भाग 1 ला
संध्याकाळच्या वेळी साताऱ्याकडे जाणाऱ्या खंडाळा घाटामधील ट्रॅफीक फारच विरळ होता. एखादा ट्रक किंवा मधुनच एखादी कार साताऱ्याच्या दिशेने जात होती. थंडीचे दिवस होते. त्यात हवा जोरात होती हुडहुडी भरत होती. एक तरुणी रस्त्यात कुडकुडत ऊभी होती. ती येणाऱ्या गाडीला हात करुन लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करीत होती. पण ती वळणावर उभी असल्यामुळे पटकन दिसत नव्हती किंवा वळण असल्यामुळे गाडीवाला न थांबता पुढे जात होता.
राजन आज खुशीत होता. बरेच दिवसा नंतर त्याच्या हाताला एक सावज लागल होत. त्याचा विश्वास संपादन करण्यात त्याने आयुष्यातील सहा महिने घालविले होते. जवळ जवळ तिन एक लाखाच कर्ज डोक्यावर होतं. ज्या होटेलमध्ये रहात होता त्याचेही २५-३० हजाराच देण होत केवळ राजनने आपल्या गोड बोलण्याच्या स्किलवर त्याला थांबवले होेते. आजच त्याने त्याचे देणे एकरकमी देऊन वर १० हजाराची ठेव फ्युचरसाठी त्याच्याकडे ठेवली होती.
होंडा सिटीचा लाभ त्याला झाला होता वर बॅगेत पन्नास लाखाची रक्कम होती. त्याने जेंव्हा मुंबई सोडली तेंव्हा त्याने काहीही पलॅन केला नव्हता. गाडी कोल्हापूरकडे वळली तिकडेच तो निघाला होता. गाडीचा हिटर चालु होता आणि मस्त मुकेशची गाणी.
खुप स्टाइलमध्ये त्याने वळण घेतले आणि त्याला हात करणारी ती दिसली. थोड पुढं जाऊन त्यानं गाडी थांबवली. थोडा विचार करु लागला. तो पर्यंत ती धावतच आली. काचेवर आंगठीने ती टकटक करु लागली. थोडा विचार करत त्याने काच खाली केली.
सर मला प्लिज लिफ्ट द्याना. या सुनसान रस्त्यावर मी एकटीच आहे. मला खुप भिती वाटतेय. प्लिज. . मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.
तिच्या एकंदर पहिरावावरुन ती सुशिक्षीत, चांगल्या घरातील असावी असे वाटत होते. तिच्याकडे एक सॅक होती ती ही ब्रँडेड असावी. हातावर उंची घड्याळ होते. मोबाईल ही भारीतला असावा. अंगावर जिन्स आणि टाॅप होता ते ही ब्रँडेडच असावेत.