आज मुलांच्या कानात जखम झाली म्हणून सकाळी सकाळी ओळखीच्या अन जवळच्या खाजगी डॉक्टर कडे गेलो .
त्याने पाहिले , अन म्हणाला सिव्हिल ला घेऊन जा माझ्याजवळ मशीन नाहीये चेक करायला . सिव्हिल म्हणजे तालुका लेव्हलच सरकारी दवाखाना . सगळे तेथेच जातात सुव्यवस्था अन सुविधांनीयुक्त , अन विशेष म्हणजे डॉक्टर प्रेमळ अन हसमुख .
जायचे कसे ?बाहेर तर पोलीस अन त्यांची दांडकी , अन त्यात पंजाब पोलीस , बोलतात कमी अन मार जास्त ,
नाही म्हणायला सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत जरुरी सामान घेण्यासाठी सूट असते .
पण आता 9 वाजले होते ... जायचं कस ?
कानातून स्त्राव होत होता , म्हटलं पाहू काय होईल ते ?
काढली होंडा बाहेर , होंडा म्हणजे सरकारी सायकल जी पंजाब सरकारतर्फे शाळकरी मुलींना वाटली जाते दरवर्षी , मग ते जुन्या सायकली शे पाचशे रुपयात विकतात , तशीच खरेदी केलेली .
पोराला म्हटलं बस , काय होईल ते होईल ?
आमच्या गल्लीत 5 ते 6 घरे म्हणजेच दोन तीन मजली, त्यातली त्यातली निम्मी पडीक .. विदेशी स्थायिक झालेल्यांची ...
गल्लीतून बाहेर मेन रोड वर आलो अन म्हटले बोळाबोळाने जाऊ ,म्हणून शेजारच्या गल्लीत घुसलो ती आमच्या गल्लीसारखी बंद नव्हती त्यातून गेल्यामुळे दोन मेन चौक वाचणार होते .
गल्लीत घुसल्या घुसल्या जाणवले की,
संचारबंदी फक्त आमच्या गल्लीत अन गल्लीतून दिसत असलेल्या मेन रोडवरच आहे ....
बायका गप्पा मारत बसल्या होत्या , पोरं इकडून तिकडे पळत होती ... दोन तीन ठिकाणी तर टोळकी सामूहिक पबजी खेळत होती ...किराणा दुकाने सुरळीत चालू होती , अन त्यात भाजीपाला ही मिळत होता .
शीतद्रव्ये, अंड्याचे ट्रे लक्ष वेधून घेत होते , एक मेडिकल पण चालू होते .
हे सगळे घरापासून दोन मिनिटाच्या अंतरावर ,अरेरे फुकट सकाळची पळापळ करतो आपण असे काहीसे मनात आले .
तशीच सायकल रेमटत ह्या बोळातून त्या बोळात करत शेवटी मेन चौकात येऊन पोहोचलो तिथे तोंडालाच पोलिसांनी बॅरेक लावून अडथळे केले होते , अन दोन तीन पोलीस अन आर्मी टाईप 5 ते 6 असे कमीत कमी दहाजन दंडुके घेऊन उभे,अन गल्लीकडेच तोंड करून उभे ,
थोडे मनात चर्रर्रर्रर्र झाले पण मनातल्या मनात म्हटले औलाद कुणाची आहेस भिऊन चालतय नसतंय ,
गल्ली सगळी हिंडते आहे यांच्या डोळ्यासमोर , आपल्याला काय करणार आहेत .
तशीच सायकल पुढे नेली अन पार त्यांच्या शेजारून मेन चौकात घुसलो , अक्षरशः त्यांनी मला इग्नोर केलं .
माग बसलेलं पोरगं पप्पा पुलीस, पप्पा पुलीस म्हणून चिरकले , तसे त्यांच्या आईचा अस्सल कोल्हापुरी अन सातारी मिक्स पद्धतीने सत्कार केला , अन सायकल दामटली .
रस्त्यावरून दोन चाकी, चारचाकी सायकल रिक्षे , बॅटरीवरचे रिक्षे अधून मधून एखादा ट्रक , धावत होते ,
पुढे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर गर्दी 1 मीटर अंतर ठेऊन लाईन लागलेली दूरपर्यंत .
संचारबंदीच्या काळात हे सगळे बघून मनात धीर आला ,
दवाखान्यात पोचलो तर तुडुंब गर्दी , अन लाईन ...
10 रुपयांच्या केसपेपरला अर्धा तास गेला ....
म्हटले चुकून जर कोरोना भाऊ इथे असला तर आपला पण कार्यक्रम झालाच म्हणून समजा .....
9 नंबर च्या केबिन मध्ये कानाचे डॉक्टर असतात असे समजल्यावर तिकडे गेलो तर तोंडाला मास्क लावून किडकिडीत बांध्याच्या डॉक्टर मोबाईलवर काहीतरी करत बसलेल्या ,
"मॅडम अंदर आऊ ?"
तर मॅडमनी हातानेच या म्हणून खुणावले.
"क्या प्रॉब्लेम है ? "
मी पोरांचा तोंडाचा मास्क बाजूला करून डोक्यावरची टोपी काढून कान उघडा केला ,
मॅडमनी चष्मा लावला अन लांबूनच पाहिले .
"दोनो कान मे हैं ? "
"नही मॅडम 1 ही कान मे है , "
केसपेपर घेतला , त्याच्यावर डॉक्टरी भाषेत काहीतरी खरडले ,
"उधरसे दवाई लेलो "
"थँकु मॅडम "
बाहेर येऊन औषधे मिळतात तेथे जाऊन औषधे घेतली , 200 ते 300 रुपयाची औषधे अक्षरशः फुकट .
नुसत्या 10 रुपयात सिव्हिलचा बाजार संपवून घराकडे कूच केली , तेही बाजीरावांसारखे मेन रोडने अन सगळ्या चौकातून ............