आपल्या जीवनात खूप काही घडत असतं. काही आठवणी साठवणीच्या कप्प्यात जातात तर काही विस्मरणाच्या. आपण म्हणतो मी विसरलो यार. पण कधी कधी त्या आठवणी एकांतात कप्प्यातून नकळत बाहेर येतात आणि मी विसरलो यार वाली आठवण ही साठवणीत जाते. त्यातील या काही आठवणी .. सायकलने डोंबिवली ते कर्नाळा अभयारण्य आणि परत असा आमचा बेत होता. सकाळी लवकर निघून संध्याकाळी परत यायचे होते. अकरावीत असतानाची ही गोष्ट. आमच्या चौघांच्या ग्रूपने हे ठरवले होते. उत्साह दांडगा होता. फक्त एक अडचण होती..मला सायकल चालवता येत होती पण स्वतःची सायकल नव्हती. आमच्या आईला सायकल वगैरे वाहनांची भीती वाटायची. आम्हा भावंडांना ती सायकल शिकून ही देत नव्हती..विकत घेणे फार पुढची गोष्ट होती. चोरुन आम्ही सायकल शिकलो होतो. त्यामुळे घरी कळून न देता कोणाची तरी सायकल घेऊन जायचे ठरवले. घरी बसने जातोय असेच सांगितले. कोणी काय आणायचे ते ठरवले. मी उकडलेली अंडी आणणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून एका मित्राची सायकल घेऊन आम्ही आमचा प्रवास चालू केला. सायकलची फारशी सवय नसल्याने मला हा प्रवास तसा जडच गेला. पायात गोळे येणे,दमछाक होणे याचा अनुभव घेत कसाबसा कर्नाळा गाठला. मध्ये नाश्त्यासाठी थांबलो असता उकडलेली अंडी घेण्याचे विसरलो हे लक्षात आले. इतरांनी आणलेले पदार्थ भरपूर होते त्यामुळे तसे फारसे जाणवले नाही. वरचा किल्ला बघून जेवून आम्ही निघालो. परतताना जास्तच दमछाक झाली. घरी अंडी विसरल्याचे आईला लगेच कळले. तिने वडलांना त्वरित बस स्टँड वर ती अंडी घेऊन पाठवले. त्यावेळी सकाळी ज्या दोन चार बसेस सुटायच्या त्यात त्यांनी चौकशी केली. आम्ही कुठेच दिसलो नाही. नंतर तसेच रेल्वे स्टेशन वर गेले..तिथेही आम्ही दिसलो नाही. बिचारे तसेच घरी परत आले. दोघांनाही जीवाला दिवसभर उगाच काळजीपोटी हुरहूर वाटत राहिली. बसने नाही गेला तर नक्की कसा गेला ही आणखीन वेगळी काळजी. दोघांनी नीट जेवण ही गेलं नाही त्यामुळे. मला हे सगळे संध्याकाळी घरी गेल्यावर समजले. काहीतरी उत्तर देऊन मी वेळ मारुन नेली. या गोष्टीचे गांभीर्य तेंव्हा फारसे जाणवले नाही. पुढे स्वतः पालकाच्या भूमिकेत शिरल्यावर ती काळजी ती हूरहूर मीही अनुभवली.. तेंव्हा या प्रसंगाची आठवण झाली. बालपण जातं. तारूण्य तारुण्याच्या नशेत असतं. कॉलेजचं जीवन काही वेगळंच असतं. जुन्या मित्रांत नवीन मित्र add होतात. काही जुने मित्र खूप दूर जातात. आणि मग तो आपला हा कुठे आहे रे अशी चौकशी होते. पण या चौकशीत काही असे प्रसंगही घडतात की विसरता येत नाहीत. त्यातील ही एक आठवण ...अकरावी नंतर आमची कॉलेज वेगळी होती. नितीन एकटाच दुसऱ्या कॉलेजमध्ये गेला. तरीही आमचा संपर्क होताच. आठवड्यात दोन चार वेळा भेटणे व्हायचेच..शिक्षण पूर्ण होता होता भेटणे काहीसे कमी झाले. नोकरीचा शोध चालूच होता. काहींना नोकरी मिळाली ही.. सगळेच कॉमर्सचे विद्यार्थी त्यामुळे बहुतेकांना बँकेत किंवा सरकारी नोकरी मिळत गेली.. बँकेची परीक्षा पास होऊन मी ही बँकेत लागलो. प्रथम पोस्टिंग कोकणात होते. त्यामुळे सर्वांचा संपर्क तुटला. हळू हळू सगळेच नोकरीस लागून लग्न वगैरे करुन आपापल्या संसारात गुरफटून गेले. सगळेच पांगले गेलो. अशीच काही वर्ष गेली. सगळे स्थिरावल्यावर हळू हळू परत भेटू लागलो... नितीन सोडून सगळेच भेटलो. छान गप्पा रंगल्या. परत भेटायचे ठरवून सर्व परत पांगले. ठरवल्या प्रमाणे भेटणे जमले नाही पण अधूनमधून भेट व्हायची.. नितीनचा विषय निघायचा. त्याच्या बद्दल काहीच कळत नव्हते. त्याने घर देखील बदलले असे कळले. अशीच काही वर्षे गेली. एफबी वगैरे सोशल माध्यमातून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातही यश आले नाही. अचानक आमच्याच एका मित्राकडून नितीनचा मोबाईल नंबर मिळाला. तो ही बँकेत नोकरीस होता. बाकी माहिती मिळाली नव्हती. मोबाईल नंबर असल्याने त्याचा संपर्क होऊ शकणार होता. एक दिवस ठरवून त्याला फोन लावला. मनात विचार चालूच होते. नितीन आपला आवाज ओळखेल का.. त्यालाच विचारु कोण बोलतय ओळख.. अशी थोडी गंमत करु असे काहीसे ठरवून फोन लावला. रिंग खूपवेळ वाजत होती. माझी उत्कंठा वाढत होती. कोणी तरी फोन घेतला. मी त्याचा आवाज ऐकायला उत्सुक.. बाईंचा आवाज आला. समोरून कोण बोलतंय अशी विचारणा झाली. काहीसा विरस होऊन मी माझी ओळख दिली. नितीनशी बोलायचे सांगितले. समोरून खूप वेळ आवाज नाही आला. आणि मग त्यांचा आवाज आला. मी ''नितीनची मिसेस बोलतेय. नितीन गेले काही दिवस आजारी होता. तेरा दिवसापूर्वी तो गेला. आज त्याचे तेरावे होते''. मी ऐकून हादरुन गेलो. नक्की काय बोलावे कळत नव्हते. भीषण शांतता सहन होत नव्हती. कसं बसं माफ करा बोललो. मला काहीच माहीत नव्हते हेही सांगितले. फोन ठेवला. सुन्न होऊन तसाच बसलो होतो काही क्षण...आपल्या जीवनात बरेचसे प्रसंग असे असतात जे आपल्याला खूप काही शिकवून जातात. फक्त आपला दृष्टिकोन ,आणि हो .. आपली दृष्टीही स्वच्छ असायला हवी ..असा एक प्रसंग माझ्या आठवणीत आहे. तो असा ... वडिलांना म्हणजे भाईंना नाटकाचे वेड होतेच. त्यात त्यांच्या ऑफिस तर्फे नाटकं,एकांकिका बसवायचे. कधी डोंबिवलीत ही प्रयोग असायचे. नाटकात भाईंची भूमिका असल्याने आम्ही कुटुंबीय नेहमीच हजर असायचो. राज्य नाट्यस्पर्धेत रेल्वे तर्फे नियमित सहभाग असायचा. उषा नाडकर्णी अभिनित गुरु नाटकाला एक वर्षी प्रथम पारितोषिक मिळाले होते तेव्हाच भाईंच्या रेल्वे तर्फे केलेल्या नाटकाला दुसरे पारितोषिक मिळालेले आठवते.. परीक्षकांचे निरीक्षण किती बरोबर असायचे याची एक गोष्ट आठवते. रेल्वे तर्फे एक नाटक स्पर्धेला होते. भाईंनी अभिनय चांगला केला होता. मध्यंतर व्हायच्या आधी भाईंच्या पात्राचा खून होतो आणि पडदा पडतो. असा प्रसंग होता. आम्ही नाटकाला गेलो होतो. तो प्रसंग छान जमला होता. पण एक मोठी चूक झाली होती. आम्हाला समजली नव्हती. नाटक संपल्यावर परीक्षक भेटले. म्हणाले.. तुमचं नाटक चांगले झाले. सर्वांनी चांगला अभिनय केला. फक्त एक गोष्ट खटकली..आणि ते भाईंना म्हणाले..अहो तुमचा खून होतो..तुम्हाला एवढे सूरा भोसकून मारले जाते. पण तुम्ही तोंडातून आवाज ही नाही काढलात.. माणूस काही तरी ओरडेल ना ? खरं होते ते. भाईंनी चूक मान्य केली. त्या परीक्षकांनी योग्य परीक्षण केले होते.. काही वेळा आपण माणसांबद्दल चुकीचे आडाखे बांधतो. ती खरी चूक आपलीच असते. पण आपला स्वतःचा अभिमान म्हणा किंवा पांढरपेशा असल्याचं भूत म्हणा आपल्या मानगुटीवर असतं नि अगदी नंतर आपल्याच आपण असे काय वागलो याची खंत लागते. तसा काहीसा हा प्रसंग ... बस तशी बऱ्यापैकी भरलेली होती. मध्ये मध्ये छोट्या गावात थांबतच चालली होती. सुरुवातीपासून बसल्याने मला कशीबशी मागे जागा मिळालेली. कुठल्याशा गावात गाडी थांबली. आदिवासी बायका त्यांच्या टोपल्या सावरत आत चढल्या. चालत्या गाडीत टोपल्या घेऊन उभे राहणे जिकरीचेच काम होते. त्यांना ते सवयीचे असावे. त्यात एका बाईच्या कडेवर लहान मूल होते. गाडी सुटता सुटता एक जोडपे आत चढले. पांढरपेशी जोडपे होते. या बाईंच्या ही कडेवर मूल होते. बाई सफाईदारपणे पुढे सरकल्या. मुलाला घेऊन मध्ये उभ्या राहिल्या. त्यांना बघून स्त्री दाक्षिण्य म्हणून एक बसलेला पुरुष उभा राहिला. बाईंना बसायला जागा देऊन स्वतः उभा राहिला. बाईंना जे घडले ते अपेक्षित होते. त्या हक्काने त्या जागेवर बसल्या...नाममात्र आभार मानून त्या जागेवर छान स्थिरावल्या. आदिवासी बाई बिचारी टोपली आणि मूल सांभाळत उभीच होती. बाकी बसलेले पुरुष प्रवासी डोळे मिटून किंवा चक्क दुर्लक्ष करत होते. प्रत्येकजण दुसरा कोणी उठेल आणि त्या आदिवासी बाईला जागा देईल असा विचार करीत असावा.. नव्हे तसेच होते. कारण त्यातलाच एक मी ही होतो की. खरंतर मी खूप मागे होतो त्या बाई पासून.. मी जागा दिली असती तरी त्या बाईला तेवढे मागे येणे जमले नसते. मी डोळे उघडून हळूच बघत होतो. त्या बाईचे हाल बघवत नव्हते. जागा ही सोडवत नव्हती. उगाचच अस्वस्थ वाटत होते. थोड्या वेळाने डोळे उघडले तर ती बाई दिसली नाही. बहुतेक मधल्या थांब्याला उतरली असावी. हुश्श्श..खूप सुटल्यासारखे वाटले. खरंतर मी ही इतरांसारखाच तर वागलो होतो की. डोळ्यावर झापड लावून दुसरा कोणी तिला जागा देतोय का बघत होतो. माझी जागा का देऊ शकत नाही याच्या मनातच अनेक सबबी तयार करत होतो. हे असे खूपदा घडते ना.. अर्थात कारणं ही खरी असतात. आपल्यालाच कशीतरी जागा मिळाली असते. त्यामुळे जागा सोडायला जीवावर आलेले असते.. किंवा आदिवासी बाई आहे..त्यांना सवय असते उभे राहण्याची हा एक विचार असतो, कधी महिलेस जागा दिली म्हणून लोक काय म्हणतील,. पण मग हा विचार त्या पांढरपेशी महिलेस जागा देताना येत नाही.आपली मदत तो माणूस शहरातला की खेड्यातला, कसे कपडे आहेत,कसा दिसतोय यावर ठरत असेल तर.. तर अशा या आठवणी माझ्या तुमच्या सारख्याच आहेत न ? राजेंद्र शशिकांत धबडे.