आज भाद्रपद अमावास्येला महाराष्ट्रातील काही भागात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात हाच सण श्रावणी अमावस्येला साजरा केला जातो. तर आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात हा सण आषाढी त्रयोदशीला साजरा केला जातो. त्यास 'बेंदूर म्हटले जाते. बैलपोळा या सणाच्या तिथी आणि दिवस भिन्न असले तरी तो सर्वत्र साजरा करण्याची पद्धत मात्र बहुतांशपणे एक सारखीच आहे. वर्षभर कष्ट उपासणाऱ्या बैलाप्रती कृतार्थता व्यक्त ही सण साजरा करण्यामागची भावना आहे. ‘शेतकऱ्याचा बैल अन गरीबाची बायको कधी आजारी पडू नये’ पूर्वी ग्रामीण भागात ही म्हण प्रचलित होती. यावरूनच बळीराजासाठी बैल किती महत्वाचा व अनिवार्य होता हे अधोरेखीत होते. यांत्रिकीकरणापुर्वीच्या काळात शेतीची सर्व कामे बैलांमार्फत केली जात होती. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी असायची. काळ्या मातीत राबून हिरवं सोन पिकवणारे बैल हेच शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पोशिंदे असायचे. त्याकाळी शेतकऱ्यांच्या दावणीला किती बैलजोडी आहेत, यावरून त्याची प्रतिष्ठा, श्रीमंती ठरवली जायची. हा बैलबारदाणा पाहूनच शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न ठरवली जात असत. बैल हे शेतकऱ्यांचे घरचे भूषण असल्यामुळे उत्तम बैल बाळगण्याची हौशी स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये होत होती. परीणामी बैलपोळा हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातअसे. पंधरा वीस दिवस आधीपासून या सणाची तयारी चाललेली असायची. बैलांच्या साजशृंगाराच्या साहीत्याने आसपासच्या बाजारपेठा भरुन गेलेल्या असयाच्या. या सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी म्हणजे बैलांचे खांदे गरम पाण्याने धुवून खांद्यांना हळद लावून शेकायचे. सणा दिवशी सकाळच्या प्रहरी नदी, ओढा, कालावा याठिकाणी बैलासह अन्य जनावरांना नेहून घासूनपुसून आंघोळ घालून घरी आणायचे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर रंगाने नक्षीकाम करायचे. नव्या म्होरक्या, पायात तोडे, गळ्यात मणीमाळा, घाट्या, शिंगाला हिंगुळ त्यावर बेगड वरती पितळी शेंब्या, रंगीबेरंगी गोंडे, फुगे, कपाळावर बाशिंग अन पाठीवर रंगीबेरंगी झुल टाकून आपल्या ऐपतीप्रमाणे साजश्रुंगार केलेल्या बैलांना गावातून मोठ्या दिमाखाने सनई, ढोल, ताशांच्या गजरात फिरवून आणायचे. घरी आल्यानंतर कुंकू लावून गृहीणींच्या हस्ते त्यांची पूजा करायची. त्यांना पंचारती ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य भरवायचा. त्यानंतर दावणीला बांधून हिरावा चारा घालायचा. मगच शेतकरी कुटुंब जेवण करीत असायचे. तीन चार तासांच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पुन्हां ग्रामदैवताच्या मंदिरापुढे आपापल्या बैलजोड्या एकापाठोपाठ एक उभ्या करायच्या. त्यांच्यापुढे ढोल लेझीमचा खेळ रंगयाचा. गावातील सर्व बैलांची एकत्रित काढलेली ही मिरवणूक रात्री नऊ दहा वाजेपर्यंत चालत असत. त्याकाळी बळीराजाच्या सुख दुःखात सहभागी असणारे बैलांना कुटुंबातील सदस्याचे स्थान होते.
¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.
घरातील कर्त्या पुरुषांसारखीच बैलांची काळजी घेतली जायची. एवढेच नव्हे तर बैल म्हातारे झाले की, त्यांना विश्रांती दिली जायची. वृद्धापकाळामुळे सुखाने दावणीला खात बसलेला बळीराजाचा हा सखा, सोबती एके दिवशी निघून जात. त्यावेळी जड अंतकरणाने त्याला दफन करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे. यावेळी सार कुटुंब हळहळ व्यक्त करीत असायचे. अलीकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाले. ट्रॅक्टर आणि त्यावरील कृषी औजारे यामुळे बैलांच्या संख्येत झपाट्याने घट होत गेली. एकत्र कुटुंब पध्दतही संपुष्टात आल्याने शेतजमीनीचे तुकडे झाले. त्यामुळे आता बैल सांभाळणेही परवडेनासे झाले. परीणामी पूर्वी गावामध्ये प्रत्येक घरी असणारी बैलजोडी आता मोजक्याच लोकांकडे असते. तेही शेतीच्या वरकड कामासाठी उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून ती पोसली जाते. आधुनिकीकरणापुर्वी ग्रामीण भागात बैलगाडी हेच दळणवळनाचे मुख्य साधन होते. यात्रा जत्रा, मामाच्या गावाला जाण्यासाठी, लेकी सुनांना माहेर सासर पाठवणी अशा अनेक कारणांनी होणाऱ्या प्रवासासाठी सर्रासपणे बैलगाडीचा वापर होत असे. प्रवासात ऊन, पाऊस लागू नये म्हणून बैलगाडीवर गोलाकृती कळक बांधून त्यावर कापडी पडदा लावला जायचा. त्याला तट्याची बैलगाडी म्हटले जात असे. लग्नाचे वऱ्हाड घेउन पाच-पंचवीस बैलगाड्यांच्या एकामागून एक चालेलेल्या ताफ्याचे दृश्य मोठे मनमोहक असायचे. एकेकाळी बैलजोडी, बैलगाडी, जनावरांची भरलेला गोठा हे शेतकरी कुटुंबाचे वैभव असायचे. कालोघात हे वैभव, हा डामडौल संपुष्टात आला आहे. बैलांची संख्याच घटल्याने या सणांचा पुर्वीचा थाट आता उरलेला नाही. आता परंपरेचा सण म्हणून बैलपोळा साजरा केला जातो. या सणाची पूर्वीची हौस अन मौज आता उरलेली नाही. दत्ता सावंत : सोमेश्र्वरनगर, बारामती