अनैतिक भाग २

6.7K 9 1
                                    

अनैतिक
भाग दोन

आदित्य रात्रभर तिचाच विचार करत होता. सकाळी ऑफीसमध्ये कामात बिझी असला तरी जरा सवड भेटली की राधिकाचा विचार त्याच्या मनाच्या खिडकीतून आत शिरकाव करत असे. एक बरे झाले की त्याला तिचे दहा रुपये देणे होते. या दहा रुपयाच्या मुळे त्याची दुसरी भेट नक्की होती. ह्या दुसऱ्या भेटीत काय बोलायचे याचा तो विचार करत होता. एक नवलाईची गोष्ट होती ती म्हणजे आदित्यच्या मुंबईच्या ऑफीसमध्ये काही स्त्रिया होत्या. त्यातल्या काही दिसायला सुंदर पण होत्या पण त्याच्याकडे आदित्यने कधीच ढुंकून पाहिले नाही. एक लग्न आणि एक पत्नी या लाईन प्रमाणे तो आपल्या बायकोशी इमानी राहिला पण आज राधिकास पाहून काय नवीन खूळ त्याच्या डोक्यात बसले होते हे परमेश्वरास ठाऊक. हे खूळ एक दोन दिवसाचे होते की कायम स्वरुपी होते हे उत्तर येणारा वेळच देणार होता.

आज ऑफीस सुटल्यावर आदित्य लगबगीने घरी गेला. फ्रेश झाला. केस चांगले विंचारले. परफ्यूम मारला आणि तो पुन्हा मेडिकल मध्ये निघाला. कारण हेच होते की त्याला राधिकाचे दहा रुपये परत करायचे होते पण खरे कारण हे होते की तो तिला भेटण्यासाठी कासावीस झाला होता. नेहमी सश्या सारखा धावणारा आदित्य राधिकाच्या विचारात इतका गढून गेला की त्याचे हातातले काम कासव गतीने चालू लागले. फक्त एका भेटीत तो इतका तिच्यात शिरला होता. तिच्या बद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. ती कोण आहे ती कुठे राहते. तिचा नवरा काय करतो, नवरा कसा आहे हे सगळे प्रश्न अनुत्तरित होते.

आदित्य मेडिकल मध्ये पोहचला ती एका कस्टमरची औषधे ड्रॉवर मधून काढत होती. मध्येच ती हातातले प्रेस्क्रीप्शन वाचायची आणि ते औषध शोधू लागायची. ती आदित्य कडे पाठ करून पाठमोरी उभी होती त्यामुळे तिला कळले नाही की आदित्य मागून तिची वाट पाहत आहे. पण आदित्यला सुद्धा घाई नव्हती. तो पण निवांत होता. तिने आज सुद्धा एक आकाशी रंगाची कॉटनची साडी घातली होती. त्यावर एक काळ्या रंगाचे ब्लाऊज. केसाची वेणी नीट बांधून ती नितंबा पर्यंत लोळत होती. ती पाठमोरी आकृती पाहताना तिची कंबर साधारण २६ असेल. सव्वीस कमरेत अजिबात चरबी नव्हती. तिच्या वागण्यात सुद्धा चरबी नव्हती. तिच्या उघड्या कमरेतील सावळी त्वचा तिला लोभस दिसत होती. मागून तिला पाहणारा आदित्य तिच्या नितंबाच्या गोलाईत अडकून पडला. तिची केसाची वेणी तिच्या हालचाली प्रमाणे तिच्या दोन नितंबावर आदळत होती. हे सर्व रोमँटिक विचार चक्र आदित्यच्या मनात चालू होते इतक्यात ती विरुद्ध दिशेस म्हणजे आदित्यच्या समोर वळली. ती म्हणाली अरे तुम्ही?
त्यावर आदित्य म्हणाला हो राधिका मॅडम, तुमची उधारी मला चुकवायची होती ना.
त्यावर राधिका आपल्या कस्टमरच्या औषधाच्या पैश्याची एकूण बेरीज कॅल्क्युलेटरवर करता करता काहीच बोलली नाही. तिने एकूण बेरीज केली. औषधे पिशवीत भरली आणि समोरचा एकच कस्टमर उभा होता त्याला दिली. त्या कस्टमरने दोन हजार रुपयांची नोट तिला दिली. ती म्हणाली अहो माझ्याकडे सुट्टे नाहीत. त्यावर तो म्हणाला सुट्टे तर माझ्याकडे सुद्धा नाहीत. यावर ती म्हणाली तुम्ही गूगल पे करू शकता का. त्यावर कस्टमर म्हणाला होय. तिने गुगल पेचा बारकोड पुढे केला आणि त्याने ३३९ रुपये गुगल पे द्वारे ट्रान्स्फर केले. यावर खजील होऊन आदित्यला वाटले की त्या दिवशी आपण पाकीट विसरलो पण मोबाईल आपल्या हातात होता. आपण सुद्धा राधिकाला गुगल पे करू शकलो असतो. तो आपल्याच मूर्खपणा वर हसला. एका अर्थी ते बरे होते कारण त्याने जर पहिल्या भेटीत गुगल पे केले असते तर आज दुसरी भेट लोप पावली असती. पहिला कस्टमर गेल्यावर राधिका त्याला म्हणाली बोला?
तो बोलायला तोंड उघडणार इतक्यात ती म्हणाली काय तुम्ही फक्त दहा रुपये द्यायला इतक्या लांब आलात. दहा रुपये तुम्ही गुगल पे सुद्धा करू शकला असता. यावर आदित्य अजुन खजिल झाला. आपल्या मनात जी गुगल पेची कुजबुज चालू आहे त्यावरच नेमके या स्त्रीने भाष्य करावे यामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले. अरेच्चा या स्त्रीला आपल्या मनातले ओळखता येते की काय ? आणि तसे असेल तर त्याच्या मनात असलेला काल रात्री पासूनचा गोंधळ तर तिला ऐकू आला नसेल. मग त्याने स्वतःस सावरत म्हटले की मी जरा इथेच मार्केट मध्ये फेर फटका मारायला आलो होतो म्हटले की हाताबरोबर तुमचे पैसेही द्यावे.
त्यावर ती म्हणाली याचा अर्थ तुम्ही मला भेटायला आलात नाही. मला वाटले की तुम्ही मलाच भेटायला आला आहात. तिने त्याची मस्करी करता करता एक स्टेडियम बाहेर बॉल जाईल असा षटकार मारला.
त्यावर पुन्हा तो अडखळत बोलला की नाही तसे तुम्हालाच भेटायला आलो आहे. पण मनात शंका होती तुम्ही मेडिकल मध्ये नसाल आणि त्या जागी तुमचे मिस्टर असतील तर.
त्यावर ती अजुन खट्याळपणे बोलली मग तुम्ही दहा रुपये माझ्या मिस्टरांना दिले असते तरी चालले असते.
त्यावर तो म्हणाला असे कसे, पैसे तुमच्याकडून घेतले तर तुम्हालाच दिले पाहिजे ना आणि तुमच्या मिस्टरांना पैसे दिले असते तर तुम्ही पुन्हा भेटल्या नसत्या ना. असे बोलून आदित्यने पण सीमा रेषेबाहेर चेंडू पार केला.
त्यावर ती हसु लागली. तिचे हसू पाहून तोही हसू लागला. ती म्हणाली मी तुमची मस्करी करत होते. माझे मिस्टर कधी मेडिकल मध्ये येत नाहीत. तुम्हाला कधी औषधांची गरज लागली तर इथे येत जा आणि भेटावेसे वाटले तरी येत जा. तसे तुम्ही चांगल्या घरातले दिसताय म्हणून तुमच्याशी मैत्री करायला काही हरकत नाही.
जे आदित्य तिला बोलायला आला होता ते त्या राधिकाने स्वतःच बोलून अख्खी मॅच जिंकली होती. तिच्या मोकळ्या स्वभावाने त्याच्यातील अनोळखी पणाची भिंत थोड्या प्रमाणात तरी नाहीशी झाली होती. आदित्यने खिशात दहा रुपये असताना देखील तिला गुगल पे करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर घेतला आणि दहा रुपये ट्रान्स्फर केले. महत्वाचे म्हणजे आता त्याच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर होता. आदित्य मनोमनी खुश होता जणू काही त्याला चाळीस चोरांच्या त्या गुहेचा दरवाजा उघडण्यासाठी असणारा "तिळा तिळा दार उघड" हा कोड वर्ड समजला होता.

अनैतिकWhere stories live. Discover now