प्रकरण १: आम्रखंड

296 1 2
                                    


"लेका, अरे आहेस कुठे? किती वेळ झाला तुझा फोन ट्राय करतोय. लवकर ये चल. आज दुपारी अभिजीत जेवायला येतोय." मनोहरचे बाबा लक्ष्मण फोनवर बोलू लागतात.

"अहो, सकाळीच म्हणालो होतो ना! आपल्या कारखान्याजवळ एका गावात जागा बघण्यासाठी जातोय म्हणून. इथे रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे." मनोहर बोलू लागतो.

"ते ठीक आहे. काम आटोपून लवकर ये. अभिजीत जेवायला येतोय. येताना आम्रखंड घेऊन ये." बाबा बोलतात.

"त्या पंडिताला काही कामधंदे नाहीत, तुम्ही त्यालाच सांगा आम्रखंड आणायला. इथे मी एका कामासाठी आलो आहे." मनोहर म्हणतो.

"भावाबद्दल असं बोलतात का?" बाबा.

"भाऊ कसला, येऊ द्या त्याला. त्याने काय करामती केल्या आहेत हे तुम्हाला माहित नाही. तो आला की तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला काय, तो जे करतो तेच तुम्हाला बरोबर वाटणार." मनोहर.

"पुरे आता, त्याने फोन करून सांगितलं आहे, आम्रखंड पाहिजे म्हणून, काम झालं की लवकर ये. मी बाजारात जातोय." एवढं बोलून बाबा फोन ठेवून देतात.

फोनवर बोलून झाल्यावर मनोहर आलेल्या गावी कारखान्यासाठी नवी जागा बघू लागतो. जागेचा व्यवहार लवकरात लवकर व्हावा यासाठी तो सकाळीच घरातून निघाला होता, पण दुपार झाली तरी त्याला मनासारखी जागा मिळाली नव्हती, आणि आता लहान भाऊ त्याला भेटायला आल्याने तो जागा बघण्याचा उर्वरित कार्यक्रम दुसऱ्या दिवसावर ढकलून घराच्या दिशेने आपली गाडी वळवतो.

कर्जत येथे मनोहरचा बॅग बनवण्याचा व्यवसाय असतो. टिकाऊपणा आणि सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवत त्याने विविध प्रयोग करून नाविन्यपूर्ण बॅग तयार केल्या होत्या. जीपीएस, मोबाईल चार्जर, पाणी-आग प्रतिबंधक, आकर्षक डिझाईनस् अशा अनेक सुविधांमुळे त्याच्या बॅगस् अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मनोहरच्या बॅगांना भारतासह परदेशातून देखील चांगलीच मागणी आली होती. अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपनीसोबत करार केल्याने त्याला आपल्या बॅगा विकणे सोपे जात होते. दोन दिवसांपासून त्याच्या बॅगांना चांगलीच मागणी येऊ लागली होती. मागणीपुढे उत्पादन कमी पडू लागल्याने त्याला आपल्या कारखान्यासाठी नवी जागा घ्यायची होती. जेणेकरून मोठ्या प्रमाणात बॅग बनवता याव्या. पण त्याला मनासारखी जमीन मिळत नव्हती.

Mr Single FatherWhere stories live. Discover now