दारावरची बेल वाजली. सुनंदाने दार उघडलं आणि प्रकाशने पटकन हातातल्या दोन्ही बॅगा खाली ठेवल्या. त्याने त्याची लॅपटॉपची बॅग सुनंदाच्या हातात दिली आणि कोचावर येऊन पडला.
"काय रे? जास्त दमला आहेस?" तिने बॅग आत नेत विचारलं.
"फार नाही तसं, पण थोडा दमलो आहे." तो उसासा सोडत म्हणाला.
थोड्याच वेळात सुनंदाने सवयीप्रमाणे चहा आणि पेपर प्रकाशच्या समोरच्या टेबलावर ठेवला. प्रकाशने चहाचा घोट घेतला आणि पेपर वाचायला लागला. त्याने मधलं पान उघडलं आणि त्यावरची बातमी वाचताच त्याचे डोळे मोठे झाले. त्याने पटकन कप खाली ठेवला आणि ताडकन उठून उभा राहिला.
"अगं ए...सुनंदाsss" त्याने जोरात हाक मारली. सुनंदा लगबगीने बाहेर आली.
"काय रे, काय झालं एवढं ओरडायला?" तिला त्याच्या आश्चर्यचकित चेहऱ्याचा अंदाज येत नव्हता.
"मला सांग, हा आजचाच पेपर आहे?"
"नाही, तुला दोन दिवसांपूर्वीचे पेपर दिले ना मी." सुनंदाला काहीच अंदाज येत नव्हता.
"अगं, कसं शक्य आहे?" तो हतबल होऊन उद्गारला.त्याने टेबलाचा आधार घेत पुन्हा नीट वाचले. त्याला खूप मोठा धक्का बसल्यासारखं सुनंदाला वाटलं. "का? का नाही शक्य?" तिने विचारलं.
"अगं, हे वाच, ही बातमी. नागपूरमधील ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन मेहता यांचे निधन. बरेच दिवस प्रकृती ठीक नसल्याने ते नागपूरच्या मनोहर खाजगी रुग्णालयात होते. काल रात्री १ वाजता त्यांचे दु:खद निधन झाले. जनार्दन मेहता यांचे कोणीच नातलग न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले." प्रकाश अगदी अस्वस्थ होऊन बातमी वाचत होता.
"मग, त्यात शक्य नसायला काय झालं?" तिला अजूनही प्रकाशला नक्की काय म्हणायचे आहे ते कळेना.
"अगं, तू म्हणलीस हा पेपर दोन दिवसांपूर्वीचा आहे. पण मी ह्या माणसाला काल भेटलो!" प्रकाशचं बोलणं ऐकताच सुनंदा अवाक् झाली. तो जे बोलत होता ते खरंच वाटत नव्हतं.
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...