या पुस्तकांच्या घरात...

38 0 0
                                    

पाच वर्षांपू्वी आवास येथे गेलो होतो. आम्ही सर्व कुटुंबीय खूप दिवसांनी एकत्र बाहेर पडलो होतो..दोन दिवस राहून परत घरी असा काहीसा बेत होता. आवास येथे असलेले जाधव यांचे हॉलिडे होम आमचे उतरण्याचे ठिकाण होते.. आवास जवळ बघण्यासारखे म्हणजे अलिबाग,किहीम,मुरुड, रेवदंडा ..ते खूप वेळा बघून झाले होते. तसा ही आमचा फिरण्याचा मूड नव्हता त्यामुळे हॉटेलवरच राहून आराम केला. त्यात जाधवांचा पाहुणचार, अगत्य खरंच छान होते. जेवण तर उत्तमच. लवकरच नुसता रुम वर थांबण्याचा कंटाळा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी असेच सर्व बाहेर पडलो. जवळच असलेल्या सासवणे गावात पोहोचलो. करमरकरांचे शिल्पालय दिसले. आधी एकदा बघितले असून ही परत आत शिरलो. करमरकरांची सगळीच शिल्प अप्रतिम. अगदी चेहऱ्यावरचे हावभाव देखील खरेखुरे वाटावे अशी ती शिल्प बघून मन भरून गेले. मागच्या वाडीत असलेली शिल्प बघायला गेलो. करमरकरांच्या सूनबाई एकट्या सध्या तिथला कारभार बघतात. कामाला माणसे असतात. सध्या त्या सूनबाई तिथेच असल्याचे कळल्याने भेटण्याचे ठरवले. त्यांनी लगेच अगत्याने आत बोलावले. रोहनने, माझ्या मुलाने वाढलेल्या केसांचा बो बांधलेला आणि त्याला साजेसे कपडे असल्याने तो कलाकार असला पाहिजे असा बाईंचा अंदाज. बाईंनी तसे विचारले देखील. रोहन मेंडोलिन उत्तम वाजवतो त्यामुळे बाईंचा अंदाज चुकीचा नव्हता. पंच्याहत्तरी पार केलेल्या या बाई काही वर्षे परदेशात होत्या. घर छान ऐसपैस होते आणि छान ठेवलेही होते. त्यांनी सगळी छान माहिती दिली. गप्पा रंगल्या. त्या वाचत असलेले इंग्लिश पुस्तक रोहन आणि सून, स्नेहाने वाचलेले होते. त्या पुस्तकावर चर्चा झाली. त्यामुळे गप्पांची दिशा आपोआप वाचनाकडे वळली. आम्ही सर्वच कुटुंबीय वाचनवेडे. त्यांना देखील वाचनाची आवड.. त्यांनी प्रेमाने त्या वाचत असलेले ते पुस्तक रोहनला भेट दिले. बरोबर रवींद्रनाथ टागोरांचे ही एक पुस्तक भेट म्हणून दिले.. सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकरांनी शिल्पकार करमरकरांवर नुकतेच एक छान पुस्तक लिहिले होते. बाईंनी पुस्तक कसे लिहून झाले याची छान कथा सांगितली.. आम्ही भारावून सगळं ऐकत होतो. बाईंनी ते पुस्तक दाखवले. सुबक बांधणीचे ते शिल्पकार करमरकरांचे चरित्र खरंच वाचनीय वाटले. आम्ही ते पुस्तक विकत घेतले. आमचा वाचनातला उत्साह पाहून बाईंनी एक अमूल्य माहिती दिली. शिल्पकार करमरकरांनी त्या काळात अनेक पुस्तकं जमा केली होती. इंग्रजी,मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह होता त्यांचा. रोहन आणि स्नेहा जरा चाचरतच बोलले. आम्ही पुस्तकं बघू शकतो का ? या वरील बाईंचे उत्तर आम्हाला अनपेक्षित होते... बाई म्हणाल्या.. नक्कीच बघू शकता आणि तुम्हाला पाहिजेत ती पुस्तकं तुम्ही घेऊनही जाऊ शकता. फक्त मराठी सोडून. मराठी पुस्तकं गावातल्या लोकांसाठी राखून ठेवली आहेत. रोहन आणि स्नेहा पडत्या फळाची आज्ञा समजून लगेच उठले आणि ती पुस्तक असलेल्या खोलीत गेले. आमच्या गप्पा चालूच होत्या. थोड्याच वेळात दोघेही हातात पुस्तकं घेऊन आले. तीस चाळीस पुस्तकं असतील. रोहनने मला हळूच विचारले एवढी पुस्तकं घेऊ का ? एवढी पुस्तकं बघून मीही काहीसा गडबडलो. म्हटलं.. विचारून घे. त्याने बाईंना विचारले. बाईंनी पुस्तके बघितली ही नाहीत. सगळीच जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं होती. त्या पुस्तकांवर परत थोड्या गप्पा झाल्या. ''एवढीच पुस्तकं घेतलीत. अरे घ्यायचीत ना आणखीन. नाहीतर एक काम कर.. पुढे येशील तेव्हा टेम्पो घेऊन ये. तुम्हाला पाहिजेत तेवढी पुस्तकं घेऊन जा. मला विचारायला ही येऊ नकोस. या आमच्या कामावरल्या बाईना सांग फक्त. त्या तुला खोली उघडून देतील. अट तीच.. फक्त इंग्रजी पुस्तकं घेऊन जायची'. बाईंनी आग्रहाने सांगितले. ती पुस्तकं घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. मनोमन आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. रोहन आणि स्नेहा यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या खोली मध्ये खरंच खजिना होता. खूप जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं तिथे होती. घेशील किती दो करांनी अशीच अवस्था झाली होती त्यांची. खरंच टेम्पो घेऊन जायला हरकत नव्हती. अर्थात पुढे जाणे झाले नाही. जाधवांच्या छान आदरातिथ्याचा आणि करमरकर बाईंच्या औदार्याच्या रम्य आठवणी मनात ठेवून आम्ही घरी पोहोचलो.... शरीराने फ्रेश झालोच होतो पण पुस्तकांमुळे मनाने जास्त फ्रेश झालो होतो.. राजेंद्र शशिकांत धबडे.

साठवणीतल्या    आठवणीWhere stories live. Discover now