236 1 0
                                    


रात्रीच्या अंधारात प्रकाश पलंगावर पडून पंख्याकडे एकटक बघत होता. त्याच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरु होते. 'आईचं इंटरकास्ट लग्न..लग्नानंतर दोन्ही घरातील माणसांनी संबंध तोडणं.. नागपूरला असणं..पण आई म्हणाली होती की परिस्थिती खूप हलाखीची होती, सुखसोयी नव्हत्या..त्यांच्या म्हणण्यानुसार ते श्रीमंत होते..पण वर्तमानपत्रात तर लिहिले होते की समाजसेवक होते...आणि हे सगळं..म्हणजे बऱ्यापैकी तसचं आहे जसं मेहता...पण आईने कधी नाव सांगितलं नाही..पण कोण आहेत कोण हे मेहता नक्की?

जर त्यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले असेल तर ते मला कसे भेटले, माझ्याशी बोलले कसे? ते माझ्या मनाला एवढे का चटके देऊन गेले..काय संबंध असावा..माझ्या मनात त्यांच्याबद्दल एवढं कुतूहल का असावं..का वर्तमानपत्रातील मेहता आणि मला भेटलेले मेहता वेगवेगळे असावेत..पण चित्रावरून तरी एकाच व्यक्ती वाटत आहे..पण..मग ते मला कसे दिसले..त्यांची सगळी गोष्ट आणि आई..पण ते जर अस्तित्वातच नसतील तर..आणि असतील तर बातमी..म्हणेज मला भूत दिसलं?? भरलेल्या स्टेशनवर?? का मला भास झाला..पण जो माणूस मला माहितच नाही त्याचा भास कसा होईल ....या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली पाहिजेत, मला कळायला हवं मेहता कोण आहेत..यासाठी मला परत नागपूरला जायला हवं...मला माझ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच सापडतील..मला जायलाच हवं...उद्याच..'

"काय रे कुठे लक्ष आहे?" सुनंदाने प्रकाशची विचारसाखळी तोडत विचारलं.

"हां?" प्रकाश दचकला. त्याच्या विचाराच्या गोंधळातून थोडा सावरला. "काय?"

"म्हणलं कुठे लक्ष आहे?"

"काही नाही. असाच पडलो होतो. बरं मला उद्या परत नागपूरला जावं लागणार आहे."

"उद्या? परत? कशाला? अरे आज तर आला आहेस उद्या कशाला जायचं आहे आता पुन्हा?"

"अगं मेह.."प्रकाश अचानक थांबला.

"काय?"

"अगं एक महत्त्वाचं काम राहून गेलं. म्हणलं पुन्हा बॉसला तोंड दाखवायच्या आधी सगळी कामं संपवून टाकू"

"असं कसं राहिलं? आता उद्या परत जावं लागणार ना!"

"आता राहिलं..गेलं डोक्यातून"

"कधी निघणार आहेस?"

"दुपारी. म्हणजे परवा पहाटेपर्यंत नागपूरात."

"बरं. झोप आता शांतपणे."


अपुरी इच्छाWhere stories live. Discover now