राखी.......
ऑक्टोंबर संपत आला अन् वाढत्या थंडी बरोबर वातावरणात हळूहळू बदल जाणवू लागला.
शुभ्र, केसरी, अन् निळसर रंगाचं असणार आभाळ सुद्धा दिवसातून चार वेळा काळवटून जायला लागलं. आत्ता मरतील मग मरतील अशा परिस्थितीत सुद्धा तग धरून राह्यलेली गावातील खमकी दोन-चार म्हातारी माणसं थंडीन दगावली.
इतकी कडाक्याची थंडी माझ्या आज पातूरच्या अख्या जिंदगीत कधी पाहिली नाही,
कुरकुर करत मोडकळीस आलेल्या लाकडी बाजावर कातड्यांच्या पिशवीत हाड सांभाळत जगणारा लक्ष्मण अण्णा मत्सू पारध्याला म्हणाला.
यंदाच्या या थंडीत आपला बी नंबर लागणार या विचाराने त्याची रात्रीची झोप गेली होती. वासेगाव कसं सगळं शांत भासत होतं.
वासेगाव च्या माळावर उभारणारा कारखाना शेतकऱ्यांनी जमिनी न दिल्यामुळे राठेगावच्या मुरूल कडील माळावर उभारून सात-आठ वर्षे उलटली होती.
कृष्णा खोर्यावर अतोनात माया असणारे बापू कारखाना उभारणीमुळे आणखीनच लोकांच्या पसंतीस उतरले होते.
भागातील शेकडो घरांच्या चुली याच कारखान्याच्या जीवावर पेटणार होत्या.
चांगलं शिक्षण घेऊन शहराकडे पळणारा तरुण आता याच कारखान्याच्या भरवशावर गावात राहून गावच्या प्रगतीत हातभार लावणार होता.
अनेक बेरोजगार हातांना काम मिळणार होतं. तस सगळीकडे आनंदाचच वातावरण होत.
बीड भागातील ऊस तोडणी कामगार सीझनमध्ये कारखान्यावर उतरल्यानंतर राठेगाव आणि आसपासच्या भागातील व्यापारी वर्गाला पर्वणीच असे.
वासेगाव तसं विस्तीर्ण असलेलं गाव, गावच्या पश्चिमेकडील तटास सह्याद्रीच्या भर भक्कम डोंगर रांगा त्याच डोंगर रांगा पार करून सरळ पुढे गेलं की कोकणचा पूर्वेकडील भाग सुरू होत होता....
कोकणचा सहवास लाभल्यामुळे राठेगाव पासून पश्चिमेकडील गावांना लोक, कृत्रिम कोकणच संबोधू लागले होते. वासेगाव सोडलं तर इतर आसपासच्या गावातील लोकांना शेतीमध्ये कमी आण मुंबईचा जास्त ध्यास होता.
पोराबाळांना गावाकडं ठेवून...घरच्या कर्त्या पुरुषाने मुंबईला काम बघायचं अन् तिकडेच आयुष्य घालवायचं जणू ठरवलं होतं....
मुंबईचा ध्यास लागलेल्या त्या लोकांना या कारखान्यामुळे तसा फारसा फरक पडणार नव्हता पण तरीही ठराविक लोकांसाठी राठेगाव चा कारखाना म्हणजे एक सुवर्णसंधीच होती...
ओसांडून वाहणाऱ्या उनाड माळावर वसलेला तो कारखाना काहीच दिवसात गजबजून जावू लागला.
सुरुवातीला कारखान्यांमध्ये बैलगाड्यांचा खूप मोठा राबता होता त्यात भर पडली अंगद ट्रॅक्टरची...
प्रत्येक वर्षाला कारखान्यावर ऊस तोडणी कामगारांची आवक वाढतच चालली होती परिणामी कारखान्याच्या आसपास अनेक उद्योगधंद्यांनी आपले पाय रोवायला सुरुवात केली.
कुणी चहा नाश्त्यासाठी टपरी उभारली तर कुणी जेवणाच हॉटेल कम ढाबा उभारला.
पंक्चर वाल्या पासून पिठाच्या गिरणी पर्यंत सगळ्यांनी कारखान्याच्या भोवताली ठाण मांडलं.
कारखान्याचा सिझन अवघा चार ते पाच महिन्यांचाच असायचा.
पण त्याच चार ते पाच महिन्यात वर्षाची कमाई व्हायची. पाच महीने चिकाटीन धंदा करायचा आणि उरलेलं वर्ष बसून खायचं असा नियमच जणू इथं लागू झाला होता.
ज्याप्रमाणे कारखान्यावर आलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कायदेशीर व्यावसायिक होते त्याच प्रमाणे काही बेकायदेशीर उद्योगधंदे सुद्धा कारखान्याजवळ उभारले गेले होते त्यात दारूचा गुत्ता असेल.... किंवा कुणी फिरून गांजा विकणारा असेल तर कुठ चालणारा पत्याचा क्लब. असे हरेक प्रकारचे उद्योग राठेगावच्या त्या ओसाड माळावर बहरू लागले.
अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी वाटेल ते करायची तयारी दाखवतात. बीड भागातील हे लोक सुद्धा असेच...