प्रकाशने ५ रुपये ठेऊन पेपर घेतला आणि तो तडक स्टेशनच्या बाहेर पडला. त्याने पुढचा मजकूर वाचायला सुरुवात केली. 'नागपूरमधील ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन मेहता यांची पंच्याहत्तरी त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहात साजरी केली. जनार्दन मेहता यांची अनेक वृद्धाश्रमे, अनाथाश्रमे, एन.जी.ओ., दिव्यांगांची शाळा, रात्रशाळा, रात्र महाविद्यालये आहेत. त्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून मेहतांच्या पहिल्या आश्रमात हा सोहळा आनंदात साजरा केला. जनार्दन मेहता यांचा पहिला आश्रम...'
बातमीमध्ये प्रकाशला आश्रमाचा पत्ता मिळाला. त्याने लगेचच रिक्षा पकडली आणि आश्रमाकडे निघाला.
प्रकाश आश्रमाचं दार उघडून आत गेला. अंधार झाल्याने आश्रमाच्या बागेत शुकशुकाट होता. एका बंगल्यासारख्या इमारतीत त्याने पाऊल ठेवले. त्या इमारतीत शिरताना अनेक चित्रे, फलक वगैरे भिंतीवर टांगले होते. त्यातील शेवटच्या फ्रेमच्या खाली नाव होतं 'मा.जनार्दन मेहता – संस्थापक.' आश्रमाचे संस्थापक असल्याने त्यांचा माहिती फलक काही अनपेक्षित नव्हता. त्यावर लिहिलेली सगळी माहिती तीच होती जी प्रकाशने दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष मेहतांच्या तोंडून ऐकली होती!
त्याच माहिती फलकात प्रकाशला मेहतांच्या निवासस्थानाचा पत्ता मिळाला. प्रकाश तडक निघाला. बाहेर पडून लगेच रिक्षा केली.
स्टेशनच्याही पुढे साधारण ५-६किमी. अंतरावर रिक्षा थांबली. पैसे देत असताना प्रकाशच्या हातात असलेले वर्तमानपत्र खाली पडले. ते पाहून रिक्षावाला म्हणाला, "दादा एक सांगू का?"
मुंबईतल्या रिक्षावाल्यांची सवय असलेला प्रकाश नागपूरमधल्या त्या रिक्षावाल्याची नम्रता बघून आश्चर्यचकितच झाला.
"पेपरवाल्याने गंडवला तुम्हाला." रिक्षावाला म्हणाला.
"काय?" प्रकाशला काहीच कळले नाही. प्रकाश पुढे काही विचारणार इतक्यात तो रिक्षावाला सटकला. प्रकाशने पेपर उचलला पण त्याला त्यात काहीच वेगळे आढळले नाही. तो ज्या गोंधळात पडला होता त्याच्यापुढे त्याने त्या वर्तमानपत्राच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केलं.
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...