अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवराय 2

65 2 0
                                    

२..
   हि घटना राज्याभिषेकानंतरची आहे. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी स्वराज्यासाठी इंग्रजांच्या मुंबईच्या वखारीतून तांबे खरेदी केले. परंतु त्यावेळेस रायगडावर रोख स्वरुपात रक्कम उपलब्ध नसल्याचे कारण देत, महाराजांनी इंग्रजांना एक हुंडी (BILL OF EXCHANGE) दिली. या हुंडीनुसार स्वराज्याला कुतुबशहा कडून खंडणी मिळत असत. त्या खंडणी वसुलीसाठी स्वराज्याचे एक कार्यालय गोवळकोंडयाला होते. महाराजांच्या सही शिक्क्याचा तो कागद इंग्रजांनी गोवळकोंडयाच्या त्या कार्यालयात दाखवायचा आणि तेथून रोख रक्कम घ्यायची. इतका साधा व्यवहार.
      व्यवहारा झाला, महाराजांनी दिलेली हुंडी मुंबईच्या वखारीतून गोवळकोंडयाला पाठवायची सोय मुंबईत नव्हती. म्हणून मुंबईतून ती हुंडी सुरतला पाठवण्यात आली. सुरतला इंग्रजांचे मुख्य कार्यालय होते. तेथून ती हुंडी घेऊन इंग्रजांचा कुरियर (स्वार) गोवळकोंडयाला पोहोचला. बर आतासारखा मुंबई – सुरत – गोवळकोंडा हा एक दोन दिवसाचा प्रवास तेव्हा नव्हता. या प्रवासाला त्याकाळी २० ते ३० दिवसांचा कालावधी लागत असत. एव्हडा प्रवास करून इंग्रजांचा तो स्वार गोवळकोंडयाला पोहोचला. तिथे महाराजांचे एक कार्यालय होते. स्वार कार्यालयात पोहोचला, तेथे कारभारी बसले होते. स्वाराने त्याच्याकडील हुंडी त्या कारभाऱ्याला दिली. कारभाऱ्याने तो कागद वाचला आणि म्हणाला.
“महोदय! आपण योग्य ठिकाणी आला आहात. राजांच्या या हुंडीनुसार आम्ही आपणाला रोख रक्कम देणे बंधनकारक आहे. परंतु यात एक अडचण आहे.”
“कसली अडचण महाराज.” स्वार
“ या कार्यालयाचे प्रमुख प्रल्हादपंत निराजी आहेत. ते नुकतेच एका महत्वाच्या कामासाठी रायगडावर गेले आहेत.” कारभारी
“मग आता” स्वार
“या हुंडीच्या बदल्यात पैसे देण्याचा अधिकार माझा नाही. तो प्रल्हादपंताचा आहे. आता आपणाला प्रल्हादपंत पुन्हा येईपर्यंत थांबावे लागेल. किंवा रायगडावर जाऊन तसे फर्मान आणावे लागेल.” – कारभारी.
    स्वाराने त्या कारभाऱ्याकडून ती हुंडी घेतली. आणि तो माघारी फिरला. पुन्हा येवून त्याने सर्व हकीकत सुरतच्या अधिकाऱ्याला सांगितली. आणि सुरतमधून पुन्हा ती हुंडी मुंबईच्या वखारीत पाठवली. मुंबईला तेव्हा गॅरॉन रोन्जीअर नावाचा कंपनीचा मुख्य अधिकारी होता. त्याने त्याच्या पदरी असलेले दुभाषी नारायण शेणवी यांना ते पत्र घेऊन रायगडावर पाठविले. नारायण शेणवी अष्टमी मार्गे पाचाडला आले. या प्रवासाला चार पाच दिवसांचा कालावधी लागला असेल. पाचाडला आल्यावर रायगडाखाली शिवाजी महाराजांचे एक कार्यालय होते. तेथे चौकशी केल्यावर माहिती मिळाली कि, राजे गडावर नाहीतच. स्वारीवर गेलेत. कोठे त्याची कल्पना नाही. चौकशीअंती मोरोपंत गडावर असल्याची माहिती नारायणपंताना समजली. त्यांनी मोरोपंताना भेटीची वेळ मागितली. अर्थात राजे गडावर नसल्यामुळे मोरोपंत कामात व्यग्र होते. त्यांनी नारायण शेणव्यांना थांबायला सांगितले. साधारण दीड दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नारायण शेणव्यांना भेटीची वेळ मिळाली. नारायण शेवणी गडावर पोहोचले. ठरल्याप्रमाणे मोरोपंताना भेटायला सदरेवर पोहोचले.
“या! या! नारायणपंत तुम्हाला बराच अवधी भेटीची प्रतीक्षा करावी लागली. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.” – मोरोपंत
“नाही नाही पंत, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून आमची दखल घेत, आम्हास भेटीस वेळ देणे हेच आमचे भाग्य. आमच्यासाठी आपली भेट होणे महत्वाचे होते पंत.” - नारायणपंत
“हो ते हि आहेच, भेट होणे महत्वाचे. पण काय करणार नारायणपंत महाराज गडावर नसल्यामुळे गडाची, कारभाराची स्वराज्याचे पेशवे म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि जबाबदारीत कसूर करणे महाराजांना अजिबात खपत नाही. त्यामुळे यातून वेळ काढणे अंमळ अवघडच.” – मोरोपंत
“हो हो यात काही शंका नाही. मी समजू शकतो.” – नारायणपंत
“बोला! नारायणपंत काय काम काढलत.” – मोरोपंत
“पंत आपणाला स्वराज्याचा इंग्रजांबरोबर झालेला व्यवहार तर माहिती असेलच. त्याच संदर्भात पंतांच्या पायाशी एक अर्ज घेऊन आलो आहोत.” – नारायणपंत
“बोला नारायणपंत.” – मोरोपंत
यानंतर नारायणपंतानी सर्व तपशील मोरोपंताच्या कानावर घातला. तसेच इंग्रजांनी वसुलीसाठी आपली नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी मोरोपंताना सांगितले.
“नारायणपंत आपण सांगताय ते योग्य आहे. प्रल्हाद निराजी स्वराज्याच्या काही कामासंदर्भात रायगडावर आले होते. परंतु ते परत गोवळकोंड्याला गेले आहेत. तेव्हा तुम्ही हि हुंडी घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकता.” – मोरोपंत
“पंत आता पुन्हा मुंबई – सुरत – गोवळकोंडा एव्हडा प्रवास करण्यापेक्षा आपणाला आमची विनंती आहे कि, आपण रायगडावरच आम्हास पैसे द्यावेत आणि आम्हास या व्यवहारातून मोकळे करावे.” – नारायणपंत
“नारायणपंत! रायगडावर पैसे नाहीत, म्हणून तर महाराजांनी या व्यवहारात आपणाला हुंडी दिली आहे. रायगडावर आपणाला रोख रक्कम देणे सद्या तरी शक्य नाही.” – मोरोपंत
“पण मग यावर काहीतरी उपाय सुचवावा पंत.” – नारायणपंत
“उपाय......! ठिक आहे पंत. स्वराज्यालाही यापुढे इंग्रजांशी व्यापारी संबंध जपायचे आहेत. आणि आम्ही या स्वराज्याचे पेशवे आहोत. त्यामुळे आम्ही आपणास एक चांगला मध्यममार्ग सुचवितो.” मोरोपंत
“कोणता उपाय पंत.” नारायणपंत
“अलिबागला आमची एक वखार आहे. घाटाखालील शेतकरी शेतसारा म्हणून नारळ. सुपारी, आणि तांदळासारखी पिके त्या वखारीत जमा करतात. इंग्रजांना देणे असलेल्या रकमेचे जिन्नस इंग्रजांना द्यावेत म्हणून तेथील कारभाऱ्यानां आम्ही तशा वराता काढतो.” – मोरोपंत
“उपाय चांगला आहे, परंतु पैशाच्या बदल्यात जिन्नस घेण्याचा अधिकार माझा नाही. त्यासाठी मला गोऱ्या साहेबाची परवानगी घ्यायला मुंबईला जावे लागेल.” नारायणपंत
“हो! हो! आपण जाऊन तशी परवानगी घेऊन यावे. आमची काहीच हरकत नाही.” – मोरोपंत
      मोरोपंताची परवानगी घेऊन नारायण शेणवी चार पाच दिवसचा प्रवास करून मुंबईला आले.

अद्भुत शिवराय - व्यवहारी शिवराय Where stories live. Discover now