मोह.....

961 3 0
                                    

मोह......

तो सर्व भाग अतिशय दाट अशा झाडांनी व्यापला होता. सह्याद्रीची उंचच्या उंच शिखरं आभाळाला मस्तकं लावून कणा ताठ करून उभी होती. जणू देसाईवाडीवर कधीच कुठलच संकट येऊ नये म्हणून ते सह्याद्रीचे कडे शिवरायांच्या मावळ्यांसारखे अखंड उभे होते. अक्राळविक्राळ ढग पैलवानाच्या गतीनं येऊन त्या कड्यांवर आदळून उद्ध्वस्त होत होते.
पूर्वेकडून एक वळणवाट डोंगर उतरून नागमोडी वळण घेत देसाईवाडीकडे गेली होती... त्या वळणवाटेला झाडाझुडपांनी दोहोबाजूंनी वेढा दिला होता. सभोवतालच्या वातावरणाला कसलातरी दुःखाचा गंध येत होता. काहीतरी आक्रीत नक्कीच घडणार होत.
पहाटेची वेळ असल्याने सूर्यभानरावाला घोडा नीट पळवता येत नव्हता. त्याचा तो अस्मानी वेग धारण करणारा सफेद वर्णाचा घोडा सुद्धा त्या अंधाऱ्या पहाटे वाट चुकत होता, पण क्षणात सूर्यभान त्याला परत टाच मारून मार्गाच्या वाटेला आणत होता. पूर्ण वातावरणात घोड्याच्या टापांचा आवाज तेवढा घुमत होता बाकी चराचर शांत भासत होते. काही अंतर राखून कुणीतरी सुर्यभानरावच्या मागोमाग येत होतं, ते साधारण सात ते आठ जण असावेत. त्यांची गती एकदम सौम्य होती , हालचाल क्षीण जाणवत होती. बहुदा त्यांना समोरच्या माणसाला आपला सुगावा लागू द्यायचा नसावा. दिवसभर पोटासाठी वणवण करणारे निसर्गातील हरएक जीव गाढ निद्रिस्त अवस्थेत होते.
आपली तलवार नीट आहे का ते तपासून घेत आपण देसाईवाडीच्या वेशीवर पोहचल्याची त्याने खात्री करून घेतली. अजून कडूस पडायला अवकाश होता. सूर्यभानरावने घोड्याला लगाम देत , हळुवार तो घोड्यावरून खाली उतरला. त्याला आज कुठलीही गलती करून हार पत्करायची नव्हती. ज्या कामगिरीवर तो आज आला होता ती कामगिरी काहीही करून आज त्याला फत्ते करायची होती. घोडा वेशीवर ठेवत दबक्या पावलांनी त्याने कुलकर्ण्याचा वाडा जवळ केला. तोंडावर केशरी तलम कापड अच्छादून घेत त्याने आपले अस्तित्व त्या काळोखाला अर्पण केले.
वाड्याला समोरून भक्कम दरवाजा होता त्यामुळं मागच्या बाजूने आत जाण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता. तटाला मागील बाजूस घनदाट अरण्य लागून होत.त्याच ठिकाणी आक्रमणाच्या वेळी निसटून जाण्यासाठी एक लहान पण मजबूत दरवाजा होता तो आतूनच बंद असायचा.
वाड्याच्या मागच्या बाजूला तटाला लागूनच जंगली बाभूळ वाड्याला वेडावन दाखवल्यागत अक्राळविक्राळ उभी होती. त्या बाभळीचा काटा बोटभर लांब होता.खोड तटाला लागून सरळ आणि परत वेडेवाकडे पसरले होते. अमावस्येच्या त्या काळोखात सुद्धा त्याला ते झाड स्पष्ट दिसत होते , गेल्या कित्येक दिवसांच्या निरीक्षणाचा त्याचा तो अंदाज होता. सुर्यभानचा घोडा वेशीवर दिसताच ते सगळे थांबले लांबूनच त्यांनी घोड्याजवळ कुणी नसल्याचा कयास पक्का केला. हातभर अंतरावर येत त्यांनी घोड्यांना लगामी दिल्या, सगळे भरभर खाली उतरले. प्रत्येकाने आपापल्या कुर्हाडी पाठीवरून काढत हातात घेतल्या. इशारत होताच सगळेच्या सगळे वेगवेगळ्या दिशांनी गावात शिरते झाले. त्यांच्या चालण्यात एक वेगळाच वेग होता, प्रत्येकाचं पाऊल भक्कम होत. मारू अथवा मरू म्हणत खंडेरायाचा जप करत ते सगळे वेगवेगळ्या मार्गानी कुलकर्णी राहत असलेल्या वाड्याच्या आसपास पोहचले.
सुर्यभानने बाभळीवरून तटावर उतरत पहिली चढाई यशस्वी केली होती. आता प्रश्न होता तटावरून खाली उतरण्याचा , उडी मारली तर आवाजाने पहारेकरी सावध होण्याची शंका होती. त्यामुळंच की काय त्याने कंबरेचा दोरखंड सोडून बाभळीच्या एका मजबूत फांदीला बांधत आतील बाजूस सोडला. दोर धरत हळूहळू तो खाली उतरला. त्याला तटाच्या आत उतरताच समोरच्या वाड्याच्या भव्यतेची जाणीव झाली. तो भान हरखून त्या वाड्याची कारागिरी बघत उभा झाला. अतिशय रेखीव पद्धतीने कोरलेले ते दगडी बांधकाम बघताना त्याला आपण राहत असलेल्या जंगलातील त्या ओबडधोबड पाषानांची उगीचच दया आली. काहीवेळाने भानावर येत तो भिंतींच्या आडाने त्याच्या इस्पिताकडे सरकू लागला.
सूर्यभान वाड्याच्या आत गेल्याच समजताच बाहेरील त्या साऱ्यांच ह्रदय धडधडू लागलं.सौम्य अशी भीतीची लहर प्रत्येकाच्या मनात चमकून गेली , भयंकर अशा थंडीत सुद्धा घामाचे थेंब त्यांच्या कपाळावर जमू लागले. पुढं काय होईल या विचारांनी त्यांची मस्तके ठणकू लागली. पण बाहेर वाट बघत बसण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
एक एक खोली सरकत अखेर सूर्यभान त्या सागवानी पायऱ्यांजवळ येऊन पोहोचला.
तोच साऱ्या चारचरातील शांततेला भंग करत , चर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज झाला तस त्याने स्वतःला अंधारात फेकत मागे बघितले, दिवाणखोलीचा दरवाजा उघडून कुणीतरी बाहेर पडले होते. डोक्यावर असलेल्या काळ्या टोपी अन नेसलेल्या धोतरामुळे तो मुनीमच असावा अशी त्याची खात्री पटली. अनेक पहारेकर्यांना चुकवत तो इथपर्यंत येऊन पोहचला होता.पण खरी कामगिरी अजून बाकी होती. आवाज न करता त्याने एक एक पायरी चढायला सुरवात केली. वरच्या मजल्यावर येताच त्याला हवी असलेली खोली समोरच दिसली. इकडं तिकडं बघत त्याने दरवाजावर विशिष्ट प्रकारच्या खुणेन आपल्या उजव्या हाताचा अंगठा वाजवला. क्षणात आतुन हालचाल जाणवली. दार उघडलं गेलं आणि समोरच्या व्यक्तीने त्याला आत ओढत घट्ट मिठी मारली. तिच्या त्या उबदार स्पर्शाने त्याच्या अंगातील थंडीचा जोर वितळू लागला. तिच्या भावनांना मोकळी वाट करून देत त्याने तिच्या केसांमधून आपला हात फिरवत मानेवर आणला तसे तिचे शरीर शहारले , तिच्या मखमली त्वचेवर होणारा त्याचा स्पर्श तिला नवखा वाटू लागला......

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: May 27, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मोह....Where stories live. Discover now