Part 3

1.5K 4 0
                                    

" कशाची चिंता सतावते आहे का ?" आचार्यांच्या आवाजाने तो भानावर आला. आपल्या हातून जे घडतंय ते चूक का बरोबर ह्या विचारांतच त्याचा दिवस सरून जात असे. अध्ययन, पाठ, ध्यान, जेवण खाण कशावरच त्याचं लक्ष नसे. सकाळची गंगासफारी आणि त्यानंतर कुठल्यातरी कोपऱ्यात बसून विचारमग्न राहणं एवढाच त्याचं दिनक्रम होता. त्याच्यासारख्या बुद्धिमान आणि एकाग्र शिष्याला अश्या अवस्थेत बघून आचार्य देखील पीडित होत. आज न राहवून त्यांनी बोलण्याचे ठरवले.


" आचार्य जी आपण..." तो दचकला परंतु लगोलग वाकून त्याने आचार्यांना विनम्र अभिवादन केले. त्याची अवस्था समजून आचार्यांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. क्षणभरासाठी त्याच्या मनात आले आपण आचार्यांना सगळे सांगून टाकावे आणि झाल्या प्रकारची क्षमा मागावी. हे असे लपवून सतत अपराधी भाव मनात ठेवण्यापेक्षा एकदाच काय ते मोकळे व्हावे आणि शिक्षा घ्यावी. परंतु... आचार्य माफ करतील का....नुसत्या विचारानेच त्याच्या पोटात गोळा उठला. नकोच....


" कशाचे चिंतन चालू आहे...?" त्याला पुन्हा विचाराधीन झालेले पाहून आचार्यांनी जरा मोठ्यानेच विचारणा केली.


" मी... ते.. काहीच नाही..." काय बोलावे ते सुचेना. त्याच्या जिभेला कापरं सुटलं. हातपाय भीतीने थरथरू लागले.


त्याची तशी गोंधळलेली मुद्रा आणि मागील काही दिवसांच्या वागण्याने आचार्य चिंतीत होते. सततच्या विचाराने व अपुऱ्या निद्रेने निस्तेज झालेले त्याचे डोळे आणि मलूल झालेला चेहरा पाहून त्यांच्या पोटात गलबलून येत असे. काहीही झाले तरी आज त्याच्याशी बोलायचेच असे ठरवून आचार्य त्याला भेटले तर खरे... परंतु त्याच्या एकूण हावभावावरून त्याच्या मनातील वादळाचा थांग लागणं त्यांच्यासाठी अशक्य होत.


" तुझ्या मनात नक्की कोणता कल्लोळ चालू हे समजण्यास मी आता तरी असमर्थ आहे. जो शिष्य अत्यंत कठीण अशा पाठांवर निसंकोच माझ्याशी चर्चा करत असे, कित्येकदा माझ्याही मनात येणाऱ्या शंकांवर विचार विनिमय करत असे त्याच्या मनात असे काय वादळ उठले असावे जे बोलावयास तुला अपुरे व्हावे..." तो अजूनही शांतच होता. आचार्यांच्या शब्दांनी त्याला मागल्या काही दिवसांचे स्मरण झाले. किती चुकीचा समज करून घेतला होता आचार्यांबद्दल. ते त्याला आपल्या जवळचा शिष्य समजायचे आणि तो मात्र...

मोह - A TemptationWhere stories live. Discover now