दुपार झाली. प्रकाश निघतच होता. तेवढ्यात त्याला अनेक वर्षांपासून समोर राहणारे शिरवळकर भेटले.
"काय रे प्रकाश, आज ऑफिसला सुट्टी का?" शिरवळकरांनी सहज चौकशी केली.
"सुट्टी कसली काका, कामासाठीच चाललो आहे."
"कुठे बाहेरगावी काम आहे का?" प्रकाशच्या हातातली सूटकेस बघून काकांनी विचारले.
"नागपूरमध्ये आमची दुसरी शाखा आहे, तिकडेच निघालो आहे आता."
"अरे वा! मी सुद्धा नागपूरलाच निघालो आहे. चल, एकत्रच जाऊ."
"अहो नको काका, तुम्हाला कशाला त्रास उगीच! मी जातो ना रेल्वेने."
"त्रास कसला. तेवढीच मला सोबत होईल रे." काका म्हणाले.
"सोबत? काकू नाही येणार का तुमच्याबरोबर?"
"अरे नाही, एका मित्राकडे जायचं आहे.तिथे कशाला न्यायचं हिला?" काका हळूच डोळा मारत म्हणाले, "बरं मला सांग, नागपूरात कुठे जायचं आहे तुला?"
"सिताबुल्डी. स्टेशनच्या जवळच."
"मग तर चलच तू बरोबर. मलासुद्धा तिथेच जायचे आहे."
प्रकाश त्याच्या पुढच्या 'महत्त्वाच्या' गोष्टींचा आराखडा बदलत म्हणाला, "ठीक आहे काका. चला एकत्रच जाऊ."
प्रकाश आणि शिरवळकरांनी निरोप घेतल आणि काकांनी त्यांच्या गाडीला किल्ली मारली.
नागपूर स्टेशनच्या जवळ शिरवळकरांनी गाडी थांबवली. "इथून ५ मिनिटांच्या अंतरावरच आहे माझं ऑफिस. मी जातो इथूनच. तुम्ही जा तुमच्या मित्राकडे." प्रकाश म्हणाला.
"नक्की?" शिरवळकर.
"हो काका, खरचं जातो मी इथून. जवळच आहे."
"तसं माझ्या मित्राचं घर पण इथून फार काही लांब नाही. ५-६ किमी.च असेल." काका म्हणाले.
"बरं बरं , मी पळतो आता. आणि हो.. थँक्यू!"प्रकाश निघता निघता म्हणाला.
"यू आर मोस्ट वेलकम हो!" शिरवळकर उपरोधिकपणे पण गंमतीने म्हणाले."मुंबईला निघताना फोन कर म्हणजे परत एकत्रच जाऊ."
"हो चालेल." प्रकाश म्हणाला आणि काकांनी गाडी सुरु केली.
प्रकाश त्या स्टेशनवरच्या गर्दीत घुसला. त्याच प्लॅटफॉर्मवर. साधारण तीच वेळ. तीच मुंबईला जाणारी गाडी समोर दिसत होती. प्रकाशला वाटायला लागलं की परत तो माणूस दिसेल..तिथेच..त्या चहाच्या टपरीजवळ..पण नाही. आज तो बाक रिकामा होता.
प्रकाश त्या चहावाल्यापाशी गेला. "बोला साहेब, कटिंग का फुल?" चहावाल्याने नेहमीचा प्रश्न टाकला.
"एक कटिंग दे."प्रकाश इकडे तिकडे बघत म्हणाला.
प्रकाशने चहा घेत घेत विचारलं," काय रे, ह्या बाकावर रोज एक आजोबा बसायचे ना?"
"काय पन सवाल करता साहेब तुम्ही, रोज शेकडो म्हातारी टाळकी असतात इथं. आमी काय त्यांच्याकडं बघत बसू का? कोण बसतं , कोण जातं काय माहित आता.." चहावाला दुसऱ्या गिऱ्हाईकाला चहा देता देता म्हणाला.
त्यावर काय बोलावं प्रकाशला कळेना. त्याने कप ठेवला आणि पैसे देऊन बाहेर जाण्याच्या मार्गाला लागला. वाटेत त्याला पेपरवाला दिसला म्हणून थांबला. त्याने गठ्ठ्यातला एक पेपर घेऊन चाळायला सुरुवात केली. मधल्या पानावर पोचताच त्याचे डोळे पुन्हा मोठे झाले. त्यावर ठळक अक्षरात बातमी होती "समाजसेवक मेहता यांची पंच्याहत्तरी उत्साहात साजरी."
YOU ARE READING
अपुरी इच्छा
Mystery / Thrillerप्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याची आई त्याच्या वडिलांना सोडून मुंबईला आली होती. आणि आजतागायत प्रकाश आपल्या वडिलां...