Rahasya Chapter 2

141 1 0
                                    

  रहस्य ( Rahasya )....भाग २ ( Chapter 2 )  

          लगेचच दुसऱ्या दिवशी सायंकाळी दाभोळच्या एसटीमध्ये आम्ही सात जण चढलो. दाभोळ हे मुळातच आडगाव असल्यामुळे दिवसातून जेमतेम दोन तीन एसट्या गावाकडे सुटायच्या. आम्ही कशीबशी ती शेवटची एसटी पकडली सोबत दोन-तीन दिवसांसाठीचे कपडे, थोडेसे पैसे आणि मोबाईल या व्यतिरिक्त आम्ही फारसे काही घेतले नव्हते. अर्थातच आमच्या घरातल्यांना आमच्या खऱ्या प्लॅनचा अंदाज नव्हता. विद्यार्थी शिबिराचे खोटे कारण सांगून आम्ही दाभोळला रवाना झालो. मला ठाऊक होते की आम्ही एका अश्या गोष्टीच्या शोधात आहोत ज्याबद्दल आम्ही सर्वजण अनोळखी होतो. अनोळखी गोष्टींमधली गुढताच खरंतर रहस्याला जन्म देते. मात्र त्या गोष्टीच्या खोलात उतरून समोर आलेल्या रहस्यांवरचा पडदा हटवणे किंवा दुर्लक्ष करून आपली दैनंदिनी जगणे हे आपल्या हातात असतं. अर्थातच रहस्याचा शोध हा आपल्या दैनंदिनीचा भाग नव्हे. मात्र त्यांच्या शोधात मिळणारे अनुभव नक्कीच आपल्या दैनंदिनीमध्ये उपयोगी ठरू शकतात. अशाच एका रहस्याच्या शोधात असलेला मी आणखी सहा जणांना घेऊन ती वाटचाल चालू लागलो. आम्हा सातही जणांच्या मनामध्ये भीती अन् त्या रहस्याबद्दलची उत्सुकता एक समान होती. मात्र माझ्या मनामध्ये आणखी एका भावनेची भर पडली होती ती म्हणजे माझ्या मित्रांची जबाबदारी. कारण घरच्यांशी खोटं बोलून आणि त्यांना अंधारात ठेवून आम्ही हा प्रवास करत होतो. निश्चितच आमचं ते खोटं अखेरीस उघडकीस येणारच होतं कारण ते म्हणतात ना... 'खोटं कधी लपून राहत नाही..!' असंच काहीसं आमच्या बाबतीत होणार होतं.
          रात्री ७-७:३० च्या दरम्यान एसटी दाभोळच्या स्टँड वर येउन थांबली. दाभोळ हे विसाव्या शतकातले फार मोठे बंदर होतो. अरबी समुद्राचे पाणी डोंगरदऱ्यांच्या अधून-मधून कसंतरी वाट काढत दाभोळच्या किनाऱ्याला लागतं. किनाऱ्यावर तुम्ही उभे राहून जर समुद्राकडे पाहिले तर त्याचा रुंदावत जाणारा तो आकार आपण एका खाडीच्या किनार्‍यावर उभे आहोत हे जाणवून देते. माझं गाव जरी दाभोळ असलं तरी त्या गावाबद्दल त्यावेळेस मला फारसे काहीच माहीत नव्हते. अगदी दोन-तीन वर्षांचा असताना मी त्या गावामध्ये होतो. मात्र माझे संपूर्ण कुटुंब कालांतराने   स्थलांतरित झाले. ते गाव, तो समुद्र, ते वातावरण आणि तो वाडादेखील माझ्यासाठी नवीनच होता.  आमचा दाभोळचा वाडा त्या स्टॅन्ड पासून कमीत कमी चार पाच किलोमीटर आत गावाच्या दुसऱ्या टोकास होता. एका हॉटेलमध्ये थांबून आम्ही सर्वांनी पेटपूजा केली आणि नंतर मी रिक्षा बघण्यासाठी रिक्षा स्टँड जवळ गेलो. "काका काटकरांच्या वाड्यावर जायचंय किती घेणार..?" मी एका रिक्षावाल्या काकांना विचारलं. त्यांनी भुवया वर केल्या आणि आश्चर्यचकित होऊन पुन्हा मला विचारलं "काटकरांचो वाडो..!" मी त्यांच्या त्या अनपेक्षीत प्रश्नाला मुंडी हालवून होकार दिला. "काय र बाबा थयसर काय काम तुझो? त्यो वाडो पछाडलेलो आसा...थयसर कुनिबि जात न्हाय..." काका मला म्हणाले. यावर आता काय बोलावे मलाच काही सुचेना. तेव्हा आठवण आली गोपीकाकांची..." अहो नाही हो काका त्या वाड्यात कसलं काम माझं...ते गोपीकाका राहतात ना शेजारीच त्या वाड्याच्या त्यांना भेटायला जायचं होतं." ते म्हणतात ना 'एक खोटं लपवण्यासाठी आणखी दहा खोटं बोलावे लागतात' त्यावेळी मी तेच करत होतो. "आरं मग तसा सांगायचो ना घाबरवलायस ना मका...चला बसा घेऊन जातंय मी तुमका थयसर" काका म्हणले. आम्ही सर्वजण त्या रिक्षात बसलो . नकळत का होईना तो वाडा पछाडलेला आहे याचा पुरावा मला त्या काकांनी दिला. वाड्याबद्दलचं त्यांचं मत अगदी ठाम होत. "काका तो वाडा पछाडलेला आहे हे तुम्हाला कसं कळलं? आणि गावातलं कोणीच जात नाही का त्या वाड्याकडे?" मी काकांना विचारलं त्यावर काकांनी त्या वाड्याबद्दल, त्या वाड्याबद्दल गावातल्या लोकांना काय वाटतं या सर्वांबद्दल एक भले मोठे रामायण सांगितले. मात्र त्यांच्या त्या बोलण्यावरून माझ्या काही गोष्टी ध्यानात आल्या की गावकऱ्यांचं त्या वाड्याबद्दल एकसारखंच मत होतं की तो वाडा पछाडलेला आहे मात्र कोणालाच त्या वाड्याच्या भूतकाळाबद्दल काहीच ठाऊक नव्हते. त्या वाड्यात घडलेल्या घटनांनबाबत देखिल त्यांना फारसे ठाऊक नव्हते . इतकंच नव्हे तर तो वाडा दर महिन्याला गोपी काका एका दिवसासाठी उघडतात हे देखील माहीत नव्हते. गावकऱ्यांच्या मनातली ती वाड्याबद्दलची भीती माझ्या मनातली भीती वाढवण्यास पूरक ठरली.
          रिक्षात बसून त्या वाड्याचा विचार करता करता माझं लक्ष बाहेरील झाडांकडे गेलं. उंचच उंच माड... घनदाट वृक्ष...गावातली ती कौलारू घरे...घरांवरली ती मातीची लेप फारच अप्रतिम दृश्य होते. रात्र असल्याने मला फारसे त्या दृश्यामध्ये रमता आले नाही. मात्र एका गोष्टीने माझे मन तूरतास हेरले. रस्त्याच्या शेजारच्या त्या झाडाझुडपांत लाखलखणारे ते काजवे फारच सुंदर दिसत होते. मी त्या काजव्यांकडे पाहतच राहिलो इतक्यात काकांनी रिक्षा थांबवली. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार आणि ते मन हिरवून घेणारे काजवे एवढेच दिसत होते. तोच काका म्हणाले, "चला... ह्यो बघा इला तुमच्या गोपीकाकांचो खोपटो" आम्ही सर्वचजण एकसुरात एकसाथ ओरडलो "इथे...?" ते काकासुद्धा दचकले. रिक्षाच्या खाली उतरून त्यांनी डावीकडे बोट दाखवले. गर्द झाडीमध्ये थोड्या अंतरावर प्रकाशाची एक ज्योत दिसत होती. कदाचित ती गोपिकाकांची झोपडी असावी असा आम्ही अंदाज बांधला. "काकानू ही तर गोपी काकांची झोपडी असय...मग त्यो वडो खय असा?" यश ने त्यांना विचारलं. काकांनी रिक्षाच्या समोरच्या वाटेवर हातातल्या बॅटरीने उजेड मारला. बघतो तर काय...'वाडा...!'  "पोरानु आताच सांगतोय तुमका त्या वाड्याकडे कुनिबि जाऊ नका...त्या वाड्यात वाईट शक्ती असय...तुम्ही हयसर नविन असा तुमच्यासाठी ती धोकादायक हा." काकांनी आम्हाला आणखी एक इशारा दिला. आम्ही रिक्षातून खाली उतरलो. काकांचे पैसे देऊन त्यांना निरोप दिला.
          रात्रीच्या त्या काळोखात गर्द अश्या झाडाझुडपांनी घेरलेल्या एका कच्च्या वाटेवर आम्ही सात जण उभे होतो. आता पुढे काय करावे... हा एक मोठा प्रश्न होता.सर्वत्र काळाकुट्ट अंधार...! अश्या स्थितीत त्या पछाडलेल्या वाड्यात जाणे धोकादायक वाटत होते. पण मग जाणार तरी कुठे...? काहीजण बोलू लागले गोपी काकांकडे जाऊ. मात्र ते सुदधा शक्य नव्हते करण जर गोपी काकांना आमच्या प्लॅन ची चाहूल लागली असती तर त्यांनी सरळ आम्हा सर्वानाच अपापल्या घरी पाठवले असते. 'इकडे आड तिकडे विहीर...!' नक्की करावे तरी काय आम्ही...? इतक्यात यश म्हणाला,"वाड्यातच जाऊयात रे... आपण इथे कशाला आलोय? वाड्यात काय रहस्य आहे हे शोधायला ना... मग आता का घाबरतोय आपण ?"  "अरे हो यश बरोबर आहे पण अरे आता खूप रात्र झाली आहे रे आणि यावेळी आत जाणं मला बरोबर नाही वाटत. बघ सलोनीलासुद्धा भीती वाटते आणि साक्षी आणि प्राचीला सुद्धा त्यापण बघ नको बोलतायत." प्रथम बोलला त्यावर सलोनी ने त्याला थोडे आवाज चडवूनच उत्तर दिले,"ए... मी नाय घाबरत कळलं का...तू तुझ बघ..." मी त्यांच्यातला तो वाद शांतपणे ऐकत होतो. त्यांच्या मानामधल्या भीतीची मला जाणीव होत होती मात्र आणखी कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे मी वाड्याच्या दिशेने चालू लागलो. वाड्याचा मेन गेट खोलून आत आलो. मोबाईल ची टॉर्च  चालू करून बघितली तर समोर आमचा खानदानी वाडा होता. जसजसा मी वाड्याजवळ जात होतो मला पडणारे वाड्याबद्दलचे प्रश्न डोक्यात पुन्हा येऊ लागले. माझी पाऊले हळूहळू वाड्याच्या दिशेने जात होती अन् चालता चालत अचानक थांबली. वाड्याच्या दरवाजावर भलेमोठे कुलूप होते. आता काय करावे तरी काय आम्ही...? म्हणून शेजारच्या खिडक्या खुल्या अहेत का ते तपासून पाहिले. पण त्या सुद्धा नाहीच. आता वाड्यात जाण्यासाठी कुलूपाची चावी तर लागणारच आणि ती चावी फक्त एकाच माणसाकडे होती... 'गोपीकाका' आम्ही ठरवलं चावी चोरायची...! बाकीच्यांना तिथेच थांबवून मी, यश आणि प्राची गोपी काकांच्या झोपडीपाशी गेलो.
यश ने हळूच आत डोकावून बाघीतले आत कोणीच नव्हते. " हीच वेळ आहे...प्राची तू इथेच थांब बाहेर...कोणी येत नाही ना यावर लक्ष ठेव...आम्ही आत जावून चावी शोधतो" असे बोलून मी यशला घेऊन झोपडीत शिरलो. झोपडी फारच छोटी होती. गोपी काकांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या झोपडीत कसं काढलं असावं हा प्रश्न मला पडला. झोपडीच्या एका कोपऱ्यात पुस्तकांचा भलामोठा ढिगारा पडला होता. कदाचित गोपी काकांना वाचनाची आवड असावी असा अंदाज मी लावला. त्या ढिगाऱ्याशेजारीच काही फोटोफ्रेम्स पडल्या होत्या. काही फोटो तर नीट दिसत सुद्धा नव्हते तर काही तुटल्या होत्या. समोरच्या एका रकान्यात एक छोटा पत्र्याचा डबा ठेवला होता. यशने तो डबा उघडून बघितला तर त्यात वाड्याच्या चाव्या होत्या. पटकन त्या चाव्या घेऊन आम्ही तिकडून पळ काढला. वाड्याजवळ येऊन वाडयाचं कुलूप उघडलं आणि हळूच दरवाजा आत ढकलला. 'करररररररररर...' त्या दरवाजाचा आवाज जणू एखाद्या horror film मधल्या दरवाजसारखाच वाटला. आतमध्ये संपूर्ण अंधार...! यश बॅटरी घेऊन आत घुसला त्याच्या पाठोपाठ प्रथम, राहुल, साक्षी, प्राची, सलोनी आणि मी आम्ही सर्वच आत घुसलो.
          मी माझ्या रहस्याच्या शोधातली पहिली पायरी चढलो होतो. आई, पप्पा , आजोबा आणि त्या रिक्षावाल्या काकांनी सावध करून सुद्धा मी त्या रात्री एका पछाडलेल्या वाड्यात माझ्या मित्रांसामवेत होतो. होय आम्ही एका पछाडलेल्या वाड्यात होतो...! त्या रात्री मी मान्य करू लागलो होतो अस्तित्व अंधश्रद्धेच...अस्तित्व भूत, प्रेत, आत्मा यासर्वांचंच...आणि हे सर्व मान्य करण्यामागे फक्त एकच कारण होतं...'भीती' माझ्या मनातली भीती...माझ्या मित्रांच्या मनातली भीती...गावकारांच्या मनातली भीती... याच भीतीने माझ्या रहस्याबद्दल च्या विचारांवर ताबा मिळवला होता. कदाचित त्याच वेळी मी माझ्या रहस्याला उलगडण्या ऐवजी त्यात फसलो गेलो. माझे डोळे बंद होते, डोक्यात अनेक विचार चालू होते. इतक्यात 'खट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्.....' मोठ्याने आवाज आला. मी अलगद डोळे उघडले. समोर सर्वत्र प्रकाश...! राहुल ने वाड्यातल्या लाईट चा खटका दाबला होता. आम्ही एका मोठ्या हॉल मध्ये उभे होतो. वाडा आतून बऱ्यापैकी स्वछ होता. "एवढा मोठा वाडा...!"साक्षीने तिचे आश्चर्य व्यक्त केले. "अरे...हा वाडा तर ना आमचा पाहिजे होता...या वाड्याला सोडून गेलोच नसतो रे मी तर...उलट त्या भूतलाच पळवून लावले असते...आणि ना..." प्रथम बोलतच होता इतक्यात शेजारच्या खोलीतून सामान पडण्याचा आवाज आला. आम्ही सर्वचजण घाबरलो. हळूच त्या खोलीशेजारी गेलो तर अचानक यश दरवाजा खोलून बाहेर आला. " अरे...ए काय नाय मीच होतो...आतमध्ये जाम घाण आहे रे...गोपी काका ही खोली साफ करत नाहीत वाटतं... तुझ्या पप्पांना नाव सांग त्यांच... सगळं नीट साफ करायला सांग त्यांना..." यश हसत हसत बोलत होता. बाकीच्यांना यशचे हे कारस्थान आवडले नव्हते. त्यांनी सरळ त्याला शिव्या घालायला सुरुवात केली. मी मात्र संपूर्ण पणे थक्क होऊन बसलो होतो त्या वाड्याचा थाट, रुबाब अन् बांधकाम पाहून... "प्रथम बोलला ते बरोबरच आहे...एवढा मोठा वाडा आम्ही सोडून कसा गेलो..?इतके कसे वेडे असू शकतात पप्पा आणि आजोबा..? ते काहीही असो मी आता या वाड्याला बंद करू देणार नाही. या वाडयातल्या भूताचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे..." मी माझ्या स्वतःशीच बोललो.
          रात्र फार झाली होती. सर्वजण थकलो सुद्धा होतो. वाड्याच्या कुलूपाची चावी पुन्हा गोपी काकांच्या झोपडीत ठेवायची होती. कारण गोपी काकांना हे कळू देखील द्यायचे नव्हते की आम्ही या वाड्यात आहोत. "यश, प्राची चला पटकन ही चावी गोपी काकांच्या झोपडीत ठेऊन येऊ. आणि प्रथम तू इथे या खिडकी शेजारीच थांब. आम्ही बाहेर जाऊन दरवाजाला कुलूप घालतो आणि ही चावी ठेऊन या खिडकीतून आत येतो. फक्त आम्ही यायच्या आधी ही खिडकी बंद करू नको. कळलं का तूला..?" मी प्लॅन सांगितला आणि यश, प्राची सोबत वाड्याच्या बाहेर गेलो. बाहेरून कुलूप घातले आणि पुन्हा गोपी काकांच्या झोपडीपाशी गेलो. यशने पुन्हा झोपडीत हळूच डोकावून बघितले. यावेळीसुद्धा झोपडीत कोणीच नव्हते. मी आणि यश आत गेलो प्राची मात्र बाहेरच थांबली होती. चावी पुन्हा त्या डब्यामध्ये ठेवली मात्र परतताना माझ लक्ष पुन्हा त्या फोटोफ्रेम्स कडे गेलं. मी पुढे जाऊन त्यातले काही फोटो निरखून पाहिले. एक माणूस शरीराने काडी... हातापायांच्या काड्या झालेल्या...डोक्यावरती टक्कल पडली होती... अन् तोंडावर वाढलेली दाढी संपूर्ण पिकलेली असा सर्वच फोटो मध्ये दिसत होता. त्यावेळी मी त्यांना गोपिकाकाच समजलो. कारण त्या दिवशी मी गोपी काकाना पहिल्यांदाच बघत होतो तेही त्या फोटोमध्ये. अगदी दोन- तीन वर्षांचा असताना कदाचित मी गोपी काकांना पाहिले असावे मात्र त्यावेळी मी फारच लहान असल्याने गोपिकाकांचा चेहरा मला आठवत नव्हता. मात्र त्या फोटो मध्ये पाहिल्यावर मला त्यांची ती देहबोली फारच विचित्र अशी वाटली... त्यातला एक फोटो मी पलटून बघितला तर त्या मागे काही अक्षरे पुसटशी दिसत होती. फोटो फार जुना असल्याने ती पुसली गेली होती मात्र त्या अक्षराची सुरुवात 'र' या शब्दांपासून होत होती..." ए... पळा... पळा... पळा... चला पटकन कोणीतरी येतंय " प्राची बाहेरून ओरडली. मी ते फोटो तसेच टाकले आणि यश सोबत बाहेर आलो. झोपडीच्या मागच्या बाजूने झाडाझुडपातून कोणतीतरी एक माणूस अंगावर घोंगडी घेऊन पायाखाली बॅटरी मारत येत होता. मात्र काळोख असल्याने त्या माणसाचे तोंड दिसत नव्हते. कदाचित ते गोपिकाकाच असावेत असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही तिथून पळ काढला आणि वाड्याच्या खिडकीतून वाड्यात घुसलो. खिडकी बंद केली. आणि आतून त्या खिडकीला कडी घातली. सर्वांच्याच डोळ्यांवरची झापडं बंद व्हायला आली होती. त्यामुळे आम्ही बाहेरच त्या हॉल मध्ये आडवे झालो. डोळे बंद केले तसे सर्वच शांत होऊ लागले...रातकिड्यांचा आवाज आमच्या कानात घर करू लागला आणि आम्ही शांतपणे झोपी गेलो...
          त्या भयाण वाड्यात आम्ही त्या रात्री स्वतःलाच डांबून घेतले होते. पुढे घडणाऱ्या गोष्टींबाबत आम्ही अनोळखी होतो. अश्या गोष्टी ज्या आम्ही आमच्या रहस्याच्या शोधातल्या वाटेवर अनुभवणार होतो. आणि त्याच गोष्टींबद्दलचा अनोळखीपणा आमच्या रहस्याच्या वाटचालीला रहस्यमयी करणार होता.

क्रमशः (To Be Continued )

Rahasya ( रहस्य )Where stories live. Discover now