" जरा जरा मेहकता है... बहकता है... आज तो मेरा तन बदन ..."
वैशू गाणे काय म्हणतीयेस... मी इकडे तुला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू आहेस कि..."
पहाटेचे तीन वाजले होते. शैलेश त्याच्या रूम मध्ये बसून समाधीमध्ये मग्न होता. वैशालीला त्याने झोपेतून ऊठवले होते. त्याने वैशालीच्या मनात प्रवेश करून तिला ध्यानतंत्र त्याला जसे माहित होते तसे शिकवायला घेतले होते. पण वैशूचे चित्त एकाग्र होत नव्हते.
"ईऊऊऊ.. मला जाम बोर वाटतंय हे सर्व... मला नाही जमत.." वैशाली म्हणाली.
"हे बघ आपण चित्त एकाग्र करून सूक्ष्म रूपातून शरिराबाहेर पडण्याचा प्रयत्न करायचाय. ते करताना आपोआप आपल्या शरिरात आंतरिक ऊर्जेचे वहन व्हायला सूरूवात होते. तूझ्यातली ऊर्जा बाहेर पडताना मला दिसेल मग आपण मिळून प्रयत्न करू तिच्यावर कंट्रोल करण्याचा." शैलेश तिला म्हणाला.
"त्यापेक्षा मी माझ्या आंतरिक ऊर्जेचा वापर गाडी चालवण्यासाठी करते. मग मी तूझ्या रूमवर येते. मग आपण दोघे मिळून एकमेकांवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू. " वैशू त्याला लाडीकपणे म्हणाली.
गेल्या दोन दिवसांतच दोघे एकमेकांच्या खूप जवळ येत एकमेंकांच्या सानिध्यात खूप सारा वेळ घालवत होते.
"वैशू प्लिज यार. असे नको करूस. वूई हॅव टू डू ईट. माझ्यासाठी ईतके पण नाही करणार?"
शैलेश तीला गळ घालत म्हणाला.
" अरे शोण्या..तूझ्यासाठी काय करू आणि काय नको असं होतय मला. सतत तूझा विचार असतो डोक्यात बाकी काही सूचतच नाही. तू कशाला भेटलास रे मला? परवा नाश्त्याच्या टेबलवर पप्पांच्या चहात साखरे ऐवजी जॅम घालून ढवळत बसले होते मी. पप्पांनी कान पिळल्यावर जाग आली मला" ती म्हणाली.
दोघेही हसू लागले.
"शैलू आय लव्ह यू." ती म्हणाली.
"आय लव्ह यू सो मच." शेलेश म्हणाला.
"ए पण आता हा पहाटेचा शांत वेळ वाया नाही घालवायचाय. लेट्स ट्राय ईट अगेन." त्याने परत ध्यान करण्यासाठी बजावले.
"ओह... यूअर ब्लडी ध्यान.... करते... करते हं काॅन्सन्ट्रेट गूरूजी." वैशूने ताठ बसत डोळे मिटले.
वैशू शरीर आणि मन दोन्ही सैल सोड. भरून श्वास घे आणि अगदी शेवट पर्यंत सोड. तुझ्या मनात येणाऱ्या अवांतर विचारांना रोखण्याचा प्रयत्न कर. नसेल जमत तर माझ्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष असू देत. लक्षात ठेव वैशू. तुझ्यामध्ये असीम शक्ती भरली असल्याचे मला जाणवते. ती जागृत कशी करायची ते आपल्याला शोधून काढायचे आहे. तुझ्या श्वासोच्छवासाकडे लक्ष दे. आत येताना आणि बाहेर जाताना श्वासाच्या गतीकडे लक्ष केंद्रित कर. हळूहळू तुझे विचार येणे बंद होईल. आपण दोघेही समाधीमध्ये विलीन होऊ. त्यातली शांतता अनुभवू." शैलेश तिला सांगत होता. ती डोळे मिटून दिलेल्या सूचना ऐकत होती. आता दोघे शांत झाले. वैशालीची हलके हलके तंद्री लागू लागली. तिला मन एकाग्र होत आहे ह्याची जाणीव नकळत शरीरात पसरलेली जाणवली. श्वासाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करत ती शरीरामध्ये असलेल्या प्राणवायूच्या अंतर्बाह्य भ्रमणावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी झाली. काही काळ असाच गेला आणि शैलेश वैशाली ध्यानात मग्न झाले.
"विजेचा प्रपात लखकन डोळ्यासमोरून चमकून गेला. चरचर ... अजून एक.. नंतर काळे ढग ...परत वीज... खूप मोठी. थाडकन आसमंतात आवाज घूमला. वैशूला काळ्या ढगांमागून ढग जाताना दिसू लागले. विजांचे स्तंभ मधेच चमकून जाऊ लागले. कसला तरी प्रवास दिसत होता... कोणाचा..? .. कोण आकाश चिरत ऊडत चाललं होतं?.. आणि कूठे? त्या धडाडणार्या विजांची पर्वा न करता... कि ती ऊडणारी व्यक्ती स्वतः.. स्वतः वैशालीच होती. ..काळेकूट्ट मळभ बाजूला सारत प्रचंड वेगाने.... कसली ऊर्जा होती तीच्यामधे? ....ऊर्जेच्या वहनाचे केंद्र कोणते होते?.. ऊष्ण... प्रचंड ऊष्णता जाणवू लागली तीला... अचानक समोर दूरवर एक निळसर प्रकाश बिंब दिसू लागले... तिथे पोहोचायची तिच्या मनात प्रचंड क्षूधा दाटून आली. ते आहे तरी कोण?.. काय आहे ते? खेचतय तीला स्वतःकडे कि.. कि.. तीच स्वयंस्फूर्तीने चाललीये..? ते बिंब जवळ येत होते...आणखी काहीवेळ मग ती सामावून जाणार होती त्या दिव्य प्रकाश बिंबात."
"वैशूsssss" तीला दूरून हाक ऐकू आली.
"शैलेश..शैलेशच.. ईतकी आर्त हाक का मारली त्याने... ती हाक त्या बिंबातूनच तर आली.
"वैशू...ssss..... सोड मला... वैशूsss..वाचव..." परत शैलेशची काळीज भेदणारी हाक... तिथूनच आली होती.
"अंगाची लाही लाही का होतीये... आग आग... माझ्या आत आग लागलीये... नाही नाही. मला... काय होतय..? माझं डोकं.. भयानक दूखतय... का?" वैशूच्या डोक्यात भरभर ह्या गोष्टी येऊ लागल्या ती पाहात होती. तीच्या समोरचे प्रकाशबिंब त्याच्या मागून येणारा अंधार गिळू पाहात होते.
"तो...तो तर शैलेशच आहे... कोण.. कोण धरतोय त्याला...? कोण आहेssss?" वैशाली लडखडू लागली तिचा वेग कमी जास्त होऊ लागला. तीला हेलकावे बसू लागले.
"म्हणजे..? म्हणजे मी आकाशात आहे...? कसंं? माझं डोकं का ईतकं दूखतय...?" ती विचार करत होती.
तितक्यात परत शैलेशची आर्त किंकाळी तिचं काळीज भेदून गेली.
"वैशू.... तो आलाय... वैशूssss तू स्वतःला दूर ठेव.... जा इथून..." शैलेश ओरडत म्हणाला.
इकडे वैशालीची समाधी भंग पावू लागली. तिचे डोळे अस्वस्थपणे हलू लागले.
अचानक एक मोठा गगनभेदी क्रूर आणि आवाज आसमंतात घूमला...
"हाहाहा... हा तर सापडला... तूला यावच लागेल... तूमची नियती आहे ती... तूला याव लागेल.. यावच लागेल...हाहाहा..."
"वैशू...sss" शेलेशचा आवाज दूरदूर जात राहीला...
ती हेलकावे खात खाली येत होती. शरिरातली ऊष्णता विझत चालली होती.
"शैलेश ssssss ...." वैशाली कोसळली. तिच्या रूम मध्ये ती जमिनीवर चक्कर येऊन पडली होती.
तिचे बाबा जोरात दार ठोठावू लागले. "वैशाली... वैशू बेटा दार उघड." सोबत आईपण हाका मारत होती.
वैशू जमिनीवर पडली होती. काहीही हालचाल न करता. तीचाचे सर्वांग घामाने डबडबलेले होते. अचानक तिच्या बोटांमधली अनामिका हलू लागली. तिला जाग येऊ लागली. भसकन तिने डोळे उघडले.
"भैरव.........." तिच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली. तिचे शरीर हवेत उचलले गेले. केस मोकळेपणाने स्वतंत्र जीव असल्यासारखे लहरू लागले. तिच्या डोळ्यातून प्रकाशाचे तेज ओसंडून वाहू लागले. ती हवेत अधांतरी होती.
तेवढ्यात तिच्या बाबांनी धक्के देत तिच्या बेडरूमचे दार उघडले. समोरचा नजारा पाहून त्यांचे आणि वैशूच्या आईचे डोळे विस्फारले.
"वैशू... ..अहो हे हो काय?" तिची आई ओरडली. दोघे जाम घाबरले होते.
"आई... घाबरू नकोस. मी वैशालीच आहे. पण हि वैशाली तुम्हाला अज्ञात आहे. सध्या मला माझ्या कर्तव्यपूर्तीसाठी जावे लागणार आहे. मी परत येईन. बाबा तिला धीर द्या." असे म्हणून तिने दोन्ही हात बाजूला केले. परत कर जुळवत डोळे मिटले. तिच्या शरीरातून तेजाचा लोळ बाहेर पडला. तिची धगधगत्या तेजाची मशाल झाली. तिच्या बेडच्या उघड्या खिडकीतून ती निमिषार्धात आकाशाकडे गेली. तिचे आईबाबा प्रचंड धक्का बसून तिथेच घट्ट रोवले गेले होते. जे घडले त्यावर त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. कारण अर्थातच जे होते ते संपूर्णपणे त्यांच्या आकलनापलीकडले होते.
पहाटेच्यावेळी आकाशातून जाणारा तेजाचा झोत कदाचित एखादे राॅकेट किंवा जेट असेल असेच पाहणार्याला वाटत होते. पण ती तेजःपूंज शलाका होती वैशाली. तीला कळत नव्हते शैलेशला शोधू तरी कसे. स्वतःकडे असलेल्या सामर्थ्यांचा आठव तीला आजिबातच नव्हता. ती संपूर्ण भानावर आलेली नव्हती. काहीतरी होते खोलवर मनाच्या कूलपात जे बाहेर येण्यासाठी धडपडत होते. कोण ऊघडणार होते ते कूलूप. कोण मार्गदर्शन करणार होते. ती भयंकर अस्वस्थ झाली होती. नूसतेच आकाशात भ्रमण करून शैलेशचा ठाव लागणार नव्हता.
अचानक एक आवाज निनादला.
"जटाशंकर मंदीर पंचमढी... लगेच ये .. तूझ्या प्रश्नांची ऊत्तरे माझ्याकडे आहेत. त्वरा कर."
तो आवाज ओळखीचा होता. खूप आपूलकी असलेल्या व्यक्तीचा होता. त्या आवाजाच्या रोखाने जाण्यात धोका नव्हता.
वैशाली क्षणाचाही विलंब न करता वळली आणि तीने सातपूड्याच्या ऊंचसखल डोंगररांगांकडे कूच केले. प्रचंड वेगाने धूमसत ती जाऊ लागली. सातपूड्याच्या एका विशाल डोंगरावर असलेल्या शिवाच्या त्या स्थानात प्रवेश करताच तीचा दाह शितल होऊ लागला. आजूबाजूच्या घनगंभीर अध्यात्मिक वातावरणाने तीचे मन आपसूकच थोडे शांत होत स्थिर होऊ लागले. आकाश भ्रमण करत येताना त्या तपोभूमीच्या परिसरात डोंगराच्या कड्याकपारीमधे ध्यानस्त बसलेले कितीतरी दिव्यात्मे तीला तीच्या सहज दृष्टीने दिसू लागले. जे पाहण्याची क्षमता कूठल्याही सामान्य व्यक्तीमधे नव्हती.
तीची पावले अगदी अलगदपणे मंदीराच्या फरशीवर टेकली. नूकताच अवकाशात सूर्याने केशरी रंग हलकासा ऊधळायला सूरूवात केली होती.
"मंदिराच्या गाभार्यामागे ये." एक आज्ञावजा आवाजाने वैशालीला बोलावले.
वैशाली चालत तिथे पोहोचली. मंदिराच्या संपूर्ण आवारातले जेवढे काही मूठभर लोक होते ते सर्व कसल्यातरी शक्तीने बांधल्यागत स्तब्ध झाले होते. त्यांच्यासाठी काळ थांबला होता. त्यांनी त्यावेळी वैशालीला पाहीले असते तर निश्चितच एखादी देवी समजले असते. कारण तिच्या चेहर्यावरून ओसंडणारे तेज सांगत होते. ती दैवी शक्तीने भरलेली होती. फक्त त्या शक्तीचे तिच्या ठायी असणारे अस्तित्व आणि तीचा संपूर्ण वापर यापासून वैशाली अनभिज्ञ होती.
एक व्यक्ती दगडी भिंतीकडे तोंड करून ऊभी होती. सध्यातरी वैशालीचा कोणावरही विश्वास बसणे कठिण होते. म्हणून ती सावधपणे अंतर ठेऊन ऊभी राहीली.
"ऊमा... शलाका..अंबा..दामिनी..सती..वैगरे कैक नावे धारण केलेली आजची वैशाली." तो व्यक्ती वळत म्हणाला. गौरवर्णी चेहर्यावर तपाचे तेज ओसंडून वाहात होते.
वैशालीला न जाणो का त्यांच्यातला जूणा ऋणानूबंध जाणवला."आपण?" तीने विचारले.
"मी?... बाळा..मी ऋषी गहन." त्या आवाजातली ती आपूलकी... ते लाघव.. जणू आपण ह्या व्यक्तीशी आपले हक्काने आणि प्रेमाने काहीही मागू शकतो असे पक्के नाते आहे असे वैशालीला वाटले.
"खूप सार्या जन्मांची स्मृती पटले आहेत बाळा. सर्व दूर करायला काही वेळ तरी निश्चितच जाईल. फक्त विश्वास ठेव. तूमच्यावर बेतलेल्या प्रसंगातून बाहेर पडायला मदत करण्यासाठीच माझ्या जीवाची योजना विधात्याने केलीये." गहन म्हणाले.
"पण तूम्हाला माझ्याबद्दल...?" वैशालीने विचारले.
"तूझ्याबद्दल आणि आणि तूझ्या जूळात्म्याबद्दल माहीत असलेले जगात दोघेच आहेत. एक मी तर दूसरा भैरव. ज्याच्याकडे आत्ता शैलेश आहे. ह्या भिंतीकडे लक्ष केंद्रित कर वैशाली. आपण तूझ्या पूर्वजन्मांची काही क्षणचित्रे कालभ्रमण करून पाहणार आहोत जेणेकरून तूझ्या ठायी असलेल्या असिम शक्तीचे ज्ञान तूला होईल. तूम्हा दोघांच्याही जन्माचे महत्कारण तूला समजेल. बघ वैशाली मन केंद्रित करून बघ." गहन ऋषी धीरगंभीर आवाजात म्हणाले.
वैशालीने नजर केंद्रीत केली. एक सूक्ष्म विवर भिंतीवर ऊमटले त्यातून एक किरण शलाका बाहेर आली. काही क्षणांत अजून थोडा किरणोत्सर्ग दिसू लागला. मग अजून थोडा... वाढत जात जात प्रचंड असा ऊजेड त्या भिंतीतून बाहेर पडला. वैशाली त्या प्रकाशात खेचल्या गेली.
क्रमशः
YOU ARE READING
जुळात्मे
Spiritualविधात्याला कधीतरी सृजनात्मक असे काही करण्यासाठी हस्तकांची गरज लागते. नेहमीच अवतार शक्य नसतो. तेव्हा तो अशी काही किमया करतो कि त्यातून अचंबित करणाऱ्या गोष्टी जन्माला येतात. हि गोष्ट आहे अशाच एका किमयेची. हजारो वर्षांत त्याच्या अगणित विश्वांमधल्या एख...