Rahasya Chapter 5

96 2 0
                                    

     रहस्य (Rahasya).... भाग ५ (Chapter 5)

          'दाभोळचा वाडा...!' सुरुवातीस आमच्यासाठी तो वाडाच केवळ एक रहस्य होतं. मात्र त्या रहस्याचा शोध घेण्या अगोदर ही गोष्ट आम्हाला रहस्यमयी वाटली नव्हती. कारण त्या रहस्याची वाटचाल देखील आम्हास माहीत नव्हती. मात्र जसजसे आम्ही या वाटचालीवर पुढे जात राहिलो तसतसे या रहस्यातील आणखी काही रहस्यमयी गोष्टी आमच्या समोर येत गेल्या. 'गोपी काका..!' 'वाड्याचा भूतकाळ..!' 'वाड्यातलं ते भूत..!' इत्यादी गोष्टींबद्दल आम्हास कळले होते आणि त्या गोष्टींची अपेक्षा देखील आम्ही केली होती. मात्र या वाटचालीत काही अनपेक्षित गोष्टीसुद्धा आमच्या सोबत घडलेल्या. ज्या मुळातच आमच्या समोर एक नवं रहस्य घेऊन उभ्या राहिलेल्या. उदाहरणार्थ 'आमचं सर्वांचंच ते स्वप्न... आणि हकीकत...!'  आता आम्ही एका अशा वळणावर होतो जेथे आम्हाला भविष्यातल्या सर्व घटनांबाबत माहिती होती. तरी देखील आम्हास त्याप्रमाणे त्या घटनांना सामोरे जावेच लागणार होते.
          "अरे ए... काय करायचं आपण आता गेले दीड-दोन तास आपण या खोलीत बसून राहिलो बाहेरून सुद्धा कडी आहे." यश म्हणाला. बराच वेळ आम्ही सर्व त्या खोलीमध्ये अडकलो होतो. रघुकाकांचं ते भूत आमच्यावर नजर ठेवून होतं हे आम्हास ठाउक होतेच. मात्र कसेही आम्हाला त्या खोलीतून बाहेर पडायचे होते. साक्षी, सलोनी, आणि राहुल यांनी पाहिलेली स्वप्ने जर खरी घडणार होती तर आम्ही त्या खोलीच्या बाहेर जाणे आवश्यक होते. "अरे पण कसं? बाहेरुन तर कडी आहे..!" राहुल म्हणाला. त्या खोलीच्या बाहेर पडण्यासाठी काही ना काही शक्कल लढवणे गरजेचे होतेच. तेव्हा त्या खोलीत एका कोपऱ्यात एक सळी पडलेली आम्हाला दिसली. मी ती जाऊन पटकन उचलली आणि सर्वांकडे बघितले. त्यांना माझ्या डोक्यात काय प्लॅन आहे तो कळला असावा त्यावर प्राची मला म्हणाली," नाही विचार सुद्धा करू नको त्याचा... अरे तो भूत आपल्यावर नजर ठेवून आहे. आपण जर तो दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर त्याला चाहूल लागणार आणि जर का तो आपल्यावर रागवला तर तो आपल्यासोबत काहीही करू शकतो." तिचे म्हणणे देखील बरोबरच होते. मी थोडा विचार केला आणि म्हणालो,"ऐका... ऐका... हे बघा तसं पण आपण एका Haunted वाड्यात आहोत. त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी त्या भुताला चाहुल लागणारच... किंवा कुठेही नाही गेलो म्हणजेच इथे बसून वाट बघितली तरी देखील त्याला माहीतच असणार की आपण येथेच बसून राहिलो आहे...! आता साक्षी, सलोनी आणि राहुलच्या स्वप्नांप्रमाणे आपण खोलीच्या बाहेर पडतो बरोबर ना... मग ते तसं घडणारच आहे... त्यामुळे इथे बसून वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही." त्यावर प्रथम माझ्यावर रागावून म्हणाला,"अच्छा म्हणजे सलोनीचं स्वप्नसुद्धा खरंच होणार का...? आणि आपल्याला ते माहीत असून सुद्धा आपण असं खोलीच्या बाहेर पडून तिचा जीव धोक्यात घालायचा का...? खोलीच्या बाहेर आपल्याला पडायचंच असेल तर त्या भुताला कळू न देता आपण बाहेर पडलं पाहिजे...!"  "अरे हो... माहिती आहे मला सलोनीचं स्वप्न...! पण त्या घटनांना आपण थांबवू शकत नाही. आणि जर आपण तसा प्रयत्न केला तर काहीतरी वेगळेच घडून बसेल. कळतंय का तुला...? त्यामुळे आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे त्यांच्या स्वप्नांना फॉलो करायचं. आणि राहिली गोष्ट सलोनीच्या स्वप्नाची तर सलोनीला अजूनही तिच्या स्वप्नाचा शेवट माहित नाही. जो आपण तयार करु शकतो.... घडवू शकतो.... चांगला करू शकतो....! मात्र त्यासाठी आपण या खोलीत घाबरून बसू शकत नाही. कळतंय का तुला...? तुम्हा सर्वांनाच...?" सर्वजण शांत झाले मी थोडा आवाज चढूनच बोललेलो होतो.
त्यांनाही माझे म्हणणे पटले. त्यामुळे आम्ही सर्वांनीच तो दरवाजा तोडण्यास सुरुवात केली. खट्ट्ट्... खट्ट्ट्... खट्ट्ट्... दरवाजा फार जुना असल्याने तीनच दणक्यात आरपारच दिसू लागलं. आम्ही आणखी जोर लावला खट्ट्ट्... खट्ट्ट्... खट्ट्ट्... आणि त्या दणक्यांनी दरवाजा दुसऱ्या बाजूवर जाऊन जमिनीवर दाणकन पडला. "साक्षी आणि सलोनी तुम्हाला माहीतच आहे की आता तुम्ही काय करायचं..!" मी साक्षी आणि सलोनीला बोललो त्यावर सलोनीच्या डोळ्यांत पुन्हा पाणी येऊ लागले. "नको... नको... नको... नको रडू. आम्ही आहोत ना. तू जर घाबरलीस तर त्या भुताला खूप सोपे जाईल आपल्यासोबत खेळायला. त्यामुळे तू नको घाबरू. आम्ही तुला काहीच होऊ देणार नाही." मी सलोनीला धीर दिला. तिने मुंडी हलवली व डोळे पुसले. आम्ही जसे त्या खोलीच्या बाहेर पडलो तसे आमच्या समोरच ते रघूकाकांच भूत उभं होतं. आमच्याकडे बघून हसत होतं. त्याच क्रूरपणाने हसत होतं. आणि म्हणालं," कारं माझ्या लेकरांनो... थकलात व्हय एवढ्या लवकर माझ्या पाहुणचाराला...?  का म्या गोपीकाका न्हाय... त्याचा बाप हाय म्हणून...?"  मी त्यांना माझ्या मनातली भीती न दाखवता बोलण्याचा प्रयत्न केला," काका तुम्ही या वाड्यात पुन्हा का आलात हे आम्हाला माहीत नाही पण तुम्ही आता या वाड्यात जास्त वेळ नाही टिकणार हे मी तुम्हाला आत्ता सांगून ठेवतोय" त्यावर ते गोपीकाकांचं भूत मोठ्याने हसू लागलं... माझ्याकडे बघून पुन्हा म्हणालं,"माझ्या लेकरा... नको रे एवढे प्रयत्न करू... नको... तुझ्या त्या प्रयत्नात माझंच भलं हाय बघ"  तोच अचानक ते भूत माझ्या अगदी तोंडाजवळ आलं आणि म्हणालं, "आणि जर का तुमी माझ्या वाकड्यात गेलात. तर तुम्हास मी लय काय भोगायला लावन. मला तुमच्याकडून जे हवय ते तर मी घेणार हाय पण मग तुम्हाला बी नाही सोडणार..."   एवढे बोलून अचानक ते माझ्या समोरून गायब झालं.
          आमच्या तोंडावर जरी नसलं तरी मनातून फारच घबराट उडाला होता. मात्र आमच्या मनातली भीती आम्हाला काही केल्या त्या भुता पासून लपवायची होती. आम्ही ठरलेला प्लॅन प्रमाणे कृती करण्यास सुरुवात केली. साक्षी व सलोनी जिना उतरून खालच्या मजल्यावर गेले आणि मी बाकीच्यांना घेऊन त्या वरच्या मजल्याच्या शेजारी गेलो. आणि बाहेरची कडी उघडून ठेवली मात्र त्यावेळी सुद्धा आतून कडी होतीच. त्यामुळे आम्ही बाहेरच त्या दोघींची वाट बघत बसलो. इकडे साक्षी आणि सलोनी खालच्या मजल्यावरील खोलीत शिरले. ज्या खोलीत आदल्या रात्री यश गेला होता. त्या खोलीला वरच्या बाजूस भले मोठे भगदाड पडले होते. शेजारची शिडी उचलून त्यांनी तिथे लावली. आणि वरच्या खोलीत आले. वरच्या खोलीत येऊन बघतात तर काय...? साक्षीने पाहिलेल्या स्वप्नासारखी ती खोली संपूर्णपणे रिकामी होती. मात्र तिथेच एका कोपऱ्यात एक लाकडी बोर्ड पडला होता. मात्र त्याचे दोन तुकडे झाले होते आणि शेजारीच काही मेणबत्त्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. साक्षीने त्या बोर्डच्या जवळ जाऊन त्याला निरखून पाहिले तर तो अगदी तिला तिच्या स्वप्नात दिसलेल्या बोर्ड प्रमाणेच होता. साक्षीने नंतर दरवाज्याजवळ येऊन दरवाजावर दस्तक दिली. त्या दोघी आत मधल्या खोलीत पोहोचले याचा इशारा थोडक्यात आम्हाला तिने दिला. बाहेरील आम्ही सर्वजण दरवाजापाशी येऊन उभे राहिलो. पुढे घडणारी गोष्टं माहीत असल्याने पूर्णपणे सतर्क होतो. थोड्या वेळातच खोलीतून कडी खोलण्याचा आवाज आला आणि हळूच दरवाजा उघडला मात्र दरवाजा उघडला तर पाहतो काय...? आमच्या समोर सलोनी डोळे बंद करून उभी होती आणि सलोनीच्या मागे साक्षी उभी होती. आत मध्ये कोणतेही भूत दिसत नव्हते...! असे कसे घडले...? साक्षीच्या स्वप्नाप्रमाणे तर त्यावेळी तिथे भूत असायला हवे होतं. मात्र तिथे कोणतेच भूत नव्हते. आम्ही थोडा सुटकेचा श्वास घेतला. सलोनी आतून फार घाबरली होती. मोठ्याने श्वास घेत होती. मात्र तिचे डोळे बंद होते. "सलोनी..." आणि जशी राहुल ने तिला हाक मारली ती पळत खोलीच्या बाहेर आली. मात्र साक्षी अजूनही खोलीच्या आतच होती. सलोनीला शांत करून आम्ही पुन्हा खोलीच्या आत शिरलो... खोलीत नक्की काय आहे ते बघण्यासाठी. मात्र सलोनी आत येण्यासाठी तयारच नव्हती. त्यामुळे ती खोलीच्या बाहेरच थांबली आणि जसे आम्ही आत गेलो त्या खोलीचा दरवाजा धाडकन लागला. सलोनी खोलीच्या बाहेरच राहिली. "सलोनी... दरवाजा उघडण्याचा प्रयत्न कर... सलोनी" आम्ही आतून खूप जोरजोरात बोंबलत होतो. मात्र बाहेरून तिचा काहीच आवाज येईना. तोच  साक्षी अडखळत म्हणाली,"तो... तो...बोर्ड सुद्धा गायब झाला" कोपऱ्यातला तो बोर्ड देखील गायब झाला होता. मी पटकन ती शिडी उतरून खाली गेलो. खालच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. मात्र मी त्या दरवाजाच्या इथे पोहोचणार तोच तो दरवाजा देखील धाडकन आपटला. होत्याचं नव्हतं होऊन बसलं...! नकळतच आम्ही आमच्या नियतीला बदलण्याचा प्रयत्न करून बसलो होतो. कारण साक्षीच्या स्वप्नाप्रमाणे त्या खोलीचं दार साक्षी उघडणार होती. मात्र हकीकत काही उलटीच घडली. साक्षीने सलोनीला दार उघडायला सांगितले होते... या छोट्याशा बदलामुळे सलोनी त्या खोलीत अडकण्या ऐवजी आम्ही सर्वजण तिथे अडकून बसलो होतो. मात्र नियती ही अटळ असते. कारण कोणत्याही वाटचालीत कितीही वळणं आली तरी देखील त्याचा शेवट ठरल्याप्रमाणेच होतो. मात्र त्या वळणावर आम्हाला आणखी एक प्रश्न पडला होता... तो म्हणजे ठरल्याप्रमाणेच त्या खोलीतल्या मागच्या मुलीस थोडक्यात साक्षीला देखील ते भूत पकडू शकत होते. मात्र त्याने तसे केले नाही. त्याने सलोनी लाच पकडले मात्र तसे का...?  निश्चितच त्या प्रश्नांची उत्तरे त्यावेळी आमच्या जवळ नव्हती. मात्र आम्हाला लवकरात लवकर ती शोधावी लागणार होती. कारण सलोनीचा जीव धोक्यात होता. मात्र आम्ही त्या खोलीमध्ये बसून काहीच करू शकणार नव्हतो. बराच वेळ त्या रिकाम्या खोलीत आम्ही विचार करत बसलो होतो. तोच खालच्या खोलीतून कसलातरी जोरदार आवाज आला. आम्ही खाली जाऊन बघतो तर काय...? खाली गोपीकाका उभे होते... खरे गोपीकाका. गोपीकाकांना तिथे पाहून डोळ्यातून पाणी आले. मनातली मेलेली जिद्द पुन्हा जागी होऊ लागली. "चला पोरांनो... चला पटकन इथून." गोपी काका आम्हाला म्हणाले. त्या खोलीमध्ये भरपूर सामान होते आणि तिथेच एक लाकडाचे कपाट होते त्या कपाटाला खालून एक सुरंग होती. "भुयार...!" मी आश्चर्याने बोललो. "हा बेटा भुयार...! तुमच्या तीन पिढ्या या वाड्यातच गेल्या. तर तूच विचार कर या वाड्याचा किती थाट... किती रुबाब असेल पूर्वी... तर मग अशा वाड्यात कोणती तरी खुफीया जागा तर असणारच ना...! " गोपी काका मला म्हणाले. आम्ही पटकन त्या भुयारामधून वाड्याच्या मागील बाजूस बाहेर पडलो आणि गोपी काकांच्या झोपडीत जाऊन आम्ही सर्व बसलो. या भुयाराबाबत रघु काकांना केव्हाच माहीत नव्हते. गोपीकाका जेव्हा वाडा साफ करण्यासाठी वाड्यामध्ये जायचे त्यावेळी ते त्या भुयारी मार्गाने जायचे. त्यामुळेच कदाचित गावातल्या लोकांना हे ठाऊक नव्हते की गोपी काका दर महिन्याला त्या वाड्या मध्ये जातात. सलोनी अजूनही त्या वाड्यातच त्या भूतासोबत अडकली होती. आणि आता तिला सोडवण्यासाठी फक्त गोपीकाकाच आमची मदत करू शकणार होते.
          गोपीकाकांना आम्ही सर्वांनी घडलेली हकीकत सांगितली. अगदी दाभोळात येण्यापासून ते त्या खोलीतल्या घटनेपर्यंत...! सर्वकाही गोपी काकांनी सुरुवातीस शांतपणे ऐकून घेतलं. आणि नंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. "पोरांनो तुम्हाला जो वाड्याचा भूतकाळ कळलाय तो संपूर्ण बरोबर नाही. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी माझ्या बाबांना एक बोर्ड मिळाला होता. कोणा एका गोर्या माणसाने माझ्या आजोबांना थोडक्यात माझ्या बाबांच्या वडिलांना 1930-35 च्या दरम्यान तो बोर्ड दिला होता. आणि त्याबद्दलची विद्या देखील त्यांना शिकवून ठेवली होती. मात्र त्याबद्दल सुरुवातीस माझ्या बाबांना ठाऊक नव्हते. माझ्या आजोबांनी ती विद्या जेव्हा पूर्णपणे अवगत केली. तेव्हा त्यांनी त्यावर काही पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली पाश्चिमात्य संस्कृतीतील त्या बोर्ड ची कहाणी आपल्या देशात देखील यावी... त्याबद्दल लोकांना ज्ञात व्हावे असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल अशी अनेक पुस्तके लिहिली. मात्र आपल्या लोकांनी त्या सर्व गोष्टी मजेवारी नेल्या. त्या बोर्ड च्या कथेवर वा अस्तित्वावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे माझ्या आजोबांनी तो बोर्ड कोठेतरी लपून ठेवला जेणेकरुन तो कोणाच्या हाती लागू नये... आणि त्याचा दुष्परिणाम होऊ नये. मात्र ज्यावेळी माझ्या आजोबांचा मृत्यू झाला तेव्हा कालांतराने तो बोर्ड माझ्या बाबांच्या हाती लागला. सोबतच आजोबांची पुस्तके देखील...! ज्यामध्ये त्या बोर्डबद्दल सर्व काही लिहिले होते. माझ्या बाबांनी त्याबद्दल सर्व काही वाचून काढले... मात्र त्याचा योग्य तो वापर करण्याऐवजी त्यांच्या डोक्यात त्याचा वाईट वापर करण्याचं खूळ आलं. मी अवघ्या दहा वर्षांचा असताना मला ते सर्व सामान त्यांनी दिलं. आणि म्हणाले,"या गोष्टींचा तेव्हाच वापर कर जेव्हा तुला माझी आठवण येईल" मात्र त्यामागे त्यांचा काय हेतू होता हे मला ठाऊक नव्हते. कालांतराने त्यांचा देखील मृत्यू झाला मात्र 12 वर्ष आधी मी एके दिवशी तो बोर्ड बाहेर काढला. मी कधीच माझ्या आजोबांनी त्या बोर्ड बद्दल लिहिलेल्या माहितीला वाचण्याचे कष्ट घेतले नव्हते. मी फक्त माझ्या बाबांनी सांगितलेल्या पद्धतीने त्याचा वापर केला. मला वाटले नव्हते की त्या बोर्ड च्या वापराने त्यांची आत्मा पुन्हा या जगात येऊ शकेल. मात्र माझ्या त्या एका चुकीमुळे मी आपल्या जगात एका राक्षसाला घेऊन आलो." आम्ही ऐकतच बसलो हे रहस्य फक्त दहा-बारा वर्षे जुने नव्हतं... ना चाळीस-पन्नास वर्ष... हे रहस्य अगदी ऐंशी-नव्वद वर्षां पुराणे होते. मी आदल्या रात्री गोपीकाकांच्या झोपडीत पुस्तकांचा ढिगारा बघितला होता. तो कोणत्या पुस्तकांचा होता हे मला तेव्हा कळले. नकळतच गोपी काकांच्या खानदानीत त्या बोर्डचे रहस्य पिढ्यानपिढ्या चालत आले होते. मात्र त्या बोर्डचे अस्तित्व हे तर गोपी काकांच्या आजोबांच्या अगोदरही होत... त्यामुळे त्या बोर्डचं अस्तित्व हे नक्की किती सालचे...?
          "ओइजा(ouija) बोर्ड याचं खरं अस्तित्तव नक्की किती सालचं आहे हे आज संपूर्ण जगात कोणासही ठाऊक नाही. म्हणजेच त्या बोर्डचं अस्तित्व हे मुळातच एक रहस्य आहे. मात्र इतिहास संशोधकांच्या मते पंधराव्या शतकामध्ये त्या बोर्डचा वापर खेळ म्हणून चीनमध्ये होत होता. मात्र कालांतराने तो कमी झाला. एकोणिसाव्या शतकात American civil War घडलं. ज्यामध्ये अमेरिकेतील अनेक जण मारले गेले. असा दावा केला जातो की या Civil War मध्ये मेलेल्या माणसांच्या कुटुंबीयांनी या ओइजा बोर्डचा वापर करणे सुरु केले. ते या बोर्ड मार्फत म्रृत व्यक्तींसोबत संवाद साधू लागले. मात्र त्या प्रयत्नांत सफल होणाऱ्या कुटुंबीयांची संख्या फारच कमी होती. मात्र या घटनेनंतर त्याचे अस्तित्व संपूर्ण जगासमोर आले. कालांतराने हीसब्रो(Hisbro) नामक कंपनीने या ओइजा बोर्डच्या Manufacturing चं काम सुरू केलं आणि अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये तो पसरला गेला. अनेक ठिकाणी त्या बाबत लोकांची उत्सुकता वाढू लागली. मात्र काही ठिकाणी लोकं या बोर्डची थट्टा उडवत होते. आपल्या भारत देशामध्ये देखील या बोर्ड बाबत कोणीच गांभीर्याने बघितले नव्हते." गोपी काकांनी त्याबद्दलचा संपूर्ण इतिहास आमच्या समोर ठेवला. वर्षानुवर्षे नव्हे...तर शतकानुशतके चालत आलेल्या या रहस्याच्या जाळ्यात आम्ही अडकलो होतो. मात्र ते योग्य त्या वेळी सोडवणे गरजेचे होते. कारण ती गोष्ट आता आमच्या मैत्रिणीच्या जीवाची होती. त्यामुळे आम्ही वाड्यात घडलेल्या घटनांबाबत गोपी काकांना विचारले... आम्हाला पडलेल्या स्वप्नांबाबत... त्यांना विचारले.
          त्यावर ते म्हणाले,"प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक घटनेला दोन भाग असतात... प्रत्येकाच्या अस्तित्वाला दोन पर्याय असतात... आता तुम्ही क्रिकेट खेळताना टाॅस उडवता. त्यावेळी त्या नाण्याची एक बाजू तुमच्यासाठी चांगली असते कारण ती तुम्हाला उमेद देणारी असते... जिंकवणारी असते. मात्र दुसरी वाईट असते. कारण ती तुम्हाला निराशादायक असते. त्याचप्रमाणे या सर्व घटनांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टींचे अस्तित्व दिसून येते. जिथे वाईट शक्ती असते तिथे चांगली शक्तीदेखील असतेच...! आता हे गरजेचे नाही की तुम्ही त्या वाईट शक्तीला एका विचित्र अवतारात किंवा विचित्र आवाजातच पाहिलं पाहिजे किंवा मग हे देखील गरजेचे नाही की एखाद्या चांगल्या शक्तीला तुम्ही एखाद्या देवाच्या रूपातच पाहिले पाहिजे...! माणसाने माणसाच्या रूपांमध्ये त्या सर्व शक्तींची कल्पना केली आहे. मात्र  या शक्ती मानवाच्या अस्तित्वा अगोदरपासूनच आहेत. थोडक्यात तुमचं हे रहस्य वर्षांचे नव्हे... शतकांचं नव्हे... तर अनेक युगांच्या मुळापासूनचं आहे...! त्या वाड्यामध्ये तुम्हाला भरपूर सार्‍या गोष्टींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातूनही काही गोष्टी अशा होत्या ज्या तुम्हाला वाईट शक्तींपासून सावध करत होत्या. थोडक्यात तुम्हा सर्वांची स्वप्ने...! त्या स्वप्नांमुळे तुम्हाला पुढे जे काही घडणार होतं ते माहीत झालेले. थोडक्यात त्या वाड्यातील चांगली शक्ती तुम्हाला तुमच्या स्वप्नांतून पुढे घडणार्‍या घटनांबाबत सूचित करत होती. आता तुम्ही म्हणाल... मग तसं तर सर्वच ठिकाणी होणं गरजेचे आहे म्हणजे एरवी कधी घडणारी गोष्ट आमच्या स्वप्नात येत नाही...! मग या वाड्यातल्याच का...? तर पोरांनो एक ध्यानात ठेवा जेवढा समोरचा ताकदवान तेवढीच ताकद आपल्याला देखील लावावी लागते. वाड्या मधली ती माझ्या बाबांची आत्मा ही फारच ताकदवान आहे. शिवाय ती काही सैतानी प्रयत्नांत आहे. पाश्चिमात्यांनी लिहिलेल्या त्या ओइजा बोर्डच्या संकल्पनेमध्ये आणखी एक संकल्पना येथे 'यजमानाची'. यजमान म्हणजे एका प्राण्यावर परोपजीवींनी जीवन जगणे. थोडक्यात Host. माझ्या बाबांना त्या संकल्पनेला चालना द्यावयाची होती. त्यासाठी एक जिवंत माणसाचे शरीर गरजेचे होते. तुमच्या नकळत तुमच्या मैत्रिणीचे शरीर ते या संकल्पनेला चालना देण्यासाठी वापरणार आहेत. ज्यामुळे अनेक आत्मा आपल्या जगामध्ये येऊन एक सामान्य जीवन जगू शकतात. मात्र त्यामुळे जो यजमान असतो थोडक्यात Host... म्हणजेच तुमची मैत्रीण तिच्या जीवाला फार मोठा धोका आहे. " ते सर्व ऐकून आम्हाला खरच खूप मोठा दचका बसला. सलोनी फार मोठ्या संकटात सापडली होती. "मग फक्त सलोनीच का...? आमच्यामधील कोणालाच का नाही...?" मी विचारले.  "बेटा तुझ्या मैत्रिणीला पडलेल्या स्वप्नामध्ये माझे बाबा कोणता शब्द वारंवार बोलत होते?" गोपी काकांनी मला एक प्रश्न विचारला. त्यावर मी उत्तर दिले,"भीती...!"  गोपीकाकांनी माझ्याकडे बघून जड अशी Smile दिली. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. ती गोष्ट भीती होती...! कारण आम्हा सातही जणांच्या मनामध्ये भीतीही होतीच. मात्र सलोनीच्या मनातली भीती ही जरा जास्तच होती. त्या भीतीनेच सलोनीला आमच्यापासून वेगळे केलं आणि त्यामुळेच ती रघूकाकांच्या भूताच्या तावडीत होती.
          मनातली सलोनी बद्दलची काळजी आणखी वाढायला लागली. माझ्यामुळे तिचा जीव धोक्यात होता. मात्र जिद्द हारून चालणार नव्हती. "काका मग आता काय करायला लागेल.... तिला त्या वाड्यातून बाहेर काढण्यासाठी...?" मी गोपी काकांना विचारले "बेटा जर आपल्याला वाईट शक्तींवर कब्जा मिळवायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला आपल्यातल्या चांगल्या शक्तींना जागृत करणं थोडक्यात मनातल्या जिद्दीला जागं करणं गरजेचं असतं. Be Positive असं कोणी उगाचंच म्हणत नाही. शिवाय त्या वाईट शक्तींना आपल्याला जर संपूर्णपणे संपवायचे असेल तर आपल्याला हात घालावा लागतो त्याच्या मुळाशी...!" गोपी काका सांगत होते इतक्यात राहुल म्हणाला,"म्हणजे तो बोर्ड...! आपल्याला त्या बोर्डला नष्ट केले पाहिजे."  त्यावर गोपी काका म्हणाले ,"नाही बेटा... नाही" त्या बोर्डला नष्ट करून आपण  माझ्या बाबांच्या आत्म्याला नष्ट करू शकत नाही. घटनेच्या कारणाला नष्ट करून उपयोग नाही. जर एक कारण नष्ट झालं तर इतर हजारो कारणे तयार होऊ शकतात...! कारण नियती ही अटळ आहे...! त्यापेक्षा त्या एका कारणाला हाती घेऊन त्या घटनेला सामोरे जाणे हाच केवळ एक पर्याय उरतो.  "पण तुम्ही बोलताय तसं... मग ते कारण म्हणजे तो बोर्ड  तर तुटला आहे मग त्या बोर्डला आपण कसे काय वापरू शकतो...?"  मी गोपी काकांना विचारले. गोपी काका उठून त्या झोपडीच्या एका कोपर्‍यात गेले. तेथे एका कापडात कोणती तरी गोष्ट गुंडाळून ठेवली होती. ती त्यांनी माझ्या हातात आणून दिली. मी जसे उघडून बघितले तर आमच्या समोर एक नवा कोरा ओइजा बोर्ड होता. त्यावर काका म्हणाले ,"मी तुम्हाला म्हटलं ना... कारण नष्ट केल्याने हजारो कारणे तयार होऊ शकतात..." गोपी काकांनी गेली बारा वर्षे त्यांनी केलेल्या चुकीला सुधारण्यासाठी जीव ओतून प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आजोबांची अनेक पुस्तके वाचली. त्या पुस्तकांतून त्या बोर्ड बाबत सर्व माहिती गोळा केली आणि एक नवा कोरा बोर्ड तयार केला होता. तोच राहुल म्हणाला ,"मी हाच बोर्ड माझ्या स्वप्नात पाहिला होता एकदम सेम टू सेम...! आणि हो... ही बदामी कृती फळी देखील अगदी सेम आहे."    "प्लॅनचेट... प्लॅनचेट म्हणतात त्याला..." गोपी काका म्हणाले.  "काका पण याचा उपयोग कसा करायचा? आम्हाला काहीच माहित नाही." राहुल म्हणाला. त्यावर गोपी काका बोलू लागले ,"बेटा माणसाच्या मनातल्या भावना देखील घटनांना कारक असतात. जर का या बोर्डचा वापर करून तुम्ही एखाद्या चांगल्या आत्म्याला तुमच्या या घटनांबाबत सांगितले तर ती आत्मा तुमची मदत जरूर करणार.  मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातली भीती संपूर्णपणे घालवावी लागेल."  "पण ती चांगली आत्मा आपल्याला का मदत करणार...?" मी त्यांना विचारले. त्यावर काका म्हणाले "बेटा प्रत्येकाला आपल्या केलेल्या मेहनतीचं काहीतरी चांगलंच फळ हवे असते... आणि जर त्या मेहनतीचं कोणी एखाद्या वाईट पद्धतीने वापर करणार असेल. तर ते रोखण्यासाठी तो जीव लावून प्रयत्न करू शकतो. कळलं का तुला... मला काय सांगायचंय...?"  गोपी काका आम्हा सर्वांकडे बघून थोडेसे हसले. मात्र आमच्या ध्यानात आलं होतं की गोपी काका नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत होते.
          त्या बोर्डला वापरण्याची पद्धत आम्ही काकांकडून नीट समजून घेतली. मनातल्या त्या भितीला शरीराच्या बाहेर काढून कुठेतरी दूर फेकून दिले. सलोनीच्या स्वप्नात त्या रघूकाकांच्या वाईट आत्म्याने सलोनीला ईजा पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र त्या स्वप्नाचा शेवट आम्ही करणार होतो.चांगला करणार होतो. त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. मनातून आणि शरीरातून...! आणि आम्ही सहा जण त्या ओइजा बोर्डला घेऊन वाड्याच्या दिशेने चालू लागलो.

क्रमशः ( To Be Continued )

Rahasya ( रहस्य )Where stories live. Discover now