Rahasya Chapter 1

388 4 1
                                    

          रहस्य ही गोष्ट जरी रहस्यमयी वाटत नसली तरी तिचा शोध हा नक्कीच रहस्यमयी ठरू शकतो. कारण आपल्या अवतीभोवती अनेक रहस्ये असतात ज्यांची चाहूल आपणांस कधीनाकधी येतेच. मात्र प्रत्येक वेळी आपण त्या रहस्याच्या शोधात जात नाही. शक्यतो प्रत्येक माणसाला एक साधे, सरळ, सामान्य जीवन जगायचे असते त्या जीवनाच्या शोधात माणूस रहस्यांकडे दुर्लक्ष करतो. तसं म्हटलं तर रहस्य ही गोष्ट सीमित नाही. रहस्य हे कोणत्याही गोष्टीबाबत, कोणत्याही घटनेबाबत, कोणाच्यातरी अस्तित्वाबाबत, तर कोणाच्या तरी जीवनाशी निगडित असू शकते. अशा रहस्याच्या शोधात जेव्हा आपण जातो तेव्हा त्याबद्दलचा आपला अनोळखीपणा हाच त्या रहस्याला रहस्यमयी ठरवतो. आणि अखेरीस त्या शोधात उमगलेलं रहस्य अंगावर शहारे आणणारे देखील असू शकते. अशाच एका रहस्याची कहाणी मी माझ्या विचारांमध्ये तयार केली होती निश्चितच ती काल्पनिक होती. ती कथाच खरं तर माझ्या काल्पनिक जीवनातल्या एका रहस्याबद्दल होती. एक असं रहस्य जे माझ्या जन्मापासून माझ्या अवतीभोवती होतं मात्र माझ्या दृष्टीसमोर नव्हतं. ते रहस्य जरी सुरुवातीस मला रहस्यमयी वाटलं नव्हतं. तरी त्या रहस्याचा शोध हा जरूर एका रहस्यमयी कथे सारखा होता त्याहूनही स्पष्ट सांगायचे झाले तर भयानक होता.
          तर मग माझ्या विचारांतल्या त्या काल्पनिक रहस्याच्या रहस्यमयी शोधाची कहाणी आपण जाणून घेऊ.

          बारावी बोर्डाची परीक्षा संपून नुकतेच तीन-चार दिवस झाले असावेत. मी आणि माझे काही मित्र रात्री पाय मोकळे करण्यासाठी गेलो होतो. तेव्हाच आमच्या दाभोळच्या वाड्याचा विषय निघाला. नकळत निघालेला तो विषय भरपूर वेळ चर्चेत राहिला. इतक्यात एका मित्राने विचारलं,"तुमचा दाभोळचा वाडा Haunted आहे ना..?" आत्तापर्यंत मी आमचा वाडा असा आणि आमचा वाडा तसा करून भरपूर बढाया मारत होतो. मात्र या एका प्रश्नाने माझ्या तोंडावरचं हास्य कपाळाच्या आठ्यांमध्ये बदललंच मात्र इतरांच्या तोंडावरची ती भितीही मला दिसली.
         खरं सांगायचे झाले तर मलाही त्या वाड्याबद्दल फारसे काही माहीत नव्हते. मी सहा-सात वर्षांचा असताना त्या वाड्याला काही कारणास्तव बंद करण्यात आले होते आणि आज बारा वर्ष तो वाडा तसाच बंद आहे असे मला माझ्या आजोबांकडून कळाले होते. मात्र तो वाडा बंद ठेवण्या मागचे कारण मला़ ठाऊक नव्हते. तो वाडा Haunted आहे की नाही हे देखील मला ठाऊक नव्हते. मात्र त्या वाड्याबद्दल दाभोळ गावात भरपूर चर्चा चालायची. त्या चर्चेपासून ही मला माझ्या वडिलांनी दूरच ठेवलं होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मला त्या वाड्याबद्दल काहीच ठाउक नव्हते. मी माझ्या मित्राच्या प्रश्नाला कसेबसे फेटाळले. मात्र त्याच्या त्या एका प्रश्‍नाने माझ्या मनातल्या असंख्य प्रश्नांना माझ्या विचारांवर कब्जा मिळवण्यासाठी एक नवी वाट तयार करून दिली. अर्थातच तो वाडा म्हणजे माझ्यासाठी एक रहस्य होतं ही गोष्ट जरी रहस्यमयी वाटत नव्हती तरी त्या वाड्यासोबतचा माझा पुढील प्रवास तितकाच रहस्यमयी ठरणार होता.
         दुसऱ्या दिवशी जरा उशीराच जाग आली. सुट्ट्या होत्या त्यामुळे कॉलेजची घाई नव्हती. पप्पांनी सुध्दा कामावरून सुट्टी घेतली होती. आई स्वयंपाकघरात काम करत होती आणि आजोबा सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. इतक्‍यात मी बेडरूम मधून डोळे चोळत बाहेर आलो.दाभोळच्या वाड्याचा विचार अजूनही माझ्या डोक्यात होताच. टेबलवर ठेवलेली कॉफी उचलुन आजोबांच्या शेजारी जाऊन बसलो. आजोबांनी नेहमीप्रमाणेच डायलॉग मारला,"उठला का माझा छावा..! रात्रीचा चंद्र जोवर मावळत नाय तोवर यांना काय झोप येत नाय आणि दिवसाचा तो सूर्य डोक्यावर पोहोचत नाय तोवर यांना जाग पण येत नाय. कसं व्हायचं या पिढीचं देवालाच ठाऊक..!" यावर पप्पांनी हसून त्यांच्या ठरलेल्या डायलॉगला प्रतिसाद दिला मी सुद्धा नकळत हसलो आणि राहवलं नाही म्हणून विचारलं,"आजोबा तो आपला दाभोळचा वाडा आपण बंद का ठेवलाय? तो पछाडलेला आहे का?" हा प्रश्न विचारताच दोघेही डोळे वटारून माझ्याकडे बघू लागले. पप्पांनी त्यावर मला थोडं सुनावलंच,"नसते विषय येतात कुठून रे डोक्यात तुझ्या? काय करायचंय त्या वाड्याचं तुला आणि तो वाडा पाछाडलाय वगैरे कोणी सांगितलं तुला? नसत्या चौकशा करू नको गपगुमान ती कॉफी पी आणि आंघोळीला जा" मी त्यांच्यापुढे पुढे काहीच बोलू शकलो नाही. पप्पांच्या रागाला मी थोडे घाबरूनच राहत आलो होतो. त्यामुळे गटागटात कॉफी पिऊन मी अंघोळीला गेलो.
          आंघोळी वरून आलो तोवर आईने शुक्क् शुक्क् केलं मी आईजवळ गेलो तर ती म्हणाली,"कशाला रे बाळा त्या वाड्याचा विषय काढतोस? पप्पांना नाही आवडत त्या वाड्याबद्दल बोललेलं." "अगं पण नक्की काय आहे एवढं त्या वाड्यात?" मी तिला विचारलं. "अरे बाळा त्या वाड्याबद्दल त्या गावातले लोक खूप वाईट बोलतात. तो वाडा पछाडलेला आहे असं म्हणतात. ते कितपत खरे आहे हे मला सुद्धा माहित नाही. लग्नानंतर मी सुद्धा त्या वाड्यात चार-पाच वर्ष राहिली आहे माझ्या तरी निदर्शनात असं काही आलं नाही. पण तू सहा-सात वर्षांचा असताना तुझे आजोबा, पप्पा आणि काका वगैरे दाभोळला गेले होते आणि परत येताना त्या वाड्याला कुलुप घालुन आले होते आणि तो वाडा गेले बारा वर्षे आता तसाच बंद आहे. वाटत नाही पुन्हा उघडेल." आईने मला समजावले. "पण मग तू विचारलं नाहीस का त्यांना की त्यांनी असं का केलं ते?" "अरे बाळा विचारलं मी तेव्हा तुझ्या आजोबांनी सांगितलं की गावातली लोकं त्या वाड्याबद्दल खूप वाईट बोलतात. म्हणून त्यांनी तसं केलं. तू आता याचा जास्त विचार करू नकोस. नाहीतर पप्पांचा ओरडा खाशील. कळलं का? चल नाश्ता करून घे." आई म्हणाली. नाश्ता करून मी प्रथमच्या घरी गेलो.
          संध्याकाळी अचानक आजोबांनी विचारलं,"काय रे पठ्ठ्या एक फेरफटका मारून यायचं का बागेतून?" मी लगेच होकार दिला. मला आजोबांबरोबर फिरायला जाणं खूप आवडायचे कारण ते खूप चांगल्या गोष्टी सांगायचे ज्या मला प्रेरणादायी वाटायच्या आणि आणखी एक मुख्य कारण म्हणजे नेहमी परतताना ते मला आईस्क्रीम द्यायचे. मात्र अडत होते एका ठिकाणीच..! आजोबा खूप हळू चालायचे आणि मी बुलेट ट्रेन. मात्र त्या दिवशी ती बुलेट ट्रेन अन् पॅसेंजर ट्रेनची एकत्र सफर बागेकडे रवाना झाली. खरंतर ही बुलेट ट्रेन आणि पॅसेंजर ट्रेन ची उपमा आजोबांनीच दिली होती. चालता चालता आजोबांनी पुन्हा विषय काढला दाभोळच्या वाड्याचा..! "काय रे भुसनाळ्या, तुला कोण बोललं की आपला वाडा पछाडलेला आहे?" "आजोबा तो प्रथम आहे ना तो बोलला काल रात्री आणि आज सकाळी आईसुद्धा सांगत होती की गावातली लोकं असं बोलतात" मी अडखळत उत्तर दिले आणि पुन्हा विचारले,"आजोबा खरच तो वाडा पछाडलेला आहे का?" त्यावर आजोबा म्हणाले,"अरे माझ्या लेकरा काय सांगायचं तुला तो वाडा आपला खानदानी वाडा आहे बघ. आपल्या तीन पिढ्या गेल्या त्या वाड्यात. गावात खूप चांगली प्रतिष्ठा होती बघ आपली. लोक खूप नावजत होते आपल्या खानदानाला." "मग असं काय झालं जेणेकरून आपल्याला तो वाडा बंद करावा लागला?"माझ्या तोंडून क्षणात हा प्रश्न विचारला गेला. "सगळं काही ठीक चालले होते बघ मात्र ती एक गोष्ट बिनसली आणि तेव्हापासून आपल्या त्या वाड्याची उतरती कळा चालू झाली." "आणि काय होती ती गोष्ट?" मी विचारले. "ती गोष्ट काही मी तूला सांगू शकत नाही. पण तू त्या वाड्याबद्दल जास्त विचार करू नकोस. आता आपण त्या गावातले नाही आहोत. आपण त्या गावापासून....त्या वाड्यापासून दूर झालोय." आजोबांचा  आवाज हळूहळू कमी होत गेला त्यामुळे मी अचानक आवाज थोडा वाढवून विचारलं,"मग तो वाडा आजोबा बारा वर्ष तसाच बंद आहे का?" ते क्षणभर शांत झाले आणि माझ्या कानाजवळ येऊन बोलले," नाही..!" मी दचकलोच..! कारण इतके वर्ष आई, पप्पा आणि आजोबा देखील मला सांगत होते की तो वाडा बंद केलाय. पण आता आजोबा काहीतरी वेगळंच सांगत होते. इतक्यात आजोबा म्हणाले," म्हणजे...अ्अ्अ्...तसा वाडा बंदच असतो मात्र तिथे एक कामगार ठेवलाय जो दर महिन्याला तिथे जाऊन त्या वाड्याची साफसफाई करतो. इतरवेळी वाडा बंदच असतो. गोपी नाव त्याचं. पूर्वी आपल्या वाड्यात रघूकाका काम करायचे त्यांचा मुलगा तो. आता तो देखील आला साठी गाठायला. त्या वाड्याच्या शेजारीच त्याचं एक छोटंसं खोपटं आहे." आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. त्या वाड्याबद्दलचं रहस्य मला सकाळ पर्यंत एक सरळ आणि साध्या प्रकारे वाटत होते...की कदाचित लोकांनी पसरवलेल्या अफवांमुळेच तो वाडा बंद करावा लागला असेल. कारण भूत-प्रेत यांसारख्या अंधविश्वासू कल्पनांवरती माझा मुळीच विश्वास नव्हता. आणि माझ्या जीवनातल्या या रहस्याला गेले बारा वर्षे मी त्याच प्रकारे बघत आलो होतो. मात्र आजोबांनी फेकलेल्या त्या बागेतल्या यॉर्कर नंतर माझ्याकडे दोनच पर्याय होते. एक तर या सर्व विषयांना "ओके...!Now Stop...!" बोलून विसरून जाणे कारण गोष्टींमधला गुंता वाढत चालला होता. मात्र मला ते जमणार नव्हते.  म्हणून मी या विषयाच्या खोलात उतरण्याचा प्रयत्न केला. माझ्या जीवनातलं हे रहस्य मला रहस्यमयी वाटू लागलं होतं कारण त्या रहस्याची वाटचाल मी सुरू केली होती. 
          रात्री जेवून खाऊन पुन्हा नेहमीप्रमाणे मी आणि माझे मित्र पाय मोकळे करायला म्हणून बाहेर पडलो. मित्रांचे इतर विषय चालू होते मात्र माझ्या डोक्यातून त्या वाड्याचे खुळ काही उतरे ना. त्या वाड्याबद्दलचे विचार माझ्या डोक्यात फिरू लागले होते. एका घटनेची कडी दुसऱ्या घटनांशी जोडून पाहू लागले. 'बारा वर्षे वाडा बंद..!' 'लोकांचं वाड्याबद्दलचं मत..!' 'सहा-सात वर्षांपूर्वी असं काय घडलं असावं जेणेकरून तो वाडा बंद करावा लागला?' 'ते गोपी काका..!' 'दर महिन्याला एका दिवसासाठी तो वाडा उघडा असतो..!' 'जर खरच त्या वाड्यात काही आहे..! खरंच तो वाडा पछाडलेला आहे तर मग त्या गोपी काकांना कसं काही होत नाही?'  'नक्की काय रहस्य आहे त्या वाड्यात' असे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. डोक्यातले विचार या प्रश्नांमध्ये कडी जोडण्याचा प्रयत्न करत होते मात्र तेही असफल..! यावर एकच उपाय मला दिसू लागला....
"मी दाभोळच्या वाड्यात जाणार." मी मोठ्याने बोललो. इतरांची चर्चा क्षणात थांबली. सर्वजण माझ्याकडे वाकड्या नजरेने बघू लागले. "मी दाभोळच्या वाड्यामध्ये जाणार आहे तुमच्यापैकी कोणी येणार का?" मी अडखळत अडखळत त्यांना विचारले. खरंतर त्या विचारण्यामागे माझी भीतीच होती. इतक्यात प्रथम म्हणाला,"अरे भाई पण तो वाडातर Haunted आहे ना..!" राहुलनेही त्याचा प्रश्न विचारला,"गेली बारा वर्षे तो वाडा बंद आहे मग तू कसा तिकडे जाणार?" "अरे अन्या, त्या वाड्याबद्दल खूप वाईट बोलतात ना गावातली लोकं." सलोनी सुध्दा तिच्या घाबर्या आवाजात बोलली. मी क्षणभर शांत झालो आणि अचानक सुरुवात केली... माझ्या रहस्याबद्दलच्या रहस्यमयी गोष्टी मी त्यांच्यासमोर उघड केल्या. आमच्या खानदानाच्या तीन पिढ्यांपासून गोपी काकांच्या महिन्यातल्या वाड्याच्या साफसफाई बद्दल सर्व काही त्यांना सांगितले. मी त्या वाड्यात जाणार हे नक्की होतेच मात्र हे सांगण्यामागे कारण होतं माझ्या भीतीचं. त्यावेळी मला पडलेल्या त्या सर्व प्रश्नांनी माझ्या मनामध्ये भीती साठी एक जागा तयार केली होती. त्यामुळे त्या वाड्यात एकटं जाणं माझ्यासाठी धोकादायक वाटत होतं. सर्वांचे चेहरे उतरले होते. एकमेकांकडे बघून एकमेकांचे चेहरे वाचण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते. मात्र सर्वांच्या चेहर्‍यावर एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे 'भीती'. इतक्यात यश ने हात वर केला आणि म्हणाला,"अन्या, मी येतो रे घाबरू नको तू." मी त्याच्याकडे बघून थोडासा हसलो आणि पुन्हा इतरांकडे बघू लागलो. प्राची देखील यशच्या मागोमाग म्हणाली,"मी पण येते मग आणि जर मी येणार असेन तर साक्षी पण येईल." साक्षीने माझ्याकडे बघितलं आणि जड अशी Smile दिली. "मग या मर्दांना कसली भीती? काय रे प्रथम आणि राहुल्या...चलतायना?" त्या दोघांनी पण मान डोलावली मात्र चेहऱ्यावरचे हावभाव काही विचित्रच होते. आता उरली फक्त सलोनी..! सलोनी मुळातच फार घाबरी भागूबाई..! म्हणूनच मी तिला बोललो,"सलोनी तू राहू दे नको येऊस. कारण कितीही झालं तरी आपल्यासाठी ती अनोळखी जागा आहे." थोडावेळ ती शांत बसली कदाचित थोडा तिने विचार केला आणि मग बोलली,"नाही रे अन्या, मी सुद्धा येणार. तुम्ही सगळे जाणार मग मी काय करू इथे एकटीच?” अशा प्रकारे आमची एक टीम तयार झाली. निश्चितच अनोळखी होतो आम्ही आमच्या निर्णयाच्या परिणामांशी मात्र मनातल्या त्या भीती शेजारी एक उमेद अशी होती की आम्ही त्या रहस्याचे जाळे उलगडणार. मात्र आम्हाला कुठे माहीत होतं त्यावेळी की आम्ही रहस्य उलगडायला नव्हे तर त्यात आणखी फसायला जात होतो. रहस्याला रहस्यमयी नाही समजले तरी चालू शकते. मात्र त्या रहस्याच्या वाटचालीत एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींच्या मागे लागणे हा फार मोठा मुर्खपणा ठरू शकतो आणि असाच मूर्खपणा मीदेखील माझ्या वाटचालीत केला. जो फक्त मलाच नव्हे तर माझ्या इतर मित्रांनाही फार महागात पडला.

क्रमशः( to be continued )

Rahasya ( रहस्य )Where stories live. Discover now