रायगडाला जाणे खूप वेळा झाले. नोकरीसाठी महाडला असल्याने रविवारी किंवा सुट्टी असेल तर नाहीतर एखादा मित्र मंडळींचा ग्रूप रायगडला जाण्यासाठी आमच्या खोलीवर डेरेदाखल व्हायचा. मग आमची पण वारी त्यांच्या बरोबर असायचीच.असाच एकदा रायगडला एका ग्रुप बरोबर गेलो. टकमक टोकावर गेलो. खाली बघत होतो. खाली खोलवर छोटी गावं दिसत होती. सकाळची प्रसन्न वेळ होती.. घरातून धुराची रेषा, कुठे अगदी छोटे खेळण्यातले वाटावे असे बैल, माणसें, झाडे दिसत होती. अचानक खालून गाण्याचा आवाज आला. खाली गावात कुठे तरी कार्यक्रम असावा आणि त्यात लाऊड स्पीकर वर गाणी चालू झाली. पहिलेच "सोन सकाळी सर्जा उठला हसले हिरवं रान" हे गाणे होते. इतकं छान वाटले. लता बाईंचा स्वर्गीय स्वर वाऱ्यावर स्वार होऊन आमच्यापर्यंत कमी जास्त होऊन पोहोचत होता. नंतर सगळीच छान गाणी लता बाईंची चालू झाली. जोरदार वारा, टकमक टोक, सभोवताली दिसणारा निसर्ग आणि ही सुंदर गाणी..सर्वच भारुन टाकणारे वातावरण होते. आज देखील ' सोन सकाळी ' गाणे लागले तर प्रथम टकमक टोक आणि तो माहौल डोळ्यासमोर येतो.संगीत हे असेच काहीसे भारुन टाकते आपल्याला. एखादी आठवण आणि गाणे हे एक कॉम्बिनेशन आपोआप तयार होते आणि ते पण कायमचे. बरं त्या गाण्याचा आणि त्या परिस्थितीचा काही संबंध असतो असे पण नाही. अशा अनेक आठवणींशी निगडित गाणी कायम स्मरणात राहतात. अर्थात संगीत आवडायला आठवणीच पाहिजेत असे नाही.. माझा मामा आणि माझे विशेष सख्य. त्याने लाड देखील भरपूर केलेत. बारावीला असताना मामा परदेशी जाणार हे कळले. मी काहीसा उदास होतो. सहा महिने ते एक वर्ष तो तिथे राहणार होता. त्याच्या परदेश प्रयाणाच्या दिवशी आम्ही सर्व जवळचे नातेवाईक त्याला सोडण्यासाठी संध्याकाळी एअरपोर्टला जाण्यासाठी निघालो. मी एका टॅक्सीत पुढे बसलो होतो. टॅक्सी मध्ये गाणी चालू होती. " मेरी आँखोमें बस गया कोई रे " हे गाणे चालू झाले. ते गाणे त्या उदास क्षणी मनावर कोरले गेले. खरं तर गाण्याचा आणि मला वाटतं असलेल्या दुःखाचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. पण ते गाणे लागले की डोळ्यासमोर तो संध्याकाळचा टॅक्सी प्रवास दिसतो. सगळा मामाचा निरोप समारंभ डोळ्यासमोर लख्ख उभा राहतो. चाळीमध्ये रहात असताना आम्ही बागेतून येताना गाणी आठवत सर्व चाललो होतो. मांजरीच्या पिल्लावर असलेले एक गाणे काही केल्या आठवत नव्हते. प्रत्येक जण आठवायचा प्रयत्न करत होता. तोंडावर होतं पण कोणालाही आठवत काही नव्हतं. घरी पोहोचलो तर रेडिओवर "छान छान छान मनी माऊचे बाळ कसे गोरे गोरे पान " हे गाणे लागलेले..सर्वच एकदम आनंदाने ओरडले.. योगायोग होता तो. पुढील आयुष्यात हे असे योगायोग खूपदा घडले. एखादे छान गाणे,संगीत ऐकले की आपण कसे व्यक्त होतो ते कळत नाही. नकळत दाद देणे होते. आमचे एक स्नेही एका कार्यक्रमात एका गाण्याला आनंदाने भरून आलेले डोळे पुसताना बघितले. आम्हा मुलांसाठी काही काळ तो चेष्टेचा विषय होता. संगीताची आवड निर्माण झाल्यावर याची अनुभूती स्वतःच घेतल्यावर त्या चेष्टेतला फोलपणा जाणवला..सुंदर गाणे, उत्तम संगीत ऐकल्यावर किंवा एखादे गाणे खूप वर्षांनी ऐकल्यावर अंगावर काटा येणे,डोळे भरणे मग नित्याचेच झाले. संगीताची जादू काही वेगळीच..रेवदंडयाच्या छोट्या टॉकीज मध्ये उमलत्या वयात बघितलेला मराठी सिनेमा घरकुल... विषय काहीसा बोल्ड. त्यातले सी रामचंद्रांचे संगीत अप्रतिम..सगळीच गाणी सुंदर, एकापेक्षा एक.. लक्षात एकच राहिले.. ग दी मा कृत जोगीया.. "कोन्यात झोपली सतार.. सरला रंग" त्या गाण्याचे शब्द शब्द कोरलेत मनात. काय सुंदर.. चाल,संगीत की शब्द.. सांगता येत नाही. मला याचे शब्दच खूप भावतात. हे गाणे आणि एकंदरच ही जुनी गाणी ऐकायला मिळणे दुर्मिळच. गोड गोजिरी लाज लाजरी हे एक असेच गाणे..हे ऐकल्यावर आम्हा तिघा भावंडांचे लहानपण डोळ्यांसमोर येत. हे गाणे बघत ऐकायला जास्त आवडते.घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात..हे एक गाणे डोळ्यात पाणी आणणारे. नवीन लग्न झालेल्या मुलीला येणारी माहेरची आठवण खूप छान मांडली आहे. घरातल्या प्रत्येक माणसाची आठवण आणि घराच्या बाजूचा निसर्ग ,झाडे,गाई यांची एकत्र आठवण छान गुंफली आहे. सुमन कल्याणपूर यांनी हे गाणे अप्रतिम गायले आहे. या गाण्याशी माझी कोणतीही आठवण निगडित नाही तरीही कुठेतरी मनास भिडते.. आली कुठूनशी तान टाळ मृदुंगाची धून हे एक असेच गाणे. लहान पणी रेडीओवर लागणारे हे गाणे एका कार्यक्रमात ऐकले. गायक होते स्वतः वसंत आजगावकर. त्यांनी ज्या आर्ततेने आणि सहज ते गाणे गायले आहे त्याला तोड नाही. तेंव्हापासून अत्यंतिक आवडत्या लिस्ट मध्ये ते गाणे सामील झाले.. हृदयनाथ मंगेशकर आवडते संगीतकार,गायक. मीरेच्या भजनाची एक कॅसेट हाती लागली. यातली सर्वच गाणी/भजन एकाहून एक. लता बाईंचा सुंदर आवाज आणि मोजक्याच वाद्यातून निर्माण झालेले ते संगीत अप्रतिम. याची एक जुनी आठवण म्हणजे "चला वाही देस" ही पण मीरेची भजनाची कॅसेट घेताना विचारले की कशी आहेत गाणी..त्यावर दुकानदाराने सांगितले ठीक आहे..पशू पक्षांचे वगैरे आवाज आहेत.. आणि गाणी आहेत. त्याने केलेले वर्णन भयंकरच. पण लता मंगेशकर आणि हृदयनाथ .. परत एक अप्रतिम कॅसेट हाती लागली.. त्यातले ,"संतो करम की गती न्यारी.." अप्रतिमच.आपण निवांत असलो की मनात एखादे गाणे असते ते तोंडावर येते. आपण गुणगुणतो.. ते गाणे नुकतेच ऐकलेले असू शकते किंवा आधी कधीतरी ऐकलेले असते. हा सर्वांचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त एखादे गाणे मनात खोलवर कायमचेच वस्तीला असते. ते केंव्हाही वरती येते. असेच एक माझे गाणे म्हणजे "जाईन विचारीत रानफुला" किशोरी अमोणकरांचे हे गाणे बहुतेक कामगार सभेतून वस्तीला आले असावे.. हेच गाणे का आले कळत नाही. रेडिओचा संबंध संपल्यावर हे गाणे मुद्दामून ऐकले आहे असे पण आठवत नाही. म्हणजे चांगले संगीत आपल्या मनावर नकळत किती छान अधिराज्य गाजवते. हे गाणे मेंदूच्या आठवण कप्प्यात तेंव्हा पासून कायमचेच..गाणे तर अतिशय सुंदरच..आज दुर्मिळ गाणी ऐकायला मिळणे तेवढे दुर्मिळ नाही राहिले. पूर्वीच्या काळी असे एखादे गाणे मिळवायला खूप कष्ट व्हायचे. आज यु ट्यूब वर सर्व मिळते. पण सगळी मजा गेली. रेडिओ वर कोणते गाणे लागणार हे शेवटच्या क्षणी कळायचे. ती उत्सुकता,हुरहूर वेगळीच असायची. आपले आवडते गाणे असेल तर आतुरतेने ऐकण्याची मजा न्यारीच. ती मजा पाहिजे ते गाणे पाहिजे तेंव्हा कितीही वेळा ऐकण्यात नाही. एक सोय म्हणून नक्कीच चांगले. कुठेतरी या सर्व आनंदाला आपण मुकतोय.. अर्थात जग बदलतेय तेंव्हा हे सर्व अपरिहार्यच."ये जिंदगी उसी की है " या गाण्याच्या शेवटच्या 'अलविदा अलविदा' वर आपला शेवट व्हावा ही वडिलांच्या एका मित्रांची इच्छा आगळी वेगळीच..पण किती छान..असा संगीतमय शेवट मला नक्कीच आवडेल..राजेंद्र शशिकांत धबडे.