Rahasya Last Chapter

99 1 1
                                    

रहस्य (Rahasya)...शेवटचा भाग (Last Chapter)

          एका ठराविक गोष्टीला त्याचे मूळ असते. ज्यामुळे त्याचे अस्तित्व असते. त्या मुळापासून पुढे घडणाऱ्या काही घटना असतात. त्या घटनांमुळे एक इतिहास तयार होतो. जो इतिहास काही दशकांनी किंवा काही शतकांनी कोणाच्यातरी नजरेस पडतो. यावरून त्याचे अस्तित्व नव्या पिढीस कळते आणि अशा गोष्टींचे अस्तित्व जेव्हा नव्या पिढीत कळते तेव्हा त्या गोष्टी एका रहस्या सारख्या त्यांच्या समोर येतात. नकळतच माणसाने अनेक रहस्यांना जन्म दिला तसेच अनेक रहस्यांचा शेवट देखील केला. मात्र या रहस्यांच्या अस्तित्वाच्या विळख्यात जेव्हा एखादा माणूस अडकतो तेव्हा त्याला त्या रहस्याच्या मुळापासून ते त्या रहस्याला संपवण्याच्या प्रयत्नांर्यंत संपूर्णपणे त्या शोधामध्ये झोकून द्यावे लागते. निश्चितच त्यावेळी आम्ही सातजण अशाच एका रहस्याच्या विळख्यात अडकलो होतो. मात्र आता यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला त्याच्या अस्तित्वाचा अंत करणे गरजेचे होते. ज्यासाठी त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला झोकून देण्यास तयार झालो होतो.
          पाऊले वाड्याच्या दिशेने चालली होती. जमिनीवरची सावली हळूहळू लांबवत चालली होती. आम्ही सहा जण वाड्याच्या गेटपाशी आलो. गोपी काका सोबत नव्हते. गोपी काका आम्हाला म्हटले होते,"पोरांनो आता मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही मात्र तुम्हाला जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तुम्ही न बोलवता मी तेथे तुमच्या सोबत असेन." मात्र हातात गोपी काकांनी दिलेला नवा ओइजा बोर्ड होता. आम्हाला ठाऊक होते की आम्ही त्या वाड्याच्या भुताच्या नजरेस चोरून त्या बोर्डची प्रक्रिया काही करू शकत नव्हतो. शिवाय या प्रयत्नांमध्ये आम्ही पकडलो गेलो असतो तर सलोनीच्या जिवास धोका होता. थोडक्यात आम्हाला आग तर लावायची होती मात्र काडी न जाळता...! त्यामुळे आम्ही एक शक्कल लढवली. आम्ही तो बोर्ड त्या भुयाराच्या बाहेरच्या तोंडाजवळ एका झाडीत टाकून ठेवला. थोडक्यात वाड्याच्या मागील बाजूस...! आणि मग वाड्याच्या दरवाजा कडची वाट पकडली. दरवाजा जवळ जाऊन तो हळूच आत ढकलला...कर् र् र् र्.... आत मध्ये भयाण शांतता... ना सलोनीचा काही आवाज येत होता... ना वाड्यातल्या त्या काकांच्या भुताचा... आम्ही दब्या पावलांनी वाड्यात शिरलो. गोपी काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्या भुताचा अंत तिथेच करावयाचा होता जेथे त्याचा जन्म झाला. थोडक्यात वाड्यातली ती रिकामी खोली. आम्ही जिना चढून वरच्या मजल्यावर गेलो. त्या खोलीमध्ये जाण्याअगोदर सलोनी कोठे आहे हे शोधणे गरजेचे होते...! त्यामुळे त्या खोलीमध्ये जाण्याऐवजी आम्ही इतर खोल्यांमध्ये सलोनीला शोधू लागलो. आम्हाला माहीत होते की त्या रघु काकांच्या भुताची आम्हा सर्वांवर नजर होतीच. आम्ही संपूर्ण वाडा शोधला मात्र सलोनी कुठेच नव्हती आता फक्त एकच खोली बघायची राहून गेली होती. ती रिकामी खोली...! त्यामुळे आम्ही त्या खोलीच्या शेजारी गेलो. मात्र खोलीला बाहेरून कडी नव्हतीच..! खोली तर आतून बंद होती..! त्यामुळे आम्ही खालच्या मजल्यावरील खोलीत गेलो मात्र यावेळी ती खोली देखील आतून बंद होती. आम्हाला खात्री पटली की त्या खोलीमध्येच सलोनी होती. त्यामुळे आम्ही पुन्हा वाड्याच्या बाहेर जाऊन त्या वाड्याच्या मागील बाजूस गेलो. आणि तेथील भुयारामधून त्या खोलीत आलो. जेव्हा आम्ही त्या खोलीतून वरच्या खोलीत शिडी चढून वर आलो तेव्हा तेथे सलोनी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. आम्ही वर जाऊन तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला शुद्ध येतच नव्हती. इतक्यात साक्षी मोठ्याने किंचाळली आणि त्या खोलीच्या एका कोपर्‍यात जाऊन बसली. तिने त्या खोलीला पडलेल्या भगदाडातून खालच्या खोलीत काही तरी पाहिले होते. मी हळूच पुढे जाऊन खाली बघितले तर तेथे रघु काका उभे होते. मात्र त्यांचे ते रूप आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांचे शरीर संपूर्णपणे सडले होते... डोळ्यांची बुबुळे लाल झाली होती... शरीरावर अनेक निशाण होते... दात बाहेर आले होते... असे काहीसे ते त्यावेळी विचित्रच दिसत होते. मात्र माझ्या मनातल्या भीतीला मी जागे होऊ दिले नाही. "साक्षी... घाबरू नको...!" मी साक्षीला म्हटले. "म्या तुम्हास्नी बोललो व्हतो...की माझ्या मधी मधी करू न्हका... आता म्या तुम्हास्नी सोडणार न्हाय... तुमास्नी हे लय महागात पडल...!" वाड्यातलं ते भूत खूपच आक्रमक झालं आणि शिडी चढून वर येऊ लागलं. आम्ही पटकन सलोनीला त्या बेशुद्धावस्थेत कशीबशी उचलली आणि कडी खोलून खोलीच्या बाहेर आलो. धावत धावत आम्ही जिना उतरू लागलो मात्र अचानक वाड्यातल्या सर्व वस्तू हलू लागल्या.... अचानक हवेत उडू लागल्या... एकमेकांवर आपटू लागल्या... तोच आमच्या पायाखालची जमीन अचानक सटकली आम्ही सरळ जाऊन वाड्याच्या भिंतीवर आपटलो. सलोनीला मात्र शुद्ध नव्हतीच. ती आमच्या हातातून निसटली आणि  हवेमध्ये तरंगू लागली. तोच पुन्हा जमीन विरुद्ध बाजूस सरकली आम्ही सर्वजण समोरच्या भिंतीवर जाउन आपटलो. खूपच जोरात आपटलो. सर्वांना थोडीफार दुखापत झाली. यशच्या पायामध्ये भिंतीचा एक खिळा घुसला. प्राचीने तो हळूच ओढून काढला तर त्यातून भरपूर रक्त येऊ लागले. फारच वेदना होत होत्या त्याला...! शेजारच्या एका खिडकीचा पडदा मी ओढून काढला. तर अचानक बाहेर वीज चमकताना दिसली... ढगांचा गडगडाट ऐकू आला... थोड्याच वेळात पावसाची जोरदार सर आली... भर उन्हाळ्यात पाऊस...? त्यावेळी सर्वच गोष्टी विचित्र घडणार होत्या. त्यांची सुरुवात या पावसाने केली होती. मी तो पडदा फाडून यशच्या पायाला बांधला. "म्या तुम्हास्नी त्या खोलीच्या बाहेर पडूच द्याया नको व्हतो. म्या चुकलो... म्हटलं पोरांवर थोडी दया दाखवू... पण न्हाय तुम्हास्नी माझ्या कामात तडमड करायचीच हाय व्हय.." ते भूत फारच क्रूर आवाजात बोलत होतं. मात्र आम्हाला आमच्या डोळ्यांनी ते कुठेच दिसत नव्हते फक्त त्याचा आवाज आमच्या कानी पडत होता. सलोनी मात्र अजूनही हवेतच आपोआप तरंगत होती तिच्या शरीरा मध्ये शुद्ध नव्हती. इतक्यात अचानक पुन्हा जमीन हळूहळू सरकू लागली आम्ही पुन्हा या भिंतीवरून त्या भिंतीवर आपटलो. मात्र यावेळी जमीन सरकायची थांबली नाही ती आणखी सरकूच लागली. आम्ही यावेळी सरळ वाड्याच्या कौलांवर जाऊन आपटलो. हळूहळू वाडा उलटा होत होता. आम्ही मोठ-मोठ्याने बोंबलत होतो... किंचाळत होतो....!  हळूहळू जमीन सरकत होती आणि अचानक थांबली. आम्ही सर्वजण एका जागी स्थिर बसून थोडा नीट श्वास घेतला. आमच्या समोरील दृश्य फारच विचित्र होते. आम्ही वाड्याच्या हॉलच्या कौलांवर उभे होतो...! वाडा पूर्णपणे उलटा झाला होता...! समोर वरच्या मजल्याच्या खोल्यांचे दरवाजे दिसत होते. आम्हाला सर्वच गोष्टी उलट्या दिसत होत्या. सलोनी देखील उलटीच दिसत होती. ती कौलांच्या फारच जवळ तरंगत होती त्यामुळे आम्ही चालत चालत तिच्या जवळ जाऊ लागलो इतक्यात... "भ्वा..."आम्ही फार घाबरलो आणि उलट्या दिशेने पळालो. ते भूत आमच्या सोबत खेळत होते. ते अचानक आमच्या डोळ्यांसमोर प्रकट झाले. त्यावेळी मात्र ते माणसाच्या रूपात होतं .आमच्याकडे बघून हसू लागलं आणि म्हणालं ,"भीती...भीती...भीती....!  काय रं पोरांनो...काय म्हणता... हिच्यासोबत(सलोनीसोबत) म्या काय करनार असंन...? सांगा बरं... हीच्या शरीरात हजार भूतांचा आत्मा टाकणार हाय...! मग ते आनखी हजार भुतांना तुमच्या या दुनियेत घेऊन येतील... मग ते आणखी...! अशा सर्वच आत्मा तुमच्या या जगात येतील. मंग माणसं आनी भूत यांची एक नवी दुनिया आम्ही तयार करू...!"  बोलता बोलता ते राक्षसी रूप धारण करू लागलं ,"आणि तुम्हा सर्व माणसांचा खात्मा...! पृथ्वीला एक नवं नरक बनवून टाकू आम्ही...! त्यासाठी तुमच्या या गोड मैत्रिणीला तिचा आत्मा आम्हाला द्यावा लागल " एवढे बोलून ते भूत गायब झालं आणि अचानक आमच्या पायाखालची जमीन पुन्हा सटकन सरकली... वाडा पुन्हा होता तसा सरळ झाला...! आणि आम्ही दाणकन वाड्याच्या जमिनीवर आपटलो. दणका खूप जोरात होता. त्यामुळे आम्ही जागीच बेशुद्ध झालो. ते भूत किती ताकदवान होतं हे आम्हाला तेव्हा कळले.
          हळू-हळू सूर्य मावळून लागला आणि आता सलोनीच्या स्वप्नाची हकीकत सुरू झाली होती. "अन्या... ए अन्या‌... अनिरुद्ध अरे उठ लवकर..." मला कोणीतरी हाक मारत होते. माझ्या कानांना ऐकू येत होते. मात्र अजूनही मी शुद्धीत नव्हतो. इतक्यात कोणीतरी माझ्या खानदीशी कानफाटात मारली... आणि मी ताडकन उठलो. समोर बघतो तर काय प्राची दुसरी कानफाडीत देण्यासाठी तयारच होती...! ती म्हणाली," त्या भूताने आपल्याला पुन्हा एका खोलीत डांबून ठेवलंय." मी इकडे तिकडे बघू लागलो. यावेळी आम्ही वेगळ्याच खोलीमध्ये अडकलो होतो. यशच्या पायातून खूप रक्त येत होतं. साक्षी आणि प्रथम त्याला पट्टी करत होते. तो सुद्धा फारच कळवळत होता. तिकडे राहुल दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होता. मी इकडे तिकडे पाहीले त्या खोलीला एक खिडकी होती. मात्र आम्ही वरच्या मजल्याच्या खोली मध्ये अडकलो होतो. त्यामुळे ती खिडकी फारच उंचावर होती. मला एक युक्ती सुचली. मी पटकन उठलो आणि खिडकी उघडून बघितली. उंचीचा थोडासा अंदाज घेतला. आता त्या वाड्यातून बाहेर पडण्यासाठी ती खिडकी हाच एक पर्याय होता. कारण त्यावेळी जर आम्ही पुन्हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता तर ते भूत आमच्यासोबत काहीही करू शकले असते. शिवाय आम्ही सलोनीला वाचण्याची संधी देखील गमावली असती. मात्र आम्ही सर्वजण त्या खिडकीने देखील खाली उतरू शकत नव्हतो कारण यशच्या पायाला दुखापत झाली होती. आमच्या समोर फार मोठे प्रश्नचिन्ह होते. त्यामुळे कोणीतरी एकाने त्या खिडकीतून खाली उतरून पुन्हा वाड्याच्या दरवाजाने वाड्यात येऊन तो दरवाजा उघडणे हाच एक पर्याय उरला होता. मी कोणाचेही ऐकून न घेता हा प्लॅन सांगून त्या खिडकीतून खाली उतरू लागलो. मी खाली उतरलो. सूर्य पूर्णपणे मावळला होता. सर्वत्र अंधार पसरला होता. मी धावत धावत वाड्याच्या दरवाजापाशी आलो हळूच वाड्याचा दार आत ढकललं...कर् र् र्... आत मध्ये संपूर्ण काळोख पसरला होता. मी दरवाजाच्या भिंतीला असलेला लाईटचा खटका दाबला. खट् ट् ट्... मात्र माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा एक विचित्र चित्र होते.  वाडा पुन्हा उलटा झाला होता ते भूत पुन्हा माझ्याशी खेळत होतं. मात्र मी न घाबरता त्या वाड्याच्या कौलांवरून चालत चालत त्या खोलीच्या छतापर्यंत पोहोचलो. वरच्या मजल्याच्या खोल्या उंचीने छोट्या असल्या कारणाने आपण जरी छतावर उलटे उभे राहुन खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला असता तर तो सहज शक्य झाल असता. तर मी खोलीचा दरवाजा उघडणार तोच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी पुन्हा खाली आपटलो. मात्र यावेळी मी सरळ वाड्याच्या दरवाजापाशी येऊन आदळलो. मला कळलेच नाही नक्की काय घडले...! उठलो तर वाड्यात पुन्हा काळोख होता. मी पुन्हा लाइट्स चालू केल्या मात्र तेव्हादेखील माझ्यासमोर वाडा उलटाच होता मी पुन्हा चालत चालत त्या खोलीपर्यंत गेलो मात्र दरवाजा खोलणार इतक्यात पुन्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि पुन्हा वाड्याच्या दरवाजापाशी येऊन आदळलो. मी उठून पुन्हा सर्व काही तसेच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन-चार वेळा माझ्यासोबत अगदी तसेच घडले. माझ्यासोबत ते भूत खेळू लागलं होतं. माझ्या बुद्धीशी खेळू लागलं होतं... माझ्या दृष्टीशी खेळू लागलं होतं... मी कितीही माझी भीती लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या जाळ्यातून बाहेर पडतच नव्हतो. यावेळी मात्र पडल्यावर मी उठलोच नाही. शरीर थोडे मोकळे केले आणि स्तब्ध त्या दरवाजाच्या पाशीच बसून राहिलो. डोळे बंद केले... डोक्यात गोपी काकांनी सांगितलेल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न केला. 'जेथे वाईट शक्तींचे अस्तित्व असते तेथे चांगल्या गोष्टींचंही अस्तित्व असतेच... जर त्या वाईट शक्ती आपल्या बुद्धीशी खेळू लागल्या तर गरजेचे नाही की आपण हार मानून त्यांना शरण जावे किंवा हे देखील गरजेचे नाही की त्या खेळाला कंटाळून घाईगडबडीत काहीतरी चुकीचे करून बसावे... सर्वप्रथम संपूर्ण शरीरास शांत करावे. आपल्या बुद्धीमध्ये वाईट शक्तींनी जे वर्चस्व माजवले असते त्यास चांगल्या शक्तिंच्या आधिन करावे. थोडक्यात Be Positive प्रमाणे विचार करावा. समोर घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगल्या गोष्टींचा विचार करावा. संपूर्ण जगात चांगल्या शक्तींना वाईट शक्तीं पेक्षा उच्च स्थान असते. मात्र चांगल्या शक्तींना अनुसरणे हे देखील वाईट शक्तींना अनुसरण्यापेक्षा अवघड असते. मात्र अशक्य केव्हाच नसते...!' गोपी काकांचे ते शब्द आठवून हळूच डोळे उघडले. समोर वाड्यात सर्वत्र अंधार होता. जागेवरून उठलो पुन्हा लाईटच्या खटक्या पाशी गेलो. खटका दाबला. तर पुन्हा तो  वाडा उलटाच होता. मी एक पाऊल मागे आलो. वाड्याच्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलो. डोळे बंद करून वाड्यातल्या चांगल्या गोष्टी आठवू लागलो. बारा वर्षे अगोदर चा वाडा आठवू लागलो....! आणि पुन्हा डोळे उघडले. हळूहळू वाडा गोल फिरू लागला...! थोड्यावेळातच सर्व काही ठीक झाले...वाडा सरळ झाला...! आणि मी पुन्हा वाड्यात घुसलो.
          मी जिना चढून वरच्या मजल्यावर गेलो तोच माझ्या मागून कोणीतरी गेल्याचा भास मला झाला. त्यामुळे मी वळून बघितले मात्र मागे कोणीच नव्हते. म्हणून मी पुन्हा पुढे वळलो तर माझ्यासमोर दोन्ही बाजूस रघु काकांचं ते भूत होतं...! फक्त एकच नव्हतं बाजूच्या भिंतींना दोन्ही बाजूला ते सर्व रांगा करून माझ्याकडे बघत होते. एक नव्हे... दोन नव्हे... तर भरपूर होते...! त्यांचं ते रूप राक्षसी होतं...! अगदीच किळसवाणे...! डोळे मोठे करून माझ्याकडे ते सर्वच बघत होते. मला माहित होते ते भूत माझ्या बुद्धीशी खेळत होते. ते माझ्या मनात भास निर्माण करत होते. मी पुन्हा डोळे झाकले आणि हळूहळू पावले पुढे टाकत राहिलो. गोपीकाकांचे शब्द मनामध्ये आठवू लागलो. चांगले विचार डोक्यात आणू लागलो. आणि चालता चालताच हळूच डोळे उघडले. तेव्हा ते सर्व माझ्याकडे बघून हसत होते. मात्र हळूहळू ते सर्व रघु काकांच्या मानवी रूपात येऊ लागले. मात्र मी घाबरलो नाही. मी जाऊन त्या खोलीचा दरवाजा उघडला ज्यामध्ये माझे मित्र होते. तर अचानक ते सर्वच भूत गायब झाले...! माझे मित्र त्या खोलीच्या बाहेर पडले. आम्ही त्या रिकाम्या खोलीच्या शेजारी जाऊन त्या खोलीच्या दरवाजाला कान लावला. दरवाजा बंदच होता... आतून...!  रघु काकांचा पुटपुटण्याचा आवाज खोलीतून येत होता. आम्हाला खात्री पटली की ते त्या खोलीतच होते. शिवाय सलोनी देखील त्याच खोलीत होती. "सलोनी घाबरू नको... अजिबात घाबरू नकोस... आम्ही तुला तिकडून सोडवतो..." आम्ही सर्वजण मोठ्याने बोलत होतो. तोच आतून त्या रघु काकांचा आवाज आला,"पोरांनो, तुम्ही कितीही प्रयत्न केलासा तरी या खोलीत येऊ शकत न्हाय. त्यामुळं हिला आता तुम्ही ईसरा" आम्ही त्यांच्या बोलण्याला प्रत्युत्तर दिले,"काका तुम्ही ही फार मोठी चूक करत आहात... आमच्या मैत्रीणीला काहीही झालं तर याद राखा..."  त्या बोलण्याचा त्या भूतावर काहीच परिणाम झाला नाही. निश्चितच होणारही नव्हता. आम्ही पटकन जीना उतरुन खाली गेलो. खालच्या त्या खोलीचं दार देखील लावलेलं होतं. आम्ही ते तोडण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या ते तुटेना... आता आमचा खरा प्लॅन उपयोगी पडणार होता. आम्हाला असेच काहीसे घडणार याची खात्री होती त्यामुळे आम्ही तो बोर्ड भुयाराच्या बाहेरच्या तोंडापाशी लपवून ठेवला होता. ज्या भुयारा बद्दल रघु काकांना माहीतच नव्हते...! गोपी काकांनी आम्हाला सांगितले होते की त्या भुयाराबद्दल आमच्या घराण्यातही जास्त लोकांना माहीत नव्हते. वाड्यातल्या त्या भुयाराबाबत फक्त वाड्यातल्या ज्येष्ठांनाच माहित होते. थोडक्यात माझे आजोबा...! शिवाय माझ्या आई-बाबांना देखील त्या भुयारा बाबत माहीत नव्हते. आजोबांनी तो वाडा बंद करताना त्या भुयारा बाबत गोपी काकांना सांगितले होते जेणेकरून पुढे जाऊन जर गोपी काकांना त्या वाड्यातल्या भुताने वाड्यात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर गोपी काका त्यातून सहज बाहेर पडू शकले असते. मात्र नकळतच ते भुयार आता आमच्या उपयोगी पडत होते. आम्ही पटकन त्या भुयाराच्या बाहेरील तोंडाच्या इथे गेलो. तिथला तो बोर्ड उचलून भुयारात घुसलो. आणि वाड्यातल्या त्या खोलीच्या आत शिरलो. हळूच शिडीवर चढून वरच्या खोलीत वाकून बघितले. तर तेथे सलोनीला हातापायांना बांधून ठेवले होते. तो जुना ओइजा बोर्ड हवेत तरंगत होता सलोनी थोडी शुद्धीत आली होती काकांच्या त्या भुता जवळ स्वतःला वाचवण्याची भिक मागत होती. मात्र तो क्रूर तिच्याकडे बघून त्याच्य क्रूरतेने हसत होता. आम्ही त्या भुताला कळू न देता खालच्या खोलीत त्या ओइजा बोर्ड ची प्रक्रिया करावयास बसलो. बोर्ड जमिनीवर ठेवला त्याला घोळका करून आम्ही बसलो. आणि आमच्या चारही बाजूस काही मेणबत्त्या पेटवल्या. मेणबत्त्या पेटवण्यामागे खास असे कोणते शास्त्र नाही. मात्र असे म्हटले जाते की मेणबत्त्या या आत्म्याला आदरांजली वाहण्यासाठी पेटवतात. बोर्डवर प्लॅनचेट ठेवला होता आणि त्यावर आम्ही सर्वांनी आमचे एक बोट ठेवले होते. मनामध्ये गोपी काकांच्या आजोबांना आठवू लागलो. गोपी काका त्यावेळी आम्हाला त्यांच्या आजोबां बद्दलच सांगण्याचा प्रयत्न करीत होते. कारण त्यांच्या आजोबांनी केलेल्या मेहनतीचा रघु काका चुकीच्या पद्धतीने वापर करीत होते. "तात्या, तुम्ही इथे आहात का?" आम्ही सर्वजण एक सुरात मात्र हळू आवाजात बोललो. तात्या म्हणजे गोपी काकांचे आजोबा...! आम्ही पुन्हा तोच प्रश्न केला मात्र काहीच हालचाल दिसून आली नाही. आम्ही तोच प्रश्न पुन्हा तीन-चार वेळा केला मात्र तेव्हाही काहीच घडले नाही. बाकीच्यांनी प्लॅनचेट वरून हात काढला मात्र मी आणि राहुल ने अजूनही त्यावरुन हात काढला नव्हता. मी माझ्या मनात म्हटलं ,"तात्या, Please आम्हाला तुमची खरंच खूप गरज आहे " आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला ,"तात्या तुम्ही इथे आहात का" तर अचानक प्लॅनचेट बरोबरच्या खूणे कडे जाऊन थांबला. मी आणि राहुलने कोणताही जोर न लावता...! ते पाहून इतरही आश्चर्यचकित झाले. तात्यांची आत्मा तिथेच होती याची खात्री आम्हाला पटली. बाकीच्यांनी पुन्हा त्यांचे बोट बोर्ड वर ठेवले आणि पुन्हा आम्ही बोलू लागलो,"तात्या आम्हाला तुमची गरज आहे. आमच्या मैत्रिणीचा जीव धोक्यात आहे तुम्ही आम्हाला मदत कराल का...?" त्यावर अचानक तो प्लॅनचेट पुन्हा बरोबरच्या खुणेकडे गेला. तात्या आम्हाला मदत करण्यासाठी तयार होते. मग आम्ही सर्व काही घडलेल्या घटना त्यांना सांगत गेलो. आणि अचानक तो प्लॅनचेट पुन्हा विचित्रपणे इतरत्र फिरू लागला. राहुल ने त्याच्या स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच...! आम्ही तात्पुरता त्यावरून हात काढला आणि पुन्हा ठेवला. तसा तो शांत झाला. आणि त्या बोर्डवरील मुळाक्षरांवर फिरू लागला. "म-ला-ए-का-श-री-रा-ची-ग-र-ज-आ-हे" तात्यांनी त्यांना आमच्या जगात येण्यासाठी एका शरीराची गरज होती हे आम्हास सांगितले. रघु काकांचं ते शरीर देखील त्यांच्या स्वतःचंच शरीर होतं. कारण रघु काकांनी गोपी काकांना सांगून ठेवलं होतं की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना जाळण्याऐवजी त्यांना पुरले जावे. आणि गोपी काकांनी अगदी तसेच केले होते. बारा वर्ष आधी रघु काकांचं जेव्हा या जगात पुनरागमन झालं त्यावेळी देखील रघु काकांनी त्यांना एका शरीराची मागणी केली होती. त्यावर गोपी काकांनी रघु काकांच्या त्या पुरलेल्या शरीरास बाहेर काढून पुन्हा काकांच्या त्या आत्म्याच्या स्वाधीन केलं होतं. आणि अशा प्रकारे एक क्रूर राक्षस आपल्या जगात जन्मास आला होता. मात्र येथे तात्यांच्या शरीरास केव्हाच अग्नी मिळाली होती. त्यामुळे आमच्या सहा जणांपैकी कोणाचे तरी शरीर त्यांच्या स्वाधीन करणे गरजेचे होते. घडणाऱ्या सर्व घटनांना कारणीभूत मी स्वतः असल्याने मी म्हंटले," तात्या तुम्हाला माझे शरीर चालेल का?" त्यावर पुन्हा तो प्लॅनचेट बरोबरच्या खुणेकडे गेला. मी अवंढा गिळला... सर्वांकडे एक नजर फिरवली आणि म्हणालो," तात्या मी माझे स्वतःचे शरीर तुमच्या स्वाधीन करीत आहे" असे बोलतात अचानक तो प्लॅनचेट पुन्हा त्या बोर्डवर इतरत्र फिरू लागला आणि अचानक माझ्या आत कोणीतरी प्रवेश केल्यासारखे मला जाणवले. मला माझ्या मनालाच एक वेगळा आवाज ऐकू आला ,"घाबरू नको बाळा...मी तात्या...मी तुला काहीच करणार नाही. फक्त वाड्यातल्या या वाईट शक्तीला हरवून मी पुन्हा तुझे हे शरीर सोडेन... तू घाबरू नको... मात्र आता मी तुला बेशुद्ध करणार आहे...आणि तुझी जागा मी स्वतः घेणार आहे. चालेल का तुला...?" मी मनातूनच त्यांना होकार दिला. तर माझ्या डोळ्यांवर गुंगी येऊ लागली आणि मी बेशुद्ध पडलो. तोच अचानक तात्यांनी माझी जागा घेतली आणि डोळे उघडले. माझे मित्र माझ्याकडे बघून फारच आश्चर्यचकीत झाले होते. तात्या म्हणाले ,"पोरांनो घाबरू नका मी तात्या... मी तुमच्या मित्राला काहीही करणार नाही. फक्त मला माझा भुत्या कुठे आहे ते सांगा" सर्वांनी खोलीतल्या त्या भगदाडाकडे बोट केलं. तात्या शिडी चढून वर गेले. तर अचानक रघु काका म्हणू लागले ,"काय रे पोरा इथे कसा काय तू... तुमास्नी बोललो व्हतो की माझ्या मधी मधी काय बी करू नका म्हणून... आता मी तुमास्नी सोडणार न्हाय" असे बोलून पुन्हा रघुकाकांच्या डोळ्यांतून प्रखर असा प्रकाश येऊ लागला. रघु काका मला बेशुद्ध पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना हे माहीत नव्हते की तिथे मी नाही तर त्यांचे वडील तात्या होते. रघु काकांच्या ध्यानात कदाचित आले असावे की काहीतरी गडबड आहे. तेव्हा त्यांना तात्या म्हणाले ,"अरे माझ्या भुत्या मी सगळ्यांपासून हा बोर्ड लपवून ठेवला कारण त्याचा कोणी दुरुपयोग करू नये. मात्र तूच माझ्या या प्रयत्नांवर पाणी फेरलेस" तसे राघुकाकांनी ओळखले की त्यांच्यासमोर मी नव्हे तर त्यांचे वडील आहेत. "तात्या तुम्ही....! तात्या याच्यामध्ये पडू नकासा तुमी जावा इथून.  म्या माझं काम केल्याशिवाय राहणार न्हाय. तुम्ही लोकांना लय समजावत होता या फळ्याबद्दल पण कोणी तुमचा ऐकलं न्हाय म्हणून या... या सगळ्या लोकांची दुनिया म्या नष्ट करेल... तुम्ही यात पडू नका." असं रघु काका म्हणू लागले. त्यावर तात्या म्हणाले ,"काय म्हणतोस काय तू... दुनिया नष्ट करणार...! लेका एवढं सोपं नाहीये ते... आणि मी इथे असताना तर नाहीच नाही" "तसं असेल तर मग म्या तुम्हाला बी न्हाय सोडणार" असं बोलून रघु काकांनी पुन्हा त्यांचं ते राक्षसी रूप धारण केलं. आणि तात्यांवर झेप घेतली. बराच वेळ त्यांच्या दोघांत हातापायी चालू होती. रघु काका तात्यांवर भारी पडत होते. कारण रघु काकांकडे एक राक्षसी शरीर होते. मात्र तात्यांकडे माझे एक साधे मानवी शरीर होते. त्या लढाईत माझे शरीर खूप रक्तबंबाळ झाले. तात्यांवर रघु काका जोरदार वार करीत होते. अखेरीस तात्यांनी हार मानली. माझे शरीर जमिनीवर अर्धमेल्या अवस्थेत पडले. इतक्यात मला माझ्या वेदना जाणवू लागल्या. तात्या फारच दमले होते. ते माझे शरीर सोडण्याच्या तयारीत होते. त्यांच्या एकट्याने रघु काकांशी लढणे अवघड होऊन बसले होते. मी मनातून तात्यांना बोलत होतो ,"तात्या उठा... हार मानून चालणार नाही... माझ्या मैत्रिणीच्या जीवाचा प्रश्न आहे... तुमच्या बोर्ड चा प्रश्न आहे... उठा"  मात्र तात्यांकडून काहीच उत्तर येत नव्हते. तिकडे बाकीचे सर्व खालच्या खोलीतून ती सर्व दृश्ये पाहत होते. हळूहळू त्यांच्याही डोळ्यांत पाणी येऊ लागले. तोच अचानक बोर्डवरला तो प्लॅनचेट इकडे तिकडे त्या बोर्डवर फिरू लागला. हळूहळू त्याचा वेग वाढला... आणखी वाढला... आणि अचानक माझ्या शरीरात आणखी कोणीतरी प्रवेश केल्या सारखे मला जाणवले. कोणत्यातरी एका अज्ञात आत्म्याने...! मी मनातल्या मनात त्याला विचारण्याचा प्रयत्न केला," कोण तू..." मात्र कोणीच उत्तर दिले नाही. तिकडे रघु काका सलोनीवर ती प्रक्रिया करण्यास पूर्णपणे तयार होते. सलोनीला थोडीफार शुद्ध आली होती .ती म्हणत होती," अनिरुद्ध...Please... उठ... वाचव मला...." रडत होती... तोच अचानक मला माझ्या वेदना जाणवायच्या बंद झाल्या. मनातूनच एक अज्ञात आवाज ऐकू आला," तात्या उठा हार मानून चालणार नाही... उठा तात्या.. या भुताचा अंत आपल्यालाच करावा लागणार आहे"  तोच अचानक माझ्या वेदना आणखी कमी होऊ लागल्या आणि हळूहळू मी बेशुद्ध पडलो. नकळत एक अज्ञात आत्मा त्या वेळी माझ्या मदतीसाठी आली होती. माझे ते शरीर उठून पुन्हा उभे राहिले. मात्र यावेळी त्या शरीरामध्ये फक्त तात्याच नव्हते तर एक अज्ञात आत्मा देखील होती. तिकडे रघु काकांनी त्यांच्या प्रक्रियेस प्रारंभ केला होता. सलोनीच्या स्वप्नाप्रमाणे तो बोर्ड हवेत तिच्या डाव्या हाताशी गेला. आणि एका धारदार वस्तूने रघु काकांनी तिच्या हाताची नस कापली. रक्त येऊ लागले...! अचानक बाहेरून ढगांचा गडगडाट ऐकू आला...! सलोनी ओरडू लागली...! विजा कडाडू लागल्या...! सलोनी खूप जोरात ओरडू लागली...! गोपी काका आम्हाला म्हटले होते,"आत्मा आणि शरीर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात. दोघांचेही एकमेकांशिवाय अस्तित्व शून्य...! मात्र जेव्हा या दोघांचा मिलाप होतो तेव्हा एक सजीव तयार होतो."  रघु काकांना संपवण्यासाठी आम्हाला त्यांचे शरीर संपवणे भाग होते. पण शरीराचे अस्तित्व शरीर पुरून कधीच संपत नाही. ते तेव्हाच संपते जेव्हा ते शरीर जाळले जाते. त्यामुळे त्यावेळी आम्हाला त्यांचे ते शरीर जाळणे गरजेचे होते. त्यासाठी तात्या आणि ती अज्ञात आत्मा माझ्या शरीरात राहून त्याचा पूर्णपणे प्रयास करणार होती. मी उठून उभा राहिलो... आणि रघु हक्कांवर हल्ला केला. आम्हा दोघांमध्ये पुन्हा हातापायी झाली .दोघांमध्ये नव्हे‌... तिघांमध्ये...!  तात्या आणि ती अज्ञात आत्मा भेटेल त्या वस्तूने रघु काकांवर हमला करीत होते. खूप जोरात... भेटेल त्या वस्तूने... वेड लागल्यासारखे... रघु काकांवर आता हे दोघेजण भारी पडले. रघु काका बेशुद्ध पडले. लगेचच खालच्या खोलीतील रॉकेलचा कॅन घेऊन त्यांच्यावर संपूर्ण रिकामा केला. आणि माचिसची काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकली.
          त्यांच्या शरीराने पटकन आग पकडली. तसे ते शुद्धीत आले त्यांचे शरीर जळत आहे हे त्यांना कळल्यावर ते सैरभैर झाले. मोठमोठ्याने ओरडू लागले...किंचाळू लागले... आणि इकडे तिकडे तडमडत ते खाली कोसळले... अखेरीस मोठ्याने किंचाळून ते शांत झाले. इकडे सलोनीच्या हातातून भरपूर रक्त येत होते. सर्वजण वरच्या खोलीत आले. प्राचीने सलोनीच्या हाताच्या जखमेवर पट्टी बांधली. तिचे बांधलेले हातपाय सोडवले. मला देखील शरीरावर भरपूर जखमा झाल्या होत्या. शरीर  रक्तबंबाळ झाले होते. इतक्यात अचानक पुन्हा मला माझ्या वेदना जाणवू लागल्या. मी मनातल्या मनात दोघांनाही Thanks...! बोलून जमिनीवर कोसळलो. मला त्या अज्ञात आत्म्यास त्याच्या बद्दल विचारायचे होते... त्याने मला मदत का केली हे देखील विचारायचे होते... ती अज्ञात आत्मा कोणाची होती हे देखील विचारायचे होते... मात्र माझ्यात तेवढी ताकद नव्हती. त्या दोघांनीही माझं शरीर सोडलं. माझ्या वेदना हळूहळू मला स्पष्ट जाणवू लागल्या. तसे माझ्या समोरील चित्र अस्पष्ट होऊ लागले. तेव्हा कोणीतरी मला उचलून घेतल्या सारखे मला वाटले. कोणीतरी मला घेऊन धावत होते. मी डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न केला मात्र तेही माझ्याने शक्य नव्हते. अगदी फटभर डोळे उघडुन बघीतले. तर माझ्यासमोर प्रथम आणि राहुल दिसले. ते दोघे जण मला उचलून वाड्याच्या बाहेर नेत होते. सलोनीलाही कोणी तरी उचलून घेऊन येत असेल हे मला ठाऊक होते. माझे डोळे पुन्हा बंद झाले. माझ्या कानांना थोडाफार आवाज येत होता. जमिनीवर धावणाऱ्या पावलांचा आवाज अचानक थांबला. आणि  कर् र् र्... असा आवाज आला. नंतर मुसळधार पावसाचा आवाज कानी पडला. पुन्हा पावलांचा आवाज चालू झाला. थोड्यावेळातच Ambulanceच्या सायरनचा आवाज आला. कानांना सर्व काही ऐकू येत होते मात्र डोळ्यांना उघडण्याची ताकद नव्हती. तोच अचानक ,"बाळा... काय झालं रे... किती लागले माझ्या बाळाला... देवा... काय झालं रे माझ्या बाळाला... वाचव रे..." आई रडत रडत बोलत होती. तेथे आई असल्याची मला खात्री पटली. वाटत होते उठून आईला घट्ट मिठी मारावी. खोट बोलल्याबद्दल माफी मागावी. तिच्या डोळ्यांतून येणारे अश्रू पुसावे. मात्र त्यासाठी देखील माझ्यात ताकद नव्हती. इतक्यात "अनिरुद्ध" अशी हाक माझ्या कानी पडली. माझे पप्पा आणि आजोबा देखील तेथेच होते. "माझ्या छाव्या... काही होणार नाही तुला" मला धीर देत होते. मनातून मला रडावेसे वाटले. खूप मोठ्याने रडावेसे वाटले. कारण माझ्या त्या वाड्यात जाण्याच्या एका निर्णयामुळे आज सर्वांच्याच डोळ्यात पाणी होते. शिवाय सलोनीला देखील फार काही सोसावे लागले. यशलासुद्धा जखम झाली होती. या सर्वांचा विचार करत करत मला हळूहळू कानांनी ऐकू येणारे आवाज बंद झाले.... शांत.... सर्वच काही शांत झाले.
          तर सलोनीच्या स्वप्नाचा शेवट असा झाला. तिचे अर्धवट स्वप्न अशाप्रकारे हकीकते मध्ये घडणार होते... नव्हे घडलेच...! आपण अनेक प्रयत्न करतो सर्वकाही फक्त आपल्या मनासारखेच व्हावे याचा. पण जर का सर्व काही आपल्या मनासारखेच झाले तर जीवन फारच बेरंगी होऊन बसेल. जीवनामध्ये चढ-उतार हे असतातच. ज्यांना सामोरे जाणे आपल्याला भागच असते. असेच काहीसे चढ-उतार आमच्या या रहस्याचा वाटचालीत होते. ज्यांना आम्ही जिद्दीने सामोरे गेलो. आमच्या आत्मविश्वासाने सामोरे गेलो...! मात्र नकळतच या रहस्यात आणखी एक रहस्य आमच्या दृष्टीस पडलं होतं. त्या ओइजा बोर्डचं...! मानवी जीवन हे फक्त जन्म आणि मृत्यू या दोघांमधील नसते. जन्माअगोदर आणि मृत्युनंतर देखील मानवाला जीवन असते. हे आमच्या सोबत घडलेल्या त्या सर्व प्रकारातून जाणून येते. अन् त्या जन्माअगोदर च्या व मृत्यूनंतरच्या जीवनाचे अस्तित्व हे मुळातच एक रहस्य आहे...! अरे Don't Worry... हे रहस्य आपल्या दृष्टीस पडले म्हणजे मी लगेच त्याला उलगडला जाणार नाही आहे. मात्र एक प्रश्न मला अजूनही आहे... ती अज्ञात आत्मा नक्की कोणाची होती...?
          "सलोनी...यश... कसं वाटतंय बाळांनो तुम्हाला आता..?"  कोणीतरी सलोनी आणि यश ची विचारपूस करत होते. आवाज ओळखीचाच वाटत होता. माझ्या अंगा मध्ये थोड्या वेदना होत्या. डोळे उघडले. उघडत नव्हते मात्र प्रयत्न केले. समोर अंधुक दिसत होते. हळूहळू स्पष्ट दिसू लागले... तर माझ्यासमोर आई बसली होती... रडत होती... शेजारीच पप्पा आणि आजोबा देखील होते. उजव्या हाताच्या बेडवर सलोनी होती तर डाव्या हाताच्या बेडवर यश होता. मला शुध्द आली तसे सर्वजण माझ्याजवळ आले. माझ्या डोक्यावर एक फॅन गरगर फिरत होता... खूप आवाज करत होता... मात्र वारा तर अजिबात येत नव्हता. दाभोळच्याच एका सरकारी दवाखान्यात आम्ही Admit होतो. थोड्याच वेळात डॉक्टर आले व माझी विचारपूस करू लागले. सर्वांशी बोलून मला फार बरे वाटले. थोड्यावेळाने सलाईन लावून मला त्यांनी इंजेक्शन दिले व मी झोपी गेलो. चांगलीच दोन-तीन आठवडे मला बेड रेस्ट घ्यावी लागली. सलोनी आणि यश मात्र केव्हाचे बरे होऊन घरी देखील गेले होते. आणि अखेरीस एके दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. मी गाडीत बसलो. शेजारी आई होतीच , पप्पा आणि आजोबा पुढे होते. तेव्हाच मी विचारले ,"तुम्हाला कसं काय कळलं की मी शिबिराला नाही दाभोळच्या वाड्यात गेलो होतो." त्यावर पप्पा म्हणाले," अनिरुद्ध, तू कितीही खोटं बोललास ना तरी खोटं कधीच लपून राहत नाही. गोपी काकांनी आम्हाला फोन करून कळवलं होतं. वाड्यात घडणार्‍या सगळ्या गोष्टींबाबत सुद्धा सांगितलं होतं. तसे आम्ही लगेच दाभोळ कडे यायला निघालो. तू फक्त बरा हो तुझी चांगलीच पूजा करतो आम्ही सर्व मिळून"  मी आता काय बोलणार त्यावर म्हणून फक्त हसलो. मात्र गोपी काकांनी त्यांना कळवलं हे एका अर्थी बरंच झालं... नाही तर ऐन वेळी त्या वाड्याजवळ आम्हाला कोणीच मदत करायला आले नसते. सर्व काही गोपी काकांना एकट्यालाच बघावे लागले असते. पुन्हा दाभोळला यायला भेटेल असे वाटत नव्हते. म्हणून गोपी काकांना भेटावे म्हंटले... त्यांना धन्यवाद म्हणावे म्हटले. त्यामुळे मी पप्पांना सांगितले गाडी जरा वाड्याकडे घ्या... मला गोपी काकांना भेटावयाचे आहे. तसे तिघेही शांत झाले. नंतर आई मला म्हणाली ,"बाळा ते आता राहिले नाहीत... ते वारले" हे ऐकून मला धक्काच बसला. असे अचानक गोपी काकांना नक्की काय झाले...? त्या दिवसापर्यंत तर ते अगदी ठणठणीत होते. ना कोणता आजार... ना काहीच...! नंतर पप्पा बोलू लागले ,"त्याने Suicide केला त्याच दिवशी.. आम्हाला शेवटचा कॉल करून झोपडी शेजारच्या झाडाला त्याने गळफास लावून घेतला. पण त्याने तसं का केलं हे कारण काही कळलेच नाही" पप्पांचे ते बोलणे ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. काका आम्हाला म्हटले होते की आम्हाला जेव्हा गरज लागेल त्यावेळी ते आम्ही न बोलावताच आमच्या मदतीला येतील. त्यांच्या त्या वाक्याचा अर्थ मला तेव्हा कळला. ती अज्ञात आत्मा दुसरी-तिसरी कोणाची नव्हे तर गोपी काकांची होती. गोपीकाकांनी या कथेच्या अंतासाठी स्वतःचा जीव दिला होता. मी पप्पांना गाडी वाड्याकडे घेण्यास सांगितली. थोड्या वेळातच आम्ही वाड्याच्या येथे पोहोचलो. मी गाडीतून खाली उतरलो. गोपी काकांच्या झोपडी पाशी गेलो. झोपडीत कोणीच नव्हते... गोपीकाकांची फार आठवण येऊ लागली. नकळत डोळ्यातून पाणी आले. जर गोपी काकांनी ते पाऊल उचलले नसते... तर आज मी तिथे नसतो... माझे मित्र कोणीच वाचले नसते... शिवाय ते रघु काकांचं भूत त्याच्या प्रयत्नात सफल झाल असतं. अचानक गोपीकाकांचे शब्द आठवले... 'या जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या घडतात. काही आपल्या मर्जीने... तर काही आपल्या मर्जी शिवाय...! मात्र त्या घडण्यामागे देखील एक कारण हे जरूर असतं. आपण त्यांना सामोरे जाणार हे निश्चितच...! मात्र अखेरीस त्या कारणास संपवणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. हो... त्या कारणास संपवल्याने घडणारी घटना काही केल्या चुकणार नाही. मात्र त्या कारणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ती घटना घडण्यासाठी आपल्या पदरचे प्रोत्साहन त्या घटनेस देणे असे होते. गोष्टीचा अंत हा कधीच होत नाही...! मात्र त्या गोष्टींना तात्पुरता पूर्णविराम आपण जरूर देऊ शकतो. हेच जीवन आहे... हेच खरे जीवनाचे रहस्य आहे‌...!' गोपीकाकांचे ते शब्द आठवताच मी पटकन वाड्याकडे पळालो आणि त्या रिकाम्या खोलीत गेलो. तेथे दोन्ही ते ओइजा बोर्ड पडले होते. मी त्या दोघांनाही उचलले आणि वाड्याच्या मागे कुदळ-फावडे घेऊन पोहोचलो. सोबतच तात्यांनी लिहिलेली पुस्तके देखील होती. मी खड्डा खणू लागलो 'या ओइजा बोर्डचं अस्तित्व हे जरी सर्वांना मान्य नसलं तरी ते आहे...! आणि त्या बोर्ड सोबतच्या आत्म्यांचे अस्तित्व देखील आहे...! जर आपण हा बोर्ड जाळला तर त्या आत्म्यांना देखील अपार वेदना होऊ शकतात...! कारण त्यांच्या आणि आपल्या दुनियेतला त्यांचा संपर्क त्या बोर्ड मुळेच असतो.'  गोपी काकांचे शब्द आठवत होतो. डोळ्यात भरपूर पाणी येत होते. मला तात्या आणि गोपीकाकांच्या आत्म्यास केव्हाच इजा पोहोचवायची नव्हती. म्हणून मी गोपिकाकांनी दिलेला बोर्ड जाळला नाही. मात्र तात्यांचा तो जुना बोर्ड ज्याने रघु काकांचा आत्मा पुनर्जीवित झाला होता त्याला आगीत टाकले. थोड्याच वेळात त्याची संपूर्ण राख झाली. ती त्या खड्ड्यात टाकली व सोबत तात्यांची सर्व पुस्तके आणि गोपी काकांचा तो बोर्ड सुद्धा सहीसलामत त्या खड्ड्यात ठेवला. आणि वरुन माती टाकायला सुरुवात केली. मी ते सर्व जमिनीखाली पुरून टाकले. त्या बोर्डच्या अस्तित्वास तात्पुरता पूर्णविराम दिला. वाड्याला पुन्हा लॉक घालून गाडीत येऊन बसलो.
          आपण जीवनात अनेक स्वप्न बघतो. ती पूर्ण करण्यास भरपूर खटाटोप करतो. मात्र काही स्वप्न ही फक्त बघण्या पुरतीच असतात. त्यांना आपण कधीच पूर्ण करू शकत नाही. असंच काहीसं रहस्यांबाबतीत...! जगातल्या अनेक रहस्यांपैकी अनेक रहस्ये ही फक्त आणि फक्त एक रहस्य म्हणूनच जन्माला येतात आणि त्यांचा अंत देखील एक रहस्य म्हणूनच होतो. आता हा योगायोग म्हणावा की आमचे नशीब...? मात्र आमचं ते वाड्यातील रहस्य आमच्यासमोर एक रहस्य म्हणून आले व एक रहस्य म्हणूनच संपले. हा... मात्र त्या रहस्याची ओळख ही वेगवेगळी होती. कारण वाड्यातलं ते रहस्य आमच्या समोर एका पछाडलेल्या वाड्याच्या रूपात आले. मात्र संपताना ते एका बोर्ड च्या रूपात संपले. एक असा बोर्ड ज्याचे अस्तित्व मुळातच एक रहस्य आहे. एक असं रहस्य ज्याचे मूळ काही दशकांअगोदर चे नव्हे... काही शतकां अगोदरचे नव्हे... तर युगायुगां पासूनचे आहे...! नकळतच आम्हा सातही जणांच्या अथक प्रयत्नांनी देखील त्या वाड्यातले खरे रहस्य काही उलगडले नाहीच. मी म्हटल्याप्रमाणे ते आमच्यासाठी एक रहस्य आहे हे जरी रहस्यमयी वाटले नसले. तरी त्याची वाटचाल तितकीच रहस्यमयी ठरली. आणि ठरल्याप्रमाणेच भयानक देखील...! मात्र या वाटचालीतले अनुभव आम्हास आमच्या जीवनात फारच उपयोगी ठरले. थोडक्यात म्हणायचे झाले तर ते अनुभव म्हणजे गोपी काकांचे विचार...!

तात्पुरता पूर्णविराम...

Rahasya ( रहस्य )Where stories live. Discover now