बँकेत लागण्याच्या आधीचा काळ काहीसा कंटाळवाणा होता. नोकरीची गरज होतीच शोधही चालू होता. काही ठिकाणी ओळखीच्या संदर्भाने मुलाखतीला ही जाऊन आलो. त्यातलीच एक डोंबिवलीतील नामांकित कंपनी. तिथे पण काम नाहीच झाले. जे होते ते चांगल्यासाठी होते याचा नंतर प्रत्यय आला. ती कंपनी लवकरच बंद पडली आमचा पिढीजात व्यवसाय सोनारकाम ते तेवढे शिकण्याची तयारी नव्हती. वडील रेल्वेत नोकरीस. त्यामुळे आमच्याकडे तसे या व्यवसायाचे वातावरण नव्हते. माझे सख्खे काका,मामा आणि बरेचसे नातेवाईक यात होते. सोनार कामाला पूरक हिऱ्यांचा व्यवसाय. त्यात पण हीरे पारखणे, त्याला पैलू पाडणे पासून अनेक गोष्टी करण्यासारख्या होत्या. तसे ते आकर्षक क्षेत्र होते. का कोणास ठाऊक मन तयार नव्हते यातले काही करायला. बँकेच्या परीक्षा देणे चालू होतेच. बँकेत नोकरी करण्याची खूप इच्छा होती. तसे प्रयत्न ही चालू होते. दोनदा परीक्षा दिली होती. या वेळी तिसऱ्यांदा बँकेची आणि प्रथमच सरकारी नोकरी परीक्षा ही दिली होती. निकालाची वाट बघत होतो.एक दिवस दिलीप मामा ज्याचा उल्लेख खूपवेळा माझ्या इतर लेखात आला आहे, त्याने हीरे पारखी म्हणून काम करायला आवडेल का विचारले. अर्थात रितसर शिक्षण घेऊन...मी रिकामाच असल्याने हो म्हटले.. काही तरी नवीन शिकायला मिळाले असते हे एक कारण होते. माझा हा मामा हीरे उद्योगातला नावाजलेला रत्नपारखी. आज त्याची पार्ल्यात पेढी आहे. त्यावेळी तो ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर मधील एका प्रसिद्ध कंपनीत नोकरीस होता. ही एक मोठी कंपनी.. इथे खाणीतून आलेल्या दगड रुपात असलेल्या हिऱ्याचे पारखणे होऊन त्या दगडाचे पैलू पाडून हिऱ्यात रूपांतर करण्याचे काम चाले. माझा लहान भाऊ संजय, आताचा सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक तिथे तेंव्हा असोर्टर म्हणून काम करत होता. त्याच्या पुढील यशस्वी प्रवासात या कंपनीचा आणि मामाचा मोठा हात होता. प्रसाद चेंबरमधीलच बाराव्या मजल्यावरील एका मोठ्या नामांकित कंपनीत मला मुलाखतीस बोलावले. अर्थात मामाच्या ओळखीनेच. मला अपेक्षा कारकुनी जॉबची होती. मुलाखत म्हणजे नाव,शिक्षण विचारुन पाच सहा मोठ्या संख्याची सरासरी काढायला सांगितली. मी ती काढली. मला तेथे ट्रेनी असॉर्टर म्हणून नोकरी दिली गेली. पगार रुपये अडीचशे फक्त. एक वर्षांनी साडेसहाशे. खरंतर अशा कंपनीत मौल्यवान वस्तूंची हाताळणी होत असते त्यामुळे इथे विश्वास महत्वाचा असतो. अशा ठिकाणी नोकरी ही तुम्ही कोणाच्या ओळखीने आलात यावर अवलंबून असते. मला दोन दिवसांनी येण्यास सांगितले.मी दोन दिवसांनी हजर झालो. संजूचे पण त्याच बिल्डिंग मध्ये ऑफिस.. त्यामुळे दोघेही बरोबरच निघालो. आमच्या कंपनीचे हे ऑफिस फारच देखणे होते. पूर्ण एसी, सुंदर सुशोभित असे हे कॉर्पोरेट ऑफिस होते. बाराव्या मजल्यावरून रॉक्सी सिनेमा, आजूबाजूचा परिसर आणि एका बाजूने अथांग समुद्र छान दिसत होता... इथे तयार हीरे व इतर रत्न पारखून त्यांची आयात निर्यात होत असे. मोठा कारभार होता. मला हीरे पारखण्याच्या मोठ्या केबिन मध्ये नेण्यात आले. आत एक मोठे आयताकृती टेबल आणि समोरासमोर बसलेले पंधरा सोळा अॅसॉर्टर म्हणजेच रत्नपारखी. प्रत्येका समोर असलेल्या पेपर पॅड वर हिऱ्यांची रास.. हातात असलेल्या आय ग्लासने सर्व जण पारखण्याचे काम करत होते. चिमट्याने खालील राशीतला एक हीरा उचलून पारखायचा आणि गुणवत्तेनुसार त्याचे वर्गीकरण करायचे. असे काहीसे काम होते. माझी ओळख करून देण्यात आली. मी सोडून सर्वजण गुजराती होते. दोन तीन मुली होत्या. माझी जुजबी माहिती विचारली. डोंबिवलीहून रोज येणार म्हटल्यावर सगळ्यांनी हातभर जीभ बाहेर काढली. त्यांना डोंबिवली म्हणजे खूप लांब वाटत होते. मी रोज कसा काय येऊ शकणार याबद्दल ते साशंक होते. हे सगळे जण मुंबईतले पश्चिम रेल्वेवर कांदिवली, मालाड,बोरीवलीत राहणारे. मला बसायला जागा, आय ग्लास आणि पॅड दिला गेला. बरोबर एक छोटा हीरा दिला बघून शिकण्यासाठी. आय ग्लास कसा पकडायचा हे थोडक्यात शिकवले. आणि ते सर्व आपल्या कामात, बोलण्यात गुंग झाले. मला शिकवण्यात त्यांना जास्त स्वारस्य नसावं हे जाणवले. कदाचित जास्त कामामुळे हे असावे. मग बाजूच्याला विचारत विचारत माझा तिथला दिवस सुरू झाला. दुसऱ्या दिवशी आणि एक नवीन मुलगा आला. सुदैवाने तो मराठी होता. एकास दोघे आल्याने जरा बरं वाटलं. तो बिचारा अगदीच साधा होता. नुकताच तळ कोकणातून आलेला होता. पहिले दहा पंधरा दिवस एक हीरा दिवसभर विविध कोनातून बघायला सांगायचे. काही वेळाने ते खूप कंटाळवाणे व्हायला लागले. त्यात आम्ही दोघे नवीन काहीसे बुजलेले, त्यामुळे बोलणे कमीच व्हायचे.. इथे कामाबरोबरच गप्पा भरपूर चालायच्या. अर्थात गुजरातीतून.. एकच हीरा एक टक बघितल्याने झोप यायची. जेवल्यावर तर झोप जास्तच यायची. जास्त कामामुळे नीट शिकवणे व्हायचे नाही. त्यामुळे मी मामाकडून नीट माहिती घ्यायचो. त्याने छानच शिकवले. हळू हळू माहिती होत गेली. आय ग्लासचा अजून एक प्रकार म्हणजे घोडी, या वर थोडे वाकून हिऱ्याच्या राशीतले हीरे बघायला लागायचे. काही हीरे इतके लहान असत की नुसत्या श्वासाने देखील उडायचे. त्यामुळे काळजीपूर्वक काम करावे लागे. अर्थात देतानाच वजन करून हीरे दिले जायचे. त्याच्या विशेष कागदी पुडीवर ज्याला तिकडे पडिका/पुडीका असे म्हणतात त्यावर वजन लिहिलेले असे... तेव्हढेच वजन देताना असले पाहिजे. प्रसंगी वजनात जास्त घट आली तर एखादा हीरा खाली पडलाय का हे बघणे नाहीतर टेबलाखाली झाडू घेऊन झाडावे ही लागे. बहुतेक वेळी पडलेला हीरा मिळायचा.. काही प्रमाणात घट ही गृहीत धरली जायची. हिऱ्यांचे एवढे रंग, प्रकार तिथेच समजले. गुलाबी छटा असलेला हीरा सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ त्या नंतर निळसर छटा आणि नंतर पांढराशुभ्र. हिऱ्याची किंमत त्याचा रंग,पैलू आणि चमकदारपणा यावर ठरते. काही हिऱ्यांवर डाग असतात . आय ग्लासने ते दिसू शकतात. हिऱ्यांच्या वर्गीकरणात, किंमतीत या गोष्टींचा विचार केला जातो. सिंगल कट, डबल कट आणि इतर गोष्टी हळू हळू कळू लागल्या. या व्यवसायात विश्वासाला जास्त महत्त्व. माझ्याबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला असावा दिवसभर गुजराती ऐकुन मला पण ही भाषा समजू लागली. बोलता येईल असे वाटू लागले. दिवसभर सहकाऱ्यांच्या कामाबरोबरच गप्पा चालू असतं. रेडिओ चालू असे..छान हिंदी गाणी ऐकत काम चाले. मधून मधून आम्हा दोघांना त्यात सामील केले जाई. डोंबिवली बद्दल त्यांना भयंकर कुतूहल असे. डोंबिवलीत रेल्वे, फोन, टॉकीज वगैरे आहे का.. हे देखील एकाने विचारलेले आठवते. डोंबिवली म्हणजे एखादे परग्रहावरील ठिकाण वाटायचे. त्याचा फायदा देखील व्हायचा. कधी कधी रविवारी कामावर बोलावले जायचे. त्याचे वेगळे पैसे ही मिळायचे. पण मला मुंबईत रविवारी यायचे याचे जाम टेन्शन असायचे. पण हे इतर सहकारी आधीच सांगायचे.. "राजन, तुम नही आयेगा तो चलेगा..." मला बरेच वाटायचे. पडत्या फळाची आज्ञा.. हिऱ्यासारखी मौल्यवान गोष्ट बघायला, हाताळायला मिळायची याचा आनंद होताच. टेन्शन ही तेवढेच असायचे. त्यामुळे हीरे घेताना आणि देताना वजन करूनच घ्यायचे हे कटाक्षाने पाळावे लागे. वजनात घट जास्त असेल तर भरून द्यावी लागे. सुदैवाने तसे कोणाच्या बाबतीत झालेले बघितले नाही. सर्वत्र सीसी टीव्ही कॅमेरे असायचे. तसे हे क्षेत्र जोखमीचेच. आपण मराठी माणसें एकंदर धंद्यात मागेच पण बऱ्यापैकी प्रामाणिक... त्यामुळे इथे आपल्याला तसा चांगला डिमांड असावा. पण का कुणास ठाऊक.. या नोकरीत मराठी माणूस मागेच होता. आज याचे शिक्षण देणाऱ्या संस्था देखील आहेत. एकदा काही माल बाहेर पाठवायचा होता. मला देखील बरोबर जाण्यास सांगण्यात आले. एका कापडी पिशवीत प्लॅस्टिकची पिशवी त्यात पॅक करून सिल केलेला माल चेक केला गेला आणि मग निर्यातीसाठी स्वीकारला गेला. अशीच दुसऱ्या कंपनीची माणसे देखील आलेली होती. त्यांनी ही तशीच पॅक करून मोठी पिशवी आणली होती. चेक करण्यासाठी पॅकिंग उघडले आणि त्यांचे काही हिरवे खडे खाली पडले. ते पाचू होते. खाली वाकून त्यांनी ते उचलले. एक दोन खडे खालीच कडेला राहिले होते. मी त्यांना दाखवले. त्यांनी चक्क दुर्लक्ष केले. हे त्यांच्यासाठी नेहमीचेच असावे. माझे लक्ष त्या पाचू वर लागले होते. त्या खुर्ची खाली अगदी अडचणीच्या जागी होते ते. अर्थात लोक लज्जेस्तव मी ते घेण्याची हिंमत केली नाही..जवळपास एक वर्ष मी त्या कंपनीत काम केले. हीरे पारख आणि त्यांची किंमत ठरवणे हे काहीसे जमू लागले होते.माझ्याबद्दल, कामाबद्दल मत बरे झाले होते..हळू हळू जम बसू लागला होता. तरीही या कामात मन लागत नव्हते. स्टेट बँकेची परीक्षा परत दिली होती. निकालाची वाट बघत होतो. एक दिवस लिखित परीक्षा पास झाल्याचे कळले. यथावकाश इंटरव्ह्यू पास होऊन बँकेत नोकरीचे पत्र आले. खूप आनंद झाला. पहिली शाखा महाड होती.. त्याचवेळी सेल्स टॅक्सचे ही नेमणूक पत्र आले. दोन्हीत स्टेट बँक उजवी ठरली. मी महाडला जायचे ठरविले.कंपनी सोडण्या आधी मी तिथे पेढे वाटले. कंपनीच्या मालकांना कल्पना दिली नव्हती. नेमके पेढे वाटताना तेच समोर आले. गोंधळून गेलो..मग त्यांना ही एक पेढा दिला. त्यांनी कारण विचारल्यावर बँकेत नोकरी लागल्याचे सांगितले. ही नोकरी सोडून बँकेत जाणार याचे त्यांना खूप आश्चर्य वाटले. महाड म्हटल्यावर तर एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथे चांगली प्रगती करता येईल असे सांगितले. त्यांनी तसा आग्रह ही केला. ते म्हणत होते ते खरेही होते. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कंपनीतील सर्वांचा निरोप घेऊन बँकेत हजर झालो..माझ्या आवडत्या क्षेत्रात.या एका वर्षाच्या नोकरीत मामामुळे छान अनुभव मिळाले. एक वेगळे क्षेत्र बघितले, नवीन काही शिकलो..इथे राहिलो असतो तर कदाचित मी काही वेगळा असतो. कारण तो आमचा पिढीजात व्यवसाय आहे आणि राहील.बँकेच्या नोकरीमुळे एका चांगल्या क्षेत्राला मुकलो. माझ्यासारख्या कच्च्या दगडाला थोडे पैलू पडले..अगदी हीरा जरी झालो नाही तरी दगड ही राहिलो नाही..राजेंद्र शशिकांत धबडे.