वश भाग २
कुबड्या मरून २० दिवस लोटले होते. जगात त्याच्या मारण्याची ना कोणाला फिकीर होती ना तसदी. त्यामुळे त्याचे क्रियाकर्म बेवारस म्हणून केले गेले. रात्रीच्यावेळी कचऱ्यातून कुबड्याला लागणाऱ्या गोष्टी गोळा करून नेताना त्याला एका भरधाव गाडीने उडवले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणीही पहिले नाही. पण मरणाआधी कूबड्याने गाडी ऊडवल्यावर त्याला बाहेर येऊन पाहणारे आणि तसेच निघून जाणारे गाडीतले ते जोडपे पाहीले होते.
शहराच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या कडेला असलेल्या ओसाड स्मशानात त्याच्या जळणाची तयारी करून तिथला माणूस त्याची चिता पेटून निघून गेला होता. खाली आग पेटली होती. रोज रोज काय जळणारी मढी बघत बसायची म्हणून त्यानं ताडीची बाटली तोंडाला लावली आणि निघून गेला. तो गेल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. चितेची आग कशीबशी फरफरत थोडा वेळ जिवंत राहिली. नंतर पावसाचा जोर थोडासा वाढला हळूहळू धुमसत धुमसत ती विझून गेली. सर्वदूर शांतता पसरली होती. वाऱ्याचा आणि पावसाच्या माऱ्याचाच आवाज तेवढा येत होता. अमावास्येमुळे गर्द काळोख पसरला होता.
एका घुबडाची तेवढी अधून मधून घु घु .. ऐकू येत होती ती पण काही वेळाने थांबली. सळसळणारी सरपटी जनावरे पण झुडुपांच्या आसऱ्याला गेली. शांततेला गडद अंधारामुळे भयकारी रूप आले होते. तितक्यात चितेच्या जवळ दबका पुरुषी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. "आय...आय...आय..आssss...हं....हं ...हं ... " ते रडणे त्या वातावरणात अतिशय भयाण होते.
" कुत्र्यासारखे मरण येणार्यांची वासलात पण कुत्र्यासारखीच लावली जाते लक्षात ठेव." शांततेला चिरत एक घनगंभीर आवाज आला.
सोबतच पावसाच्या थेंबांवर एक आकृती प्रकट झाली.
"आता रडून काय उपयोग? तू संपलाच आहेस. देहाची विटंबना पाहणे आणि झुरत बसने ह्याव्यतिरिक्त तुला काही पर्याय आहे का? " त्या आकृतीने चितेच्या रोखाने प्रश्न विचारला.
चितेजवळ पण एक आकृती उमटली." मंग काय करू?... हूं ....हूं ... हूं ..."
"प्रतिशोध घे. ज्याने तुला असे मरण दिले त्याचा. मी मदत करेन. पण त्यासाठी तू मला मदत करायची आहेस." आकृती परत म्हणाली.