आई-बाबांचा आशीर्वाद आणि मनोहरची भेट घेऊन अभिजीत निघून गेला. दांपत्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान होता, तर मनोहरच्या मनात अभिजीतचं वाक्य खोलवर रुतून बसलं होतं. अवघं लहानपण दोघांनी एकत्र घालवलं होतं, वयात दोघांची लग्न झाली असती तर आता दोघेही तरुण मुलांचे बाप झाले असते. पण का कुणास ठाऊक, दोघांच्याही मनात लग्न आणि प्रेमाविषयीची भावना आलीच नाही. मनोहरचे बाबा कमवत असले तरी ते पैसे घरखर्चासाठी खूपच कमी होते, असे असताना त्यांनी अभिजीतला घरी आणलं आणि मनोहरप्रमाणे त्याला देखील वागवलं, शिकवलं आणि मोठं केलं. आजवर अभिजीतविषयी कुणाच्याही मनात परकेपणाची भावना नव्हती. पण आज अभिजीतने म्हटलेलं वाक्य मनोहरसाठी परकेपणाचं होतं. त्याला या विषयावर स्वस्थ बसवेना. त्याने हा विषय आई-बाबांसोबत चर्चा करून सोडवायचे ठरवले.
"हम्म, बोल. काय म्हणायचंय?" बाबा विचारतात.
"अभिजीतविषयी बोलायचं होतं." मनोहर म्हणतो.
"अरे, तो इतक्या वेळ होता तेव्हा बोलायचं होतंस ना!" आई म्हणते.
"त्याच्यासमोर न बोलण्यासारखं आहे. खरं तर त्याने मला म्हटलेल्या एका वाक्याने मी जरासा विचलित झालो आहे. त्याविषयी बोलायचं आहे." मनोहर म्हणतो.
"बरं, बोल." बाबांनी विचारताच मनोहर संपूर्ण प्रसंग सांगतो. मनोहरप्रमाणे आई आणि बाबांच्या चेहऱ्यावरील रंग उडून जातो.
"तुम्हाला काय वाटतं, त्याने बोललेले शब्द बरोबर आहेत, की आपण कुठेतरी कमी पडलो आहोत?" मनोहर विचारतो.
बाबांकडे या प्रश्नावर उत्तर नसतं. अभिजीतचं हे वाक्य त्यांच्या मनात खोलवर रुतणारं होतं, कारण त्यांनीच तर अभिजीतला आणलं होतं. मनोहरच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते पुन्हा भूतकाळात जातात.
तो काळ १९७१ चा होता. लोकसंख्या आताएवढी नव्हती, पण तेव्हाच्या मानाने खूप होती. आमच्या ऑफिसचे काही पेपर्स मंत्रालयात सादर करायचे होते. काम झालं तसा मी मंत्रालयातून निघालो. अचानक तिथे धावपळ सुरु झाली. मला काही समजायला मार्ग मोकळा नव्हता आणि कुणाला विचारायची हिम्मतसुद्धा नव्हती. माझ्यासोबतच एक जोडपं तिथे त्यांच्या मुलासह आलं होतं. त्यांच्यासोबत जेवढं औपचारिक बोलणं झालं, त्यानुसार ते अकोल्याहून आले असं कळलं होतं. धावपळीने ते सुद्धा पुरते गोंधळून गेले होते. पहिल्यांदाच ते मुंबईला आले असावेत. सोबत तीन वर्षाचं मूल घेऊन फिरताना त्यांची काय अवस्था होईल हे समजून मी त्यांना माझ्यासोबत यायला सांगितलं.

YOU ARE READING
Mr Single Father
General Fictionसदर कादंबरीमधील सर्व घटना, पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर पुस्तकामधून कोणत्याही जात, धर्म किंवा व्यक्तीला दुःख पोहोचवायचा हेतू नसून केवळ वाचकांच्या ज्ञानसमृद्धीसाठी आणि प्रेर...