रेल्वेची सूचना झाली, "नागपूरहून मुंबईला जाणारी रेल्वे, क्र.११४०११ दीड तास उशिरा येत आहे."
सूचना ऐकताच त्याला जरा हायसंच वाटलं. उशीर होईल म्हणून तो त्याच्या २ जड बॅगा आणि एक लॅपटॉपची सॅक घेऊन प्लॅटफॉर्म पर्यंत पळत आला होता. त्याने त्याचा ओला चेहरा त्याच घामाने भिजलेल्या ओल्या शर्टाच्या बाहीने पुसला आणि एक दीर्घ उसासा सोडला.
"ए तुला बसायचंय का रे?" आं?"
शेजारच्या बाकावर बसलेल्या पंच्याहत्तरीच्या माणसाने विचारलं.
"अहो नाही काका, ठीक आहे मी."
"अरे ठीक कसला, दीड तास उभा राहणार का रे तू? आं? ये बस असा इथे आरामात"
"थँक्यू हं काका".
"अरे थँक्यू कसला रे? आं? अरे तुझ्या बापाच्या वयाचा मी. आमचा काळ असता तर तुझ्या आजोबाच्या वयाचा. ते काय ते फार्मालिटी दाखवते काय रे म्हाताऱ्याला? आं? हां पण तू गप्पा मारल्यास माझ्याशी तर बरं वाटेल हां मला."
तो हलकेच हसला आणि म्हणाला, " होss, मारू की गप्पा. तसंही दीड तासाशिवाय ट्रेन काही येत नाही आता." त्या वयस्कर माणसाच्या चेहऱ्यावर हलकेच हसू उमटले.
"मी मेहता. तुझं नाव काय म्हणालास?"
"माझं नाव प्रकाश." त्याचं नाव ऐकून मेहता क्षणभरासाठी कुठेतरी हरवला.
लगेच सावध होऊन मेहता बुवांनी पुढचा प्रश्न टाकला. " काय मुंबईला काय सुट्टीसाठी का कामासाठी? आं?"
"अहो मी मुंबईचाच. कामासाठी नागपूरला आलो होतो चार दिवस."
"घरी कोण कोण असतो तुझ्या?"
"मी आणि माझी बायको. दोघंच."
"चांगलंय चांगलंय. एकाला दुसरो तरी आहे ना." मेहतांच्या चेहऱ्यावर एक निराशेची सुरकुती पडली.
"तुम्ही कुठले?" प्रकाशने प्रश्न केला.
"मी इथलाच. तसा आत्ता इथलाच."
"आत्ता म्हणजे?" प्रकाशने विचारलं.
हलकेच हसत मेहता म्हणाले, "अरे म्हणजे जन्म झाला तेव्हा गुजराथेत होता म्हणे. मला काही आठवत नाही, बाप सांगायचा. नंतर चौथीपर्यंत कोकणात, मॅट्रीक बेळगाव पास, कॉलेजला नाशिक आणि पुणे, कामासाठी काही वर्ष मुंबईला. आमच्या काळचा एकदम पैसेवाला बिझनेसमन बरं का मी. आणि आता आम्ही नागपूरवासी."
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...