kalaram te kedarnath

10 1 0
                                    

काळाराम ते केदारनाथ
अद्भुत, उत्कंठापूर्ण
एक आध्यात्मिक प्रवास आणि आत्मशोध
भाग - 2
मी खोलात जाऊन अध्यात्माचा शोध घेण्यासाठी व गुरुजींना भेटण्याची लागलेली आस म्हणून मी केदारनाथला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्याच बिल्डिंगमध्ये राहणारे श्री. रमय्या व त्यांची पत्नी हे नाशिक येथील इस्कॉन मंदिरातील भाविक. दररोज इस्कॉनच्या मंदिरात जातात. त्यांच्या ग्रुपने केदारनाथला जाण्यासाठी ट्रिप काढली. रमय्यांनी हे मला सांगताच मी त्यांच्याकडे ट्रिपसाठी नोंदणी करून पैसे भरले. जाण्याची सर्व तयारी झाली; परंतु जायच्या दोन दिवस आधी मला खूप ताप यायला लागला. ताप उतरण्याचे काही लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे शेवटी मला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. माझी ट्रिप चुकली. आठ दिवसांनी बरे वाटल्यानंतर मी हॉस्पिटलमधून घरी आलो. नियतीला मला त्यावेळी केदारनाथला घेऊन जायचेच नव्हते, असा मनात विचार आला.
माझे घर नाशिकमधील गंगापूर रोडवर चैतन्यनगर येथे गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच आहे व माझे ऑफिसही गंगापूर रोडवरच होते. त्यामुळे ऑफिसकडे जाण्याचा रस्ता हा गंगापूर रोडवरूनच असायचा. गंगापूर रोडला प्रमोद महाजन गार्डनजवळ मनोहरदास ठक्कर रोड येऊन मिळतो. त्या दोन्ही रोडच्या कॉर्नरला फुटपाथवर बोहरा पार्कच्या समोर एक म्हातारी बसलेली असायची. गाडीतून येता-जाता मी तिच्याकडे नेहमी बघायचो. त्या फुटपाथच्या पाठीमागचा प्लॉट रिकामा व झाडांनी भरलेला होता. रस्ता मोठा असल्याने वर्दळीचा होता. सत्तरीच्या वयाची असलेली म्हातारी अंगावर नावालाच वस्त्र, आदिवासी प्रकारातील चेहरा, विस्कटलेले केस व तेजस्वी डोळे, चेहर्‍यावर स्मितहास्य, असे तिचे रूप दिसायचे. बरेच लोक तिला वेडी समजत असावे. तसेही बरेच मनोरुग्ण शहरात फिरत असतात. माझे त्या रस्त्यावरून येता-जाता त्या म्हातारीकडे लक्ष जायचे. एकटक एकाच ठिकाणी ती तासन् तास पाहत असायची. ती मला कधी वेडी वाटली नाही. सवार्र्ंत म्हणजे कुठल्याही प्रकारचा निवारा नसताना ती एकाच ठिकाणी बसलेली असायची. खाली धरती, वर आकाश. तिच्याभोवती नेहमी कुत्र्यांचं कोंडाळं असायचे. कोणी काही खायला दिले तर त्याला ती हात लावत नसे. ती कुत्री तिची मित्रच झालेली होती. मीच काय, पण गंगापूर रोडवरून जाणार्‍या बर्‍याच लोकांनी तिला बर्‍याचदा बघितलेले असेल. तिच्याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. ऑफिसचा रस्ता तोच असल्याकारणाने मी येता-जाता पोळी, भाजी वगैरे फुटपाथवर ठेवून जात असे. एकदा हिवाळा कडक असल्याने थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून मी त्या म्हातारीला ब्लँकेट द्यावे, असा विचार मनात आला. ब्लँकेट घेऊन मी तिच्या अंगाभोवती टाकावे म्हणून मी जवळ गेलो. ती एकटक बघतच होती; परंतु यावेळी ती काहीतरी पुटपुटली. मला काही समजले नाही. तेव्हा तिने मला फुटपाथवर पडलेली भाकरी बाजूच्या कुत्र्यांना टाकण्याचा इशारा केला. नंतर माझा हात पकडला तसा माझ्या शरीरातून वीज जावी असा संचार झाला. मी शुद्ध हरपतो की काय, असे मला वाटले. तो परमानंद माझ्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचल्याची जाणीव झाली. ती एकच वाक्य बोलली, ‘तुला जे ध्येय प्राप्त करायचे आहे, त्याचा मार्ग काळाराम मंदिरातून पुढे जातो. तुला पुढील संकेत हे काळाराम मंदिरातूनच मिळतील. तिकडे जा.’ तसा मी एकदम आश्‍चर्यचकित झालो. मला जाणीव झाली की, म्हातारी कुणी वेडी वगैरे नाही. मी तिला घाबरूनच नमस्कार केला. अचानक त्यादिवशी मला एक अलौकिकाची अनुभूती आली होती. दुसर्‍या दिवसापासून ती म्हातारी मला त्या जागेवर तिथे दिसली नाही; परंतु येता-जाता माझे लक्ष न चुकता त्या जागेकडे जात असे व एक प्रकारची हुरहुर वाटत असे.
एक दिवस मी वृत्तपत्रांमध्ये काळाराम मंदिरात असलेल्या कसल्यातरी कार्यक्रमाची बातमी वाचली. तसे मला त्या म्हातारीचे शब्द आठवले. ‘तुझ्या ध्येयाचा पुढचा मार्ग हा काळाराम मंदिरातूनच पुढे जाणार आहे.’ तिच्या अशा या गूढ व विचित्र बोलण्याने मनात विचारांचे काहूर माजलेले होते. एक विचार मनात आला की, आज जावे का काळाराम मंदिरात? नाशिकमध्ये राहूनसुद्धा मी कधी काळाराम मंदिरात गेलेलो नव्हतो. धर्म, परंपरा, चालीरिती, कर्मकांड, रीतिरिवाज, रूढी, मूर्तिपूजा यांच्या मी विरोधात होतो; परंतु आज माझी गाडी ऑफिसच्या गेटकडे न वळता सरळ अशोक स्तंभमार्गे रविवार कारंजावरून होळकर पूल ओलांडून काळाराम मंदिराकडे निघाली होती. गोदावरीच्या कडेकडेने जाताना विविध प्रकारची मंदिरे दिसत होती. काळाराम मंदिराकडे जाताना माझ्या मनात विचार आला की, गुरुजींच्या भेटीनंतर व त्यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनाचे ध्येय आनंद स्थिती प्राप्त करून घेणे झाले होते. खरे पाहता प्रत्येकाची वाटचाल तिकडेच सुरू असते; परंतु त्यास ते माहीत नसते. माझे चिंतन प्रामाणिक आणि गंभीर होत चालले होते. गुरुजींनी विविध अवस्थांमध्ये जिवाचे कसे रूपांतर होते ते समजवले होते. जडत्वाकडून जीव मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे टप्पे पार करत आनंद स्थितीकडे रूपांतरित होत असतो. मनाच्या अवस्थेतून मी बुद्धीच्या अवस्थेत प्रवेश करू पाहत होतो. माझी जिज्ञासूवृत्ती बळावत चालली होती. प्रत्येक साध्या साध्या गोष्टीपासून ते मित्रांशी झालेल्या आध्यात्मिक चर्चांपर्यंत, संत-महात्म्यांच्या भेटी, विविध ग्रंथांचे वाचन, मनन याने माझी बुद्धी तीक्ष्ण होत चालली होती. निरीक्षणाअंती मला अशी समज येऊ लागली की, मी बुद्धीच्या पातळीत अडकून राहिलो आहे व बुद्धीच्या पातळीवरील मर्यादा माझ्या लक्षात यायला लागल्या होत्या. एखाद्या गोष्टीबद्दल सांगोपांग तर्कशुद्ध विचार करून ती गोष्ट बुद्धीच्या साहाय्याने पटवून घेत होतो. पण त्या विचारांवर, ज्ञानावर निष्ठा उत्पन्न होत नव्हती. त्यासाठी मला आता बुद्धी बंद करून, पांडित्य बंद करून चित्तात उतरणे गरजेचे वाटू लागले होते. त्यासाठी सवार्र्ंत आवश्यक महत्त्वाची गोष्ट ‘श्रद्धा’. ती निर्माण होणे गरजेचे होते. चित्तात उतरण्यासाठी चित्त शुद्ध व पवित्र असणे खूप गरजेचे होते, हे लक्षात येऊ लागले होते. काळाराम मंदिराजवळ गाडी पार्क करून मी मंदिरात गेलो. नाशिक शहराची ओळख एक तीर्थक्षेत्र अशीच आहे. धार्मिक क्षेत्र म्हणूनच नाशिक प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीवरील विविध घाट, रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड, हनुमानकुंड, नदीच्या दोन्ही काठांवरील शेकडो ऐतिहासिक मंदिरे, अगदी दुतोंड्या मारुतीपासून रामेश्‍वर मंदिर, नारोशंकराची घंटा, गंगा-गोदावरी मंदिर, गोरेराम मंदिर, सुप्रसिद्ध कपालेश्‍वर मंदिर, सुंदरनारायण मंदिर ही सर्व भाविकांची श्रद्धेची ठिकाणे. नाशिकजवळ त्र्यंबकेश्‍वर ही ज्योतिर्लिंग असल्याने तिकडे देशभरातून येणारे संत, महात्मे, योगी, बैरागी सर्वच गोदावरी घाटावर फिरताना दिसतात. काळाराम मंदिरही पंचवटीत गोदावरी तीरावरच आहे. पूर्वी श्रीराम वनवासात असताना पंचवटीत राहत असे. पंचवटीच्याच पूर्वेकडील भागाला तपोवन असे म्हणतात. पूर्वी तपोवनात घनदाट अरण्य होते. त्याला दंडकारण्य असे म्हणत. तेथे अनेक ऋषिमुनी तपश्‍चर्या करीत व आश्रम बांधून राहत. त्यावरून त्याला तपोवन असे म्हणतात. मी काळाराम मंदिरात प्रवेश केला. मंदिरात कसला तरी कार्यक्रम असल्याचे दिसत होते. सभामंडपात बरीच गर्दी होती. मी सभामंडपापासून दूर व्हरांड्यात बसलो. समोर पाटीवर पर्यटकांसाठी मंदिराची माहिती व इतिहास लिहिलेला दिसला. पाटीवर लिहिलेला इतिहास मी वाचू लागलो. त्यात गोपिकाबाई पेशवे यांच्या प्रेरणेने सरदार खंडेराव त्र्यंबक व रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर इ.स. 1782 ते 1794 दरम्यान बांधून पूर्ण केले. मूर्तीच्या पायाशी असलेल्या सिंहासनावर त्यांची नावे कोरलेली आहेत. हेमाडपंती शिल्पमंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील एक प्रमुख देवस्थान आहे. मंदिर भव्यतेची व कलात्मकतेची छाप आपल्यावर उमटते. बांधकामशैलीचा उत्कृष्ट नमुना ठरावा असे सुंदर आहे. त्या काळात 23 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या मंदिराला चहूबाजूनी संरक्षक कोटाची दगडी भिंत असून, चार द्वारांपैकी पूर्वेच्या प्रवेशद्वाराला ‘महाद्वार’ म्हणतात. चारही दिशांना दरवाजे असले तरी सुरक्षिततेसाठी इतर दरवाजे बंद ठेवतात. त्याच्यावर भव्य असा नगारखाना आहे. मंदिरावरील कळस तांब्याचा असून, त्यावर सोन्याचा पत्रा जडविल्याने तो दिवसा व रात्री चंद्रप्रकाशातही चमकतो. मुख्य सभामंडप 40 खांबांवर उभारलेला असून, त्याला ‘हनुमान चालिसा’चे रूपक दिले जाते. मंदिराच्या 14 पायर्‍या म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षे वनवासाचे प्रतीक मानले जाते. विद्येची (वेद, उपनिषद इ.) स्थानेही 14 आहेत. मंदिराच्या आतून बाहेरून उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. या मंदिराची अशी बरीच वैशिष्ट्ये असून, ते ‘श्री’ यंत्रावर आधारित आहे. मंदिरातील श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती वालुकामय असून, मिट्ट काळ्या पाषाणाच्या आहेत. म्हणूनच याला तसे नाव पडले आहे. सकाळी सूर्योदयाची किरणे समोरच्या मारुतीच्या मूर्तीला स्पर्श करून पुढे गाभार्‍यातील या मूर्तीवर पडतात. मंदिर पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत भाविकांसाठी खुले असते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत रामजन्मोत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. श्रीमंत पेशवे यांनी इ.स. 1785 मध्ये या मंदिरास दिलेला मोठा रथ या उत्सवाचे आकर्षण असते. जगन्नाथपुरीच्या रथाप्रमाणे उत्सवात येथील हा श्रीराम रथ व गरुड रथ भक्तमंडळी ओढून नेतात. सुमारे दोन लाख भाविक यात्रेला येथे जमतात.
त्या फुटपाथवरील म्हातारीने मला काळाराम मंदिरात का पाठवले असेल, याचा विचार मी करत होतो. बसल्या जागेवरून मला मंदिराचा सर्व परिसर दिसत होता. तास-दीड तास बसल्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ गर्दी होऊ लागली. उत्तर दरवाजातून एक पांढरे शुभ्र वस्त्रे घातलेल्या व्यक्तीने मंदिराच्या आत प्रवेश केला. माझी नजर त्याच्यावरच खिळून राहिली. त्यांचा चेहरा अत्यंत शांत आणि प्रसन्न होता. त्यांच्या हालचालीत एक नेमकेपणा होता. डोक्यावर टोपी व कपाळाला गंध लावलेले होते, नाक सरळ आणि धारदार होते. गोरापान चेहरा, डोळ्यात एक अलौकिक चमक होती. ते येताच मंदिराच्या कमिटीचे सदस्य त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाले. शेजारून जाताना त्यांनी मंद स्मितहास्य करून माझ्याकडे कटाक्ष टाकला. मंदिरातील कार्यक्रमाचे सर्व नियोजन झालेले दिसत होते. थोड्याच वेळात ही व्यक्ती म्हणजेच वारकरी बाबा एका खोलीतून तयार होऊन, राम मंदिरात दर्शन करून पुढील सभामंडपात आले. प्रवचनास त्यांनी सुरुवात केली. त्या दिवसाचे मंदिरातील प्रवचन त्या वारकरी बाबांचे होते. मी लक्ष देऊन ते प्रवचन ऐकू लागलो. भक्तिमार्गात प्रवास करताना आपल्याला कळून येते की, ज्याप्रमाणे हवा वाहू लागली म्हणजे त्यास वारा म्हणतात किंवा ज्याप्रमाणे ढगातून पाणी पडू लागले म्हणजे त्यास पाऊस म्हणतात, त्याचप्रमाणे अंतरंगात वास करीत असलेल्या परमेश्‍वराबद्दल अतिशय प्रेम, वात्सल्य वाटू लागले, म्हणजे त्यास ‘भक्ती’ असे म्हणतात. अशी त्यांनी भक्तीची व्याख्या सांगताच मी अतिशय लक्ष देऊन त्यांचे प्रवचन ऐकू लागलो. त्यांनी त्या दिवशी नारदीय नवविदा भक्ती विशद केली. त्यांच्या प्रवचनात त्या निसर्गाच्या शक्तीचा उल्लेख येत होता. त्या शक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्या शक्तीचा अनुग्रह हा सत्संगाने प्राप्त होतो, पण सत्संगसुद्धा काय इतका सहज प्राप्त होणार आहे? सत्संग लाभणे कठीण. लाभला तर मुरणे कठीण व मुरला तर मात्र तो कधीही वाया जाणार नाही. त्या शक्तीच्या कृपेशिवाय, परवानीशिवाय काहीही शक्य नाही. त्या शक्तीच्या मिलनाची आत्यंतिक तळमळ पाहून ती शक्ती स्वतः साधकाला शोधत येते व त्याला संकेत देते. त्याला त्याच्या प्रयत्नात मदत करते, पण साधक जेव्हा सत्संगाचा अनुभव घेत असेल तेव्हा त्याने पूर्ण समर्पण बुद्धीने मनाच्या कोर्‍या पाटीने ते तत्त्वज्ञान तर्कशुद्ध बुद्धीने समजून घ्यायला पाहिजे. तिथे श्रद्धा उत्पन्न झाली तरच बुद्धी बंद करून पुढे चित्तात उतरता येते. चिंतन खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. बाकी काम तुम्ही परमेश्‍वर शक्तीवर सोडून द्या. बुद्धीतून चित्तात उतरण्यासाठी चित्त आधी शुद्ध असावे लागते. चित्त शुद्ध झाल्याशिवाय पुढे प्रगती नाही. तुम्ही चित्त शुद्धीसाठी यज्ञ, दान, जप, तप, ध्यान, धारणा इत्यादी अनेक गोष्टी करता. त्यांच्या या वाक्याने मी एकदम कान टवकारून लक्ष देऊन ऐकू लागलो. त्यांनी दृष्टांत दिला. तो मला खूपच भावला. तुम्ही या सर्व साधनांना (यज्ञ, दान, जप, तप, ध्यान, धारणा इत्यादी) सोडा. साबण किंवा कपडे धुण्याचे केमिकल म्हणा; परंतु भक्ती म्हणजे पाणी आहे. वरील सर्व गोष्टी, साधने स्वच्छता देतात; परंतु पाण्याशिवाय त्यांचे काही चालणार नाही. ‘पाणी’ म्हणजे प्रेम, भक्ती, वात्सल्य.
त्यांचे प्रवचन पूर्ण झाल्यानंतर आता मला त्यांना भेटावे असे वाटू लागले. मी थोडा जवळ जाऊन उभा राहिलो. लोकांचे दर्शन घेण्याचे काम सुरू होते. ते दर्शन घेणार्‍याच्या पाठीवर हळुवार हात ठेवत व स्मितहास्य करत. त्यांच्याशी काय आणि कसं बोलावं, हे मला काही समजत नव्हतं. मात्र, त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व, प्रेमळपणा,  अध्यात्मासाठी व इतरांसाठी जाणवणारी कळकळ यामुळे माझी औपचारिकता गळून पडली व मी दर्शनासाठी खाली वाकलो. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. नजरानजर झाली व त्यांनी मला थांबायला सांगितले. सर्व गर्दी कमी झाल्यानंतर त्यांनी माझा हात धरून राम मंदिरातील ते थांबलेल्या त्यांच्या खोलीकडे घेऊन गेले. मी प्रवचन खूप सुंदर झाल्याचे बोललो. प्रवचनकार बाबांंनी माझ्याकडे बघून मी तुझ्यासाठीच इकडे आलो आहे, असे सांगितले. त्यांनी तुझ्यात नक्कीच काहीतरी आत्मिक बदल होत आहे व पुढील मार्गदर्शनासाठी आता तुला गुरुजींची भेट मिळणार आहे, असे सांगितले. आपली ही भेट नियतीने घडवून आणली आहे. तुझी व गुरुजींची भेट घडविण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. गुरुजींनी तुला सांगितलेल्या सूचनेप्रमाणे तू तुझा अभ्यास चालू ठेवलेला आहे, असे दिसते, पण त्यात येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी, तुला असलेल्या शंका सोडविण्यासाठी तुझी व गुरुजींची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मला माहीत आहे की, तुला तुझ्या गुरुजींना भेटण्याची तळमळ लागली आहे. तुझे आज येथे येण्याचे प्रयोजनही तेच आहे आणि लवकरच तुझी भेट होणार आहे. नंतर मी प्रवचनकार बाबांना स्वप्नात येणार्‍या काळाराम व केदारनाथ मंदिराबद्दल सांगितले. त्यामागचा अर्थ मला कळला नाही, असे सांगताच त्यांनी तुला गुरुजी केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे भेटणार आहेत, असा संकेत दिला; परंतु ते कधी भेटणार हे मलासुद्धा सांगता येणार नाही. मी भेटीच्या वेळेबाबत तुला मार्गदर्शन करतो. त्यांनी सांगितले की, अशा शंकराच्या मंदिरात जा जिथे शंकराच्या पिंडीसमोर नंदी नाही. अशा मंदिराच्या पायरीवर उभा राहून समोर बघितल्यानंतर समोर दिसणार्‍या मंदिरात तुला गुरुजींना भेटण्याची तारीख व वेळ लपलेली आहे. ती तुला शोधावी लागेल.
तुझे नाव कृष्णा आहे व तुला गुरुजींना केदारनाथला भेटायला जायचे आहे. याही गोष्टी तारीख व वेळ यांच्याशी निगडित आहेत, हे लक्षात ठेव. तुला ती वेळ न सांगता शोधायला लावणे यामागे तुझी गुरुजींना भेटण्याची तळमळ किती आहे ही परीक्षाच ते पाहत असतील असे मला वाटते. गुरुजींनी सांगितलेल्या सूचनेनुसार तुझा अभ्यास चालू ठेव. तू तुझ्या ध्येयापयर्र्ंत पोहोचशील. त्यांनी आशीर्वाद दिला व ते निघून गेले.
त्याच विचारात मी घरी पोहोचलो. त्या दिवसापासून माझ्या मनाला प्रकर्षाने जाणवू लागले की, माझ्यापुढे वेगळाच मार्ग आहे. गुरुजी या मार्गावर माझी वाट पाहत आहेत. आनंदी अवस्था जाणून घेण्याच्या उत्तरोत्तर तीव्र इच्छेने माझे चिंतन सुरू होते. त्यासाठी कोणाचे तरी मला आशीर्वाद मिळत आहेत आणि सांगत आहेत ‘जा बाळ याच मार्गावरून असाच पुढे जा.’ या प्रवासातच तुझे भले होणार आहे. दोन-तीन आठवडे तेच विचार माझ्या डोक्यात होते. नंदी नसलेले महादेवाचे मंदिर शोधणे माझ्यासाठी एक आव्हानच होते.  मी मंदिरात जात नसल्याकारणाने मला मंदिरांबाबत तितकीशी माहिती नव्हती. एक दिवस संध्याकाळी विचारात असताना बायकोने विचारले की, तुम्ही दोन-तीन दिवसांपासून कसला इतका विचार करता? मी तिला काळाराम मंदिरातील घडलेली सर्व घटना सांगितली. तिने एकदम मोठ्याने मला सांगितले की, पूर्ण भारतात नाशिकलाच असे नंदी नसलेले महादेवाचे मंदिर आहे. कपालेश्‍वराचे मंदिर! दुसर्‍या दिवशी मी कपालेश्‍वर मंदिराकडे निघालो. तेही पंचवटीत गोदावरी तिरावर आहे; परंतु त्या मंदिराच्या समोर असंख्य मंदिरे आहेत व कपालेश्‍वराचे मंदिर बर्‍याच उंचीवर आहे. ज्या मंदिरात भगवान शंकराच्या पुढे नंदी नाही, असे एकमेव मंदिर म्हणजे नाशिकचेच कपालेश्‍वर मंदिर, याची खात्री झाली होती. मी माझ्या मार्गावर बरोबर होतो. कपालेश्‍वर मंदिराची अशी आख्यायिका आहे की, नंदीला शंकर भगवानाने गुरूसमान मानल्यामुळे आपल्यासमोर बसवले नाही. त्यामुळे भारतात भगवान शंकराच्या पुढे नंदी असला तरी नाशिक येथील कपालेश्‍वर मंदिरात नंदी नाही. पायरीवर बसून मी समोरील मंदिरे न्याहाळू लागलो. एक-एक मंदिर डोळ्यापुढे येऊ लागले. सिंहस्थ गोदावरी मंदिर, गोदावरी मंदिर, बालाजी मंदिर, नारोशंकर, रामेश्‍वर मंदिर इ. मंदिरे. आता यापैकी कुठल्या मंदिरात मला गुरुजींना भेटण्याची तारीख व वेळ मिळेल याच्या विचारात पडलो. त्या प्रत्येक मंदिरात जाऊन तपास करू लागलो. या सर्व मंदिरांचा इतिहास बघू लागलो; परंतु काही अर्थबोध होत नव्हता. माझा तो आता नित्यक्रमच बनला होता.
एक दिवस चमत्कारिक योगायोग झाला. कपालेश्‍वर मंदिराच्या पायर्‍या उतरताना पायर्‍यांच्या कडेला असणार्‍या पुस्तकांच्या दुकानातून योगायोगाने नाशिक दर्शन हे पुस्तक विकत घेतले गेले. योगायोग हा शब्द आपण अगदीच सहजपणे वापरतो. योगायोग म्हणजे, एखादी गोष्ट कोणतीही तार्किक संगती नसताना विलक्षण आकस्मिकपणे घडणं. निसर्गाच्या लीलेमध्ये संयोग अपघाताने यांना अजिबात वाव नसतो. या विश्‍वाची निर्मिती सर्व काही योगायोग नाही. कोणतीही गोष्ट अकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट कोणत्या तरी कार्याला साहाय्यभूत होत असते. ते पुस्तक घेतले व पायरीवर बसूनच वाचू लागलो. त्या पुस्तकात नाशिकच्या सर्व मंदिरांची माहिती होती. इतिहास होता. सवार्र्ंत शेवटच्या पानावर सुंदरनारायण मंदिराच्या माहितीवर माझी नजर गेली. मी मान वर करून समोर बघितले तर होळकर पुलाच्या पलीकडे मला सुंदरनारायण मंदिराचा कळस दिसत होता. भगवान विष्णूंना जालंदर पत्नी वृंदा हिच्या शापाने कृष्णवर्ण रूप प्राप्त झाले. त्यालाच आपण शालिग्राम म्हणतो. तेव्हा विष्णुंनी गोदावरी तीर्थावर स्नान करून आपले रूप पूर्ववत प्राप्त करून घेतले व तेथेच वास्तव्य केले. तेव्हापासून सुंदरनारायण मंदिर प्रसिद्ध झाले. गोदावरीच्या तीरावर व्हिक्टोरिया पुलाजवळ म्हणजेच आताच्या होळकर पुलाजवळ हे मंदिर 1756 मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी पुन्हा बांधले. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, 20 व 21 मार्च रोजी सूर्याची किरणे दुपारी 12 वाजता विष्णूच्या मूर्तीवर पडतात. म्हणून याला ‘हरिहर’ भेट असेही म्हणतात. म्हणजेच शिष्य व गुरूची भेट. म्हणजेच शिवाची व विष्णूची भेट. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला व मला खूप आनंद झाला. मला गुरुजी केदारनाथला 20-21 मार्चला दुपारी 12 वाजता भेटतील हा तो संकेत होता.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Aug 01, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

kalaram te kedarnathWhere stories live. Discover now