आई होती म्हणून..

31 0 0
                                    

लहानपणी सर्दी, पडस, ताप असेल तर फॅमिली डॉक्टर कडे जाणे व्हायचे. मोठा काही आजार म्हणजे जास्त खर्चिक असेल तर भायखळ्याच्या रेल्वे हॉस्पिटल मध्ये जात असू. वडील रेल्वेत असल्याने ही चांगली सोय होती आमच्यासाठी. हे हॉस्पिटल खूप मोठे होते..लहानपणी ते जास्तच मोठे वाटायचे. आम्हा भावंडांची आई बरोबर तिथे अधून मधून फेरी असायची. वय वर्ष आठ नऊ आसपास असावे. आईचे आमच्यावर आणि आमच्या अभ्यासावर लक्ष असे. एक दिवस तिला माझ्या डोळ्यांची उघडझाप जास्त होत असल्याचे जाणवले. तिने काळजीने जास्त वाचू नकोस म्हणून सांगितले. काही त्रास होतोय का हेही विचारले. तसा काही त्रास होत नव्हता. पण मला एक समजले की डोळे जास्त उघडझाप केल्याने आई वाचू नको,अभ्यास करू नको सांगते. मग मी अधून मधून तो प्रयोग करू लागलो. आईची काळजी वाढली. दोन तीन दिवसांनी आईने भायखळा हॉस्पिटलला मला घेऊन जायचे ठरवले. सकाळची गाडी पकडून आम्ही निघालो. शाळेला सुट्टी आणि रेल्वे प्रवास त्यामुळे मी काहीसा खूष. लहान असल्याने आई बरोबरच बायकांच्या डब्यातून प्रवास चाले. त्यामुळे गर्दी जाणवत नसे. भायखळा स्टेशनला उतरल्यावर डाव्या बाजूला वळून सरळ फुटपाथ पकडला की पाच मिनिटात हॉस्पिटल येत असे. मध्ये राणीचा बाग, भाजीपाल्याचे होलसेल मार्केट लागे. तिथे हमालांची डोक्यावर भाज्यांच्या गोणी घेऊन येजा चालू असे. फुटपाथवर बाटल्या विकायला ठेवलेल्या दिसल्या की हॉस्पिटल जवळ आलेले कळत असे. हॉस्पिटलची मोठी इमारत उगाचच दडपण वाढवत असे. आईने सर्व पेपर्स वगैरे काढले आणि आम्ही डोळ्यांच्या डॉक्टर असलेल्या वॉर्ड मध्ये प्रवेशलो. भरपूर गर्दी असलेल्या त्या जागेत आम्हाला कशीबशी बसायला जागा मिळाली. थोड्याच वेळात एका सिस्टरने येऊन डोळ्यात औषध टाकले. आईने पण डोळे तपासायचे ठरवले होते. तिच्या पण डोळ्यात औषध टाकले. डोळे चांगलेच झोंबले. नाकातून आणि डोळ्यातून पाणी आले. आईने माझे आणि तिचे डोळे रुमालाने पुसले. मागे डोके टेकून तसेच बसायला सांगितले. डोळे झोंबणे कमी होतंय तोच ती बया परत येऊन औषध टाकून गेली. परत खूप झोंबले. पुढे हा प्रकार काही वेळ चालू होता. उगाच डोळे मिचकावण्याचे नाटक केले असे वाटू लागले. नंतर डोळे पुरेसे झोंबलेत याची जणू खात्री करून आम्हाला आत डॉक्टरांकडे पाठवले. माझे आणि आईचे डोळे तपासून नंबर काढून दिला. मला काही महिने चष्मा लावायला लागेल असे सांगितले. चष्मा लावायचा ही कल्पना मला खूप आवडली. आम्ही दोघे जिना उतरून बाहेर जाण्यास निघालो. दोघांनाही डोळ्याने काहीसे अंधुक दिसत होते. हॉस्पिटलच्या गेट बाहेर आलो. दुपारचे रणरणते ऊन होते. उन्हाने डोळ्यासमोर पांढरा पडदा तयार झाला. तरी फुटपाथच्या कडेकडेने आम्ही चालत होतो. आम्ही दोघे हात धरून स्टेशनकडे चालू लागलो. थोडे पुढे गेल्यावर दिसणे अगदीच कमी झाले. समोरुन येणारी माणसे म्हणजे एखादी बारीक काठीची आकृती दिसायची. आईला पण तोच अनुभव येत होता. डोक्यात नको नको ते विचार येत होते. मी तर रडायचाच बाकी होतो. आई धीर देत होती. आपण आधी घरी पोहोचू मग ठीक होईल असं तिचं म्हणणं. हॉस्पिटल मध्ये असलेल्या गर्दीमुळे ती परत तेथे जाण्यास काही तयार नव्हती. आईने दिलेल्या हिमतीने मी निश्चिंत झालो. इतरवेळी आम्ही इथे आलो की भाजी खरेदी, किराणा खरेदी करत घरी परतत असू. किराणा दुकानदार दुकानात आलेल्या लहान मुलांना बोलत करुन हातात मूठभर काजू बदाम देत असे. या वेळी ते सर्व टाळून आम्हाला घर गाठण्याची घाई होती. कसेबसे स्टेशनला पोहोचल्याचे जाणवले. दोघे हात धरून जिना चढलो आणि एक नंबर वर आलो. एवढ्यात कोणीतरी ओळखीची व्यक्ती भेटली. जुनी ओळख असल्यासारखी बोलायला लागली. नक्की कोण ते आईला कळेना. कोणी भामटा असेल तर दिसत नाही म्हणून फसवायला नको म्हणून आई उगाचच काही तरी बोलली. शेवटपर्यंत तो माणूस कोण हे कळले नाही. ती व्यक्ती निघून गेली. आम्ही एक रिकामा बेंच अंदाजाने चाचपून त्यावर बसलो.. गाडीची वाट बघत. गाडी आली जाणवले की बाजूच्याना कोणती गाडी विचारायचे. दोन ठाणा गाडी गेल्यावर कल्याण आली. आम्ही दोघा तिघांना विचारुन खात्री करून कसेबसे गाडीत चढलो. इतर चढणाऱ्या लोकांच्या मागे मागे जाऊन गाडी पकडली. नशिबाने गाडी रिकामी असावी. आम्हाला जागा मिळाली. हॉस्पिटल सोडून अर्धा तास झाला असावा. आई खूप धीराने वागली. तिने दिसत नसल्याचे कोणाला अजिबात जाणवू दिले नाही. गाडीत फक्त बोलण्याचा आवाज येत होता. दिसत काहीच नव्हतं. मी वाऱ्यावर लगेच झोपी गेलो. आई काळजीने पूर्णपणे जागी होती. कोणते स्टेशन आले हे ती सारखे विचारत होती. डोंबिवली आल्यावर खात्रीकरून मला जागे करुन आम्ही उतरलो. तो पर्यंत थोडे थोडे दिसू लागले होते. घरी पोहोचेपर्यंत आमची नजर परत आली होती. न दिसण्याचा तो अनुभव खूप भयंकर होता. केवळ आईमुळे त्या प्रसंगाची झळ जाणवली नाही. नंतर चौकशी केली असता समजले की डोळ्यात औषध टाकले असता लगेच बाहेर पडायचे नसते. किंवा कोणाला तरी बरोबर घेऊन जायचे असते. त्या सिस्टरला बहुतेक आम्ही दोघेही डोळे तपासायला आल्याचा विसर पडला असावा. त्या नंतर गेल्यावर्षी मोतिबिंदू असल्याचं नक्की करण्यासाठी डोंबिवलीतच डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये एकटाच गेलो होतो. तिथल्या बाईंनी डोळ्यात औषध टाकताच परत मागचे दिवस आठवले. तीन ते चार वेळा औषध टाकल्यावर डोळे तपासले गेले. मी बाहेर आलो. त्या बाईंनी थांबायला सांगितले. कोणाला तरी बरोबर घेऊन यायला पाहिजे होते हेही सांगितले. घर जवळच असल्याने जाऊ शकेन याची मी त्यांना खात्री दिली. खाली उतरलो. परत रणरणत ऊन. इतिहासाची पुनरावृत्ती. मला दिसेनासे झाले. आई आठवली. आईने तेंव्हा किती शांतपणे परिस्थिती हाताळली. पटकन समोर येईल ती रिक्षा पकडून कसातरी घरी पोहोचलो. आईचे बरोबर असणे लहानपणी किती आश्वस्त करते आपल्याला. मोठा झाल्यावर मी तिला आश्वस्त करू शकलो का हा प्रश्नच आहे..राजेंद्र शशिकांत धबडे.

साठवणीतल्या    आठवणीWhere stories live. Discover now