वातविरहित कुंद हवा. आभाळ गच्च दाटून आलेय पण काही केल्या बरसत नाही. दगडी आसनावर वज्रासन ध्यानस्थ कालशृंग. काळाकुट्ट. अंधारात एकजीव झालेल्या गुहेतील इतर दगडांशी तादात्म्य पावलेला. जाणिवा तल्लख. शेकडो वर्षे किट्ट शांतता. हल्ली कोण किडे भुणभुणायला लागलेत? समाधी अधून मधून भंग होतेय. पुन्हा उठावे का? कारंकार रक्तपात, नंतर पश्चाताप. नको.
जय शंभो! जय शंभो! जय शंभो!
चराचर आनंद भरून राहिला आहे. पक्षी, पाने आणि अलौकिक उद्याने. उत्तानयौवना बरसल्यासारख्या जलधारा नखशिखांत चिंब करताहेत. ओल्या मातीचा गंध श्वासात भरून राहिला आहे. हातातील दंड मातीत रोवून कालशृंग पुतळ्यासारखा निश्वास निथळत उभा आहे. साक्षात कळिकाळाचा पुत्र.
गुणगुण, गुणगुण.
समाधी पुन्हा भंगली. हातातील दंड नकळत जमिनीवर आपटला. विजेचा कल्लोळ. जिवाच्या आकांताने फोडलेल्या किंकाळ्या. अर्धोन्मीलित नयनात क्षणार्ध लकाकलेल्या विजेने करोडोंच्या संख्येने गुहेभोवती जमलेले जीव उमटले. बेंगरूळ, सरपटणारे, खुरडणारे, लांब लचक जिभा लवलवणारे रोगजर्जर अभागी जीव. हलक्याशा दंडाघाताने शेकडोंचे उडालेले मांस रक्त गुहेत सांडलेले. इतक्या जवळ आले?
कालशृंगाने डोळे उघडले. कर्कश कोलाहल माजला. किंचाळत गुहेबाहेर जाऊन दूर झाडाझुडपाआड लपले. प्रत्येकाने मुखवटे लावलेले होते. मूळ थोबाडापेक्षा विकृत मुखवटे. कालशृंग मोठ्याने हसला. मोठाले खडक एकमेकांवर आदळून फोडावे तसे हास्य. पुन्हा असंख्य आरोळ्या फुटल्या. थोडे जवळून पाहणारे हजारो जंतू हृदय बंद पडून मेले.
चूप!
राक्षस! सैतान! जंतू मोठयाने ओरडले. प्रथम कालशृंगास त्या जंतूंच्या जिवाच्या मानाने त्यांच्या फारच मोठ्या आवाजाचे आश्चर्य वाटले. मग अर्थ समजला.
मूर्ख!!, कालशृंग कडाडला. पुन्हा मरामर झाली. त्याने वर्तुळाकार हात फिरवला. एक लख्ख आरसा. आपली प्रतिमा पाहून जंतू दचकले, अधिक भेसूर दिसू लागले. द्वेष, मत्सर, वांझोटी चीड त्वचेतून पु वाहवा तशी वाहू लागली. त्याची चिपाडे होऊन डोळ्यांवर आली.
खोटारडा! निर्बुद्ध झुंड किंचाळली. कर्कश चिरक्या आवाजात अर्वाच्य शिव्या देऊ लागली.
तो निशब्द उभा राहिला. कोलाहल कानांना वीट आणू लागला. पावलांनी पर्वताचा थरकाप करीत तो गुहेबाहेर आला. जंतूंचा अंत:काळ. धरणीवर दंडप्रहार झाला आणि गगनभेदी आवाज करीत एक सर्वाहारी अग्नीवलय पसरू लागले. आक्रोश, हताशा, भेकड क्षमा याचना त्या अग्निदेवतेस अस्पर्श होती. एक जळालेला वास आसमंतात भरला. एकूण एक जंतूंची राखरांगोळी झाली. साचलेले आभाळ बरसू लागले. हिरवे कोंब पुन्हा एकदा वाढू लागले. चहू बाजूस स्वर्गीय शांतता पसरली.
तो गुहेत आला तर कल्पसेनेस जाग आलेली. तिने त्याच्याकडे पाहून स्मित केले. सकाळ झाली.
अनिल जगताप
Email: anil.softx@gmail.com

أنت تقرأ
कालचक्र
قصص عامةअनादी काळापासून कालचक्र फिरतेय. कळिकाळ देखील या मूर्ख मानवांस कंटाळलाय, आपल्या पुत्रावर जवाबदारी टाकून मर्त्य मानव उत्क्रांतीचा टप्पा पार करण्याची वाट पाहतोय. परंतु दर वेळेस टप्पा चुकतोय.