'चाबऱ्या' भाग १

5.8K 9 0
                                    

१)" दादा कवा येत्याल गं आये? "

अचानक आलेला लहान मुलाचा प्रश्नार्थक आवाज, अंगणातल्या बदामाला आपसुक टेकुन विश्रांती घेत असलेल्या गोदावरीची तंद्री भंग करतो. क्षणात तिची नजर तुराट्यांनी बनवलेल्या फाटकाकडं‌ जाते.

" चाबऱ्या.. ! तु हाय व्हय रं..? आनं आत ई की... उन्हा तान्हाचं कमुन फिरायलास बरं."

" आये.. शाळत गेलतो गं... येतानी पाय शेणावर पडून चप्पल घसरली.. तुटली.." चाबऱ्या फाटकाबाहेरून बोलला.

"माय....तुला लागलं त नाय ना ! " क्षणात व्याकुळ झालेली गोदा फाटकाकडे धावली.

१० वर्षाचं एकुलतं एक मुल, ' चाबऱ्या '. त्याच्याशिवाय तिला होतं तरी कोण. नवरा ३-४ वर्षांपूर्वी त्यांना पोरकं करून गेला. आईची माया लावणारी सासु विहिरीवर पाणी भरताना तोल जाऊन पडली. आता सासरे संपतरावच या गरीब घराचा कारभार पाहत होते. २७ वर्षाची गोदावरी माञ नेहमी या कोसळलेल्या दुःखामुळे सतत चिंतित राहत होती. ऐन तारुण्यात विधवा झाल्याने तिचं मन सतत तिला खात असे. पाय घसरुन पडला हे ऐकून चलबिचल झालेली मनस्थिती साहजिकच तिला सतत चिंतित राहण्यामुळेच झाली असावी.

" न्हाय गं, फक्त पाय घसरला.. अन् भरलाय बी थोडा .. " तो पाय पुढे करुन दाखवतंच बोलला.

त्याला काही दुखापत झाली नसल्याचे बघत, " बरं न्हानीत जाऊन पाय धु जा " गोदा म्हणाली.

चाबऱ्या न्हाणीकडे तर जात होता, पण त्याचे लक्ष त्या तुटलेल्या चपलिकडेच होते. गोदाने ते पाहिलं व चप्पल नीट निरखून पहिली. चप्पलचा अंगठा उपसुन बाहेर आला होता. ती स्वतः शीच बोलली, " लय भोळं हाय महं लेकरू." अन् चप्पल धुवून तो अंगठा बसवू लागली. चाबऱ्या तोवर हात पाय धुवून आला व चुलिकडे ठेवलेल्या टोपलीतुन भाकर घेऊन ताटात ठेवत " आये सांग ना.. दादा कुठं गेल्यात? " चाबऱ्याने विचारले.

" गुरं घेऊनश्यान माळावर गेल्यात. दादाकड काय काम हुतं ? "
गोदाने त्याला विचारले.

" दादांला सांग ना, चप्पल तुटली, नवि घ्यायचीय. " चाबऱ्याचे बोलणे ऐकून गोदाला आपल्या गरिबीची जाणीव झाली. अन् क्षणात तिच्या अंगठ्याचा दाब वाढला आणि चपलीचा अंगठा पुर्ववत झाला.

' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेसWhere stories live. Discover now