आई जाऊन आज पंधरा वर्ष पूर्ण झाली. रोहनने तिच्या लाडक्या नातवाने आज स्वतः जेवण बनवून तिच्यासाठी ताट बनवले. आई आणि त्याचे एक वेगळेच नाते होते. त्याच्या आठवणीत आजी नेहमीच असते. आई काही दिवसांची सोबती आहे हे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा धक्का बसला. परंतु आई तिच्या जिद्दीवर पुढील आयुष्य जगली.. स्वतःचे स्वतः करून. शेवटचा काही काळ ती बायपॅप नामक मशीन लावूनच होती. त्यातूनही तिची काहींना काही धावपळ चालू असायची. विणकाम, भरतकामाचे क्लासेस ती स्वतः घ्यायची. जमलच तर एखादा पदार्थ बनवायची. छोटीमोठी कामे करायची. शेवटचे एक दोन महिने तिचे आजारपण जास्त असल्याने आम्ही गावाबाहेर जाण्याचे टाळले होते. अशात ऑफिस मध्ये गोव्यासाठी एक दोन दिवसांचे ट्रेनिंग आले होते. दोघांना पाठवायचे होते. एक जण नक्की झाला होता. दुसरे कोणी तयार होत नव्हते. मला विनंती केली गेली. घरी आईची तब्येत केंव्हा बिघडेल सांगता येत नव्हते. त्यामुळे घरची परिस्थिती बघून ठरवतो असे सांगितले. सौ शुभांगीशी बोललो. तिच्या म्हणण्या प्रमाणे जायला काही हरकत नव्हती. आईची प्रकृती तशी स्थिर होती. शुभांगी काळजी घ्यायला समर्थ होती. वडील आणि रोहनही होतेच सोबतीला. थोडा बदल म्हणून मी आश्वस्त होऊन जाण्यास तयार झालो. जाण्याच्या आदल्या दिवशी आईशी बोललो. ट्रेनिंग बद्दल बोलणे झाले. आईने देखील जाण्यास सांगितले. जाताना बोलली.. काळजी घ्या तिथे. पाण्यात वगैरे जाऊ नको. तिच्या त्या जीवघेण्या आजारात ही तिला माझी काळजी होती. लहानपणी आई आम्हाला सायकल कधी चालवून द्यायची नाही.. अपघात होतात म्हणून. बाईक वगैरे तर फार पुढची गोष्ट होती. आम्ही तिच्या नकळतच हे शिकलो. ट्रेनिंगला गेलो, एक दिवस पूर्ण झाला आणि फोन आला आईची तब्येत जास्त आहे म्हणून. रात्री किंवा सकाळी विमानाने निघण्याचे ठरवले. रात्री उशिरा शुभांगीचा परत फोन आला. घाई करू नकोस. उद्या ट्रेनिंग पूर्ण करून आलास तरी चालेल. तब्येत काहीशी स्थिर आहे. ट्रेनिंग संपले आणि लगेच निघालो. तब्येत स्थिर असल्याने रेल्वेने रात्री निघालो. मनात आईचे कसे असेल.. बरी असेल बहुतेक हेच विचार होते. गाडी वेळेवर पोहोचली. दिव्याला उतरणार होतो. कशी कोणास ठाऊक झोप लागली आणि ठाण्यास उतरलो. धावपळ झाली. डोंबिवलीत पोहोचेपर्यंत सात साडेसात वाजले. पटकन घरी जाऊन अंघोळ करून हॉस्पिटलमध्ये जाऊ असा विचार करून प्रथम घरी पोहोचलो. आंघोळ आटोपली आणि फोन आला आई सिरीयस आहे. लगेच निघालो. हॉस्पिटल मध्ये पोहोचलो तेंव्हा डॉक्टरांची आईला वाचवण्याची शेवटची धडपड चालली होती. थोड्याच वेळात डॉक्टरांनी बाहेर येऊन आई गेल्याचे सांगितले. थोडा आधी पोहोचलो असतो तर आई भेटली असती. उगाच ट्रेनिंगला गेलो. अस्वस्थ वाटत होते. मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो. अचानक लक्षात आले.. आई मी येईपर्यंत होती. मी घरी न जाता हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर आई मला भेटली असती. आईने मला सुखरुप पोहोचल्याचे बघितले असते. नक्कीच ती माझी वाट बघत होती. तिच्या अंतरात्म्याला मी पोहोचल्याचे कळले असावे का.. नक्कीच तसेच असावे. आईच ती .. म्हणूनच का ती या जगाचा निरोप घेताना माझी वाट पाहत होती ? ती गेली पण एक प्रश्न मागे ठेवून गेली . मी अजून त्याचे उत्तर शोधतो आहे...राजेंद्र शशिकांत धबडे.