प्रकरण पहिले
"गौतम सर, मी तुम्हाला जेव्हा जेव्हा विचारतो तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमी विषय टाळता. पण आज तुम्हाला सांगावंच लागेल. प्लीज सांगा ना की, जेव्हा एखादी केस तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही ती सॉल्व्ह करण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरता? कारण मी नेहमी प्रत्येक केसच्या वेळेस स्टार्ट टू फिनिश तुमच्याबरोबर असतो. तरीही तुम्हाला जे दिसतं, समजतं ते मला थोडंही का जाणवत नाही?"
माझा सहाय्यक वरुण आज अगदी खनपटीलाच बसला होता. मी हसून त्याला म्हणालो, "खूप लोकांना वाटतं की आयक्यूचा याच्याशी संबंध आहे पण हा गैरसमज आहे. फक्त शिस्तशीर विचार करण्याचा इथे संबंध येतो. पूर्वी कुठेतरी वाचलेलं एक कोडं मी तुला घालतो. दोन मित्र असतात. त्यातला एक दुसऱ्याला विचारतो, 'आज मी लोकलने प्रवास करत होतो. माझं उतरण्याचं स्टेशन जवळ आलं तसा मी उठून दाराकडे गेलो. उठून जाणारा मी पहिलाच होतो तरीही स्टेशनवर उतरणारा मात्र शेवटचा होतो. असं का?' दुसऱ्या मित्राला बरोबर उत्तर देता येत नाही. वरुण, तू सांग बघू याचे उत्तर."
वरूणनेही सांगितलेले सगळे पर्याय चुकले. तेव्हा मी त्याला कोड्याचं खरं उत्तर सांगितलं. उत्तर असं होतं, की तो मित्र डब्यात एकटाच असतो.
यावर वरूण बोलला, "सर, हे बरोबर नाही. लोकलमध्ये गर्दी असणं हा आपला नेहमीचा अनुभव आहे."
"एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचं आहे. जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा तू आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या चष्म्यातून त्याकडे बघतोस. मी मात्र ही अनुभवांची साठलेली जलपर्णी पूर्ण बाजूला सारतो त्यामुळे पाण्याचा तळ स्पष्ट दिसावा तसा गुन्ह्याचा तळ, गुन्ह्याशी संबंधित लोकांच्या भूमिका मला स्पष्ट दिसतात. आत्ताही लोकलला गर्दी असणे स्वाभाविकच आहे हे धरून तू पुढचे निष्कर्ष काढलेस, त्यामुळे ते चुकले. एखाद्या वेळेस अस्वाभाविक घटना पण असू शकेल यावर सुद्धा विचार करायला हवा. गणितातलं एक सोपं उदाहरण देतो. a=b, b=c असेल तर c=a असणारच. पण मी मात्र त्यात एखादा d एलिमेंट असू शकेल का याचा विचार करतो तसा एलिमेंट शोधायचा प्रयत्न तू कर."
"सर, तुम्ही खूपच सोप्या शब्दात खूप मोठी थिअरी समजून सांगितलीत. मी हे नेहमी लक्षात ठेवीन."
आमचं बोलणं चालू असतानाच भोसले ऑफिसमध्ये शिरले.
मी त्यांचं स्वागत करत म्हणालो, "या, या भोसले! आज कशी काय वाट चुकलात?"
"तुमच्या बटाटे वड्यांच्या वासानी मला खेचून आणलं."
"भोसले, तुमच्या पासून काही लपून राहत नाही हं," असं म्हणून मी हसतच वड्यांचं पार्सल पुढे ओढलं.
आम्ही वड्यांचा समाचार घेत असतानाच मी विचारलं, "आज कुठली नवीन केस आणलीत?"
"इथून जवळच, पंधरा मिनिटांच्या अंतरावर, 'सायंतारा' नावाची बिल्डिंग आहे. त्यातल्या एका फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणी राहतात. आज सकाळीच आठच्या सुमारास त्यांच्याकडे काम करणारी बाई आली होती आणि फ्लॅटच्या दाराला कुलूप नसूनही, बेल वाजवूनही कोणी दारंच उघडंत नव्हतं असं सांगत होती. त्या बाईच्या नवऱ्याने मला सांगितलं की, 'घरी येऊन हिने मला सांगितल्यावर मी दोघींच्या मोबाईलवर फोन केले. कोमल ताईंच्या मोबाईल ला रेंज येत नव्हती आणि तन्वीताई फोन उचलत नव्हत्या. म्हणून मग आम्ही इथे तुम्हाला सांगायला आलो.' हे ऐकून मग आम्ही सगळेच सायंतारा मध्ये गेलो. मास्टर-की वापरून फ्लॅटचं दार कसंबसं उघडलं. हॉल, किचन आणि एका बेडरुममध्ये कोणीच नव्हतं. दुसऱ्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता.
" 'ही तन्वी ताईंची बेडरुम आहे. थांबा मी त्यांना हाका मारते,' असं म्हणून कामवालीने बऱ्याच हाका मारल्या. आम्ही जोरात दार ठोठावलं पण आतून काही प्रतिसाद येईना. फ्लॅटला कुठलीच बालकनी पण नव्हती. फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता त्यामुळे आमचा एक हवालदार पाईपला धरून त्या बेडरुमच्या खिडकीपर्यंत पोहोचला. त्यानी खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. सुदैवाने खिडकीला गज नव्हते. त्यानी बेडरुमची कडी आतून उघडली. आम्ही आत बघतो तर काय, जमिनीवर एक तरुणी कोसळलेल्या अवस्थेत पडलेली होती. तिच्या डाव्या कानशिलावर रक्ताचे ओघळ दिसले. ते आता सुकलेले होते. उजव्या हातात छोटंसं ऑटोमॅटिक पिस्तूल होतं. तिला बघताच कामवाली 'तन्वी ताई!' म्हणून किंचाळली आणि रडायला लागली. तुम्ही येईपर्यंत आम्ही तिला फ्लॅटमध्येच थांबायला सांगितलं आहे. आत्महत्येची केस वाटते आहे पण… निघायचं का गौतमजी? एकदा समक्ष पाहिलेलं बरं. तिच्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट झाला आहे. ती पोहोचेलच आत्ता एवढ्यात."
_______
YOU ARE READING
ओल्ड सिन्ज हॅव लॉंग शॅडोज्
Mystery / Thrillerगौतम अभ्यंकरच्या बुद्धीचातुर्याची झलक दाखवणारी, उत्कंठावर्धक कथा.