टॅक्सी ने वेग घेतला आणि स्वराला थोडी झोप लागली ... घाटकोपर आलं असेल टॅक्सी गोदरेज समोरून जात होती तेवढ्यात करकचून ब्रेक लागले आणि टॅक्सी झटक्याने थांबली .. स्वरा दचकून जागी झाली .. तिला लक्षात आलं कि आपण विक्रोळीच्या समोर आहे आणि ठाणे यायला खूप वेळ आहे .. तिने बघितलं तर टॅक्सिवाला खाली उतरून टॅक्सिचे टायर चेक करत होता .. तिने खिडकीची काच खाली केली आणि विचारलं
क्या हुआ भय्या ?
मॅडम टॅक्सी पंचर हो गयी
अब
मॅडम मै आपको दुसरी टॅक्सी कारके देता हू
स्वरा खाली उतरली आणि तिने बघितलं रस्ता चालू होता पण टॅक्सी मिळेल एवढ्या रात्री? तिने फोन काढला आणि बघितलं रात्रीचे १ वाजून ३५ मिनिट झाले होते .. तिने उबर ओपन केली आणि टॅक्सी बुक केली .. थोडा वेळ लागला पण टॅक्सी कॅन्सल झाली .. ती रस्त्यावर उभी राहून टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात एक कार तिच्या बाजूला येऊन उभी राहिली ..
कुठे जायचंय ?
स्वराने दुर्लक्ष केलं ..
मग तो खाली उतरला .. छान सूट घालून होता तो ...
सॉरी रात्र खूप झाली आहे कुठे जायचंय तुम्हाला ? म्हणजे मी कुठे पण नेऊ शकतो ..
म्हणजे ? ती उसळली ... त्याच्या बघण्याच्या दृष्टीकोनातून तिने ताडलं कि हा आपल्याला देहव्यवसाय करणारी मुलगी समजतोय
म्हणजे काय ? हे कशाला वेड पांघरून पेडगावला जाणे ?.. सरळ विचारलं .. किंमत तुम्ही म्हणाल ती .. त्याने पुन्हा स्वराकडे बघून म्हटलं ..
काय ? लाज नाही का रे वाटत तुला ? चांगल्या घराचा दिसतोस आणि हो चांगला पन्नाशीतला आहेस .. म्हणजे लग्न झालं असेल तुझं ..
तुला त्याच्याशी काय करायचंय ? चालायचं असेल तर बोल
आता एक शब्द बोललास तर कानाखाली झिणझिण्या येतील.. समजलास ?
ये .. जास्त बोलायचं नाही
आता जातोस कि करू १०० ला फोन .. कोण समजलास मला .. तुझ्या इतकीच मेहनत करणारी मी आहे .. माझी टॅक्सी खराब झाली म्हणून मी खाली उतरली ...