कस्तुरी कन्या भाग १०:

310 3 0
                                    

पुढले दोन तीन दिवस आणि रात्री शिवानी आणि गुप्ता यांनी कष्टांची पराकाष्ठा करत ट्रांसस्क्रिप्ट पूर्ण केली. या काळात गुप्तांनी आपल्या आश्रयदात्याला संपर्क करणे कटाक्षाने टाळले होते. पुढची पावलं ते खूप सावधपणे टाकणार होते. लाकडी चकत्यांच्या शेवटच्या खंडात वर्णन केल्याप्रमाणे अनेक अभियांत्रिकी आणि वैद्यकीय गुपिते नव्याने उजेडात आली होती. गुप्ता खूपच उत्साहात होते. त्यांनी त्या वर्णनाहुकूम प्रयोग करायला सुरुवात पण केली होती. अर्थात ते आता शिवानीपासून काही लपवून ठेवत नव्हते. शिवानी पण त्यांच्या संशोधनकार्यात त्यांना समरसून साथ देत होती. त्यांच्या प्रयोगांना अभूतपूर्व यश मिळत होते. पण आता गुप्तांच्या चेहऱ्यावर एक दुःखाची लकेर मधूनच दिसून येत होती.

आज त्रयोदशी होती. शिवानी गुप्तांच्या समोर बसून काम करत होती. तिने अचानक गुप्तांना विचारलं "आपण आता फार एकत्र राहू शकणार नाही ना?" गुप्तांनी चमकून तिच्याकडे पहिले आणि त्यांनी विचारल "का? काय झालं शिवानी? असं का बोलते आहेस?" शिवानी उदास हसली आणि जड आवाजात म्हणाली "प्रोफेसर साहेब, थोडी फार दुनिया तर मी पण पहिली आहे. ज्या माणसाच्या चेहऱ्यावर बेदरकरपणा, महत्वाकांक्षा आणि करारीपणा दिसत होता, त्या माणसाच्या चेहऱ्यावर दोन तीन दिवस हि दुःखाची छटा का दिसते आहे? प्लिज माझं सांत्वन करायची गरज नाही. गेल्या काही दिवसात मी इतके मानसिक आघात मी पचवले आहेत कि आता काहीही सहन करायची माझी मानसिक तयारी झाली आहे. पण तुमचा माझ्यावर अजूनही विश्वास नाही आहे हे पाहून मला खूप वाईट वाटलं."

गुप्तांनी शिवानीला जवळ ओढून घेतलं आणि तिला कवेत घेत म्हणाले "शिवानी, या जगात मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेऊ शकतो. पण काही गोष्टींचा उच्चार करायला पण भीती वाटते. असो, आता कोंबड लपवून पहाट व्हायची काही टाळणार नाही तेव्हा तुझ्याशी स्पष्टच बोलतो. आपला सामना ज्या अतिमानवी शक्तींशी आहे त्या लढ्यात दोनच शक्यता आहेत एक म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश आणि दुसरी म्हणजे आपला आणि पर्यायाने शेकडो वर्षांच्या सभ्यतेचा विनाश. आपण आता या लढ्यातून माघार घेऊ शकत नाही. कारण त्या शक्ती आपला पाठलाग जगाच्या अंतापर्यंत सुरूच ठेवतील आणि त्यात खूप सारे निष्पाप जीव भरडले जातील. पण आता कुठे मला प्रेमाचा अर्थ समजू लागला होता आणि त्यात दुसऱ्या पर्यायाचा विचार केला तर.. त्या विचारानेच जीव कासावीस होतो." शिवानीने हळूच स्वतःला गुप्तांच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले आणि म्हणाली "आता मी तुम्हाला इतिहासातील दाखले द्यावे इतकी तर माझी पात्रता नाही पण आपली गत आता हॅनिबलसारखी झाली आहे. आपल्या मागे समुद्र आहे आणि पुढे शत्रू. आता आपल्याला जिंकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, पण याचा फायदा असा कि आपण आता आपल्या अस्तित्वासाठी लढणार आहोत आणि अशावेळी आपण आपली पूर्ण ताकद लावून शत्रूला नामोहरम करू. आपली बाजू न्यायाची आहे. जर या शक्तींना हरवण्यासाठी आपली नेमणूक नियतीने केली नसती तर आपल्याला आतापर्यंत जे यश मिळालं आहे ते मिळालं नसतं. मला नक्की खात्री आहे आपणच जिंकणार आहोत. तेव्हा आता अंतिम विजय सोडून दुसरा कुठलाही विचार नको. आपण आपलं लक्ष आपली योजना बनवण्यात एकाग्र केलं पाहिजे"

कस्तुरी कन्याWhere stories live. Discover now