दिवाळी

613 3 0
                                    


अजिंक्य बाल्कनीत स्टुलावर चढून आकाशकंदील बांधत होता. त्यानं आणि गौरीनं काल रात्री ऑफिसमधून आल्यावर घरीच हा आकाशकंदील बनवला होता. गणपती, दिवाळी, ख्रिसमस, न्यू ईयर, पाडवा, दसरा... अशा प्रत्येक सणाचं डेकोरेशन घरच्या घरीच करायचा नियम दोघांनी सुरुवातीपासूनच पाळला होता. ऑफीसमधून कितीही दमून घरी आले तरी या कामासाठी दोघांचाही उत्साह नेहमीच टिकून रहायचा. सामान खरेदीपासून प्रत्यक्ष सजावट करण्यापर्यंत दोघं सतत एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या साथीनं मनापासून काम करायचे.

लग्नाला दहा वर्षं होऊन गेली तरी प्रेम पातळ झालं नव्हतं, त्यामागं ही एकत्र कामातली एक्साईटमेंट नक्कीच महत्त्वाची होती.

वरच्या हुकला बांधलेली आकाशकंदीलाची दोरी अजिंक्यनं ओढून बघितली. काम फत्ते झाल्याची खात्री करून तो खाली उतरला. बेडरूममधे येऊन त्यानं आकाशकंदीलाचं बटण दाबलं आणि तो चालू करून बघितला. आकाशकंदीलाच्या पाकळ्यांमधून लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश बाल्कनीभर पसरला. रात्रीच्या अंधारात अजून छान दिसेल, असा विचार करत त्यानं बटण बंद केलं, तेवढ्यात किचनमधून गौरीचा आवाज आला.

"अजिंक्य... ए अजिंक्य... जरा पटकन इकडं ये ना. मला बेदाणे पाहिजेत लवकर."

"हो हो, आलो आलो," असं म्हणत अजिंक्य पळतच किचनमधे गेला आणि गौरीच्या समोर उभा राहिला. "कसली घाई झालीय तुला? कुठं ठेवलेत बेदाणे?"

"अरे, हे रव्याचे लाडू वळायला खालीच बसले पातेलं घेऊन. दोन लाडू वळून झाल्यावर आठवलं की बेदाणेच घातले नाहीत... बेदाण्यांशिवाय रवा लाडू म्हणजे, सलमानशिवाय दबंग आणि अजय देवगणशिवाय सिंघम! तिथं फ्रीजवर पाकीट ठेवलंय बघ समोरच... अरे, ती अरुंधती जाणार आहे ना आज मुंबईला... दुपारची ट्रेन आहे तिची स्टेशनवरुन. तिला फराळाचा डबा द्यायचं प्रॉमिस केलं होतं मी. नेमकी दिवाळीमधे बिचारीची कॉन्फरन्स आली बघ. तशी इथंपण एकटीच राहते म्हणा ती... मग दिवाळी पुण्यात केली काय आणि मुंबईत केली काय, दोन्ही सारखंच. पण माझ्या हातचे रव्याचे लाडू जाम आवडतात तिला. म्हणून मीच म्हटलं, फराळाचा डबा देते सोबत. एकटी असलीस तरी हॉटेलवर नाष्टा करण्यापेक्षा फराळच कर, दिवाळीच्या दिवशी... बाकीचं सगळं भरून झालंय डब्यात, नेमके हे रव्याचे लाडूच राहिलेत. आता वळून झाले तरी सुकवायला वेळ कुठाय? असेच ओले डब्यात भरून देते... अजिंक्य... काय झालं? असा बघत काय उभा राहिलास? आण ते पाकीट इकडं..." असं म्हणत तिनं अजिंक्यच्या हातातलं पाकीट हिसकावून घेतलं.

चरमसुख ( लघु प्रणय कथा) Donde viven las historias. Descúbrelo ahora