वश भाग १
टीप - सदर कथा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्यासाठी लिहिली गेली नाहीये. शिवाय कथेमध्ये लिहिले गेलेले स्थळ, काळ आणि व्यक्ती वर्णने हि काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजण्यात यावा आणि तोंडात (स्वतःच्या) बोटे घालून आश्चर्य व्यक्त केले जावे.
******
नरहरी पंडित सडकेवरून भरभर चालले होते. तळपणाऱ्या सूर्यापेक्षाही त्यांच्या केशविरहित डोक्यामध्ये प्रचंड आग भरली होती. त्या आगीसमोर सूर्याचा दाह शीतल वाटावा इतकी ती तप्त होती. आजवर भूक, दारिद्र्य आणि विवंचना ह्याची तमा न बाळगलेल्या, एका विद्येशी प्रामाणिक अशा पंडितावर अपमानाचा आसूड चालवला गेला होता. आजवर सत्याच्या बाजूनेच उभे राहत त्यांनी कोणाशीही कसलाच खोटेपणा केला नाही. पैशासाठी दांभिक पणा करणारया ज्योतिषांपैकी नरहरी पंडित नव्हते. त्यांना आज असल्या हिणकस आरोपांना सामोरे जावे लागले होते.
"पैशासाठी काहीही करू शकतात असली दळभद्री माणसे ..." एवढे नीच वाक्य त्यांच्याबद्दल उच्चारले गेले होते. सतत ते वाक्य त्यांच्या मस्तकात दणके देत होते.
अर्थार्जनासाठी विद्या वापरली असती तर कदाचित शहरातल्या मोठ्यात मोठ्या व्यक्तींमध्ये गणना होण्याइतपत पैसा नक्कीच कमावला असता. पण गुरुआज्ञा आणि ग्रहण केलेल्या विद्येचा बाजार न मांडण्याचा वैयक्तिक प्रण ह्या मुळे त्यांनी सतत त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीचे हितचं साधले होते. त्यांची मृदू वाणी त्यांच्या मनातला कनवाळूपणा दर्शवत असे. त्यांच्याकडे अडचणी घेऊन येणार्यामध्ये श्रीमंत, गरीब असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. सर्वच जीवांना मृत्युलोकीं समान दर्जा असतो. केवळ द्रव्यार्जन जास्त करून भौतिक सुख जास्त भोगणारे उच्च आणि पोटासाठी कष्ट करणारे नीच दर्जाचे असे त्यांना कधीही वाटले नाही.
त्यांनी कधीच दक्षिणेसाठी हात पुढे केला नाही कि कधी कशासाठीच लाचारी पत्करली नाही. साठीत आलेल्या नरहरी पंडितांच्या विद्वत्तेला मानत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणारे लाभार्थी मात्र वाढत गेले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कायम घराबाहेरच्या व्यक्ती जोडल्यामुळे कधीही संसार करण्याचं मनात आणलं नाही. कदाचित परोपकारासाठी आणि विद्येच्या अखंड साधनेसाठी त्यांना संसार अडचण वाटली असावी. शिवाय विकारांवर प्रभुत्व मिळवल्याशिवाय निर्लेप साधना करता येत नाही असे त्यांच्या गुरूनी त्यांना सांगितले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य विकारांवर ताबा मिळवत ज्ञानार्जन आणि साधनेत घालवले होते. आजचा प्रसंग घडण्यासाठी कारण होते कि त्यांनी स्वतःच आजन्म पाळलेला नियम मोडला. ते कधीही कोणाच्या घरी जात नसत. ज्यांना गरज होती ते लोक त्यांच्याकडे येत होते. कोणाचाही उंबरा ओलांडून त्यांनी कसलाही पाहुणचार कधी घेतला नव्हता. अतिशय व्रतस्थ असे आयुष्य घालवलेल्या नरहरी पंडितांना आपण असे का केले? ह्याचाही राग आला होता. पहिल्यांदाच त्यांनी खूप जुन्या परिचितांचे ऐकले होते.