*.....|| वाळण ||......*
सकाळ झाली होती . बाबा सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात ओसरीच्या समोरच्या धळीवर आंगणात दोन पाय समोर ठेऊन बसले होते. समोर आई भांडे घासत होती. काका आजुबाजुनं बसले होते. काही तरी चर्चा सुरू होती . माय चहा करत होती , मी कपबशीत चहा घेऊन आलो व बाबाला दिला . बाबांनी चहा घेतला व मायला म्हणाले ,
"हे पाय मा आमी उपाशी राह्यलो तरी चालीन पण तू का कपडे धूवाले कोणाच्या घरी गेली त तू पाहून घेजो ".
" भिकाऱ्या सारखं जिनं सोडं आता . लोकांच्या समोर खाली मान घाला लागते. "
"आमची काही
इज्जत विज्जत राहली पायजे की नाही",
"एवढा ले मोठे पोरं झाले, तरी दुसर्याच्या घरचे कपडे धुवाले जातं. "
"आजपासून कुठचं कपडे धूवाले जाचं नाही."
"मलेई धूनं घूवाले जावं वाटत नई रे राजा!"
पण मराच्या आंदी सगळ्याईचे उपकार फेडून जावू दे राजा"
"लोकइच्या कर्जाचं उपकराचं ओझं घिऊन मेलीतं नरकात जाईन ना बाप्पा!"
"अव तूले कायले नरकात जा लागिन, तुया ऐवळी पुण्यवान कर्तबगार बाई तं या पृथवीतलावर नाई"अन् बाबा तावातावानं वावरात निघून गेले. घरातलं वातावरण संचारबंदी सारखं वाटत होत. सर्वांनाच मायनं कपडे धुवू नये असं वाटत होतं पण परिस्थितीनं त्यावर निर्बंध घातले होते. त्यावेळेस उन्हाळा असल्याने लोक वावरातले काम करण्यासाठी सकाळी जात होते . आई बाबा काका सगळे आपापले जे जे होके होते त्यानुसार कामावर निघून गेले . सगळे जण वेगवेगळ्या शेत मालकाकडे शेतातील वेगवेगळी कामे करण्यासाठी रोज जात होती .आता परिस्थिती जरा बदलू पाहत होती, स्वाभिमान डोकं वर काढू पाहत होता.
दुपार झाली होती हळूहळू सगळे कामावरून परत आले.आई स्वयंपाकाला लागली होती. आईनं मातीच्या मडक्यात वरण लावलं अन् मोठ्या कोपरात दोन पायल्या मोजून जवारीचं पीठ घेतलं . घरचीच जवारी अन् घरचीच तुरीची दाय मेनू पर्मनंट . आज कशाची भाजी करू ? काही विचारनं नाही . आठवड्यातून चार पाच दिवस वरण कधी घट्ट, कधी पातळ, कधी मिसळ, कधी त्याच बेसन. कधी कैना ,कधी पिठलं , कधी कढी गोळे, कधी वड्या , अशा भाज्या असायच्या. आईनं वरण गंजात फोडणी दिलं अन् उल्यावर तो गंज ठेवला. व चुलीवर तावा ठेऊन भाकरी करायला सुरवात केली. एक एक भाकर झाली तसतसे बाबा काका आमी जेवायला ओसरीत बसलो. माय बाकीच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या कामासाठी मदत करत होती. आमचे जेवण आटोपल्यावर आई व माय यांनी जेवण केलं. दुपारचं उन आता खूप कडक तापत होतं. बाबानं हातपाय थोडेसे सरळ केले होते . अशातच वैद्य साहेबाच्या इथून एक माणूस निरोप घेऊन आला अन् तो घराच्या बाहेरूनच ओरडत ओरडत म्हणाला , " ओ वठ्ठींनबाई ,ओ वठ्ठींनबाई तुमाले वैद्य साहेबाच्या घरी कपडे घुवाले बोलावलं लवकर जा."
घरात भयाण शांतता पसरली होती, आता बाबाही काही बोलत नव्हते. वैद्य साहेब च्या घरी म्हटल्यावर ते शांत झाले, त्यांना या साहेबाबद्दल खूप आदर होता ,त्यांच्या घरी उद्या त्यांच्या बहिणींचं लग्न होत. त्यांच्या घरचा हिरवा मांडव बाबा व काकांनी मिळूनच टाकला होता, कारण या साहेबांचे आमच्यावर खूप उपकार होते, व त्याबद्दल ते कृतज्ञ होते . साहेबांनी जर काहीही काम सांगितले तरी ते काम बाबा व काका हसत हसत करत होते . ह्या लग्नाची सारी व्यवस्था काका कडेच होती. काकांनी सर्व नियोजन, सर्व काम करायची असा साहेबांचा आदेशच होता आणि आमच्या काकांच्या मनात तो साहेबांचा हक्क होता . वैद्य साहेब वर्धा येथे खूप मोठे साहेब होते , त्यांनी दोन काकांना तेथे त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरीवर लावले होते. त्यामुळे त्यांच्या घरचे कपडे घुवायला जायची मायची इच्छा होतीच . सात मुलं एक मुलगी यासर्वांचा भार तिच्या डोई वर टाकून नियतीनं तिला विधवा केल्यानं मायवर ही काम करायची परिस्थिती ओढवली होती . तरी तीनं देवाची पूजा अर्चना कधी सोडली नाही. तिच्यावर काळाचं दारिद्र्याचं पांघरूणअसल्यानं तिला करणं भाग होतं. घरात खायला काही नाही म्हणून उपाशी राहील्यापेक्षा ही कामं करण्यात तिला धन्यता वाटत होती. घरात आम्हाला चटणी भाकरी खाऊ घालतांना तिला किती वेदना व्हायच्या हे तिलाच माहीत. कपडे धुवायच्या निमित्तानं तिला "वाळण" ( कपडे घुवाच्या मजुरीच्या मोबदल्यात घर मालकाच्या घरात शिल्लक राहिलेले शिजल्या अन्नाचे एक ताट भरून मिळालेलं अन्न) मिळणार होतं.
या निमित्तानं आम्हा भावंडांना गोड धोड खायला मिळणार होतं , हाच तीचा मुख्य उद्देश होता व ह्या आपल्या निर्मळ उद्देश्यानेच ती स्वतःचा स्वाभिमान गिळून हसत हसत आनंदानं हे काम करत होती.
"माय " माझ्यावर प्रेम करणारी ही माझी सर्वात आवडती व्यक्ती होती. ती खूप खंबीर होती . माझ्या मनात तीन अश्या व्यक्ती होत्या ज्यांचा मला खूप अभिमान आहे . यांच्या ऐवढे शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्ती आसमंतात सापडणार नाहीत. मी असं ऐकलं की, गावातले लोक म्हणत की, हे तिघही भुता सारखेच काम करतात , तर कुणी म्हणे ढोरा सारखे काम करतात . त्यात एक माझे बाबा , दुसरी माझी आई व तिसरी ही एक होती ती माझी माय *( बाबांची आई )*
कामं करून काळवटलेली ,दिसायला काटक , तडफदार, स्वयंपाकात सुगरण पेक्षा कमी नाही, सुरात व काव्य रचना करण्यात बहिणाबाई पेक्षा कमी नाही , तुकोबाच्या ओवी,कबिराचे दोहे तिच्या वेळोवेळी बोलण्यात, जडीबुटीचं बरचं ज्ञान, गावातील बाळंतपण, लहान मोठ्यांच्या आजारावर उपचार करणारी डॉक्टरिन. परिस्थितीनं घायाळ केलेली अन् दयेन ठासून भरलेली माझी माय . रात्र भर जागून माझ्या साठी डबा करणारी व सकाळच्या एसटी बस नं अमरावती ला महाविद्यालय ला जाण्यासाठी चार वाजता मला उठवणारी , घरात पैसे नसले तर उसने पासणे आणून बाबाला न सांगता मला गुपचूप अमरावती ला जातांना झाडून सारे पैसे देणारी माझी माय. अतिशय उदार अंतःकरणाची , मला रामायण महाभारतातील कथा , बोध कथा सांगणारी, लूगड्याला जागोजागी ठिगळं लागलेली जिथं जिथं शिवता येत नाही तिथं तिथं गाठी बांधलेली, सगळं आयुष्य कठोर कष्ट करणारी पण स्वाभिमानानं ताठ उभी राहणारी माझी माय . जेव्हा कपडे धुण्यासाठी वैद्य साहेबाच्या घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा मी तिच्या मागे लागलो मलाही त्या साहेबांना पहायचं होतं, त्यांचं वैभव, त्यांचं घर .
वैद्य साहेब म्हणजे खूप चांगला दयाळू दिलदार खूप श्रीमंत माणूस. त्यांच्या घरी मला या अवतारात आईन जाण्यासाठी नाही म्हटलं माझ्या अंगात फाटकी चड्डी अन् फाटका सदरा होता. मी जीवाच्या आकांतानं रडू लागलो तावातावात मी माझे फाटलेले कपडे आंगातून काढून टाकले व मायला बिलगलो. माय नं मला तसचं उचलून कडेवर घेतलं एक नजर तीनं त्या कपड्यांवर टाकली हे कपडे घालून किंवा कपडे न घालता केलेल्या परिस्थितीच मूल्यांकन सारखच येईल असं तिला वाटलं . व तिनं आईला शांत राहायला सांगितलं व मला तसंच कडेवर उचलून घेवून ती धाड धाड वैद्य साहेबांकडे कपडे धुवायला निघाली .
मी तेव्हा असेल पाच एक वर्षाचा. अंगात कपडे नाहीत म्हणून की, उन लागू नये म्हणुन की काय माय न मला तिच्या लुगड्याच्या पदरानं झाकून घेतलं. वैद्य साहेबांच घर येईपर्यंत मला कपड्यांचं काहीच भान नव्हतं , माझे अश्रूंनी ओले झालेले सावळे गाल आता कोरडे झाले होते . वैद्य साहेबां च्या घराचा परकोटाला असतो तसा दरवाजा आज उघडा होता. आम्ही त्यातून आत शिरलो, समोर भल मोठ अंगण . उजव्या बाजूला दिवाणखाना .