'काळ'भ्रम ⏳

51 1 0
                                    

1976 ची ही घटना आहे. मधुकर पवार हे गृहस्थ एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारी कर्मचारी  म्हणून रुजू झाले होते . कोकणातील एका छोट्या शहरांमध्ये ते त्यांच्या मित्रासमवेत राहत असत. त्याकाळी करमणूक साधन म्हणून नाटक,सिनेमा सोडून त्यांना आवडेल असं त्या शहरात काही नव्हतं. खानावळीतील भोजनावर यथेच्छ ताव मारून, ते सिनेमा पाहण्यास  गेले. रात्री सव्वा बाराच्या सुमारास  चित्रपट संपल्यावर, जवळील पानाच्या टपरी वरून आवडते पानं तोंडात कोंबून ते घरी जायला निघाले. जाताना वाटेत त्यांना प्रथमतः  इस्पितळ व त्यानंतर काही अंतरावर त्यांचं कार्यालय लागत असे. त्यांचं कार्यालय  ( office ) तळ्याकाठीच होतं. मोठा परिघ असलेल्या तळ्याच्या भोवती मंद प्रकाशाच्या स्ट्रीट लाईट पेटत होत्या. तळ्याच्या बाजूला माणसांना बसण्यासाठी कठडा होता. मात्र आता तिथे निर्जंनता होती. संध्याकाळी वाटणाऱ्या रम्य वातावरणाची जागा आता भेसूरतेने घेतली होती. पवारांचे कार्यालय रस्त्याला लागून थोडे उंचावर होते. साधारणता 15 ते 20 पायऱ्या चढाव्या लागत. तळ्याच्या व कार्यालयाच्या मध्ये मोठा रस्ता होता. पवारांचं लक्ष सहज आपल्या कार्यालयाच्या दिशेने गेलं. मात्र तेथील दृश्य पाहून त्यांना धडकी भरली. ते त्या दृश्याकडे आवाक होऊन पाहत राहिले.....,झपाझप पावले टाकू लागले. त्यांचे श्वास वाढत चालले होते. पायाला कंप सुटला होता.
     पवारानी डॉक्टर सोनवणे यांना आपल्या कार्यालयीन ऑफिसच्या पायरीवर रेलिंगला टेकून सिगारेट शिलगावताना पाहिले होते. अर्थात, डॉक्टर सोनवणे यांचे त्यांच्याकडे मुळीच लक्ष नव्हते. डॉक्टर सोनवणे हे स्वतःच्या धुंदीत होते. त्यांची नेहमीची बॅग त्यांच्या बाजूला पायाखाली ठेवलेली दिसली. डॉक्टर सोनवणे हे त्यांच्या नेहमीच्या सफारीच्या वेशात त्यांना दिसले.
      डॉक्टर सोनवणे यांची तीन महिन्यापूर्वी हत्या झाली होती. मध्यरात्री पेशंट सिरीयस आहे.. या खोट्या बहाण्याच्या द्वारे... निर्जन रस्त्यावर त्यांचा खून करून गाडीसह त्यांना जाळण्यात आले होते. डॉक्टर सोनवणे पवारांच्या कार्यालयातच बसत. तिथेच त्यांचा केबिन होता. बाकीचा वेळ ते इस्पितळात असत. जिवंतपणी कार्यालयाच्या पायरीवर ह्याच ठिकाणी काही काळ शांतपणे थांबून सिगरेट ओढण्याचा त्यांचा नेहमीचा दिनक्रम होता.
   मृत डॉक्टर सोनवणेना मध्यरात्रीनंतर ऑफिसच्या पायऱ्यांवर त्यांच्या नेहमीच्या वेशभूषेत पाहिल्याने पवारांची घाबरगुंडी उडाली होती. पळत पळत ते घरी गेले व दार ठोठावून त्यानी मित्र शंकर तावडे यांना  उठवलं. तावडेनी माठातील पाणी देत, शांत करत.... पवारांकडून घडलेल्या घटनेबद्दलची सविस्तर माहिती ऐकून घेतली. तुला भास झाला असेल असं सांगून शंकर यांनी त्याला झोपण्याचा सल्ला दिला. पवार कसे बसे झोपी गेले. पवारांच्या मनात मात्र काहूर उठले होते. दुसऱ्या दिवशी कामाला जाण्यापूर्वी, त्याने त्यांचा मित्र शंकर कडे पुन्हा तोच कालचा विषय काढला. त्यावर शंकर यांनी त्याला संध्याकाळी, त्याचे ओळखीचे  गुढ विद्या उपासक प्राध्यापक मसूरकर यांच्याकडे याविषयी चौकशी करू असे पवारांना आश्वस्थ केले.
   सायंकाळी शंकर तावडे... हे आपला रूम पार्टनर  पवार यांची वाट पाहत " विसावा " हॉटेलमध्ये बसले होते. काही वेळातच पवार तेथे लगबगिने हजर झाले. दोघेही चहा घेऊन मसूरकरांकडे निघाले. मसुरकर हे रिटायर्ड  प्राध्यापक होते. त्यांचा गुढ विद्येचा, ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास होता. शंकरचे ते विशेष परिचित असल्याने... ते पवारांना बरोबर घेऊन त्यांच्या घरी पोहोचले.
   मंदस्मित करून मसूरकरांनी त्यांचे स्वागत केले. घडलेली सर्व घटना मसूरकराना पवारानी कथन केली. काहीसा वेळ स्तब्ध होऊन... मसुरकर गंभीरपणे बोलू लागले.... " तुम्हाला दिसलेल्या.....अशा घटना अनेक ठिकाणी घडत असतात. फक्त त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. आपल्या त्रिमितीय जगताच्या  ( three dimension world) पलीकडे एक दुनिया आहे. त्याला चतुर्थमितीय  ( forth dimension ).... अर्थात ' सूक्ष्म जगत'... असंही म्हणतात. कोणतीही व्यक्ती मृत( dead) झाली तरीही त्याच्या' सूक्ष्मदेहाचं ' अस्तित्व हे राहतंच! यालाच "वासना देह" असेही म्हणतात. असा हा वासना देह... कधी- कधी एका विशिष्ट काळाच्या चौकटीत अडकतो. त्याला कारणीभूत त्याचं स्वतःचं  'मन 'असतं. स्थूल शरीराचा मृत्यू होतो पण' मन 'व 'सूक्ष्म देह 'तसाच उरतो. दैनंदिन जीवनात व्यस्त राहणाऱ्या मानवाला ह्या जड जगताची ( material world) सवय ( habit)होऊन जाते. त्यामुळे मृत्यूनंतर देखील तो ह्या जड जगतातील आपलं अस्तित्व विसरत नाही. आपण जिवंत आहोत ह्याच... अविर्भावात,भ्रमामध्ये... जगत राहतो. मृत्यूच्या पूर्वी जी मनस्थिती असते.... त्याच मनस्थितीला मृत्यू पश्चात देखील... तो कवटाळून राहतो. दैनंदिन जीवनात जे काही करतो,तेच मृत्यूनंतर देखील करत राहतो. त्याला काळाच भान राहत नाही. स्वतःच निर्माण केलेल्या एका काळभ्रमात तो विशिष्ट जीवात्मा अडकून राहतो. "
       इतक्यात पवार त्यांना म्हणाले, " डॉक्टर सोनवणे मलाच का दिसले? त्यांची यातून सुटका होणार का? तुम्ही जे काही म्हणतायं, ते काळाच बंधन.... डॉक्टर सोनवणे यांना कोणी घातलं?.... भांबावलेल्या स्वरात पवार यानी एका दमात हे सर्व प्रश्न मसूरकरांसमोर टाकले.
      मसूरकर भुवया उंचावून काही काळ स्तब्ध राहिले..... पुढच्याच क्षणी... पवारांच्या प्रश्नाच्या रोखाने ते संवाद साधू लागले...... " तुम्हाला डॉक्टर सोनवणे 'दिसणे ' हा एक निव्वळ योगायोग होता. त्या विशिष्ट वेळी तुम्ही नेमके तेथे पोहोचलात. तुम्ही संवेदनशील  ( sensitive )असल्याने, त्या चतुर्थ  मितीचं ( forth dimension) ओझरतं का होईना, परंतु 'क्षणिक 'असं दर्शन तुम्हाला झालं....... त्यांची यातून सुटका होणे, हे आता काळाच्या हातात आहे. तुम्हाला माहिती आहे.... डॉक्टर सोनवणे हे अचानक हल्ल्यात मृत्यू पावलेत! त्यानी त्यांचा "मृत्यू " अद्याप स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांचा सूक्ष्म देह  ( astral body) हा अजून भौतिक जगतात ( material world)असल्याच्या भ्रमात वावरत आहे. डॉक्टर सोनवणे हे.... त्यांच्या स्वतःच्या मनाच्या परिघाच्या कक्षेत  फिरत आहेत. हे बंधन त्यांनी स्वतःच स्वतःला घालून घेतलय, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. "
   प्राध्यापक मसुरकर अचानक बोलता बोलता थांबले. पवारांकडे अंगुली निर्देश करत ते म्हणाले .. " तुम्ही ती घटना आता विसरून जा. त्यांना त्यांच्या जगतात राहू द्या. योगायोगाने काही वेळेला घडतं असं !"
    प्रश्न विचारण्याची संधी शोधणारे तावडे... यांना आपला मोह आवरता आला नाही. ते पटकन म्हणाले. " तुमच्या पाहण्यात असे इतर काही अनुभव आहेत का? "
   मसूरकर होकारार्थी मान डोलावत पुढे बोलू लागले.
" माझा मुंबईतील एक मोटरमन ( ट्रेन चालक ) याला रात्रीच्या वेळी ड्युटीवर असे अनुभव आल्याचे माझ्या ऐकिवात आहे. ट्रेनच्या समोर अचानक एक व्यक्ती आत्महत्ये करिता उडी मारते. परंतु,मागील स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास कोणतीही व्यक्ती जखमी अवस्थेत  अथवा मृत अवस्थेत आढळून येत नाही. अशा प्रकारचे विचित्र दृश्य त्याच्या सहकारी मोटरमन यांच्या देखील पाहण्यात आले होते .. याचा अर्थ.... हा काही मनोभ्रम नाही.... "
  पवारानी मध्येच मसूरकरांना थांबवत.....प्रश्न विचारला....' म्हणजे,आत्महत्या करणाऱ्या लोकांची पिशाच्च दिसतात का त्यांना? "
त्यावर मसुरकर हे ओघवत्या शैलीत बोलू लागले.... " हो.... आत्महत्या केलेल्या माणसांचे" वासना देह ".... पुन्हा त्याच ठराविक वेळेला आत्महत्या करताना दिसून येतात. हे काळाच्या व स्वतःच्या 'मन: चौकटीत ' अडकलेले जीवात्मे होय. जे आधीच मृत पावलेले आहेत, त्यांचे मृतदेह कसे सापडणार! हा फक्त आणि फक्त एक " काळ " भ्रम आहे. भूतकाळात घडून गेलेली, घटना पुनश्च दृश्यlयमान होत असते. "
मसूरकरांच्याद्वारे अनेक शंकांची निरसनं झालेली होती. तावडेनी पवारांकडे पाहिलं त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर त्याना समाधान दिसून आलं. मसूरकरांचा निरोप घेऊन ते त्यांचा रूमवर परतले.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 21, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

काळभ्रम (cage of time )Where stories live. Discover now