अंकुशचा फोटो सुटकेस मध्ये टाकून सीमाने ती बंद केली. एका हातात सुटकेस आणि एका हाताला छोट्या ३ वर्षांच्या जुईला धरून ती घराबाहेर आली. दाराला कुलूप लावले आणि चावी शेजारच्या माने काकूंकडे दिली. सोबत निरोप दिला कि घरमालकांना द्या. घरात काही सामान तिने तसेच ठेवले होते कारण घर मालकनी तिच्या कडून त्या महिन्याचे पैसे घेतले नाहीत. तिला तेवढेच त्यांच्या ऊपकारांची थोडीशी ऊतराई करावीशी वाटली. एक महिन्यापूर्वी अंकूशचा घरी येताना बाईकला ट्रकची धडक बसून अपघात झाला.
अंकूश. तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम. त्याच्या प्रेमावर विश्वास ठेऊन तिने त्याच्यासोबत घरच्यांचा विरोध डावलत पळून जाऊन लग्न केलं होतं. आंतरजातिय विवाहामूळे दोघांच्या कर्मठ कूटूंबियांनी त्यांच्याशी नाते तोडले. पण अंकूशने तीचा विश्वास सार्थ ठरवत सूंदर असा संसार सूरु केला होता. संसार सूरु झाल्यानंतर वर्षभरात त्यांच्या आयूष्यात जूईच्या रुपाने एक परी आली. तसेच स्वतःचे घर मिळवण्यासाठी दोघांची आर्थिक जूळवणूकही चालली होती. पण नियती निघृण असते. तिने सीमावर घाला घालण्यासाठी अंकूशला घास बनवले. १५ दिवस कोमामधे राहून अंकूश त्याचे छोटेसे जग मागे सोडून गेला. जमलेली पूंजी त्याला जगवण्याच्या प्रयत्नात संपून गेली.
कसल्याही व्यवहारासाठी कधीच ऊंबरा न ओलांडलेल्या सीमाला हे लक्षात आले कि आपली आणि जूईची जबाबदारी घेण्यासाठी ती किती असक्षम आहोत. पूढे काय हा यक्षप्रश्न तिच्यासमोर होता. अंकूशचे सर्व अंत्यविधी वैगरे शेजारी आणि त्याच्या कामामधल्या लोकांनी मिळून पूर्ण केले होते. पण पूढे तिच्या मदतीला कोणीही ऊभे राहीले नाही.
अंकूश गेल्याच्या पंधरा दिवसांनी दूपारी पूढच्या महिन्याची चिंता करत सीमा बसली होती. दाराची कडी वाजल्याचा आवाज आला. सीमाने दार ऊघडले तर समोर एक जोडपे होते. पूरुष 45च्यापूढे तर स्त्री चाळीशीतली असावी.
ती बाई खूपच स्थूल आणि पाच फूटाच्या आसपास असावी. दरवाज्यातून आत येताना अगदी दोन बोटे जागा उरेल ईतकी आडवी देहयष्टी चालल्यामूळे धापा टाकत होती. तर पूरुष तीच्या अगदी विरूध्द. तिच्याहून सव्वा फूट उंच आणि फारच सडसडीत. पण त्या माणसाचे डोळे मोठे आणि खोबणीच्या बरेच बाहेर होते. त्या मोठ्या डोळ्यांनी तो तीच्याकडे पाहत होता. तीने काही त्यांना ओळखले नाही.