊ आपण थोडा आराम कर .
( तेवढ्यात तो अनोळखी चेहरा येऊन हासिनीच्या समोर उभा राहतो. हासिनी भीतीने गोठून जाते. तो त्याच्या भेसूर आवाजात काही पुटपुटतो हा$$सिनी, आणि हासिनी भोवळ येऊन पडते.)
हासिनी डोळे उघडते तेव्हा ती तिच्या हॉटेल मधल्या रूम च्या बेड वर असते, शेजारी रोहन असतो.
रोहन: बरं वाटतय का आता, आराम कर आणखी थोडा वेळ. रात्री बरीच दमली होतीस, म्हणून धाप लागली तुला. मी तुझ्या अस्थमा वरच्या गोळ्या घेऊन येतो, संपल्यात.
हासिनी: ओके.
(रोहन ने केलेली कॉफ़ी पिऊन हासिनीला थोडी तरतरी आली. तशी ती रूमच्या गॅलरी मध्ये येऊन बसली. समोरचा सुंदर sea view सुद्धा हासिनीच मन प्रफुल्लित करू शकत नव्हता. हासिनीच्या डोक्यात अजूनही कालचेच विचार चालले होते. )
कोण होता तो? आपल्या शी काय संबंध त्याचा. रोहन म्हणतो तस मला खरंच भास झाला का, पण त्याचे ते डोळे, नाही मला अजूनही चांगलंच आठवतंय तो भास नव्हता. तो तोच होता रोहनच्या स्टोरी मधला. त्याला माझं नाव कस माहित, रोहन ला तो दिसला पण नाही, रोहनला काय वाटलं असेल आपल असं वागण पाहून. लग्नानंतर पहिल्यांदा फिरायला आलो, आणि हा त्रास . या विचारांमध्ये असतानाच पाठीमागून रोहन कधी आला तिला समजलच नाही.
रोहन: उठलात का मॅडम, कस वाटतय आता.
हासिनी: ठीक आहे.
रोहन: लवकर फ्रेश हो, आज आपण बाहेर जाणार लंच ला.
हासिनी: मला थोडं बोलायचं होतं.
रोहन: हा तू आवर ना परत तू खुप वेळ घेतेस आवरायला , मग निवांत बोलू.
हासिनी: काल काय झालं त्या बद्दल.
रोहन: हासिनी, काल फक्त तुला भास झाला आणि धाप लागल्यामुळे तुला भोवळ आली, बाकी काही नाही. तू उगीचच छोट्या छोट्या गोष्टींच टेन्शन घेतेस.
हासिनी: पण मी खरंच बघितलं होतं.
रोहन: बस झालं! मला हा विषय परत नकोय. तुला या आधी एकदा अस्थमा चा अटॅक आला होता ना, तू स्वतः काळजी नाही घेतलीस तर कस होणार.
(रोहनच्या या बोलण्याने हासिनीचा चेहरा पडतो, रोहनची काळजी तिलाही कळते पण जे तिने समोर बघितलं त्यावर अविश्वास कसा ठेवावा )
हासिनी परत त्याच विचारात गुंग होते, थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही. रोहनला कसही करून हासिनीला यातून बाहेर काढायचं असत. तिचा मूड चांगला करण्यासाठी, तो लंच नंतर दिवसभर हासिनीसोबत बाहेर फिरायांचा प्लॅन करतो. दोघेही आवरून रूमबाहेर पडतात, जवळच एका बीच साईड रेस्टॉरंट मध्ये लंच करतात, ते कोकणी पद्धतीच रुचकर जेवण खाऊन हासिनी क्षणभर सगळा क्षीण विसरते. जीभ आणि पोट तृप्त झाल्यावर, दोघे बीचवर चालायला जातात. बीचवर बऱ्यापैकी गर्दी असते, हनिमून ला आलेली बरीच जोडपी आपले सेल्फि काढण्यात मग्न असतात. काही परदेशीं ललना कपडे काढून sunbath घेत असतात. हासिनी सहज रोहनकडे बघते, रोहन त्या ललनांकडे न बघता सरळ चालत राहतो . तशी हासिनीला रोहनची थट्टा करायची लहर येते.
हासिनी: रोहन, तुला खुप फ्रेश वाटत असेल ना इथे येऊन.
रोहन: हा, मस्त बीच आहे, वारा आहे , का तुला नाही वाटत?असं का विचारतेय .
हासिनी: वाटत ना, पण आपण तिकडे कुठे चाललोय, खरी हिरवळ तर इथे आहे. बसायचं का आपण इथेच.
रोहन: अच्छा तर तू लेस्बियन आहेस. तरी मला शंका होतीच, लग्नात आलेल्या माझ्या बहिणींकडे हावशी नजरेने बघत होतीस, रोहन थट्टेच्या स्वरात म्हणाला.
हासिनी: हाहाहा गपबैस, मी तुझ्यासाठी म्हणत होते. त्या बिचाऱ्या परदेशी ललना एवढ्या आशेने बघतायत तुझ्याकडे.
रोहन: माझी ललना तर माझ्यासोबत आहे, मी कशाला बघू.
हासिनी: मग कुठे नेतोय या ललनाला.
रोहन: सरप्राईज आहे एक तुझ्यासाठी, चल तर खरं .
हासिनी: काय आहे.
रोहन: सामान्यत: सरप्राईज म्हणजे आधी नाही सांगितलं जातं.
हासिनी: हा बरं बरं, पण कुठे जातोय आपण.
रोहन: तिकडे
(हासिनी ने रोहनच्या बोटाच्या दिशेने पाहीले, वरती एक दिपगृह होता. त्यासाठी पूर्ण डोंगर चढून जावं लागणार होत )
हासिनी: पूर्ण डोंगर चढावा लागेल त्यासाठी.
रोहन: एवढं कठीण नाहीये, मी आहेना सोबत, तुला कधी पोचलो कळणार देखील नाही.
हासिनी ला दम्याचा त्रास असताना एवढं वर चढणं जीवावर आलं होतं, पण रोहनसाठी ती तयार झाली. पायपीट करत तासाभरानंतर ते दोघ दिपगृहपाशी पोचले, चढून हासिनीला धाप लागल्याने ती इन्हेलर घेऊन तिथेच बसली.
रोहन: जास्त त्रास नाही ना झाला, तरी एवढा चढ नव्हता.
हासिनीला जोरात धाप लागल्याने, काहीच बोलता येत नाही. ती त्याला खुणेने सांगते.
तसा रोहन तिच्या जवळ जाऊन बसतो, हासिनीला श्वास घ्यायला त्रास होतं असतो, रोहन तिला धीर देतो. इन्हेलर ने थोड्या वेळानं तिचा श्वास नॉर्मल होतो.
रोहन: सॉरी, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला.
हासिनी: नाही रे माझा त्रास तर नेहमीचाच आहे, तुझं ते सरप्राईज कुठेय.
रोहन: दिपगृहावर वर जायचंय पायऱ्या चढून
हासिनी: मला नाही वाटत मला जमेल आणखी चढायला .
रोहन: तू नाहीच चढायचं, मी आहेना.
हासिनी: म्हणजे.
हासिनी असं म्हणते तोच रोहनने तिला आपल्या कवेत अलगद उचलून घेतलं.
हासिनी: ए हे काय करतोय, पडशील तू असा.
रोहन: भिऊ नको, पडणार नाहीस तू तशी हलकी आहेस.
हासिनी: आज अचानक एवढा मूड कसा आला, कुठला पिक्चर बघितलास.
रोहन: काय करू, बायकोचा त्रास बघवत नाही.
हासिनी: हाहा मला तर वाटतं त्या sunbath घेणाऱ्या पोरींना पाहून मूड झाला असणार. उगीच माझ्यासमोर नाटक करतोस न बघायची.
रोहन: हा मॅडम आणि काय, हनिमून ला पण त्या पोरींसोबतच आलोय.तुला असच उचललाय एक्सरसाईज म्हणून.
हासिनी: मला काय माहीत, असशील पण.
रोहन: तुमचं सरप्राईज आलं मॅडम,
असं म्हणत शेवटची पायरी चढून रोहन ने दिपगृहाच्या वरच्या टोकाला येऊन हासिनीला खाली उतरवले. तिथे फक्त पायथ्याला आदळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज होता. हासिनीने समोर पाहीले, तिथून खालचा नजारा खुप अप्रतिम दिसत होता. तितक्यात वाऱ्याच्या जोरदार झोकाने हासिनीचा तोल बिघडला.
रोहन: सांभाळून.
हासिनीला सावरत रोहन ने तिचा हात हातात घेतला.
एव्हाना संध्याकाळ झाली होती, समोर मावळतीचा लालबुंद सूर्य समुद्रात बुडत होता, लाल सोनेरी रंगाच्या नक्षीने आकाश व्यापून राहिलेलं. रोहन ने हासिनीला जवळ ओढलं. वाऱ्याबरोबर खेळणारी तिची बट, हळुवार हाताने मागे केली. हासिनी रोहनच्या डोळ्यात बघत होती, जणुकाही ती याच क्षणाची कधीपासून वाट पहात होती. रोहन ने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले, हासिनीही रोहनच्या मिठीत विरघळून गेली. असा किती वेळ गेला दोघांनाही कळलं नाही.रोहन ने हासिनीच्या डोळ्यात बघितले तसे तिचे गाल लाजेने गुलाबी झाले.
रोहन: निघायचं का
हासिनी: एवढ्या लगेच, आत्ताच आलोय.
रोहन: होतं असं, माझ्यासोबत कसा वेळ जातो कळत नाही, पण मॅडम संध्याकाळ टळत आली. परत रूम वर जायला लेट होईल.
हासिनी: होका, बरं निघू आपण, परत हा डोंगर उतरायचाय.
रोहन: मी उचलून नाही हा घेणार आता
हासिनी: दमला वाटतं माझा रोहू.
रोहन: रूम वर गेल्यावर दाखवतो दम तुझ्या रोहूचा.
तशी हासिनी हलकेच लाजली, हळू हळू अंधार पडू लागला होता, हासिनी रोहनचा हात धरून डोंगर उतरू लागली. अर्ध्याच तासात ते डोंगर उतरून हॉटेलच्या दिशेने चालायला लागले. चालत चालत ते काल रात्री बसलेल्या ठिकाणाजवळ आले, तस हासिनीला दडपण जाणवू लागल. कालचा प्रसंग परत तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला, तिला त्या जागेवरून जायची इच्छा नव्हती पण रोहन ऐकणार नव्हता. आज तिथे बरीच गर्दी जमलेली, पोलिसही आलेले दिसत होते. विचारून कळलं की तिथे कोणा महिलेचा मृतदेह सापडला होता. खरंतर नुसती हाडंच होती, बाजूला सापडलेल्या कपडे आणि इतर गोष्टींवरून तो महिलेचा असावा असा अंदाज होता. फाडून खाल्ल्यासारखी मृतदेहाची अवस्था आणि बाजूला तसेच पडलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू पाहून हल्ला कोणी जनावराने केला असावा असा अंदाज होता. मात्र तिथे पडलेली कुकरी कुठून आली याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती. पोलीस तेथील बघ्यांची गर्दी पिटाळू लागले तसे रोहन आणि हासिनी तिथून पुढे निघून थेट रूम वर आले. हासिनीच्या डोळ्यासमोर राहून राहून काल दिसलेला अनोळखी भयाण चेहरा येत होता. रोहन फ्रेश होऊन बाहेर आला.
रोहन: जाम भूक लागलीये, मी ऑर्डर देतो. काय मागवू?
हासिनी अजून आपल्याच विचारात बुडालेली.
हासिनीsss हासिनी
हासिनी: हा काय रे
रोहन: कसलं टेन्शन घेतलयस एवढं, मी म्हटलं काय मागवू जाम भूक लागलीये.
हासिनी: काही मागव, मला नकोय भूक नाहीये.
रोहन: एवढं चालून येऊन पण भूक नाही, एका किस ने पोट भरलं का. रोहन मिश्किलपणे हसत म्हणाला.
पण हसीनिकडून काहीच रिस्पॉन्स नव्हता, ती अजूनही कुठल्यातरी विचारात बुडालेली. तिचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला.मी बिर्याणी मागवतोय असं म्हणत रोहन ने बिर्याणी ऑर्डर केली.
रोहन: हासिनी तू उगीच जास्त विचार करतेयस या सगळ्याचा, असं म्हणतात आपण जो विचार करतो तेच आपल्याला समोर दिसत. बिर्याणी येतच असेल खाऊन मस्त ताणून दे.
हासिनी: ते बीच वरती नक्की काय झालं असेल, तुला काय वाटत.
रोहन: कुठे काय कुठल्यातरी जनवराने हल्ला केला असेल त्या बाइवर , ती केस क्लोज पण झाली असेल एव्हाना आणि तू अजून तोच विचार करतेयस.
हासिनी: आणि ती कुकरी
रोहन: कोणती कुकरी?
हासिनी: नाही कोणती नाही.
एवढ्यात बेल वाजते, दारात हॉटेलचा वेटर डिनर घेऊन असतो.
रोहन: थँक्स
वेटर: वेलकम सर
रोहन एका प्लेट मध्ये बिर्याणी काढून हासिनी समोर बसतो.
रोहन: आज मी भरवतो तुला.
हासिनी: नको रे,काहीतरी काय.
रोहन: चल तोंड उघड पटकन, आता एक घास चिऊचा वैगरे नाही म्हणणार मी.
हासिनी चेहऱ्यावर उसने स्मित आणून 2 घास खाते. तिची भीती तिला आतून पोखरत असते. हासिनीचा मूड डाउन असल्याने रोहनही बिर्याणी हादडून लगेच झोपी जातो. हासिनीला झालेल्या घटनांचा विचार करत असतानाच कधीतरी डोळा लागतो . अचानक कधीतरी हासिनीला तिच्या आजूबाजूला काहीतरी हालचाल जाणवते, ओला गिळगीळीत स्पर्श होतो. हासिनी डोळे उघडते तेव्हा ती बीच वर पडलेली असते, तिच्या अंगावर वाळूतले खेकडे चढलेले. घाबरून उठत ती ते झटकून टाकते आणि आजूबाजूला पाहते रोहन कुठेच नसतो. ती त्याला बीच वर शोधू लागते,तस तिच्या लक्षात येत ही तीच जागा असते त्या दिवशीची. पण मी इथे कशी काय आले आणि रोहन कुठेय, इतक्यात तिला तीच शीळ ऐकू येते. ती पॅनिक होऊन बीच वर इकडे तिकडे पळू लागते, तिथे त्या वेळेस कोणी चिटपाखरू सुद्धा नसत. हासिनी अधांतरी धावत राहते, नाही तिला परतीचा रस्ता सापडत नाही कोणी माणूस दिसत. तो शिळेचा आवाज जवळ जवळ येत मोठा होतं जातो. धावून तिला धाप लागते, तसा तिचा श्वास अडकू लागतो तिला आणखी पळणे असह्य होते. ती तिथेच पडणार एवढ्यात तिला समोर रोहन पाठमोरा दिसतो, ती उरलं सुरलं बळ एकत्र करून त्याच्या दिशेने धावते. त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवते, तसा तो पाठी वळतो, त्याची भेदक जळकी नजर हासिनीला धडकी भरवते, तो रोहन नसतो, तशी ती जागीच थबकते. त्याच्या उजव्या हातातून कुकरी चकाकते,ते काळोखात रोखलेले लाल डोळे तिच्या शरीरावरन फिरत असतात , हासिनीची किंकाळी भीतीने घशातच अडकते. तो अनोळखी त्याचे करवतीसारखे दात दाखवत एक विकृत हास्य करतो , आणि हासिनीवर झडप घेतो. एक मर्मभेदक किंकाळी ऐकू येते आणि हासिनी बेड वर उठून बसते. तीच पूर्ण शरीर घामाने डबडबलेल, श्वास जाड पडलेला ती लगेच इन्हेलर शोधू लागते. जवळच तिला सापडतो, कसातरी तिचा श्वास नॉर्मल होतो. ती रोहनकडे पाहते, तो गाढ झोपलेला असतो. ते भयानक स्वप्न हासिनीची झोप उडवून टाकत, तिला काही केल्या झोप येत नाही. शेवटी ती रूमच्या गॅलरी मध्ये येते, समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकेने तिला बरं वाटत. ती झालेल्या घटनांविषयी विचार करू लागते, कदाचित मी जास्त विचार करतेय या सगळ्याचा. मला फक्त भास होतायत रोहन म्हणतो तेच बरोबर आहे, यावर जास्त विचार करण्यात अर्थ नाही. हासिनी विचारात असताना तिला अचानक लक्षात आलं, हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअर ला कोणीतरी उभ आहे जे गेला बराच वेळ तिच्याकडेच बघतंय. तिला रोहनच बोलण आठवलं, आपण जो विचार करतो तेच आपल्या समोर उभ राहत, तिला त्याच्याकडे बघायची भीती वाटू लागली. तिने हिम्मत करून खाली बघितले आणि तिची बोबडी वळाली, तो तोच होता अनोळखी. त्याची लालबुंद भेदक नजर तिच्यावर रोखून, विकृत हास्य करत.क्रमश:
YOU ARE READING
अनोळखी
Mystery / Thrillerरात्रीच्या त्या निरव शांततेत संपूर्ण बीच वरती दूर दूर पर्यंत कोणीही नव्हतं. दूरवर पसरलेला फेसाळणारा समुद्र त्यावर मधूनच पडणारा दिपगृहाचा प्रकाश. थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे ओल्या मातीचा वास वातावरणात भरून राहिलेला.